तु असा जवळी रहा...( भाग १२ वा)

When Aabha and Shreyash meet again..

# तु असा जवळी रहा..( भाग १२ वा)

©® आर्या पाटील

दोन दिवसांपूर्वी वाढलेली मनाची हुरहूर आता हळूहळू कमी होत होती. श्रेयश परत गेल्याने तिची मनस्थिती पूर्ववत व्हायला सुरवात झाली होती. मनाचा निश्चय पक्का होता.सरपोतदार मॅडमसाठी श्रेयशच्या कंपनीचं गार्डन एका वेगळ्या धर्तीवर डेकोरेट करायचं.. आणि त्यानुसार तिने योजनाही आखली.. विविधता हे तिने डेव्हलप केलेल्या प्रत्येक गार्डनचं मुळ होतं.. वेगवेगळ्या जातीची फुलझाडे तिने या गार्डनसाठी निवडली होती.. मुख्यत: मध्यम आकाराच्या जास्वंद, कण्हेर, रातराणी यांसारख्या बारा माही फुलणाऱ्या फुलझाडांना तिने पसंदी दिली.. प्राजक्त तर त्या बागेचा राजा होता.. आठवणींची उधळण करणारा. त्याचबरोबर अबोली, सदाफुली, गुलबक्षी, गुलाब, शेवंता सारख्या झुडूपवजा फुलझाडांचीही वर्णी तिच्या बागेत लागली.. जापानी मॅपल, एरिया, बुडलेजा, कॅरिओप्टेरिस यांसारखी शोभेची झाडेही तिने निवडली.. आणि या साऱ्यांत सर्वात महत्त्वाची म्हणजे प्रदूषण रोखण्यात मदत करणारी प्रदूषकांना शोषून घेणारी झाडेही तिने लावायची ठरवली.बऱ्यापैकी रोपटी तिने तिच्याच रोपवाटिकेत डेव्हलप केली होती. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर हे तिच्या रोपवाटिकेचे विशेष. अगदी दहा रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत किंमतीच्या नानाविध झाडांनी पंचक्रोशीत तिच्या रोपवाटिकेला प्रसिद्धी मिळवून दिली होती आणि त्याचमुळे श्रेयशच्या कंपनीने लैण्डस्केपिंग साठी तिची निवड केली होती..

मातीचे नमुने परिक्षण करून इरिगेशन मॅनेजमेंट पासून तिने आपल्या कामाचा श्रीगणेशा केला.. सुरवातीचे आठ दहा दिवस प्राथमिक व्यवस्थापनातच गेले. मिस्टर राऊतांकडून श्रेयश वेळोवेळी तिच्या कामाचा मागोवा घेत होता. तिच्यावर सोपवलेलं कोणतेही काम ती जबाबदारीने पूर्ण करायची आणि इथे तर गार्डनिंगचं काम म्हणजे तिची निष्ठा..तिने स्वत:ला या निष्ठेमध्ये झोकून दिले. आता रोजच कंपनीमध्ये येणं होऊ लागलं.. प्राजक्ताचा सहवास आता रोजचा झाला. त्या सहवासात तिला तिच्या लाडक्या मॅडम भेटायच्या. प्रेरणा बनून.. कार्याला प्रेरणा मिळाली की कार्यपूर्तीचा आनंद गगनाएवढा असतो.. आणि त्या आनंदाला ती रोजच तिथे अनुभवायची. दुपारनंतर छोटी श्रेयाही हट्ट करित तिच्या सोबत यायची. कंपनीतील मोजक्या लोकांना श्रेयाची सवय झाली होती. मिस्टर राऊत तर तिला 'चिमणी' म्हणायचे. प्राजक्ताच्या झाडाखाली खेळणे श्रेयाला खूप आवडायचे.

या साऱ्यांत रोजच छोट्या श्रेयाला श्रेयशही आठवायचा.

एक दिवस मिस्टर राऊत तिला श्रेयशच्या केबिनमध्ये घेवून गेले..

