तु असा जवळी रहा...( भाग२२ वा)

Story having shades of purity feelings emotions care responsibility and destiny..

# तु असा जवळी रहा..(भाग २२ वा)

©® आर्या पाटील

वाजणारा अनोळखी मोबाईल पाहून प्रथमदर्शनी श्रेयशला आश्चर्य वाटले पण पुढच्याच क्षणी आलेल्या कॉलवरून तो नंबर कोणाचा असेल हे कळायला उशीर लागला नाही. कॉलर आयडीला आभा आणि मंदारचा फोटो आणि 'माय लव्ह' म्हणून लिहिलेलं कॅप्शन त्याला आणखी भावनिक करून गेलं.

घाईगडबडीत मंदार तिथेच फोन विसरून गेला होता. त्याला फोन श्रेयशकडेच विसरल्याची आठवण होती फक्त खात्री म्हणून तो आभाच्या मोबाईवरून कॉल करून पाहत होता.

इकडे भावनाविवश झालेला श्रेयश मोबाईल न उचलताच तसाच किचन मध्ये आला. मंदारच्या कुशीत सामावलेली आभा आठवताच तो आणखी बैचेन झाला.

'का दिलीस एवढी मोठी शिक्षा मला आभा..? माझ्या हातून चुक घडली पण मी मुद्दाम काहीच नाही केले. त्या दिवशी अमित ऐवजी मीच मेलो असतो तर निदान या रोजच्या मरणयातनेतून सुटलो असतो. त्या दिवशी तुला गमावण्याची कल्पनाही सहन होत नव्हती आणि आज मात्र त्या वास्तवाला स्विकारत कसे काय जगू शकतो मी..? संसाराचं स्वप्न तर त्यादिवशीच भंगलं आणि आज या भंगलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात पाहून माझं आयुष्यच भग्नमूर्ती बनलं आहे..' स्वगत होत तो विखुरलेल्या काचांकडे सरसावला. पुन्हा एकदा डिप्रेशननं डोकं वर काढलं. तो भावनांच्या आहारी जाऊ लागला.फुटलेल्या काचेचा मोठा तुकडा हातात घेत त्याने हातातच जोरात दाबला. क्षणभरात रक्ताची चिरकांडी उडाली. भावनेच्या भरात त्याच काचेच्या तुकड्याने हाताची नस कापण्याची हिंमत अनावर झाली. त्याच तुकड्याला मनगटावर फिरविणार तोल दारावरची बेल वाजली. त्या आवाजाने तो भानावर आला.

' मी काय करतोय हे..? आईला वचन दिलय मी असा अविचार करणार नाही म्हणून.नशिबाने दिलेली शिक्षा जीवात जीव असेपर्यंत भोगणार पण भित्रेपणाने आयुष्य संपवणार नाही.' स्वगत झालेल्या श्रेयशने हातातला काचेचा तुकडा तात्काळ खाली टाकला.

दारावर मंदार आला होता. आपला विसरलेला मोबाईल फोन पुन्हा घ्यायला. त्याने पुन्हा बेलचं बटण दाबलं. वॉचमन असेल या विचारात श्रेयश तसाच रक्ताळलेला हात घेवून दरवाजा उघडता झाला.

" ते मी मोबाईल.." दारात उभा असलेला मंदार बोलतच होता की त्याचे लक्ष हातावर गेले.

" हे काय श्रेयश किती लागलय तुम्हांला. एवढं रक्त वाहतय म्हणजे जखम खोल असणार." त्याचा हात हातात घेत तो म्हणाला.

" जास्त नाही लागलेलं. विखुरलेल्या काचेचा तुकडा लागला हाताला. मी करतो बॅण्डेज. तुम्ही नका काळजी करू. तुमचा फोन. एक मिनिट देतो.." म्हणत तो आत वळणार तोच मंदारने त्याला धारेवर धरले.

" श्रेयश, ही साधी जखम नाही. काच खोलवर गेली असणार. म्हणूनच तर एवढ रक्त वाहतय. मी काही एक ऐकणार नाही तुम्हांला डॉक्टरकडे यावेच लागेल.जखम लवकर भरेल आणि आराम मिळेल. मी गाडी काढतो तुम्ही लवकर या.." म्हणत मंदार आत शिरला. मघासचा फर्स्ट एड बॉक्स बाहेरच होता. जखमेवर प्रथमोपचार करून रक्त थांबण्यासाठी त्याने पट्टी बांधून दिली आणि मोबाईल घेवून बाहेर पडला.

