तु असा जवळी रहा...( भाग ११ वा)

Love story having shades of purity feelings emotions care responsibility and destiny..

# तु असा जवळी रहा..( भाग ११ वा)

©® आर्या पाटील

त्या प्राजक्ताखाली जुन्या आठवणींनाही बहर आला.

सरपोतदार मॅडम श्रेयशच्या आई म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व. आभाच्या गावी असलेल्या मराठी शाळेत त्यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली होती. श्रेयशचे वडिलही गावापासून काही अंतरावर असलेल्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक होते. शहरापासून दूर त्या छोट्याश्या गावात त्यांनी आपला संसार थाटला. त्यांची बदली जेव्हा त्या गावात झाली तेव्हा आभाच्या वडिलांनीच त्यांना आपल्या वाड्याचा काही भाग राहण्यासाठी दिला होता. दरम्यानच्या काळात सरपोतदार सर आणि आभाच्या वडिलांमध्ये मैत्रीचे चांगलेच बंध निर्माण झाले. माणुसकी जपणाऱ्या आभाच्या आईवडिलांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली.. अगदी कमी वेळातच त्यांच्यात घरचे संबंध निर्माण झाले. वर्ष दोन वर्षातच त्या गावातच राहायचे हा निर्णय त्यांनी पक्का केला आणि त्या अनुषंगाने जागा घेवून छोटेखानी बंगला बांधला.त्यावेळी आभा जेमतेम पाच सहा वर्षांची असेल आणि श्रेयशही नऊ एक वर्षांचा असेल.एकाच घरात राहतांना एकाच अंगणात खेळतांना लहानवयातच त्यांच्यात मैत्रीची पाळेमुळे रोवली गेली. अमितही वर्षाचा असेल त्यावेळेस.

श्रेयशच्या आईचा तर आभावर खूप जीव. आभाही त्यांच्याशिवाय राहत नसायची.पहिल्या इयत्तेत असतांना जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याच शाळेत गेली तेव्हा आपला वर्ग सोडून ती त्यांच्याच वर्गात जाऊन बसली. त्याच वर्गात श्रेयश होता. आभा जाऊन त्याच्याच शेजारी बसली. वर्गातील साऱ्याच मुलांनी तिला असं रडतांना, आपला वर्ग सोडून दुसऱ्या वर्गात बसतांना पाहून चांगलाच हश्या पिकविला. तेव्हा त्या मुलांवर श्रेयश कमालीचा बरसला.तिच्या डोळ्यांतले पाणी टिपण्यासाठी त्याने रुमाल दिला. त्याला जवळ पाहून शाळेच्या सुरवातीचे दिवस छोट्या आभाला सुसह्य झाले.

श्रेयश लहानपणापासून खूपच समजूतदार. छोट्या आभाची अगदी मनापासून काळजी घ्यायचा तो. खूप मोठा नव्हता तो ही.चौथ्या इयत्तेत शिकणारा तो छोट्या वयातही तिच्याबाबतीत खूप जबाबदार होता. एकुलता एक असल्याने सुरवातीच्या काळात त्याला समवर्गीय मुलांचा सहवास तसा लाभलाच नव्हता.. पण जेव्हा ते आभाच्या गावी आले तेव्हा त्याचं बालपण तिच्या असण्याने रंगीत झाले.आभा म्हणजे उत्साहाचा झरा. तिने अगदी कमी वेळातच श्रेयश शी मैत्री केली. एकलकोंडा तो तिच्या सहवासात मात्र चांगलाच रमला. वर्गात फारसा न बोलणारा, वर्गातील मुलांशी न खेळणारा तो आभासोबत भरभरून जगायचा.. अगदी अजाणत्या वयात त्यांच्या मैत्रीच्या रोपाला बहर आला..

" ही मैत्री अशीच जपा बाळानों.. आपण तुमच्या मैत्रीचं प्रतिक म्हणून आपल्या बंगल्याच्या गार्डनमध्ये प्राजक्ताचं झाड लावूया.. या फुलांपरी मैत्रीचा मंद सुगंध आयुष्यभर तुमच्या नात्यात दरवळत राहु दे.." सरपोतदार मॅडमचे शब्द जसेच्या तसे तिच्या कानात रुंजी घालू लागले..

 वाऱ्याच्या थंड झुळुकेचा स्पर्श होताच ती भानावर आली..

भूतकाळाचं फुलपाखरू हृदयावर आठवणींचे रंग ठेवून उडून गेले.. त्या आठवणींच्या श्रावणसरीत ती मनसोक्त भिजली.