" सर, तो माझा न्यू फ्रेण्ड होता ना श्रेयश तो का येत नाही आता..? त्याला सांगा की त्याची फ्रेण्ड आठवण काढते

.." श्रेयशची केबीन न्हाहाळत ती म्हणाली.

" बेटा, तुझ्या न्यू फ्रेण्डला खूप महत्त्वाचे काम आले आहे त्यामुळे तो गेला पण तुझा निरोप मी त्याला नक्की देईन.." श्रेयाची निरागसता जपत मिस्टर राऊत म्हणाले.

तशी तिही खळीदार गालात हसली आणि केबीनबाहेर पडली.

मिस्टर राऊत यांनी श्रेयशला फोन करून लागलिच श्रेयाचा गोड निरोप दिला.

" सर, तुम्ही बोला त्या गोड मुलीशी. रोजच तिच्या तोंडात तुमचं नाव असतं. खूप निरागस आहे ती." मिस्टर राऊत म्हणाले.

श्रेयशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.

" बोलेन एखाद्या दिवशी. थोडा बिझी आहे आता. माझी महत्त्वाची मिटिंग आहे." खोटं कारण देऊन त्याने फोन ठेवला.

फोन ठेवला पण नजरेसमोरून श्रेयाचा चेहरा हलत नव्हता.. तिचं खळीदार रुप छोट्या आभाची आठवण करून देत होतं त्याला..

आजही ऑफिस सुटल्यानंतर मंदार त्या दोघींना घ्यायला कंपनीत आला आणि ते घरी परतले.

आता मंदारनेही घरातली अर्धी जबाबदारी स्वकुशीने स्विकारली होती. तसाही तो आभाच्या बाबतीत खूपच जबाबदार होता.आता तर तिला प्रत्येक कामात तो मदत करू लागला होता..

अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तो तिच्या सोबत असायचा.

" मंदार, मी करेन सगळं. एवढीही दमछाक होती नाही माझी.." बागेत फेरफटका मारित असतांना त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.

" असू दे गं.. ही माझीही जबाबदारी आहे. आणि त्याहीपेक्षा तुझ्या सोबत वेळ घालवायला कोणतेही कारण पुरेसे आहे.. तु फक्त जवळ हवीस.." तिच्या हातावर ओठ टेकवत तो म्हणाला.

तशी ती गालात हसली. त्या हास्याची लकेर गालावरच्या खळीत सजली.

" घायाळ करते तुझी ही खळी.खूप नशीबवान आहे मी." म्हणत आता त्याने त्याला खळीवर ओठ टेकवले.

" वेड्या, बाहेर आहोत आपण. कोणी पाहिलं तर.." आजूबाजूला पाहत ती म्हणाली.

" कोण पाहतय..? बाजूच्या बंगल्यातले साठे काका काकू कधीच झोपले असणार. श्रेयश सरपोतदार परत गेले त्यामूळे समोरचा बंगलाही रिकामा झाला.. आता आपल्याला पाहणारे आपण दोघेच.." हसत तो म्हणाला.

श्रेयशचं नाव पुन्हा एकदा तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेले.. रोजच या ना त्या कारणाने त्या नावाची सवयच झाली होती तिच्या कानाला.

पण पुन्हा त्याच वाटेवर जाऊन मनावर आठवणींचे मळभ नव्हते चढवायचे तिला.

" मंदार, झोपायला जायचं का..? श्रेया उठली तर उगा रडेल. आणि मलाही झोप येतेय.." कारण सांगत तिने श्रेयशचा विषय पुन्हा तिथेच संपवला.

घरातील दिवे मालवून दोघेही रुममध्ये शिरले.

श्रेयाच्या अंगावर पांघरुण घालत तो बेडवर येऊन बसला.

"आभा, श्रेयश सरपोतदारांचा रुमाल केलास का गं परत..?" त्याने पुन्हा त्याच्याशीच निगडित प्रश्न केला.