घरात जात गाडीची चावी घेतली.

" आभा, येतो अर्ध्या तासात अर्जन्ट काम आहे.." एवढाच काय तो निरोप देऊन तो घराबाहेर पडला.

कामात गुंग असलेल्या आभाच्या कानावर त्याचे शब्दही पडले नाहीत.

गाडी गेटबाहेर काढून त्याने हॉर्न वाजवला. मंदार ऐकणार नाही याची खात्री पटल्याने आणि खरच जखम खोल असल्याने श्रेयशनेही जास्त आढेवेढे घेतले नाहीत. 

घराबाहेर पडत तो ही गाडीत येऊन बसला.

थोड्याच उशीरात ते जवळच असलेल्या छोट्याश्या हॉस्पिटलमध्ये येऊन पोहचले.

डॉक्टरांनी तात्काळ पट्टी सोडून जखम साफ केली आणि पुन्हा बॅण्डेज केलं..

" मिस्टर श्रेयश, काचा गोळा करतांना झालेली जखम नाही ही.." श्रेयशला न्हाहाळत डॉक्टर म्हणाले.

मंदारही श्रेयशकडे आश्चर्याने पाहू लागला.

" आणखी कोणते मेडिसीन चालू आहे का..?" प्रिस्क्रीप्शनवर औषधे लिहिता लिहिता डॉक्टर म्हणाले.

त्यांच्या या प्रश्नावर त्याने एका औषधाचे नाव सांगितले.

चश्मा काढत डॉक्टरांनी चेहरा धीरगंभीर केला.

" लुक मिस्टर श्रेयश,डिप्रेशन ही गोष्ट गंभीर आहे पण त्याही पेक्षा त्यासाठी वापरली जाणारी औषधं शरिरासाठी जास्त घातक आहेत. शक्य असल्यास आपल्य माणसांत रहा. मनात सकारात्मकता ठेवा. संकटे असतील आयुष्यात पण स्वतः ला संपवणे हा उपाय नाही.." डॉक्टरांनी आपल्यापरीने समजावले.

मंदार श्रेयशकडे फक्त आश्चर्याने पाहत होता. श्रेयश डिप्रेशनमध्ये आहे हे तुरळक भेटींमध्ये कधीच जाणवले नव्हते त्याला. त्यामुळे विश्वास ठेवणे कठिण जात होते.

"तुम्ही यांचे मित्र का..? या अश्या काळातच मित्राची जास्त गरज असते. त्यांच्या सोबत रहा. आणि शक्य असल्यास त्या गोळ्या घेण्यापासून त्यांना परावृत्त करा.." डॉक्टरांनी मित्र या नात्याने मंदारलाही काही सूचना दिल्या.

मंदारने आश्वासक मान हलवली. डॉक्टरांची फिज देऊन प्रिस्क्रिप्शन घेतले.आणि श्रेयशला घेवून दवाखान्या बाहेर पडला. दवाखान्याला लागूनच मेडिकल स्टोअर होते. श्रेयशला गाडीत बसायला सांगून त्याने मेडिसीन आणले.

गाडी पुन्हा घराच्या दिशेने निघाली.

थोडा वेळ शांततेतच गेला.

आभाची आठवण येताच मंदारने फोन पाहिला. तिचे दोन तीन कॉल येऊन गेले होते. लागलिच त्याने तिला कॉल लावला.

" आभा, हात ठिक आहे ना. स्वयंपाक करू नकोस काही पार्सल मिळतं का बघतो. काळजी घे. आणि आराम कर." तो काळजीने म्हणाला.

पुन्हा एकदा श्रेयशच्या मनात कालवाकालव झाली. हाताच्या जखमेपेक्षा त्याच्या हृदयाची जखम जास्त खोल होती.

" असा कसा न सांगता गेलास. निदान कुठे जातोय हे तरी सांगायचे. त्यात फोन केला तर फोनही उचलला नाहीस. जीव टांगणीला लावायची सवय तुलाही व्हायला लागली आहे आता. काही पॉर्सल नको आणूस. मी बनवली आहे खिचडी. तु फक्त लवकर घरी ये.." तिने मनातली चिंता व्यक्त केली.

