तु असा जवळी रहा...( भाग १४ वा)

जेव्हा नियती नव्याने आभा आणि श्रेयशला समोर आणते तेव्हा...

# तु असा जवळी रहा..( भाग १४ वा)

©® आर्या पाटील

तीन दिवस ऑफिसमधील सगळीच कामे बंद ठेवण्यात आली होती. राऊत सरांचे असे अकाली निधन सगळ्यांच्य मनाला घोर लावून गेले होते.

या तिन्ही दिवसात श्रेयशने ऑफिसचे सगळे बारकावे हाताळले. तसेही राऊत सर प्रत्येक निर्णय त्यालाच विचारून घ्यायचे. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे नसूनही अप्रत्यक्षात तो ऑफिसचं काम जवळून अनुभवत होता. दिवसभरातला सारा वृत्तांत सर न चुकता त्याला सांगायचे. ऑफिसमध्ये पावलोपावली श्रेयशला त्यांची कमतरता जाणवत होती. पण नियतीपुढे कोणाचे काहीच चालत नाही याची त्याला चांगलीच प्रचिती आली होती.

दरम्यानच्या तीनही दिवसांत त्याने बंगल्यावरच निवास केला. आणि ते ही आभाच्या नजरेत आपण येणार नाही याची पूर्ण काळजी घेत.रात्री उशीरा येऊन सकाळी लवकर निघूनही जायचा त्यामुळे कोणालाही तो तेथे राहत असल्याची माहिती मिळाली नाही..

तीन दिवस झाल्यानंतर कंपनीचं काम पुन्हा पूर्ववत सुरु झालं. आता पुढे काय..? ही विवंचना घेवूनच आभा श्रेयाला स्कूलमध्ये सोडल्यानंतर ऑफिसला निघाली.

एव्हाना प्लान्टेशन प्रोसेस सुरु झाली होती. त्याच धर्तीवर तिच्याच नर्सरीतील नानाविध रोपांची आयत करण्यात आली होती. कोणते रोप कुठे लावायचे.? किती अंतर ठेवायचे..? याची रुपरेषा आधीच आखल्याने प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली होती. आभा जातीने लक्ष देऊन कामगारांकडून काम करवून घेत होती. उन्हही चढायला सुरवात झाली होती. खाली पसरलेला हिरवळीचा गालिचा आणि त्यावर फवारलेल्या पाण्यामुळे त्या उन्हातही गारवा जाणवत होता.

राऊत सर जातीने सगळं येऊन पाहायचे. त्यांची आठवण येताच आभाला गहिवरून आले.

माणसं निघून जातात पण त्यांच्या चांगल्या आठवणी त्यांच्या पश्चातही जीवनाच्या क्षितिजावर मावळतीचा सूर्यप्रकाश बनून उजळत राहतात.

ऑफिसमध्ये काय चाललय..? काम कोण पाहतय..? काहिच कल्पना नव्हती.

'मला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नाही. माझं काम फक्त या गार्डनपुरतं मर्यादित आहे. आणि तेवढ्यापुरताच मर्यादित राहिलही.' स्वगत होत तिने पुन्हा एकदा स्वत:ला कामात गढून घेतले.

इकडे श्रेयशही कधीच ऑफिसला येऊन पोहचला होता.

ती येईल की नाही ही धाकधूक होतीच.त्यामुळे पुन्हा पुन्हा मिस पल्लवीला फोन करून त्याने तिची चौकशी केली.

" सर, मॅडम उशीरा येतात. काम सुरु आहे. त्यांच्या मुलीला शाळेत पाठविल्यानंतर त्या इथे पोहचतात.." मिस पल्लवी म्हणाली.

" ओके.." म्हणत त्याने फोन ठेवला आणि ती येईल या खात्रीने नि:श्वास टाकला.

थोड्याच वेळाने पुन्हा पल्लवीने फोन करून त्याला आभा आल्याची माहिती दिली तसा त्याचा जीव भांड्यात पडला.