" मंदार, तुला करमत नाही का त्यांच्याशिवाय..? रोज त्यांच नाव काढल्याशिवाय तुझा दिवस संपतच नाही. माझ्याविषयी विचार काही तरी." ती आता चिडली.

" ये तु चिडली.. चक्क तु चिडली. या पाचवर्षांत तुला पहिल्यांदा चिडतांना पाहिलं मी.. ॲण्ड ऑफकोर्स क्रेडिट गोज टू मिस्टर श्रेयश सरपोतदार.." तो पुन्हा चिडवित म्हणाला.

" मला आता इथे थांबायचं नाही. तुझं श्रेयशपुराण चालू दे. संपल्यावर मी येते." आणखी चिडत ती रुममधून बाहेर पडू लागली..

तोच बेडवरून उठून तो तिच्याजवळ पोहचला.. तिचा हात पकडत त्याने तिला कुशीत ओढले. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवित तिच्या केसांवर स्पर्शखूण ठेवली.

" ये वेडाबाई, श्रेयशचा काय संबंध इथे..? आपल्या दोघांत तो काय कोणीच येणार नाही. जस्ट एक चांगला माणूस म्हणून रोजच त्याची आठवण होते म्हणून बोलतो. याचा अर्थ असा नाही ना की तुझ्याविषयी बोलायचे टाळतो.. तु तर माझा श्वास आहे. तो सुरु आहे म्हणूनच मी जिवंत.तुझी तुलना कोणत्याही व्यक्ती सोबत होऊ शकत नाही. तु नितळ चांदणं आहेस माझ्या हृदयाच्या आभाळावर सजलेलं.. तु धुंद नदी आहेस मला सागरासम पूर्ण करणारी.. तु हिरवीकंच धरा आहेस माझ्या आभाळाला कवेत घेणारी.. तु मनपाखरू आहेस माझ्या जीवनबागेत मनसोक्त बागडणारी.. तु फक्त तुच आहेस. आणि तुझ्या असण्याने माझं मी त्व आहे. तु नेहमी म्हणतेस ना की तु असा जवळी रहा. आज मला सांगायचे आहे की मी नेहमी तुझ्या जवळी नाही तर तुझ्यातच असेन." म्हणत त्याने तिला मिठीत कैद केले.

त्याचा प्रत्येक शब्द तिच्या भावनांना आणखी हळवं करून गेला. नकळत डोळ्यांना कधी भरून आले कळलेच नाही. त्याच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट करित ती त्याच्यात विसावली.

दोन हृदयाच्या स्पंदनांनी पुन्हा एकदा तार छेडली. श्वास पुन्हा एकदा एकमेकांत गुंतले.स्पर्शाने मनाची तृषा क्षमवली. शरिराचा अडसर तेवढा होता दोन मनं केव्हाच एकमेकांत मिसळली. रात्रीच्या अंधारावर मिलनाचा रंग चढला अन् गालात लाजणाऱ्या पहाटेवर गुलाबी लाली. ओलेती पहाट एकमेकांच्या मिठीत उबदार झाली.

प्रेम म्हणजे आणखी तरी काय..?

आपल्यावर स्वत:हून अधिक प्रेम करणारा जोडीदार..

त्याच्या नजरेत आपल्याविषयी असणारी काळजी तर काळजात आपल्या सुखाची जबाबदारी. कधी आईची माया तर कधी बापाचा खंबीर आधार.. कधी भावासारखा पाठीराखा तर कधी बहिण बनून मनीचं जाणणारा सखा..

याच्याशिवाय प्रेम काही वेगळं असेल काय..?

हे सर्वच तर होतं मंदारमध्ये. अगदी भरभरून..तिला स्वत:मध्ये सामावून घेतांनाही किती हळवा बनायचा तो.

त्याच्या कुशीत असतांना ती सगळ्या जगाला विसरायची.

त्याच्या सहवासात आपल्या दु:खाला बाजूला सारायची.

अन् त्याच्यात विरतांना स्वत: चं अस्तित्व विसरायची..

