तु असा जवळी रहा...( भाग १० वा)

Love story having shades of purity feelings emotions care responsibility and destiny

# तु असा जवळी रहा...( भाग १० वा)

©® आर्या पाटील

" बेटा, तुझ्या बाबांचा मित्र म्हणून मला असे वाटते की या नविन प्रोजेक्टचं काम तुझ्याच नेतृत्वाखाली पूर्ण झालं असतं तर उत्तम झालं असतं.. हा प्रोजेक्ट म्हणजे तुझं स्वप्न. या स्वप्नाची पूर्ती तुझ्या उपस्थितीशिवाय अपूर्ण वाटेल. तु अजून तरी या निर्णयाचा विचार करावास.." मिस्टर राऊत वडिलांच्या मायेने म्हणाले.

" काका, आपली स्वप्नपूर्ती आपल्या आदर्शाच्या उपस्थितीत होत असेल तर त्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व येते. आणि तुम्ही माझे आदर्श होता, आहात आणि नेहमीच राहाल. प्लिज नाही म्हणू नका. मी हात जोडून विनंती करतो.." पुन्हा एकदा हात जोडत श्रेयश म्हणाला.

" ठिक आहे. मी सांभाळेन सारं पण अप्रत्यक्षपणे का असेना प्रत्येक निर्णयात तुमचं मत गरजेचं असेल. मला नेहमीच तुमच्या मदतीची गरज असेल.." म्हणत मिस्टर राऊतांनी श्रेयशचे जोडलेले हात खाली घेतले.

होकारार्थी मान हलवित श्रेयशनेही दुजोरा दिला..

पुढे अगदी तासा दोन तासातच कंपनीची सारी सूत्रे मिस्टर राऊतांकडे सोपवित श्रेयश कंपनीमधून निघाला आणि परतीच्या मार्गाला लागला.

विचारांच्या गर्दीतून वाट काढीत त्याने वास्तवाचा रस्ता धरला. जेवढं शक्य होईल तेवढं तिचा विचार न करण्याचा त्याचा मानस वेड्या मनाने धुडकावून लावला.

आपल्या श्वासालाच कसे विसरणार..? निर्धार पक्का होता तिच्या आयुष्यात पुन्हा नाही जायचं.

पण तिच्या आयुष्यात तो कायमस्वरूपीच होता. आधी प्रेम बनून आणि मग त्याच प्रेमाच्या वेदना बनून.

तो अजूनही रोजच तिच्या स्वप्नांत येत होता फक्त कारण बदलले होते.आधी तिचा राजकुमार म्हणून भेटणारा तो आता आयुष्यभराचा वैरी बनला होता..

अजूनही त्यांच्यातील नातं कायम होतं पण त्या नात्याचा अर्थ मात्र बदलला होता. प्रेमाचा ओलावा सरुन मनोभूमी तिरस्काराने रखरखली होती.

सारच आनंदात सुरु असतांना.. आयुष्य भरभरून जगत असतांना.. अचानक नियती काळ बनून आली आणि आयुष्याचा रंगीत डाव क्षणार्धात उधळून गेली.. सुखाचे रंग आभाळभर उधळले गेले आणि आयुष्यावर दु:खाचा काळा रंग चढला.. या काळ्या छायेखाली ती पार गुदमरून गेली होती.. त्या काळ्या आभाळी मंदार सुखाचा इंद्रधनुष्य बनून आला आणि पुन्हा एकदा तिचं आयुष्य रंगीत केलं.. पण त्या रंगीत आयुष्याला अजूनही ती काळी किनार छळत होतीच..

काल श्रेयशला पाहिल्यापासून आभाचा चेहरा पूर्णपणे पडला होता. तिच्या वागण्यातील,बोलण्यातील ओसरलेला उत्साह मंदारच्याही लक्षात येत होता.

अमितच्या आठवणींमूळे ती भावूक झाली असेल असा अंदाज बांधून तो ही तिला समजून घेण्याचा प्रयत्न करित होता. मात्र तिने श्रेयशच्या ऑफिसचा प्रोजेक्ट सोडायचा जो निर्णय घेतला होता तो मात्र त्याच्या काही केल्या पथ्यावर पडत नव्हता..

सबंध दिवसच अगदी शांततेत गेला..तिनेही तब्येतीचं कारण देऊन रुममध्ये राहणेच पसंद केले. कोणत्याही कारणाने श्रेयशला डोळ्यांसमोर नव्हते येऊ द्यायचे तिला..