" हो राणीसरकार, चुकलो. पण तु कशाला स्वयंपाकघरात गेलीस...? आणि महत्त्वाचा मुद्दा मिस्टर श्रेयशही आपल्याकडेच जेवतील आज. त्यांनाच घेवून आलो होतो दवाखान्यात. घरी आल्यावर सविस्तर सांगतो.." म्हणत त्याने कॉल कट केला.

" मिस्टर श्रेयश, तुमचं लग्न झालं आहे का हो..?" श्रेयशची तंद्री तोडत तो म्हणाला.

" नाही.." उसणं स्मितहास्य करित श्रेयश म्हणाला.

" मग हेच आहे तुमच्या दुःखाचं मूळ.. एखादी चांगली मुलगी बघा आणि लग्न करून घ्या.. बायको म्हणजे आपली सावली असते.आपल्या सुख दुःखावर हक्काने पांघरलेली. दुःखाच्या उन्हात आपल्याला विसावा देणारी तर सुखाच्या विसाव्यात आपल्यात सामावून जाणारी. तिच्याएवढी जवळची व्यक्ती कोण नसते जी आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखते.सो या मित्राची एवढी विनंती नक्की ऐका. बाकी कसलीही गरज लागल्यास मित्र या नात्याने हक्काने सांगा." म्हणत मंदारने पुन्हा एकदा चांगुलपणाचे दर्शन घडविले.

" मिसेस कर्णिक खूप नशिबवान आहेत. तुमच्यासारखी व्यक्ती नवरा म्हणून मिळाली आहे त्यांना.. यु आर रियल जेम.." श्रेयशनेही त्याच्या चांगुलपणाचे मनापासून कौतुक केले.

" खरा नशिबवान तर मी आहे.." स्मितहास्य करित मंदारने उत्तर दिले.

" मंदार, ते जेवायचं राहू द्या. मी मागवेन पार्सल काहीतरी. मिसेस कर्णिकांना उगा त्रास. आधीच त्यांच्याही हाताला लागलय.."आभाच्या घरी जाण्याचे टाळण्याच्या उद्देश्याने श्रेयश म्हणाला.

" तुम्ही काळजी करू नका. मी आहे तिच्या मदतीला. आता निदान दोन तीन दिवस तरी घरचं खा.. जखम लवकर भरून येईल. मी आभाला सांगून देईन डब्बा दोन दिवस.." म्हणत मंदारने त्याला समजावले.

" खरच याची काहीच गरज नाही.." श्रेयशने पुन्हा नकारघंटा वाजवली.

" यावर मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. आम्ही आलो म्हणूनच हे घडलं.. म्हणजे बरणी फुटली आणि तुम्हांला लागलं.. मग एवढं तर आम्हांला करावच लागेल. सो हे फायनल आता तुम्ही माझ्यासोबत घरी येत आहात. आणि पुढचे दोन दिवस माझ्या घरातून तुम्हांला डब्बा मिळणार.." आता मंदारने स्पष्टच सांगितले.

" पण.." श्रेयश काही बोलणार तोच मंदारने त्याला पुन्हा एकदा शांत बसविले.

त्याच्या आग्रहासमोर श्रेयशचाही नाइलाज झाला. त्याला तयार व्हावेच लागले.

थोड्याच वेळात ते बंगल्यात येऊन पोहचले.

कितीही राग केला तरी ज्याच्यावर जीव उधळून दिला होता त्याला काही झालय हे ऐकून आभाला काळजी वाटू लागली होती. त्यानेही तर प्रत्येक वेळेस तिची जीवापाड काळजी घेतली होती. आयुष्याचं समीकरण जरी बदललं असलं तरी हृदयातील जाणीवा नव्हत्या बदलता येत.

मंदारच्या मागून श्रेयश तोच अपराधीपणाचा शेला पांघरुण त्याच्या घरात आला.

" हे फ्रेन्ड, काय झालं तुला..? आईसारखं तुलाही लागलं का..?" त्याचा पट्टी बांधलेला हात पाहून छोटी श्रेया काळजीने म्हणाली.

तिचा आवाज ऐकून आभाही किचनबाहेर आली. नजर श्रेयशच्या हातावर जाताच काळजात कालवाकालव झाली. पण ती जाणिवपूर्वक क्षणीक ठेवून पुन्हा आत शिरली. पाण्याचे ग्लास भरून तिने दोघांना पाणी आणले.