अगदी सोन्यासारख्या दोघांचा सोन्याचा संसार सुरु होता.

पण अचानक एक अनपेक्षित घटना घडली. आणि या संसाराची पुन्हा एकदा सुटलेल्या भूतकाळाशी गाठ पडली.

सगळच व्यवस्थित सुरु असतांना एक दिवस अचानक मिस्टर राऊत यांना हार्ट अटॅक आला आणि एक हुरहुन्नरी व्यक्तिमत्व पडद्याआड गेले. सगळच अनपेक्षित आणि अचानक घडलं. प्रसन्न आणि उमद्या व्यक्तिमत्वाचे मिस्टर राऊत असे अचानक कालवश होणे हे सर्वांसाठीच धक्कादायक होते. श्रेयशला तर हा धक्का सहन करणे अशक्यप्राय होते. वडिलांनंतर एक आश्वासक सोबत आणि एक मार्गदर्शक साथ बनून ते नेहमीच त्याच्या सोबत उभे राहिले होते. आपल्या ड्रिमप्रोजेक्टची जबाबदारीही त्याने त्यांच्यावर निर्धोकपणे सोपवली होती. प्रत्येक आर्थिक व्यवस्थापनात तो वडिलांच्या हक्काने त्यांना सामील करून घ्यायचा.. उरलासुरला आधार तेच तर होते. पण आज त्यांनाही नियतीने का हिरावून घेतले असा प्रश्न उपस्थित करून तो कितीतरी वेळ रडला.

त्यांच्या अंत्यदर्शनाला जातांना काळिज गलबलून आले होते. आभालाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली घालवलेला प्रत्येक दिवस जसाच्या तसा आठवत होता. एवढ्या मोठ्या कंपनीचे अधिकारीपद भूषवितांनाही त्यांनी तिला अन् छोट्या श्रेयाला नेहमीच वडिलांची माया दिली होती.

ऑफिसमध्ये महत्त्वाची मिटिंग असल्याने मंदारला अंत्यविधीसाठी येणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रेया शाळेत गेल्यानंतर ती एकटीच स्कूटी घेवून त्यांच्या घरी पोहचली.

अमित गेल्यानंतर ती शक्यतो अश्या प्रसंगांना जायचे टाळायची. पण आज नव्हतं टाळता येतं. शेवटी मनाला खंबीर करून ती तिथे आली. पुन्हा एकदा समोरचं हृदयद्रावक दृश्य पाहून काळीज गलबलून आलं. त्यांच्या आप्तेष्टांना रडतांना पाहून ती पुन्हा एकदा अमितच्या आठवणींनी हळवी झाली. तिला आता तिथे थांबणे अशक्य झाले. हृदयाची धडधड कमालीची वाढली.माणसांच्या आणि आठवणींच्याही त्या गर्दीत तिला गुदमरल्यासारखे झाले.अंत्यदर्शन घेवून ती गर्दीपासून बाजूला झाली. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.तिथे थांबणे अशक्य झाल्याने ती बाहेर पडली आणि स्कूटीपाशी पोहचली. खूप प्रयत्न करूनही स्कूटी सुरु झाली नाही. त्या भागात रिक्षाही फारश्या येत जात नव्हत्या. त्यामुळे स्कुटी सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न अजूनही सुरुच होता. आता मात्र ती खूप थकली. तोच तिचा तोल गेला. कशीबशी सावरत ती समोरच्या बाकड्यावर बसली. डोळ्यांतून पुन्हा आठवणी बरसू लागल्या. ओंजळीत चेहरा झाकत ती तशीच बसून राहिली.

" मिसेस. कर्णिक पाणी घ्या.." पाण्याची बाटली समोर धरून तो म्हणाला.

मिस्टर राऊत यांच्या घरात तिची झालेली अवस्था तो पाहत होता अनुभवत होता. त्यानंतर स्कुटी सुरु करण्यासाठी तिने केलेली केविलवाणी धडपड आणि या धडपडीत थकलेली ती.. हे सारं पाहून त्याने गाडीतून पाण्याची बाटली काढली आणि मनाला खंबीर करत तिच्यापाशी पोहचला.

