तू अन् मी

Niytiche N Ulgdnare Asel Ka Re Kode
विषय : दोन ध्रुवावर दोघे आपण
कवितेत नाव : तू अन् मी
राज्यस्तरीय कविता स्पर्धा,
फेरी :२

तू असतोस नामानिराळा
सभोवती माझ्या गदारोळ सारा
गुंतणे तुला जमलेच नाही फार
मी मात्र गुरफटलेली, जशी आकाशीची घार..

सनसमारंभ लग्नसमारोह
नसतचं तुला कशाचं काही घेणदेण
रुढी,प्रथा, परंपरा, संस्कार जपत
मत सांभाळणं,माझं मात्र हेच जीण

मी भला, माझं काम भलं,
पारायण तुझं नित्य
माझ्या \"मी\" मधली मी हरवले कधी
हेच माझं कर्तव्यदक्ष होण्यामागचं सत्य

खारट, आंबट, गोड, तिखट,
कधी जास्ती तर कधी कमी
चविने चाखताना, जिव्हेचे चोचले तुझे आणि
माझ्या सुगरणपणावर, तुझ्या ताशे-यांची हमी

गृहस्वामीनी तू घरकुलाची,
मान्य करतोस तू, अनेकदा
शोध घेते, माझाच मी रे
अस्तित्व रेषा धुसरं वाटतात मज कितिदा

सॉरी तुझं नसतचं कधी,
तुझ्या लेखी मीच मी चूकते
तू आग्रही, तू हट्टी, तू तटस्थ, तू निग्रही
झुकतं माप, मलाच ना रे घ्यावे लागते

काय खोटं काय खरं,
सहजीवनी माझा रे काय हुद्दा
चार भिंतीत अस्तित्व शोधले मी
हाच महत्वपूर्ण मुद्दा

ऐक ना रे जरा सख्या
मी काय म्हणते थोडे
दोन ध्रुवावर दोघे आपण
नियतीचे न उलगडणारे असेल का रे कोडे
-©®शुभांगी मस्के...
टिम : भंडारा