तु असा जवळी रहा...(भाग २१ वा)

Story having shades of purity feelings emotions care responsibility and destiny...

तु असा जवळी रहा..( भाग २१ वा)

©® आर्या पाटील

(खूप मोठ्या अंतराने या कथेचा पुढचा भाग पोस्ट करित आहे.. काही वैयक्तिक कारणाने लिखाण पूर्णपणे थांबले होते. वाचकांना खूप वेळ वाट पाहावी लागली त्याबद्दल मनापासून क्षमस्व. पण कौंटुबिक जबाबदाऱ्या नाही टाळता येत. पुन्हा नव्याने या कथेचा श्रीगणेशा करतांना आनंद होत आहे. यापूर्वी जसे तुम्ही कथेला भरभरून प्रेम दिले तसेच पुढेही द्यावे ही विनंती. यापुढे कथेचे भाग रेग्युलर पोस्ट होतील याची शाश्वती देते. पुन्हा एकदा मनापासून क्षमा मागते.. धन्यवाद.)

कथा आतापर्यंत- कथेच्या सुरवातीला आपण भेटलो एका त्रिकोणी कुटुंबाला आभा, मंदार आणि त्यांची लेक श्रेया. आनंद, सुख, समाधान सारच होतं त्यांच्या आयुष्यात पण त्या सुंदर जगण्याला भूतकाळाची दुखरी किनारही होती. आभाच्या भावाचा अमितचा ॲक्सिडेन्ट, त्यानंतर तिचं तडकाफडकी झालेलं लग्न, या दुःखातून मंदारचं तिला आणि तिच्या आईवडिलांन सावरणं, श्रेयाचा जन्म.. साऱ्या साऱ्या घटना आपण अनुभवल्या. भूतकाळाला विसरून वर्तमानकाळात जगत असतांना अचानक तो पुन्हा तिच्या आयुष्यात आला.. तो श्रेयश.. ज्याच्यासोबत तिने सातजन्माच्या सोबतीची स्वप्ने पाहिली होती. श्रेयशच्या हातून अमितचा ॲक्सिडेन्ट झाला आणि क्षणात स्वप्नांना विरहाची अग्नी मिळाली. त्याक्षणी दोघांच आयुष्य पार बदललं. श्रेयशने आयुष्यभराचं दुःख ओंजळीत टाकत आभाच्या जगण्याची आशा संपवली होती. तो तिच्यासाठी परिकथेतला राक्षस बनला होता..तो प्रवास आपण वाचलाच आहे.

नियती मात्र काही बदलू पाहत होती म्हणूनच की काय कोण जाणे त्या घटनेनंतर पाच सहा वर्षांनी श्रेयश आणि आभा पुन्हा भेटले. एकाच ऑफिसमध्ये काम करणारे, एकमेकांच्या समोरच्या बंगलात राहणारे ते दोघे जीवनातील सर्वात मोठ्या दुःखातून जात होते. आपल्या भावाच्या मारेकऱ्याला समोर पाहणं हे आभाचं दुःख आणि आपल्या प्रेमाला दुसऱ्या कोणासोबत संसार करतांना पाहणं हे श्रेयशचं दुःख. यात आभाच्या लेकीची श्रेयाची आणि नवरा मंदारची श्रेयशसोबत जुळलेली मैत्री आपण अनुभवली. ऑफिसमध्ये साप समोर आल्यानंतर श्रेयाला वाचविणारा श्रेयश मंदारसाठी देवदूतच ठरला आणि त्यासाठीच त्याचे आभार मानायला आभाला घेवून तो त्याच्या बंगल्यावर पोहचला. बंगल्यावर घडलेल्या प्रत्येक घटनेने हृदयाचा ठाव घेतला. श्रेयश आपणा साऱ्यांचा आवडता बनला तर मंदारने हृदय जिंकून घेतले.