" ते दिवस तसेच राहिले असते तर..? बालपणातील ते निरागस नाते आजही तेवढेच निरागस राहिले असते तर..?" मनाने कल्पनाशक्तीचे इमले बांधायला सुरवात केली..

त्यासरशी स्मितहास्याची पुसटशी रेषा तिच्या खळीदार गालावर उमटली..

तोच फोन वाजला.. ती भानावर आली.

मंदारचा होता फोन.

" हॅलो, आभा ठिक आहेस ना..? झालं का बोलणं सरांशी..? प्रोजेक्ट रिटर्न केलास का..?" त्याने एकावर एक प्रश्न विचारायला सुरवात केली.

तिने लांब उसासा टाकला.

" नाही रिटर्न केला.. मी करतेय काम त्या कंपनीसोबत. मिस्टर राऊतांच म्हणणं नाही टाळू शकले.." तिनेही घडलेलं सारं संभाषण त्याला सांगितलं.

" वॉव..! कॉन्ग्रज्युलेशन डियर.. खूप योग्य निर्णय घेतला आहेस तु.. इट वुल्ड बी युवर ड्रीम प्रोजेक्ट.. गो अहेड स्विट्हार्ट.. ॲण्ड आय लव्ह यू सो मच.." तो म्हणाला. तिच्यासाठी तो खूपच आनंदी झाला होता.

" थँक यु सो मच..ॲण्ड आय लव्ह यू टू.." तिनेही हसून प्रतिउत्तर दिले.

" मग आता कुठे आहेस..? पोहचलीस का घरी..? आणि ऑफिसमध्ये मिस्टर श्रेयश होते का..?" त्याने पुन्हा एकदा प्रश्नोत्तरांची सुरवात केली.

" नाही. घरी नाही पोहचले. आहे ऑफिसमध्येच. निघते थोड्या वेळात.." प्राजक्ताच्या झाडावर कटाक्ष टाकत ती म्हणाली.

श्रेयशविषयीच्या चौकशीला तिने जाणीवपूर्वक टाळले.

" ठिक आहे. व्यवस्थित जा. आणि पोहचल्यावर कॉल कर. मी वाट पाहतो." काळजीने तो म्हणाला.

" हो. करेन कॉल.. बाय" म्हणत तिने फोन कट केला.

श्रेयशचं तिच्यातील अस्तित्व कायमचं सपंवलं म्हणून नशिबाला नक्की दोष द्यायचा की मंदारच्या रुपात तिच्या अस्तित्वाला उभारी मिळाली म्हणून नशिबाचे आभार मानायचे हिच काय ती नेहमीची विवंचना तिला आताही छळून गेली.

ओंजळभर प्राजक्ताची फुले वेचून तिने बॅगेत भरली. गार्डनच्या जागेची पाहणी करून तिने तेथील मातीचे नमुने परिक्षणासाठी सोबत घेतले आणि परतीचा मार्ग धरला.

ती केबीनबाहेर गेल्याबरोबर मिस्टर राऊत यांनी श्रेयशला फोन करून तिने प्रोजेक्ट स्विकारल्याचे कळवले..

 अपराधाचं मळभ चढलेल्या त्याच्या मनाला थोडासा का होईना पण दिलासा मिळाला.

तिचं आयुष्य नाही बनू शकलो निदान तिच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गातील अडथळा तरी आपल्यामुळे दूर झाला याचे त्याला समाधान वाटले.

आज त्याच्यासमोरही बालपणीची त्याची जीवलग मैत्रीण जशीच्या तशी उभी राहिली. किती अल्लड होती ती याची आठवण येताच तो गालातच हसला. लहानपणी तिच्या सोबत खेळतांना कसलीच आठवण नसायची. लहानपणी आपलं जग फक्त तिच्याभोवती सीमित झाले होते हे आठवताच त्याने डोळे गच्च मिटले. एकदा आंब्याच्या झाडावर चढून तिला आंबे काढून देतांना तो खाली कोसळला होता.. किती रडली होती ती. जखम त्याला झाली होती पण वेदना तिच्या डोळ्यांतून वाहत होत्या.त्याला लागलिच शहरातल्या दवाखान्यात नेले.

" मला श्रेयशला पाहायचे आहे. आताच्या आता मला तिथे घेवून चला.." म्हणत तिने रडगाणे सुरु केले. साऱ्यांनी समजावलं पण ती कोणचंही ऐकायला अजिबात तयार नव्हती.शेवटी रडून रडून तिलाच काही होईल या भीतीने तिचे बाबा तिला दवाखान्यात घेवून गेले. श्रेयशच्या डोक्याला चांगलीच जखम झाली होती. त्यावर औषध लावून ड्रेसिंग केले होते. हातालाही फ्रॅक्चर असल्याने प्लॅस्टर करावा लागला होता.