रात्री जेमतेम झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे केव्हाच जाग आली .. मंदारचं ऑफिस, श्रेयाची शाळा आणि तिलाही प्रोजेक्ट परत करायला ऑफिसमध्ये जायचे होते. त्यामुळे सकाळी लवकरच तयार होत तिने किचनचा ताबा घेतला..

ऑफिसमध्ये पुन्हा तो दृष्टीस पडला तर.? त्याच्यासोबतच बोलायची वेळ आली तर..? जिथे त्याचा चेहराही पाहायची इच्छा नाही तिथे त्याच्याशी बोलण्याची कल्पनाही तिला नकोशी वाटत होती..

सकाळचा नाश्ता करता करता विचारांच्या खोल गर्तेत ती पुरती हरवली..

" गुड मॉर्निंग स्विट्हार्ट.." म्हणत मंदारने पाठमोऱ्या आभाला मिठीत घेतले..

तशी ती दचकली.

" काय गं घाबरलीस का..?" त्याने तिला स्वत:कडे वळवत विचारले.

" तु असा अचानक आलास ना म्हणून.." तिने उत्तर दिले.

" आभा, नको ना एवढा विचार करूस. मनात आहे ते बोलून टाक. शांत वाटेल.." तिच्या विचारांनी त्रस्त चेहऱ्याला पाहून मंदारने समज काढली.

तिने पुन्हा होकारार्थी मान हलविली.

" आभा, त्या प्रोजेक्ट विषयी तु पुन्हा एकदा विचार करावास असं राहून राहून वाटतय.." तिला समजवण्याचा आणखी एक प्रयत्न करित तो म्हणाला.

" प्लिज मंदार याविषयावर आपण नको बोलूयात. माझा विचार पक्का झालाय." म्हणत ती पुन्हा आपलं काम करू लागली.

" ठिक आहे. जशी तुझी मर्जी.." म्हणत तो तयार व्हायला निघून गेला. तिचा निर्णय स्विकारणे एवढच त्याच्या हातात होतं.

श्रेयाही उठली..नाश्ताचं आवरल्यानंतर तिने शाळेसाठी तिची तयारी केली. नऊच्या सुमारास शाळेच्या बसमध्ये श्रेयाला बसवून आभानेही ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयारी सुरु केली.

मंदार ऑफिससाठी निघतच होता त्याच्यासोबतच निघून श्रेयशच्या नविन ऑफिसला पोहचायचे असे तिने ठरवले.

थोड्याच वेळात नाश्तापाणी आवरून ते निघाले. गेटमधून बाहेर पडत असतांना मंदारची नजर श्रेयशच्या बंगलामध्ये ड्युटी करणाऱ्या वॉचमनवर पडली.

गाडी थांबवत त्याने त्याला आवाज दिला.

" मंदार, उशीर होतोय आता त्याच्यासोबत काय काम आहे..?" श्रेयश नजरेस पडेल या भीतीने आभा म्हणाली.

त्याने थोडावेळ थांबण्याचा इशारा केला. तोवर तो वॉचमनही त्याच्यापाशी येऊन पोहचला.

" वॉचमन, वो मिस्टर सरपोतदार ऑफिस को निकल गए क्या..?" गाडीची काच खाली करत मंदार म्हणाला.

आभा मात्र त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागली. क्षणभर त्याचा तिला रागही आला.

" वो सर ने बंगला छोड दिया! वो वापस नही आएँगे.! शायद अपने घर चले गए..!" वॉचमन म्हणाला.

" कब छोड दिया..! परसो ही शिफ्ट हूए थे ना..?" मंदार ने आश्चर्याने विचारले.

" हा साहबजी.. कल ऑफिस गए वो आए ही नही..! उन्होंने ऑफिस भी छोड दिया शायद.! उनके शहरवाले मेन ऑफिस कुछ काम निकल आया है..! अब ऑफिस भी नही आएँगे वो..!" राऊत सरांनी दिलेली माहिती त्याने जशीच्या तशी मंदारला सांगितली.

" अच्छा.. चलो ठिक है..! पर अच्छे आदमी थे..!" असं म्हणून मंदारने गाडी स्टार्ट केली.