भूतकाळाचं दुःख श्रेयश तरी किती लपविणार. आभाला मंदारच्या कुशीत पाहून अजून किती वेळ खोटं हसू चेहऱ्यावर दाखवणार. त्याला भेटून जेव्हा मंदार, आभा आणि श्रेया घरी परततात तेव्हा सुरु होतो श्रेयशचा आठवणींचा प्रवास.. जेथे त्याला बालपणीची आभा, तिच्यासोबत जगलेले सुंदर क्षण, मैत्रीची प्रेमात होणारी परिपूर्ती, शिक्षणासाठी सहन केलेला विरह, आणि विरहाने बहरलेलं प्रेम सारच आठवतं.. याच गोड आठवणींना पुढे नेतांना वाचा पुढचा भाग)

मैत्रीच्या नात्याला प्रेमाचा परिसस्पर्श झाला आणि दोघांच्या जीवनात सोनियाच्या क्षणांची बरसात झाली जणू. दुरावा संपला होता आणि सहवासाला सुरवात झाली होती. साऱ्या मर्यादा पाळून ते तो सहवास जगत होते...

आभा जवळच्या नर्सरीत काम करित होती. श्रेयशचा दिवसही ऑफिसच्या कामातच जायचा. पण त्या वेळातही जेव्हा शक्य होईल आणि जसं शक्य होईल ते एकमेकांशी संवाद साधत होते..

शनिवार आणि रविवारची नदीतीरावरची भेट ठरलेली असायची..

विरहानंतर बहरलेलं नातं दिवसेंदिवस परिपक्व होत होतं..

एव्हाना अमितची ही बारावी पूर्ण होईन तोही कम्प्युटर इंजिनिअरिंग करू लागला होता.. त्याच्या ॲडमिशनच्या वेळी श्रेयशने खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. अगदी कॉलेज निवडण्यापासून ते त्याला पहिल्यांदा हॉस्टेलला सोडण्यापर्यंत श्रेयश त्याच्या सोबत होता.

त्यांच्या अश्या जवळ येण्याने आभाही खूप आनंदित होती. त्यांच्यातील सारा मनमिटाव दूर व्हावा आणि चांगल्या नात्याची नांदी व्हावी एवढीच काय ती तिची इच्छा.. दोघेही तिच्या हृदयाच्या तेवढ्याच जवळ होते त्यामुळे एकालाही त्रासात नव्हती पाहू शकत ती.

" थँक यू श्रेयश.. अमितचा एवढा विचार करतोस हे पाहून खूप चांगले वाटले.." एक दिवस आभा म्हणाली.

" मी सगळं फक्त तुझ्यासाठी करतो.." म्हणत त्याने भलेही त्यांच्या नात्याची सकारात्मकता नाकारली असली तरी तिला खात्री होती की लवकरच सगळं सुरळित होईल.

जरी त्यांनी मर्यादा पाळत नातं स्विकारलं असलं तरी त्याचं असं भेटणं लोकांच्या नजरेत भरत होतं. लफड्याचं शीर्षक लावून लोकांनी त्यांच्या प्रेमाला चर्चेचा विषय बनवलं.. जेव्हा ही गोष्ट आभाच्या पालकांच्या कानावर पडली तात्काळ त्यांनी सरपोतदार दाम्पत्यांची भेट घेतली.

श्रेयश सारखा मुलगा शोधून सापडणार नव्हता. आणि त्याचं लहानपणापासून बहरत गेलेलं नातं दोघांच्या पालकांपासून लपलं नव्हतं..

" सर आणि मॅडम, त्या दोघांचं नातं आपल्यापासून लपलेलं नाही.. लोकं नको नको ते बोलून अर्थाचा अनर्थ करित आहेत. मुलीचा बाप म्हणून तुम्हांला विनंती आहे या नात्याबद्दल विचार करावा.. मला माहित आहे आपली बरोबरी होऊ शकत नाही.. पण मुलांच्या सुखासाठी.." आभाचे बाबा बोलत होतेच की श्रेयशच्या बाबांनी त्यांना मधेच अडवले.

" हीच का आपली मैत्री पाटील..? आम्हांला एवढच ओळखलं का तुम्ही की हात जोडून विनंती करता..

आभा कालही आमचीच होती,आजही आमचीच आहे आणि उद्याही आमचीच राहिल..फक्त सून म्हणून नाही तर लाडकी लेक म्हणूनही... या दिवसाची वाट आम्ही दोघेही तेवढ्याच आतुरतेने पाहत होतो. आणि आज तो क्षण आला.. लोकं काय हो त्यांनी देवाला नाव ठेवायला सोडलं नाही तर आपल्या मुलांना कसे सोडतील. पण आपला त्यांच्यावरील विश्वास महत्वाचा. थोडा वेळ वाट पाहू.. मुलांनी सांगितलं तर ठिक नाही तर घेऊ विषय.. आम्ही ही खूप आतुर आहोत. कधी एकदा आभा या घरात येऊन घराला घरपण देते असं काहिसं झालं आहे आमच्या मॅडमनाही.." श्रेयशच्या आईकडे पाहत त्याचे बाबा म्हणाले.