त्याला या अवतारात पाहून तिचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. श्रेयशच्या जवळ बसून ती मुसमुसून रडू लागली.

" आभा, शांत हो पाहू. तो आता ठिक आहे. आणि तुझा मित्र लवकरच बराही होईल अगदी आधीसारखा. पण तु आधी रडणं थांबव.." सरपोतदार मॅडम तिला जवळ घेवून म्हणाल्या.

तरी ती ऐकेच ना.. शेवटी त्या दोघांनाच एकत्र ठेवून सारे रूमबाहेर पडले.

" ये रडूबाई.. अशी काय रडतेस..? नाकाचा शेंडा बघ कसा लाल झालाय.. मी ठिक आहे. तु रडतेस त्याचा जास्त त्रास होतोय. आणि किती घाण दिसतेस रडतांना.." तो तोंड वाकडं करत म्हणाला.

" मी घाण दिसते तुला....?" म्हणत तिने डोळे पुसत त्याच्या हातावर हलकेच मारले.

" ये अगं फ्रॅक्चर आहे हाताला.. काय करतेस.?" तो ओरडत म्हणाला.

" सॉरी सॉरी.." म्हणत तिने जीभ चावली.

" आभा तु अशीच भांडखोर चांगली वाटतेस. रडतांना नाही पाहवत तुला.. आता हस पाहू. तुझ्या गालावरची खळी दिसलीच नाही मघापासून.." तो समजावत म्हणाला.

तशी ती ही गोड हसली..

तिची खुललेली कळी पाहून बाहेर सगळेच सुखावले.

पुढे तो पूर्णपणे बरा होईपर्यंत अल्लड आभा चांगलीच जबाबदार बनली.. रात्री झोपायला घरी यायची तेवढीच. बाकी शाळा सुटल्यावर तिची स्वारी श्रेयशच्या खिदमतीला हजर असायची.. तिच्यापरीने तिने जशी जमेल तशी त्याची काळजी घेतली. त्याचा अभ्यास पूर्ण करण्यापासून ते मॅडम नसतांना त्याला जेवण भरविण्यापर्यंत सगळच केलं तिने..

त्याच दिवसांत ती त्यांच्या घराचा एक बोलका भाग बनली.. तिच्याशिवाय त्यांनाही करमायचे नाही.. मॅडमना बागेची खूप आवड.. त्यांच्या या आवडीची गोडी तिच्यात कधी उतरली कळलेच नाही.. बंगल्यासमोरील बाग म्हणजे तिचं दुसरं माहेरघर बनलं.. त्या बागेत मॅडमसोबत तिने नानाविध फुलझाडे, फळझाडे आणि औषधी वनस्पतीही लावल्या..

त्यांच्या सोबत त्या दोघांनी मिळून लावलेल्या प्राजक्तावर तर तिचा आभाळागत जीव होता..

एकाबाजूला योग्य ती निगा राखत वेळेच्या वेळी खतपाणी घातल्याने अंगणात प्राजक्ताचं झाड बहरत होतं तर दुसऱ्या बाजूला आपुलकी, सहवास, आणि काळजी यांच्या खुराकाने त्यांच्या मैत्रीच्या रोपालाही आकार येत होता..

" आभा खूप निरागस आहे. चांगला मित्र बनून तिची निरागसता जप. बालपणीची घट्ट मैत्री अशीच आयुष्यभर निभावत रहा." त्याच प्राजक्ताखाली आईने बांधलेली खूणगाठ आजही त्याच्या जशीच्या तशी स्मरणात होती. आईची आठवण येताच तो गहिवरला.. डोळ्यांतून ती आठवण बरसणार तोच त्याचा फोन वाजला. मिस्टर राऊत यांनी पुन्हा कॉल केला होता.

" सर तुम्हांला मिसेस कर्णिक मॅडमचं प्रेझेंटेशन मेल केलं आहे.. त्यात काही सुधारणा असतील तर सांगा. तसे चेंजेस कळवतो त्यांना.." ते म्हणाले.

" नो निड ऑफ इट. मला खात्री आहे त्या बेस्टच देतील. गार्डन रिलेटेड सगळा सेटअप त्यांना त्यांच्या मर्जीनेच करू द्या.. गरजेचं सामान पुरवा पण त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप नको.." म्हणत पुढच्याच क्षणी त्याने फोन कट केला..

मिस्टर राऊत आश्चर्यचकित झाले.

असं एवढ्या खात्रीने श्रेयशने तिला दिलेली मोकळीक त्यांना पटत नव्हती पण बॉसचा निर्णय हा शेवटचा. त्या निर्णयाला मान देत त्यांनीही त्या प्रोजेक्टमध्ये हस्तक्षेप न करण्याचा निश्चय केला.