तिच्या दृष्टीक्षेपात आपण येणार नाही याची पूर्ण काळजी श्रेयश घ्यायचा. तिच्या कामाची सगळी माहिती मिस पल्लवीकडून घ्यायला मात्र तो विसरायचा नाही. ती घरी गेल्यानंतर जातीने जाऊन गॉर्डनमध्ये चाललेलं काम पाहायचा. पण तिच्या समोर मात्र तो कधीच आला नाही. एव्हाना तोच ऑफिसमधलं काम पाहतो आणि तिच्याच समोरच्या बंगलात राहतो याची कल्पना तिला आलीच होती. पण तो दिसत नसल्याने, प्रत्यक्षात समोर येत नसल्याने तिला फारशी अडचण येत नव्हती.ती ही कटाक्षाने काही गोष्टी टाळत होती. एकंदरीत एकाच ड्रीमप्रोजेक्ट साठी काम करणारे ते दोघे एकमेकांपासून प्रकर्षणाने अलिप्तता पाळत होते.

राहण्यासाठी पर्याय नव्हता असे नव्हते पण आभाच्या समोरच्या बंगल्यात त्याला मन:शांती लाभत होती. त्यामुळे त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. फक्त आभा, मंदार आणि श्रेयाच्या संपर्कात न येता. रात्री उशीरा येऊन सकाळी लवकर निघून जाणे हा त्याचा जणू दिनक्रमच बनला होता. रोजचच ते आता अंगवळणीही पडलं होतं.. जवळजवळ पंधरा दिवस तेथे राहूनही तो एकदाही मंदारच्या नजरेत पडला नाही. पण त्याच्या वॉचमनकडून तो इथे राहत असल्याची माहिती त्याला मिळाली होती. मंदारही स्वत:च्या कामात व्यस्त असल्याने त्याला असं स्वत:हून जाऊन भेटणं शक्य नव्हतं. आणि असं एकाच ओळखीत घरी तरी कसे जाणार हा प्रश्न होताच. मंदारला मित्रांचा खूप लळा त्यामुळे त्याच्या रुपात एक चांगला मित्र मिळावा यासाठीच त्याचा प्रयत्न होता. अगदी रविवारीही श्रेयश ऑफिसला निघून जायचा. श्रेयश आल्यापासून आभाने श्रेयाला ऑफिसमध्ये नेणेही बंद केले होते त्यामुळे कामगारांवर काम सोपवून आभा लवकर घरी यायची. परिणामी मंदारला ऑफिसमध्ये तिला घ्यायला जाण्याची गरज भासत नसायची.त्यामुळे तिथेही श्रेयशसोबत भेटणे शक्य होत नव्हते.

" आभा, मिस्टर श्रेयश ऑफिसमध्ये तरी भेटतात का..?" रात्री शतपावली करता करता मंदार म्हणाला.

मंदारच्या प्रश्नाने ती भांबावली.पण लगेच स्वत: ला सावरत तिने त्याला उत्तर दिले.

" माझं काम गार्डन एरियात असतं ऑफिसमध्ये नाही. सो त्यांच्याशी भेटण्याचा काही संबंधच नाही.." तिने स्पष्ट उत्तर दिले.

" ते ही आहेच. असो कामाचा लोड असेल. शेवटी नविन कंपनी उभी करायची आहे." विचार करत मंदार म्हणाला.

 होकारार्थी मान हलवित तिने विषय बदलला..

दिवस सरत होते. बागेचं कामही जोमात सुरु होतं. इवल्याश्या रोपट्यांनी बागेचं रुपडं सजत होतं. वाऱ्यावर अलवारपणे माना डोलावणाऱ्या त्या रोपांना पाहून आभाला सरपोतदार मॅडमची आठवण यायची.

" आभा, रोपट्याची चांगली निगा राखली,वेळेवर हव्या त्या प्रमाणात आवश्यक दिल्या की त्याची वाढ उत्तम होते. बदलत्या वातावरणात तग धरून राहते. तुमच्या नात्याचं पण असच आहे. या नात्यालाही प्रेम, ममता, आपुलकी या साऱ्याच गोष्टी इतक्या भरभरून मिळाल्या आहेत की मला खात्री आहे कोणती ही परिस्थिती असो ते कधीच डगमगणार नाही.." किती विश्वासाने मॅडम म्हणाल्या होत्या. त्यांची आठवण येताच ती पुन्हा भावनाविवश व्हायची. प्राजक्ताच्या झाडाखाली त्यांच्या मायेची सावली अनुभवायची.

' कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच मग तो रोपाच्या बाबतीत असो वा नात्याच्या' स्वगत होत ती स्वत: ला समजवायची.

श्रेयशलाही खूप इच्छा व्हायची तिला एकदा नजरेच्या कटाक्षात हेरण्याची. जेव्हा पासून कळायलं लागलं होतं तेव्हापासून त्याचं जग बनलेल्या तिने त्याला तिच्याच जगातून हद्दपार केले होते. कारणही रास्तच होते. आणि श्रेयशला ते पटतही होते. त्याच्या मते तो तिचा गुन्हेगार होता. तिच्यापासून वेगळं होऊन त्याची खूप मोठी शिक्षा तो भोगतही होता.सात जन्माची सोबत क्षणात संपली होती आणि राहिल्या होत्या फक्त अन् फक्त रक्ताळलेल्या आठवणी.

' का देवा असा आघात केलास..? का नाही गाडीच्या वेगावर मी नियंत्रण ठेवला..? मी त्याला वाचवू शकलो असतो.माझ्यामुळेच तो गेला. किती प्रेम होतं त्या दोघांचं एकमेकांवर. बहिण भावासारखं सुंदर नातं या जगात असूच शकत नाही आणि मी काळ बनून तेच नातं संपवलं. खरच खुनी आहे मी.' दुखरी आठवण येताच तो आरक्त व्हायचा. स्वत: ला दोष देत बसायचा. क्वचित इजाही करून घ्यायचा. त्याला सांभाळणारं कोणीच तर नव्हतं. मग अश्या वेळेस डिप्रेशनच्या गोळ्या एकमेव आधार ठरायच्या. एका काचेआड ती असायची पण पडदा बाजूला करून तिला पाहण्याची हिंमत व्हायची नाही.

त्या दिवशी शाळेतून आल्यावर छोट्या श्रेयाने आभाला आनंदाने मिठी मारली.

" आई, उद्या स्कूलला सुट्टी आहे. मी गार्डनमध्ये येणार तुझ्यासोबत. किती दिवस झाले तु मला नेलं नाही. पण उद्या मी येणारच.. ये ऽ ऽ.." श्रेया आनंदाने म्हणाली.

" बेटा उद्या जशी तुझ्या स्कूलला सुट्टी तशीच मलाही सुट्टी असेल ना. मग कसं जायचं..?" आभाने भाबड्या श्रेयाला तिच्याच पद्धतीने समजवायचा प्रयत्न केला.

" हो का..? म्हणजे उद्याही जायला मिळणार नाही. मला गार्डन पाहायचं होतं. तुझ्या प्राजक्ताला पण." श्रेयाची खुललेली कळी क्षणात रुसली.

" मी नेईन तुला लवकरच. गार्डन पूर्ण तयार झालं की मग घेऊन जाईन." तिच्या कपाळावर गोड पापा देत आभा म्हणाली.

सध्या कामाच्या ठिकाणी तिची एवढीशी गरजही नव्हती त्यामुळे उद्या ती नक्कीच घरी थांबू शकत होती.

ऑफिसमध्ये कॉल करून तिने तशी कल्पनाही दिली मिस पल्लवीला.

पण ऐन वेळी फाउन्टेनच्या कामासाठी कारागिर उद्याच येत असल्याचा फोन आला. तिने ते काम परवावर ढकळण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. त्यामुळे उद्या श्रेयाला घेवून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कामं आवरून श्रेयाला घेवून ती ऑफिसमध्ये पोहचली.

काही कामानिमित्त बाहेर जावं लागल्याने श्रेयशही उशीरा येणार होता. राऊत सर असतांना श्रेया अगदिच मोकळेपणाने ऑफिसमध्ये वावरायची. त्यांच्या केबीनमध्ये, मिस पल्लवीकडे अगदी हक्काने जायची. पण राऊत सर गेल्यानंतर जवळजवळ महिनाभराने ती तिथे आली होती. तिची निरागस नजर जणू त्यांनाच शोधत होती.

