तु असा जवळी रहा...( भाग १ ला)

Love story having shades of purity,feelings, emotions,care, responsibility and destiny....

# तु असा जवळी रहा....( भाग १ ला)

©आर्या पाटील

****************************************

गावाच्या वेशीतून गाडी आत शिरली.. आभाच्या काळजात पुन्हा तीच धाकधूक सुरु झाली... आठवणींनी मनाच्या गाभाऱ्यातून हलकेच डोकं वर काढलं... त्या नकोश्या आठवणींनी हृदय पुन्हा कातरलं गेलं.. डोळ्यांनाही भार सोसला नाही... मनाची तगमग थांबली आणि अश्रूंचा बांध फुटला...

" ये आई, काय झालं गं...? तु रडतेस..? नको ना रडू गं..?" छोटी श्रेया रडवेली होऊन म्हणाली..

" अगं तुझी आई तिच्या आईला खूप दिवसांनी भेटणार आहे.. आईला भेटायच्या ओढीने पाणी आलं बघ डोळ्यांत.. तु नाही का सकाळी उठल्यावर घरात आई दिसली नाही की घर डोक्यावर घेतेस... तुझी आई तुझ्यापेक्षा कमीच रडतेय.." आभाकडे पाहत मंदार म्हणाला...

तशी आभाही भानावर आली... पाण्याला डोळ्यांत आणि भावनांना पुन्हा मनांत साठवत तिने चेहऱ्यावर उसने अवसान आणले..

" नाही गं बेटा.. नाही रडत बघ.. आता आईला भेटणार म्हणून आनंदाचे अश्रू आले बघ डोळ्यांत.." श्रेयाला जवळ घेत आभा म्हणाली..

" अय्या... आपण हसल्यावर पण डोळ्यांत पाणी येते..?" भाबडी श्रेया निरागसपणे विचारती झाली..

" मग... तुझ्या आईच्या डोळ्यांत येते बुवा हसतांनाही पाणी.." म्हणत मंदारने आरश्यातून आभाकडे पाहिले..

तशी आभानेही नजरेला नजर दिली...

" तुझे बाबा जवळ असल्यावर फक्त आनंदानेच डोळे भरून वाहतात.." आभाच्या शब्दांनी मंदारची कळी मात्र खुलली..

पाहता पाहता गाडी आभाच्या माहेरी येऊन पोहचली..

" श्रेया, घरात गेल्यावर दंगा नाही करायचा.. तुझ्या मामासाठी पुजा ठेवण्यात आली आहे.. आई आणि आजी यांच्या डोळ्यांत पाणी दिसले तरी त्यांना विचारायचे नाही.." मंदार लेकीला समजावून सांगत होता..

" मी कशाला विचारू..? आता मला माहित झालेय त्या हसतांनाही डोळ्यांत पाणी येतं... पण बाबा.. मामाला का रे बाप्पा घेवून गेला..? मला भेटायचे होते त्याला.." श्रेयाच्या भाबड्या प्रश्नाने आभा पुन्हा अगतिक झाली..

गाडीचा दरवाजा उघडत ती घराच्या दिशेने वळली आणि आत शिरली...

मागे राहिलेल्या मंदारने गाडीतील सामानाची पिशवी काढली आणि छोट्या श्रेयाला घेवून घरात आला..

समोर हॉलमध्ये आभाच्या छोट्या भावाची अमितची फोटोफ्रेम ठेवली होती.. एखाद्या हिरोसारखा देखण्या असलेल्या त्याच्या तसबीरीवरची फुलांची माळ बघणाऱ्याचे डोळे आरक्त करून जात होते..

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतांना अमित एका अपघातात साऱ्यांच्या मनाला घोर लावून गेला..

अपघात कसला जीवघेणी थष्टा होती नशिबाची..

गावाच्या वेशीवर मित्रांसोबत फेरफटका मारायला गेलेल्या अमितला एका कारने उघडवले.. यात त्याच्या मेंदूला जबरी मार बसला आणि जाग्यावरच त्याने प्राण सोडले..