आभाच्या काळजात खोल उलाढाल झाली.. मन भरून आलं आणि डोळ्यांत पाणी दाटलं. नकळत अश्रूंचे थेंब गालावर ओघळले.. तिने मंदारच्या नकळत पटकन डोळे टिपले. आज पाच वर्षांनी पहिल्यांदा तिला तिचा श्रेयश आठवला. कारण आजही तो तसाच होता फक्त तिच्या सुखाचा विचार करणारा. आपल्यासाठीच त्याने इथे राहणे आणि त्या ऑफिसमध्ये काम करणे नाकारले हे न समजण्या इतपत ती निष्ठुर झाली नव्हती..

" आभा, चांगले होते सरपोतदार. शेजारी म्हणून त्यांचा सहवास मिळायला हवा होता. असो आता तूही ते ऑफिस सोडत आहेस त्यामुळे त्यांच्याशी संबंध इथेच संपला." मंदार म्हणाला आणि आभा भानावर आली.

आभाने फक्त तोंडानेच होकार भरला. गहिवरलेल्या मनाला शब्द थोडेच साथ देणार होते. आणि तिचे जड शब्द मंदारला भावनिक करून गेले असते म्हणून तिने शांतच राहण्याचे ठरवले.

" जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. चांगलं झालं तो इथून निघून गेला नाहीतर त्याच्या वाट्याला फक्त तिरस्कारच आला असता. आणि तो नको यायला म्हणूनच हे काम सोडत आहे मी. पाच वर्षांपूर्वी याच कारणास्तव त्याच्या सोबत होऊ घातलेलं लग्न तोडलं होतं मी.." बुद्धीने तिच्या भावनिक मनाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न केला.

मनानेही खंबीर होत बुद्धीच्या निर्णयाचं स्वागत केलं.

मनाचा गुंता सोडवता सोडवता कधी ऑफिस आलं तिलाही कळलं नाही.

" आभा, उतरतेस ना..? तुझ्या निर्णयाचं स्वागतच आहे पण मला अजूनही वाटतय.." तो बोलतच होता की आभाने त्याला मधेच अडवले आणि मानेनेच नकार दर्शवला.

त्यानेही डोळ्यांनीच तिच्या निर्णयाला परत एकदा दुजोरा दिला. ती गाडीतून उतरणार तोच त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला प्रोत्साहन दिले.

अश्रू पुन्हा एकदा डोळ्यांच्या कडा ओलांडून ओघळू पाहत होतेच की तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर पडली..

तिची पाठमोरी आकृती दृष्टीआड जाईस्तोवर तो तिथेच थांबला होता.. तिलाही याची कल्पना होतीच. थोड्या अंतरावर जाऊन तिने मागे पाहिले. आणि मंदारकडे पाहून स्मितहास्य करित हाताने जायचा इशारा केला.

मंदार ने ही स्मितहास्य करित गाडी काढली आणि तो निघाला.

" खूप नशिबवान आहे मी मंदार कारण माझ्यासोबत तु आहेस. रिती ओंजळ देवाने दुप्पट भरून दिली. पण.." भूतकाळाच्या ओढीने धावणाऱ्या मनाला तिने अडविले. आणि ऑफिस गाठले.

श्रेयश ऑफिसमध्ये नाही आहे हिच एक गोष्ट तिला समाधान देत होती..

तशी तिने ती येत असल्याची मिस्टर राऊत यांना कल्पना दिलीच होती.

रिसेप्शन एरियात आल्यावर मिस पल्लवीने सरांना कॉल केला.

मिस्टर राऊत त्यांच्या केबीनमध्ये तिची वाट पाहत थांबले होते.

" या मिसेस कर्णिक.. हॅव अ सीट.." म्हणत त्यांनी तिला बसायला सांगितले.

" थँक यू .. माफ करा सर कदाचित हे मी त्याच दिवशी स्पष्ट करायला हवं होतं.. माझ्या काही पर्सनल कारणांमुळे मी तुमच्या कंपनीचा प्रोजेक्ट नाही स्विकारू शकत.. आय ॲम सो सॉरी.." तिने आपला निर्णय स्पष्टपणे सांगितला.

" पण, हे असं शक्य नाही.एखाद्या कंपनीसोबत डील करतांना पर्सनल रिजन्स् बाजूला ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. असं वेळेवर तुम्ही प्रोजेक्ट नाही नाकारू शकत." मिस्टर राऊत गंभीर होत म्हणाले.