" मिस्टर श्रेयश, काय झालं हाताला..?" त्याच्याकडे न पाहताच तिने प्रश्न केला.

" काचा गोळा करतांना लागलं.. खूप काही नाही.." तो ही जखमेकडे पाहत म्हणाला.

" खूप काही कसे नाही. जखम खोल आहे डॉक्टरांनी दोन वेळा ड्रेसिंगला बोलावलं आहे. आताही जबरदस्तीने आणलं यांना जेवायला. आणि पुढचे दोन दिवस आपल्या घरूनच डब्बा येईल हे ही स्पष्ट सुनावलं.." आभाकडे पाहत मंदार म्हणाला.

आभाने आश्चर्याने मंदारकडे पाहिले. त्याने मान हलवित जणू तिची परवानगी मागितली. पाण्याचे ग्लास घेवून ती आत गेली. मंदारही तिच्या मागे किचनमध्ये शिरला.

" सॉरी, तुला त्रास दिला.पण खरच त्यांची अवस्था नाही बघवली माझ्याने. त्यात ते कसल्याश्या डिप्रेशन मध्ये असल्याचे कळले. काच लागली की त्यांनी लागून घेतली हे कोडच आहे. आपल्या श्रेयाला वाचवलं आहे त्यांनी निदान माणुसकीच्या नात्यात त्यांच्यासाठी एवढं तरी करूच शकतो ना आपण..." मंदारने सारं खरं खरं आभाला सांगितलं..

त्याचा प्रत्येक शब्द तिच्या जिव्हारी लागला. डोळ्यांत भावनांनी गर्दी केली. मंदार समोर असल्याने स्वतःला सावरणे जास्त महत्त्वाचे होते.

" हो मी करेन त्यांच्यासाठी जेवण. तु नको काळजी करूस. आय ॲम रियली प्राउड ऑफ यू. त्यांच्याजागी दुसरं कोणी असतं तरी तु हेच केलं असतं.." म्हणत तिने नजर दुसऱ्या बाजूने फिरवली.

" आणि मला खात्री होती की तु ही याला नाही म्हटलं नसतं.." म्हणत त्याने तिला त्याच्या दिशेने वळवले.

तिचे भरून आलेले डोळे टिपीत त्याने कपाळावर स्पर्शखुण उमटवली..

" किती गं तु हळवी. प्रत्येकासाठी तुझ्या डोळ्यांत पाणी असतं.. वेडाबाई. चल आता तु जाऊन खुर्चीवर बस. जेवण वाढायचं मी बघतो.." म्हणत त्याने किचनचा ताबा घेतला.

तिने कितीही नकोचा तगादा लावला तरी तो थोडाच ऐकणार होता. जेवणाची ताटं घेण्यापासून ते वाढण्यापर्यंत सगळच त्याने केलं. श्रेयशला त्यांच्या सुखी संसाराला नजर लावायची नव्हती त्यामुळे त्यांच्या सहजीवनापासून आपल्या हृदयाच्या वेदनेला जेवढं दूर ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला.

जेवणानंतर थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर मात्र श्रेयश घरी जायला उठला. दरम्यान श्रेयाला झोपविण्यासाठी म्हणून मंदारही आत बेडरूममध्ये आला.

खाली एकट्या राहिलेल्या आभाला तो एकांतवास जीवघेणा वाटला.. तिच्याशी काहीही न बोलता श्रेयश निघाला.

"स्वतःचा नाही निदान मॅडम आणि सरांचा तरी विचार करा. तुम्हांला काही झालं तर कसे जगतील ते.?" विरुद्ध दिशेला तोंड करित ती म्हणाली.

" त्यासाठी आईबाबा जिवंत असायला हवेत. माझ्या अपराधाची शिक्षा देवाने त्यांना दिली आणि माझं जग कायमचं हिरावून घेतलं माझ्यापासून.." एवढच काय ते म्हणत तो तसाच निघून गेला.

त्याच्या शब्दांनी आभाला मात्र भावनांचा धक्का बसला. पाठमोरी ती त्याच्या दिशेने वळली पण तोपर्यंत हक्काचं दुःख घेवून तो निघून गेला होता.

क्रमश:

©® आर्या पाटील.

🎭 Series Post

View all