मघाशी गावच्या वेशीतून आत येतांना गतकाळाची हिच दुखरी जखम आभाच्या डोळ्यांतून भळाभळा वाहत होती..

या घटनेला आज पाच वर्षे सरली पण तिच्यासाठी, तिच्या आईवडिलांसाठी सारं तिथेच थांबलं होतं.. या घटनेनंतर सहा महिन्यातच आईवडिलांच्या आग्रहाखातर तिने मंदार सोबत लग्न केले.. गावातून, बालपणीच्या आठवणीतून, अमितच्या दु:खातून शरिराने बाहेर पडली पण मन मात्र अजूनही त्याच्याभोवतीच पिंगा घालित होते..

पाठचा भाऊ होता तो... लहान भावावर प्रत्येक मोठ्या बहिणीची आईसारखी माया असते.. बहिणीच्या रुपात आईपण ती ही जगली होतीच.. अमितचाही खूप जीव होता आभावर.. तिला चिडवणे हा तर त्याचा आवडीचा छंद.. पण तिच्या डोळ्यातले पाणी सहन नाही व्हायचे त्याला.. बहिण भावाच्या प्रेमामध्ये तिसरी व्यक्ती त्याला नकोशी असायची.. जीव ओवाळून टाकायचा तो आभावर.. सुखाचा मळा फुलला होता त्यांच्या आयुष्यात.. पण नियती अवकाळी पाऊस बनून आली आणि क्षणात आयुष्य उद्धवस्त करून गेली..

पाच वर्षांत असा एकही दिवस नव्हता ज्या दिवशी अमित आठवला नसेल...

अमितच्या आठवणींना पुन्हा एकदा श्वासात भरत ती फ्रेमपाशी पोहचली..

प्रतिमा डोळ्यांतल्या पाण्यामुळे जरी धूसर दिसत असली तरी तिच्या मनाच्या गाभाऱ्यात अमित तिला कडकडून मिठी मारत होता..

मंदार श्रेयाला घेऊन तिच्या मागेच पोहचला...

पिशवीतून सोनचाफ्यांच्या फुलांची माळ काढून त्याने आभाच्या हातात दिली...

आठवांच्या पसाऱ्यात तिला क्षणभर घेरी आली.. तोच श्रेयाचा हात सोडत तिचा जाणारा तोल मंदारने सावरला..

" आभा, सावर स्वत: ला.. आईबाबांना आणखी त्रास होईल.." म्हणत त्याने तिच्या हाताला आधार देत सोनचाफ्याची माळ अमितच्या फोटोफ्रेमला अर्पण केली..

तिचा हात पकडत तिच्या आईजवळ नेऊन बसवले..

आईजवळ जाताच दोघींच्या अश्रूंचा बांध फुटला.. एकमेकींच्या कुशीत शिरून दोघीही मनभरून रडत होत्या.. मायेची भूख अर्धवट सोडून त्यांचं वासरू कायमचं दृष्टीआड झालं होतं.. कधीही न संपणारं दु: ख मागे सोडत..

आईकडून उठत आभा बाबांजवळ पोहचली..

पहाडासारखा माणूस तिच्या कुशीत शिरत हंबरठा फोडत होता..

बापमाणसाचं दु:ख आज लेकीच्या कुशीत रितं होत होतं..

ज्याच्या खांद्यावर आपली अंत्ययात्रा निघावी असे वाटत होते त्याच्याच अंत्ययात्रेला खांदा दिलेल्या बापाच्या दु:खाची कल्पना न केलेलीच बरी..

श्रेया सारच निरागसपणे न्हाहाळत होती.. भाबड्या मनाला त्यांच्या दु:खाची व्याप्ती कळत नव्हती पण सारं पाहून तिलाही रडायला येत होतं..

मंदारने तिला अमितच्या फोटोसमोर उभी केली.. आणि हात जोडण्याचा इशारा केला..

कितीतरी वेळ ती मातीआड गेलेल्या आपल्या मामाला जवळून निरखून पाहत होती..