फोन ठेवल्यानंतर मात्र श्रेयशने भूतकाळाच्या आठवणींतून काढता पाय घेतला आणि स्वत: ला ऑफिसच्या कामामध्ये गुंतवून घेतले..

आभा घरी पोहचल्यानंतर थोड्याच वेळात छोटी श्रेयाही स्कूलमधून घरी आली..

स्वयंपाक त्यानंतर श्रेयाला भरविणे यातच दुपार झाली. जेवण आटोपल्यानंतर ती तिच्या आवडीच्या कोपऱ्यात आली.. पुन्हा लक्ष खिडकीतून त्याच बंगल्यावर गेले..

त्यासरशी तिने पुन्हा खिडकी बंद केली..

"तो तिथे नाही आहे आणि येणारही नाही.." बुद्धी ओरडून ओरडून सांगत होती पण मनाला मात्र पटत नव्हते.. अजूनही सत्य स्विकारायची ताकद नव्हती आली तिच्यात..

" आई, ये ना रुममध्ये.. मला झोप येतेय.." श्रेयाच्या आवाजाने ती भानावर आली आणि रूममध्ये पोहचली.

झोपेचं फक्त कारण.. खरं तर श्रेयाला तिला आत बोलवायचे होते. समोर कपाटातील कपडे अस्तावस्त करून श्रेया काहीतरी शोधत होती.

" श्रेया, बेटा हे काय आहे..? काय शोधते आहेस.? का काढले सगळे कपडे कपाटातून..?" कपड्यांना पाहून आभा म्हणाली.

" आई, माझ्या फ्रेण्डचा हँकी हवा आहे मला. त्याला रिटर्न द्यायचा आहे. सांग ना कुठे ठेवलास तो..?" ती पुन्हा कपडे अस्तावस्त करित म्हणाली.

तशी आभा चाचपडली.. जळणारा तो रुमाल आणि त्याची झालेली राख डोळ्यांसमोर स्पष्ट दिसली. पण आता श्रेयाला काय सांगणार ही विवंचना यक्षप्रश्न बनून उभी राहिली.

 " बेटा, तो रुमाल मी त्यांच्या ऑफिसमध्ये दिला.. आणि त्यांना द्यायला सांगितला.." नजर चोरत आभा खोटे बोलली.

" का दिला तु..? मला फ्रेण्डला भेटून तो रिटर्न करायचा होता आणि त्याचा थँक यू म्हणायचे होते.." ती रुसत म्हणाली.

" मी तुझा निरोप सांगितला बरं.. त्यांना म्हटलं श्रेयाच्या नव्या फ्रेण्डला थँक यू ही म्हणा.." रुसलेल्या श्रेयाला मांडीवर घेत ती म्हणाली.

" खरच... थँक यू सो मच आई. आय लव्ह यू.." म्हणत ती आभाच्या गळ्यात पडली.

श्रेयाशी खोटं बोलल्याचा त्रास होत होता तिला पण त्याहीपेक्षा हे प्रकरण इथेच संपल्याचं समाधान जास्त होतं.. निदान मंदारला तरी आता रुमालाविषयी ती काही विचारणार नाही याची खात्री आभाला पटली. 

कपड्यांसोबत खेळता खेळता छोटी श्रेया झोपी गेली. तिला बेडवर झोपवून आभाने कपड्यांचा पसारा आवरला आणि ती रूमबाहेर पडली.

अमित गेल्यापासून झोपेशी तिचं तसं वाकडच होतं.. दुपारीही फार क्वचित ती झोपायची. यावेळात तिच्या मनाला शब्दांच्या राज्यात रमायला आवडायचे.. तिच्या आवडीच्या कोपऱ्यात बसून ती शब्दांना ओंजळीत घ्यायची आणि काव्यफुले गुफांयची..

आजही बंद खिडकीच्या त्या कोपऱ्यात तिने शब्दांना साद घातली.. पाहता पाहता मनाच्या गाभाऱ्यात भावनांची मांदियाळी सजली..

        "मी सरितेपरी अल्लड वाहतांना

         का स्वता:स हरवून बसले..

         ओंजळीत सुख असतांनाही

         का माझ्याशीच ते रुसले..

         सागराची ओढ का

         इतकी जीवघेणी ठरली...

          प्रेमाची परीक्षा देता देता

          मी जगण्याची उमेद हरली..

          सागरात सामावत असतांना

          मग मीच विरहाचे कारण ठरली..

          एकमेकांत मिसळण्याची ओढही मग

           किनाऱ्यावरच अडली...

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all