" श्रेया, राऊत सरांच्या केबीनकडे जाऊ नकोस बेटा. तिथे आता कोणीच नसतं. आणि मिस पल्लवीसुद्धा कामात असते त्यामुळे तिकडेही जाऊ नकोस. माझ्यासोबत गार्डनमध्येच थांब." उगा श्रेयशच्या नजरेत ती पडू नये म्हणून आभाने तिला काही गोष्टी सांगितल्या.

" पण आई.. ऊन लागल्यावर काय करू..? तुच तर म्हणतेस उन्हात खेळू नकोस." तिने पुन्हा एकदा तिला पेचात टाकले.

" ऊन व्हायच्या आधीच आपण घरी जाऊया मग तर झालं.." तिने समजूत काढली.

होकारार्थी मान हलवत श्रेया फुलपाखराप्रमाणे त्या गार्डनमध्ये फिरू लागली.रोपावरून आपले नाजूक हात फिरवित प्रत्येकाशी हितगूज साधू लागली. बागकाम करणारे महिला आणि पुरुष कामगारही कौतुकाने तिला पाहत होते. त्यानंतर तिची स्वारी वळली आवडीच्या प्राजक्तापाशी.प्राजक्ताचा सडा तिला साद घालत होता जणू. मांडी घालून ती तिथेच खाली बसली आणि फुले वेचू लागली.

आभा फाऊन्टनचं काम पाहत तिच्यापासून थोडी दूरच होती. पण वेळोवेळी तिच्याकडे लक्षही देत होती.

फुले गोळा करता करता श्रेयाची नजर समोरच्या गवताकडे गेली. सळसळत त्या खुरट्या गवतातून साप तिच्या दिशेने येत होता.

त्याला पाहताच श्रेया पटकन उठून उभी राहिली. आणि जोरात किंचाळू लागली.

" आई... आई ये ना.." तिची किंचाळी आभापर्यंत पोहचायच्या आधीच तो साप तिच्या दिशेने सरसर पुढे येत होता.

आभा कामात गुंग असल्याने श्रेयाचा आवाज तिच्यापर्यंत पोहचला नाही.

छोट्या श्रेयालाही काय करावे काहिच कळत नव्हते.

एकदा मंदारने त्यांच्या बागेत मारलेला साप तिने पाहिला होता तेवढाच. तिला मंदारची आठवण आली.त्या सापाला जवळ येतांना पाहून ती आणखी घाबरली. आणि रडू लागली. आता मात्र तिचा आवाज तिथल्या कामगारांपर्यंत पोहचला होता. आणि त्यापैकी एकाने आभालाही त्याची कल्पना दिली. ती तिच्याकडे वायुवेगे निघाली. पण ती आणि ते कामगार तिथे पोहचायच्या आधीच श्रेयाला मागून कोणीतरी पटकन उचलून घेतले. आणि तिथून बाजूला नेले. 

" बाबा.." म्हणत श्रेयाने त्याला गच्च मिठी मारली. त्यानेही मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरविला.

" आभा, घाबरू नको. तुला काहीच होणार नाही. मी आहे ना.." तो म्हणाला.

तो दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयशच होता. ऑफिसमध्ये जात असतांना त्याची नजर श्रेयावर पडली आणि अनर्थ टळला.

समोरचा साप पाहून आभा पार घाबरून गेली. साप विषारी आहे याची कल्पना त्या कामगारांना आली. तिथेच असलेली काठी घेवून त्या सापाला त्यांनी मारून टाकले. त्याशिवाय पर्यायही नव्हता. रोजच्या काम करण्याच्या जागी विषारी जनावर असणं म्हणजे जीवाला धोका होता.

समोर श्रेयश उभा होता आणि त्याच्या कुशीत श्रेया विसावली होती. श्रेयाला सुरक्षित पाहून आभाचा जीव भांड्यात पडला. श्रेयशचंही भान राहिलं नाही तिला. तात्काळ त्याच्या जवळ जात तिने श्रेयाला त्याच्या कुशीतून आपल्या जवळ घेतले.