" मामा, तु का गेलास निघून मला न भेटता..? माझे लाड पुरवून घ्यायचे होते तुझ्याकडून..? माझ्या फ्रेण्ड्सचे मामू किती लाड करतात त्यांचे.." जणू फोटोतल्या मामाशी तिचा मूक संवाद चालू होता..

तोच मंदारने हात पकडत तिला जवळ घेतले.. तशी ती ही भानावर आली..

मंदारच्या मांडीवर बसत ती पुन्हा मामाला निरखून पाहू लागली..

थोड्याच वेळात भटजीही आले.. विधीवत वर्षश्राध्याचा कार्यक्रम सुरु झाला.. गावातील काही मोजकी मंडळी आणि नातेवाईक यांच्या उपस्थित श्राध्याचा कार्यक्रम पार पडला..

जेवणं आटोपली.. हळूहळू घर खाली झालं..

मंदारने श्रेयाला आजीकडे जाण्याची खूण केली..

तशी ती ही उठली आणि 'आजी' म्हणत आभाच्या आईकडे झेपावली..

" माझं पिल्लु, मामाकडे आलं का..? पण तुझा मामाच दूर निघून गेला बघ.." बोलता बोलता त्या पुन्हा गहिवरल्या..

" आजी, तु नको रडूस.. मी बाप्पाला सांगणार आहे.. माझ्या मामूला लवकर घरी पाठव.. माझे लाड करून घ्यायचे आहेत त्याच्याकडून.." त्यांचे डोळे पुसत श्रेया म्हणाली..

तसा आभाच्या आईने तिचा गालगुच्चा घेतला.. डोळ्यांतल्या अश्रूंना टिपत आपल्या नातीसोबत हक्काचा वेळ घालवला..

मंदारने आभाच्या बाबांचे सात्वंन केले..

" बाबा, तुम्हीच असे धीर सोडाल तर आईंकडे कोण पाहिल..? तुम्ही दोघे इथे असेच रडत असाल.. आता मी काहीच ऐकणार नाही.. तुम्हांला दोघांनाही कायमचं आमच्या सोबत यावं लागेल.. मी ही तुमचा मुलगाच आहे.. या लेकालाही तुमच्या सेवेची संधी द्या.." मंदार हात जोडत म्हणाला..

" जावईबापू, हात जोडून पापाचे भागी नका बनवू आम्हांला.. खरं तर आमचं भाग्य थोर आम्हांला तुमच्यासारखा भला जावई भेटला.. पण मुलीच्या सासरी जाऊन राहणे नाही पटत बुद्धिला.." आभाचे बाबा अगतिक होत म्हणाले..

" बाबा, मुलीच्या सासरी नको पण मुलाच्या घरी तरी चला.." एका शब्दात मंदारने पुन्हा एकदा त्यांना जिंकून घेतले..

" आम्ही एक मुलगा जरी गमावला तरी देवाने तुमच्या रुपात परत एकदा मुलाचे दान दिले.. पण मंदारराव.. आता या थकलेल्या कुडीला अमितच्या आठवणींचाच आसरा आहे.. त्याचं बालपण.. तरुणपण.. त्याचा सहवास रोज जगतो या घरात.. आता या सहवासातून दूर जाणं नाही हो.. आम्ही येऊ ना तुम्हांला आमच्या श्रेयाला भेटायला अधून मधून.. पण तिथे येऊन राहण्याची गळ नका घालू.. नाही झेपणार आम्हांला.." अगदिच मार्मिकपणे ते म्हणाले..

शेवटी एका बापापुढे मुलगा हरला.. पण आठवणींच्या गदारोळात स्वत: ला हरवायचे नाही.. अमितला शांती लाभावी म्हणून तरी आनंदात रहायचे ही गळ घालायला मंदार विसरला नाही..

तो पूर्ण दिवस त्या तिघांनी आभाच्या आईवडिलांसोबत घालवला..