श्रेयशच्या आईनेही स्मितहास्य केले..

" आभाच्या आई तुमची काळजी समजू शकते पण निष्चिंत रहा..आपली मुलं समजूतदार आहेत.. ते काहीही चुकीचं वागणार नाहीत. थोडा वेळ देऊया त्यांना. ते स्वत:हून कबूली देतील त्यांच्या नात्याची..." आभाच्या आईला समजावत श्रेयशची आई म्हणाली..

आभाच्या आईवडिलांना सकारात्मक दिलासा मिळाला.

आता वेध होते ते त्यांच्या कबूलीचे.

लाजरा बुजरा श्रेयशतरी एवढ्या लवकर लग्नासाठी आभाला मागणी घालेल ही आशा कमीच होती.. प्रेम भरभरून करणारा तो ते व्यक्त करतांना नेहमीच मागे पडायचा..

" श्रेयश, आपण घरी सांगायला हवं आपल्या नात्याबद्दल.." एकदा नदीतीरावर बसलेली आभा श्रेयशचा हात हातात घेत म्हणाली.

" एवढ्यात घाई नको. योग्य वेळ आली की सांगूया.." तिला समजावत तो म्हणाला.

" योग्य वेळ..? अजूनही वेळेची गरज आहे..?" तिने प्रश्नचिन्ह निर्माण केला.

" वेळेची गरज मला आहे. सगळं चांगलं होत असतांना का कोण जाणे पण मन घाबरतं.." म्हणत त्याने मनातली भीती व्यक्त केली..

" आपण एकमेकांच्या सोबत आहोत मग घाबरण्याचं काय कारण..? आणि वेळेचं म्हणशील तर माझं आयुष्यही तुझच आहे. फक्त उशीर व्हायला नको एवढच वाटतं.." त्याच्या खांद्यावर डोकं टेकवित ती म्हणाली.

" हम्म.." एवढच काय ते म्हणत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरविला.

आता त्यालाही कळून चुकले होते की उशीर करून फायदा नाही पण वळत मात्र नव्हते. अजूनही घरच्यांशी कसं बोलायचं ही विवंचना होतीच. सरपोतदार मॅडम आणि सर यांच्याशी बोलण्या बाबतीत दडपण नव्हते पण आभाच्या आईवडिलांशी कसे बोलायचे हे राहून राहून वाटत होते. चुकीचं काही नव्हतं पण त्यांना काही चुकीचं वाटणार नाही ना याचचं काय ते दडपण. अन् अमित होताच. तो काय रियॅक्ट करेल..?आभा आणि अमितच्या नात्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत ना.? अश्या एक ना अनेक शंका त्याला छळित होत्या.

इकडे गावातील लोकांची आभा आणि श्रेयशच्या बाबतीत सुरु असलेली कुजबुज, आभाचं वाढतं वय यामुळे तिच्या आईवडिलांना मात्र चैन पडत नव्हता. सरपोतदार दाम्पत्यांना त्यांची अगतिकता कळत होती पण श्रेयशने स्वतःहून नात्याची कबूली देणे हे ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.

शेवटी या साऱ्या समस्यांचं कायमस्वरूपी निवारण व्हावं यासाठी आभाच्या आई वडिलांना सोबतीला घेवून त्यांनी एक शक्कल लढवली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते दोघेही श्रेयशच्या घरी पोहचले. रविवार असल्याने श्रेयशही घरीच होता.

" आपल्या आभासाठी चांगलं स्थळ सांगून आलय. आभा जेवढी आमची आहे तेवढीच तुमचीही आहे. म्हणून तुमच्या कानावर घालायला आलो आहे. मुलगा इंजिनियर आहे. सुखात राहिल आपली आभा.." त्या तिघांना एकत्र करून आभाच्या बाबांनी विषयाला हात घातला.