" श्रेया, बेटा तु ठिक आहेस ना..? तुला काही झालं नाही ना..? मी आहे तुझ्याजवळ घाबरू नकोस.." म्हणत तिने पटापटा तिला मुके घेतले.

आभाच्या जवळ जाताच श्रेया तिला गच्च बिलगली.

" आई मी खूप घाबरले होते. खूप मोठा साप होता तो.." म्हणत ती पुन्हा रडू लागली.

" नको घाबरूस बेटा. मी आहे ना.." आता बोलता बोलता आभाही रडू लागली.

" आ.." तिचे नाव तोंडावर येतच होते की त्याने स्वत: ला सावरले.

"मिसेस कर्णिक श्रेया ठिक आहे. तिला काहीही झालेले नाही. तुम्हांला रडतांना पाहून ती आणखी घाबरेल.." नजर चोरत तो आभाला म्हणाला.

" सर, तुम्ही वेळेवर उचलले पोरीला नाहीतर.." एक कामगार बोलता बोलता शांत झाला.

तशी आभा भानावर आली. श्रेयाला शांत करित तिने तिला जवळच धरून ठेवले.

तोवर श्रेयशने पल्लवीला कॉल करून तिथे बोलावून घेतले.

" मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये चला. तिला शांत होऊ द्या." पल्लवी म्हणाली. तिनेही आढेवेढे न घेता होकारार्थी मान हलवली आणि तिच्यासोबत रिसेप्शन एरियामध्ये आली.

श्रेया आता शांत झाली होती पण आभाच्या डोळ्यांतले पाणी काही थांबायला तयार नव्हते. आपलं माणूस गमावण्याचं दु: ख तिच्याशिवाय आणखी कोणाला जास्त माहित असेल. ती तर तिचा जीव होती. तिच्यावर ओढावलेला हा प्रसंग आठवून अजूनही आभाच्या काळजाचा थरकाप उडत होता.

पल्लवीने दोघींनाही पाणी दिले. श्रेयश अजूनही बाहेरच होता.

" मॅडम शांत व्हा. ती ठिक आहे आता.." पल्लवी समजावत म्हणाली.

" आई हो मी ठिक आहे. मला काहीच झालं नाही. तु रडू नकोस गं." आभाची समजूत काढत छोटी श्रेया म्हणाली.

तसं आभाने पुन्हा एकदा तिला कुशीत ओढले. तोच श्रेयश तिथे आला.

" श्रेया, ठिक आहेस ना..?"दोघींनाही उद्देशून तो श्रेयाला म्हणाला.

तसे आभाने डोळे टिपले.

" ये फ्रेण्ड तु उचललं ना मला..? मला वाटलं बाबाच आले." श्रेया भाबडेपणाने म्हणाली.

तिने 'बाबा' म्हणत घातलेली साद आणि मारलेली गच्च मिठी आठवताच तो पुन्हा सुखावला.

'आभा मला ना मुलगीच हवी आहे. अगदी तुझ्यासारखीच. गालावर खळी पडणारी.' बाबा' म्हणत माझं जग व्यापणारी..' लग्न ठरल्यानंतर नदीकाठी रंगवलेलं स्वप्न त्याला आठवत होतं. आणि त्याच स्वप्नातली परी आज त्याच्यासमोर उभी होती.

" ये फ्रेण्ड.. थँक यु.." ती म्हणाली तसा तो भानावर आला.

तिच्या डोक्यावर हात ठेवून त्याने स्मितहास्य केले आणि आभाकडे न पाहता तसाच केबीनमध्ये निघून गेला.

आभाच्या कानात मात्र श्रेयाचे मघासचे वाक्य घर करून राहिले होते.

क्रमश:

©® आर्या पाटील

बाहेरगावी गेल्याने भाग टाकायला खूपच उशीर झाला. पण आता पुढचे भाग वेळेवर पोस्ट होतील. तसदी बद्दल क्षमस्व..

कथा आवडल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा.

🎭 Series Post

View all