दु:खाच्या आभाळावर श्रेयाच्या बोबड्या बोलांचा चंद्र सजला आणि आजीआजोबांचा दिवस सुखाच्या चांदप्रकाशात न्हाहून निघाला..

लेकाचं दु: ख काही काळ मागे सरलं आणि मन निष्पाप जीवात रंगलं..

श्रेयाही आजीआजोबांसोबत आनंदात न्हाहून निघाली..

रात्रीच्या जेवणातही श्रेयाच्या आवडीचा बेत आखला आजीने.. आजोबांनी पुन्हा एकदा झोपाळा बांधला ओटीवर..

मंदार आणि आभा दोघेही त्या तिघांच्या आनंदाच्या भरतीत चिंब भिजून गेले होते..

रात्रीची जेवणं झाली.. आणि श्रेया आजीआजोबांसोबत त्यांच्या खोलीत झोपली..

नव्या जागी मंदारला झोप येईना.. तो तसाच उठला आणि बाहेरच्या अंगणात येऊन बसला..

कानोसा घेत आभाही बाहेर आली..

" मंदार, झोप येत नाही का..?" त्याच्या जवळ बसत आभा म्हणाली..

" हो.. जागा बदलली .. तु झोपायचं ना.. थकली असशील.." तिचा हात हातात घेत तो म्हणाला..

" मलाही झोप येत नाही. आजही अमित भेटतो या घरात.. आजही त्याचं असणं जाणवतं माझ्यासोबत.." मंदारच्या खांद्यावर डोकं ठेवत आभा म्हणाली..

" तु ठिक आहेस ना.." म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवीला..

लांब श्वास भरत तिने होकार दिला..

" श्रेयाही खूप भावनिक झाली होती.. मामा का गेला बाप्पाकडे..? राहून राहून हेच विचारत होती.." मंदार म्हणाला.

" अमितलाही श्रेयाला कुठे ठेवू नि कुठे नको असे झाले असते.. पण भाचीचे लाड करायला तो कायमचा निघून गेला.." बोलता बोलता ती पुन्हा अगतिक झाली..

मंदारच्या कुशीत शिरून तिने स्वत: ला मोकळे केले..

" ये वेडाबाई, पुरे ना गं आता.. अमित जिथे कुठे असेल तिथे तुला अशी दु:खी पाहून तो ही दु:खी होत असेल.. निदान त्याच्या आत्माच्या शांतीसाठी तरी स्वत: ला सावर.. तुच अशी अगतिक झालीस तर आईबाबांना कोण सांभाळेल..?" तिच्या डोक्यावरून हात फिरवित मंदारने तिचे सांत्वन केले..

कितीतरी वेळ त्या चांदप्रकाशात आभाने अमितच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला..

" ज्याने अमितचा ॲक्सिडेन्ट केला त्याला नव्हतं वाचवायला पाहिजे होतं बाबांनी.. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळायलाच हवी होती.." मंदारने आपले मत परखडपणे मांडले..

त्याच्या या मतावर आभा मात्र स्तब्ध झाली.. काळजात खोल कुठेतरी ओळखीची घालमेल झाली त्याच्या शब्दांनी..

" खूप रात्र झाली आहे.. उद्या निघावं लागेल लवकर.. झोपूया आपण.." म्हणत तिने विषय तिथेच संपवला.

दोघेही उठून घरात आले..

रात्र खूप झाल्याने बिछान्यावर पडताक्षणी मंदार झोपला..

पण आभाचा डोळा लागेना..

मंदारचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या कानावर रुंजी घालू लागले..

चादरीचा शेला डोळ्यांवर चढवत ती मंदारच्या कुशीत शिरली.. भूतकाळाला वर्तमानाच्या स्वाधीन करित निद्रिस्त झाली...

क्रमश:

काय घडलय आभाच्या आयुष्यात..? अमितच्या अपघातामागे नक्की कोण होतं..? साऱ्याच प्रश्नांच्या उत्तरासाठी कथामालिका वाचत राहत.. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...

©® आर्या पाटील..

🎭 Series Post

View all