त्यांचे शब्द कानात गरम तेल ओतल्यागत श्रेयशला वेदना देऊन गेले. आभाचं नाव दुसऱ्या कोणासोबत जोडलं जातय ही कल्पनाही त्याला नकोशी झाली. तो तात्काळ तेथून बाहेर पडला. बाहेर पडताच त्याने आभाला फोन लावला आणि जशी असशील तशी तातडीने घरी येण्याचे सांगितले.

त्याचं असं तडकाफडकी बोलावणं आभालाही धक्कादायक वाटलं. ती लागलीच घरातून निघाली आणि श्रेयशच्या घरी पोहचली. एव्हाना श्रेयश आपल्या रुममध्ये निघून गेला होता.

अजूनही त्यांच्या आईवडिलांना अपेक्षित असं काहीच घडलं नव्हतं.

थोड्याच वेळात धापा टाकत आभा सरपोतदारांच्या बंगल्यात येऊन पोहचली.

" मॅडम, श्रेयश कुठे आहे..? तो बरा आहे ना.? त्याने एवढ्या तडकाफडकी का बोलावलं..?" ती श्वास रोखत म्हणाली.

" तु आधी श्वास घे. मी बोलावते त्याला.." तिला सोफ्यावर बसवीत मॅडम काळजीने म्हणाल्या.

खोलीच्या दाराला कान लावून बसलेल्या श्रेयशने एव्हाना तिचा कानोसा घेतला होता. मनाशी निर्धार करून त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर आला.

" श्रेयश अरे काय झालं..? तु ठिक आहेस ना..? असं का बोलावलस.?" त्याला येतांना पाहून ती त्याच्या दिशेने सरसावली.

" आभा, मी म्हणालो होतो ना की मला वेळ हवाय.. आता हिच ती वेळ आहे. 

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आभाळातील चांदण्या नाही आणू शकत पण सुखाच्या चांदणप्रकाशात उजळून काढेन आपला संसार.. तुझ्या डोळ्यांत कधीच पाणी येऊ देणार नाही असं नाही म्हणणार पण हे पाणी फक्त आनंदाचं असेल याची नक्कीच काळजी घेईन. तुझ्या वाटेत कधीच काटे येऊ देणार नाही याची शाश्वती नाही देणार पण त्या काट्यांवर माझे तळहात असतील नेहमीच फुलं बनून तुला आधार द्यायला.. सांग होशील माझी जन्मोजन्मी..? मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत.." आपल्या गुडघ्यावर बसत तो म्हणाला.

सगळं अपेक्षित तेच पण अनपेक्षितपणे घडतांना पाहून दोघांच्या आईवडिलांना आनंदाचा सुखद धक्काच बसला जणू..

काही क्षण आभाला आपण सुखाच्या आभाळात स्वच्छंदी विहार करित आहोत असे काहिसे वाटले.

पण पुढच्याच क्षणी समोर आईबाबांना आणि सरपोतदार दांम्पत्यांना पाहून आभाला ओशाळल्यागत झाले.

तिने हातांचा पडदा करित चेहरा झाकला. तिला पहिल्यांदा असे लाजतांना पाहत होते सारेच.

पुढे जात सरपोतदार मॅडमने तिच्या चेहऱ्यावरून हात बाजूला केला. तशी ती त्यांच्या कुशीत झेपावली.

" आभा, उत्तर दे माझ्या लेकाला. वाट पाहतोय तो.." तिच्या डोक्यावरून हात फिरवीत मॅडम म्हणाल्या.

तिने लाजरा दृष्टिक्षेप श्रेयशवर टाकला. आणि दुसऱ्याच क्षणी नजर आईवडिलांच्या दिशेने वळवली. त्यांनी डोळे मिटून संमती दर्शवली.. तिच्या चेहऱ्यावरची लाजेची लाली आणखी गडद झाली. सगळच अनपेक्षित होतं पण सुखद होतं.

तिने डोळ्यांनी त्याला होकार दिला. तो फक्त होकार नव्हता ती होती नांदी.सुखाची,आनंदाची आणि आजन्म सोबतीची.

त्या होकाराने त्याला स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. गुडघ्यावरून उठत तो आभाच्या आईवडिलांकडे वळला.