" मला याची कल्पना आहे. पण माझं रिजन ही तेवढच जेन्युईन आहे. प्लिज सर प्लिज या प्रोजेक्टच्या बाबतीत माझा भार हलका करा." ती हात जोडत म्हणाली

" मिसेस कर्णिक तुम्ही खूप टॅलेण्टेड आहात मग अश्या प्रकारे कश्या वागू शकता. ठिक आहे तुमची अडचण असेल पण आयत्या वेळेस तुम्ही नकार नाही देऊ शकत. कंपनीच्या एम.डीनीं खूप जबाबदारीने ही कामगिरी मला दिली आहे. मीच तुम्हांला विनंती करेन की त्यांच्या नजरेत मला बेजबाबदार नका ठरवू.. ते ही हा नविन प्रोजेक्ट सोडून मेन ऑफिसला शिफ्ट झालेत. आणि आता तुम्हींही. माझंही वय झालय आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला होणारा मनस्ताप चालेल का तुम्हांला..?.." मिस्टर राऊत म्हणाले.

श्रेयशने हे असे घडेल याची कल्पना निघता निघता त्यांना दिलीच होती.

आणि काही झाले तरी आभाला प्रोजेक्ट सोडू नाही द्यायचा हे ही बजावले होते.

तिच्या भावनिक मनाचा उपयोग करून तिचा नकार होकारामध्ये कसा बदलवायचा याचीही माहिती त्याने इतंभूत दिली होती.

आणि घडलंही तसच. आभा वडिलकीच्या नात्याने बोलणाऱ्या मिस्टर राऊत यांची विनंती नाही नाकारु शकली..

" श्रेयश तर आता इथे कधीच येणार नाही. मग काय हरकत आहे हा प्रोजेक्ट करायला.. आणि हा फक्त त्याचा ड्रिमप्रोजेक्ट नव्हता तर यामध्ये माझ्यासाठीही स्वप्न पाहणाऱ्या सरपोतदार मॅडम होत्या.. "श्रेयशच्या नविन ऑफिसचं गार्डनिंग तु करायचस.. अगदी वेगळ्या ढंगात.." किती विश्वासाने जबाबदारी दिली होती त्यांनी..

निदान मॅडमसाठी तरी मी हे काम स्विकारणार..

मॅडमची आठवण येताच ती पुन्हा अगतिक झाली. त्या आणि सर श्रेयश सोबत राहत असतीस का..? या विचारात असतांनाच मिस्टर राऊत यांनी तिला आवाज दिला.

" मॅडम प्लिज, प्रोजेक्ट नका नाकारू. तुमच्या कौशल्याची गरज आहे कंपनीला.." ते पुन्हा एकदा हात जोडत म्हणाले.

" प्लिज सर तुम्ही असे हात नका जोडू. ठिक आहे मी करते हा प्रोजेक्ट.. तुम्ही नका काळजी करू." म्हणत तिने त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

मिस्टर राऊतांनी लगेच बाजूची फाईल उघडून तिच्या पुढ्यात धरली.

" प्रोजेक्टचे पेपर आहेत तेवढे साइन करा म्हणजे ऑफिशियली हा प्रोजेक्ट तुमचा.." म्हणत त्यांनी तिला पेन दिला.

लांब सुस्कारा सोडत एकवार तिने मिस्टर राऊतांकडे पाहिले आणि स्मितहास्य देत साईन केली.

गार्डनिंगची रुपरेषा ठरवून थोड्याच वेळात ती ऑफिसबाहेर पडली.

तिथल्या दिमाखात उभ्या असलेल्या प्राजक्ताच्या झाडाला पाहून तिला पुन्हा एकदा सरपोतदार मॅडम म्हणजेच श्रेयशच्या आईची आठवण आली.

" ऑफिसच्या दर्शनी भागात प्राजक्ताचं झाड लावायला विसरू नका. तुमच्या सुंदर नात्याचं प्रतिक असलेलं हे झाड तुमच्या भरभराटीचेही द्योतक बनू दे.." मॅडमचे शब्द जसेच्या तसे आठवले तिला..

तिने मागे वळून ऑफिसच्या नावाची होर्डिंग बघितली..

" न्यू व्हिजन सर्व्हिसेस.." तिनेच ठरवलेले होते हे नाव..

पुन्हा एकदा भूतकाळ समोर उभा राहिला.. स्वप्न पूर्ण होत होतं पण पण नाती मात्र बदलली होती हीच काय ती शोकांतिका..

खाली पडलेल्या प्राजक्ताच्या फुलांना ओंजळीत घेत तिने कपाळाला लावले.. आज या फुलांत तिला तिच्या मॅडम भेटल्या होत्या.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all