खरा आनंद ( भाग 3 )

About Happiness In Life


खरा आनंद ( भाग 3 )


आपल्या हुशार मुलाचे आयुष्य वाया जात असलेले पाहून श्रीकांतच्या आईवडिलांना वाईट वाटायचे. त्यांच्या मनाला वेदना व्हायच्या.
सारखी दादा...दादा करणारी त्याची बहीणही त्याचे वागणे पाहून घाबरू लागली.
श्रीकांतच्या आईवडिलांनी त्यांच्या ओळखीतील व विश्वासातील लोकांकडे आपली व्यथा सांगितली. त्या सर्वांना ऐकून धक्काचं बसला . प्रत्येकाने वेगवेगळे सल्ले दिले.
देवाधर्माच्या गोष्टी करायला सांगितले. कोणी राशीदोष,वास्तुदोष असे सांगून काही विधी करायला सांगितले.
काहींनी त्याच्याशी कठोरपणाने वागण्याचे सांगितले तर काहींनी प्रेमाने समजून घेण्याचे सांगितले.

सर्वांत सोपे काम म्हणजे सल्ले देणे,उपदेश करणे.
पण जेव्हा आपल्यावर अशी वेळ येते ,संकट येते तेव्हा हे सर्व समजत असूनही यातला काहीच मार्ग सूचत नाही. तेव्हा नको त्या व्यक्तींचेही ऐकून घ्यावे लागते.
श्रीकांतच्या आईवडिलांची व्यथा ऐकून काहींना खरचं वाईट वाटत होते कारण त्यांनाही श्रीकांतकडून चांगल्याच अपेक्षा होत्या.पण काहीजण वरवर जरी दुःखी होण्याचे नाटक करत होते पण मनातून आनंदी होत होते.कारण जेव्हा श्रीकांतचे सर्व जण कौतुक करायचे तेव्हा त्यांना श्रीकांतचा राग,मत्सर वाटायचा..आणि त्यामुळे आता त्याची अशी स्थिती पाहून दुःख वाटण्याऐवजी आनंद होत होता.

श्रीकांतच्या आईवडिलांचे प्रयत्न सुरूच होते आणि
त्याचे आयुष्य चांगले होण्यासाठी ते देवाला प्रार्थनाही करत होते.

श्रीकांतच्या अशा वागण्याचा,व्हायचा तो परिणाम झालाचं..अभ्यासात दुर्लक्ष झाल्यामुळे तो बारावीला नापास झाला. आणि त्याला या गोष्टीचे खूप टेंशन आले. त्याचे हे टेंशन दूर करण्यासाठी त्याच्या मित्रांनी त्याला दारूचे व्यसन लावले. दारू पिल्याने आपण आपले टेंशन विसरतो आणि आपल्याला एक वेगळाचं आनंद मिळतो ,असे श्रीकांतला वाटू लागले आणि तो अजून दारूच्या आहारी गेला.

दारू पिल्याने खरचं दुःख, टेंशन कमी होते का?
असे असते तर प्रत्येक गोष्टीवर दारू पिणे हाच उपाय राहिला असता ना!

व्यसनी व्यक्ती आपले टेंशन घालविण्यासाठी, आपल्या सुखासाठी, आनंदासाठी दारू पितो. पण त्याच्या व्यसनामुळे इतरांना किती त्रास होतो ? याचा तो विचारच करत नाही. दारूमुळे कुटुंबातील लोकांचे जीवन बदलून जाते, त्यांच्या आयुष्यात आनंदाऐवजी दुःखचं राहते. दारूमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते.
वडील व्यसनी असतील तर , त्यांना व्यसनामुळे मुलांवर वाईट परिणाम होतो. व्यसनी लोकांना आपल्या लोकांपेक्षा दारूच जास्त आवडू लागते. दारूच्या आहारी गेलेला व्यक्ती स्वतः च्या आयुष्याबरोबर कुटुंबातील इतर व्यक्तींचेही आयुष्य बिघडवत असतो.सुखाचा संसार असणारी कुटुंब दारूमुळे उध्वस्त होत असतात.दारूच्या आनंदात ते लोक जीवनातील खरा आनंद विसरतात आणि इतरांचाही आनंद हिरावून घेतात.

श्रीकांतच्या व्यसनामुळे त्याचे पूर्ण कुटुंब व्यथित होते. श्रीकांतचे व्यसन शेजारी, नातेवाईक व समाजातील लोकांना कळले होते. त्याच्या कुटुंबाकडे बघण्याच्या सर्वांच्या नजरा बदलत चालल्या होत्या. आईवडिलांना लोकांच्या बोलण्याचा व टोमण्यांचा त्रास होत होता. या सर्व गोष्टीला आपलाच मुलगा दोषी असल्यावर लोकांना तरी का दोष द्यावा? असे म्हणून ते लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे.
आपणचं आईवडिल म्हणून कुठेतरी कमी पडलो.असे वाटून ते स्वतः लाच दोष देत होते.

श्रीकांतमध्ये कधीतरी चांगला बदल होईल या आशेवर आईवडील एकेक दिवस काढत होते. आणि श्रीकांत आपल्या आयुष्यात मग्न राहत होता.
असेच दिवस जात होते.
आईवडिलांची देवावरील श्रद्धा व आपल्या प्रयत्नांवर असलेला विश्वास यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाची गोष्ट घडली.


क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all