"आईबाबा तुमच्या लेकीला आनंदात ठेवण्याची तुमची जबाबदारी स्विकारायची आहे मला..? आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर..पण या प्रेमाला कसलं दूषण लागेल असे वागलो नाहीत आम्ही. तुमच्या संस्कारांना तडा जाईल असं कोणतच पाऊल कधीच उचललं नाही. धाकधूक एवढीच होती की तुम्ही काय विचार कराल. तुमच्या छायेखाली लहानाचा मोठा झालो आहे म्हणून असेल कदाचित.. पण आज जेव्हा आभाच्या लग्नाचा विषय निघाला सगळीच धाकधूक संपली. तिला कायमचं गमावेन या भावनेने कातर झालो. माझं काही चुकलं असल्यास माफ करा आईबाबा.." तो खाली मान घालित म्हणाला.

" श्रेयश, तु आमचा अभिमान आहेस. भाग्य लागतं जावयाच्या रुपात मुलगा मिळाला.आम्हांला खात्री आहे तु आभाला सुखात ठेवशील. सरपोतदार सर आणि मॅडमच्या रुपात आईवडिलांचा भक्कम आधार मिळेल लेकीला. मग आणखी काय हवं..?आजचा हा दिवस सोनियाचा दिन आहे आमच्यासाठी. आभाला तुमच्याकडे सोपवतांना धन्य झालो आज.." हात जोडत तिचे बाबा म्हणाले.

" आहो हे काय करता. तुम्ही नाही धन्य तर आम्ही झालो. सून नाही लेकच मिळाली आहे या घराला. तुम्ही तुमच्या काळजाच्या तुकड्याला आमच्या ओंजळीत टाकून खूप मोठं काम केलं आहे. याचे ऋण नाही फिटणार कधीच. आभाला आम्हीही आमच्या काळजाचा तुकडा म्हणूनच सांभाळू.." आभाच्या बाबांचे जोडलेले हात हातात घेत सरपोतदार सर म्हणाले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांना आलिंगन देते झाले.

सुखाच्या सरींनी सगळेच चिंब न्हाहून निघाले होते. आता वेध लागणार होते ते त्यांच्या लग्नाचे. अगदी विधीवत, धुमधडाक्यात आभाला सून करून आणायचे होते सरपोतदार दाम्पत्यांना. 

त्याच दिवशी संध्याकाळी नदीतीरावर भेटलेले श्रेयश आणि आभा एका वेगळ्याच जाणिवेने शहारले गेले होते.

सहजीवनाची चाहूल त्यांना सुखावत होती.

आज आभाच्या बहरलेल्या रुपाचं चांदणं श्रेयशच्या काळजावर उमटलं होतं जणू. कितीतरी वेळ तिला एकटक न्हाहाळत होता तो.. एवढ्या वेळ जपलेली संस्कारांची सीमा ओलांडून त्याने तिला बाहुपाशात सामावून घेतलं.. तिच्यासाठी सुखद धक्का होता तो. त्याच्या कुशीत तिच्या प्रेमाची पूर्ती झाली. आपले हात त्याच्याभोवती घट्ट करित तिनेही अंतर संपवले. तिची त्याच्याभोवतीची मिठी घट्ट होताच तो भानावर आला. पुढच्याच क्षणी ती मिठी सोडवत तिच्यापासून बाजूला झाला.

" श्रेयश, आता नको कसल्याच मर्यादा. मला तुझ्या कुशीतच राहायचं आहे असच सुरक्षित.. माझा हक्क नको हिरावून घेवूस.." म्हणत ती पुन्हा त्याच्या कुशीत शिरली.

आता मात्र त्यानेही तिला पुन्हा सामावून घेतले.. क्षितीजावर दिवस रात्र एक व्हावे त्याप्रमाणे दोघेही एकमेकांमध्ये विसावले आपल्या प्रेमाच्या संधीप्रकाशात न्हाहून निघत..

तोच फोन वाजला आणि भूतकाळात हरविलेला श्रेयश भानावर आला. क्षणभर का होईना आज त्या भूतकाळाने त्याला नव्याने जगवले होते. तो जगला होता आपल्या आभासोबत, तिच्या आठवणींसोबत आणि त्याच्यावर रुसलेल्या सुखासोबतही..

पाहुया पुढे कोणतं वळण घेतं त्याचं आयुष्य..

क्रमशः

©® आर्या पाटील

कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

🎭 Series Post

View all