हो.. श्रेयशच होता तो. त्याला नव्हतं यायचं तिच्यासमोर. पण तिची ती अवस्था पाहणेही त्याच्यासाठी अशक्य होते. शेवटी कश्याचीही तमा न बाळगता तो तिथे पोहचलाच.

त्याच्या आवाजासरशी ती दचकली. ओंजळीतून चेहरा वर काढत त्याच्याकडे पाहिले.

आज पाचवर्षांनी त्या दोघांची प्रत्यक्ष नजरानजर घडली. मनाने साथ सोडली आणि तिच्याविषयीचं प्रेम त्याच्याही डोळ्यांतून बरसून गेलं..

त्या दिवशी प्रमाणेच आजही दोघांच्या डोळ्यांतील अश्रू त्यांच्या भेटीची साक्ष देत होते. तिच्या डोळ्यांत पाणी पाहून तो पुन्हा अगतिक झाला.

त्याला पाहताच तिने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला.

" मिसेस कर्णिक.. प्लिज पाणी घ्या.." तिची अवस्था त्याला पाहवत नव्हती. 

त्याचे शब्द काळजाला घाव घालत होते पण बुद्धी मात्र अजूनही तो खुनी आहे असं ओरडून ओरडून सांगत होती.

काहीही न बोलता ती उठली आणि पुन्हा एकदा गाडी सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागली.

" माझं ऐका, पाणी पिऊन घ्या. मी पाहतो गाडीचं.." आता त्यानेही तिच्याकडे पाहण्याचे टाळले. 

पाण्याची बॉटल गाडीवर ठेवून त्याने दुसऱ्या बाजूने गाडी पकडली.

आता तिला बाजूला व्हावेच लागले.पाण्याची बॉटल न घेता ती तशीच बाकड्यावर जाऊन बसली.

एव्हाना श्रेयाची स्कूलही सुटली असेल याची आठवण येताच ती अगतिक झाली. पर्समधून मोबाईल काढत तिने बाजूच्या साठेकाकूंना फोन लावला.

" अगं आभा आम्ही बाहेर आलो आहोत. त्यामुळे श्रेयाला नाही घेता येणार स्कूलबस मधून.." पलिकडून साठेकाकू असे म्हणताच तिचा उरलंसुरलं अवसानही गळून पडलं.

श्रेयश सारं काही ऐकत होता. स्कूटी सुरु होईल याची शक्यता नव्हतीच.

"मिसेस कर्णिक. मेकॅनिक बोलवून स्कूटी दाखवावी लागणार. वेळ जाईल भरपूर. श्रेयाला रिसीव्ह करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर घाबरेल ती. मी सोडतो तुम्हांला घरपर्यंत.." स्कूटी एकाबाजूला लावत तो म्हणाला आणि स्वत: ची गाडी आणण्यासाठी निघून गेला.

त्याच्यासोबत एका गाडीत प्रवास करणे तिच्यासाठी अशक्य होते. आजूबाजूला रिक्षा मिळते हे पाहण्याचा तिने पुन्हा एकदा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. थोड्याच वेळात तो गाडी घेवून तिथे येऊन पोहचला.

" मिसेस. कर्णिक प्लिज बसा. उशीर होतोय. श्रेया पोहचायच्या आत तुम्ही तिथे असायला हव्यात.." तिच्याकडे न पाहता तो म्हणाला.

तिने आताही काहीच प्रतिउत्तर दिले नाही.

पुढे काय होईल नक्की वाचत रहा. कथा आवडल्यास प्लिज लाईक करायला विसरु नका.

आपल्या प्रतिक्रिया अमूल्य आहेत. कळवत रहा आणि प्रोत्साहन देत रहा.

क्रमश:

©® आर्या पाटील.

🎭 Series Post

View all