Login

ट्रोलर

.
खूप दिवसांनी विवेक घरी आला होता. त्यामुळे सविताला त्याला खायला काय करावे काय करू नये असे झाले होते. विवेक सविताचा धाकटा आणि अतिशय लाडका मुलगा होता. पुण्यातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला त्याला प्रवेश मिळाला होता. त्यामुळे नाशिक सोडून तो पुण्याला स्थायिक झाला. आता परीक्षा झाल्या होत्या आणि कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या. म्हणून तो नाशिकला परतला होता. बेडवर आडवे होऊन मोबाईलवर स्क्रोल करत बसणे आणि जेवण करून झोपणे एवढेच काम विवेक करत होता.

" अरे विवेक काय दिवसभर मोबाईल उघडून बसतोस. "

" आई मग काय करू ?"

" रिकामा वेळ आहे तर कादंबऱ्या वाच. एखादा कोर्स कर. "

" आई काय ग तू पण ? एक तर वर्षभर कॉलेजमध्ये अभ्यासाचे टेन्शन असते आणि आता सुट्ट्या भेटल्या आहेत तर तू एन्जॉय करू देत नाहीये. "

" ठीक आहे बाबा. जे करायचं ते कर. माझी बनवलेली ही नवीन रेसिपी ट्राय कर. "

विवेकने सविताने बनवलेली नवीन ट्राय केली.

" वाह ! खूप टेस्टी आहे. "

" थँक्स. "

" आई , माझ्याकडे एक आयडिया आहे. "

" कसली आयडिया ?"

" आपण एक युट्युब चॅनल सुरू करायचे का ?"

" नको रे बाबा. "

" आई , तुला जेवण बनवण्याची आवड आहे. हल्ली सर्वजण युट्युब चॅनल काढतात. तू तुझ्या रेसिपीज जगासोबत शेअर करू शकते. "

सविताला हा सोशल मीडियाचा प्रकार नवीन होता. पण विवेक मात्र सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होता.

" आई , तुझे टॅलेंट जगासमोर आले पाहिजे. "

विवेकने खूप समजावले. अखेरीस सविता राजी झाली. मग विवेकने मार्केटमधून नवीन कॅमेरा आणला. सविताच्या आजीने तिला एक रेसिपी शिकवली होती. त्यावरच पहिला व्हिडीओ बनवायचा ठरले. सविताने चांगला मेकअप केला. नवीन साडी घातली. परफ्यूमही मारला.

" आई , परफ्युम का वापरला ? असे वाटत आहे की तू लग्नाला चालली आहेस. आणि व्युर्सला तुझा वास येणार नाही मोबाईलमधून. "

" अरे मी खूप नर्व्हस होते. घाईघाईत लक्षातच आले नाही. "

" असो. नेक्स्ट टाईम इतकं नटूनथटून येण्याची गरज नाही. सिम्पल लूक असू दे. "

" तुझे बाबा जेव्हा बघायला आले होते त्यानंतर पहिल्यांदाच इतकी नर्व्हस झाले आहे मी. "

विवेक हसला. सुरुवातीला सविताला जमले नाही. पण अनेकदा रिहर्सल करून शेवटी सविताने तिचा बेस्ट परफॉर्मन्स दिला. अखेरीस व्हिडीओ शूट झाला.

" आई , मी एडिटिंग करतो. "

" तेही करावे लागते का ?"

" हो मग. क्वालिटी मॅटर्स. "

" अच्छा. "

" पण या चॅनलचे नाव काय ठेवू ?"

" मॉम्स किचन ?"

" वाह ! तेच नाव ठेवतो. "

दुसऱ्या दिवशी एडिटिंग करून विवेकने व्हिडीओ अपलोड केला. हळूहळू सविता आठवड्यातून तीन-चारदा व्हिडीओ अपलोड करू लागली. या निमित्ताने का होईना आपण मुलाच्या जवळ जातोय याचे तिला समाधान होते. विवेकच्या वडिलांनाही काही हरकत नव्हती. एकेदिवशी विवेक त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. पण स्वतःचा मोबाईल घरीच विसरून गेला होता. त्याने कॉल करून सविताला व्हिडीओ अपलोड करण्यास सांगितले. सविताही इतक्या दिवसात बऱ्याच गोष्टी शिकली होती. तिने व्हिडीओ अपलोड केला. तेवढ्यात तिला एक नोटिफिकेशन दिसली. विवेकने केलेल्या काही कमेंट्सला लाईक्स आल्या होत्या. संध्याकाळी विवेक घरी आला. मोबाईल उघडताच तो " मॉम्स किचन " च्या युट्युब चॅनलवर गेला. अचानक त्याच्या मुखावरचे भाव बदलले. सविता त्याच्या जवळ आली.

" काय झाले विवेक ?"

" काही नाही आई. काही बावळट लोकांनी चुकीच्या कमेंट्स केल्यात तुझ्या युट्युब चॅनलवर. "

" हो. मी पाहिल्यात. "

" आई तू लक्ष नको देऊ. मूर्ख असतात अशी लोक. मी लगेचच त्यांना ब्लॉक करतो. "

" दुःख त्यांचे नाहीये. दुःख माझा मुलगाही अशीच कृत्ये करतो याचे आहे. "

" म्हणजे ?"

" विवेक तुही किती जणांना अगदी खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करतो त्याचे काय ? मी तुझ्या सर्व कमेंट्स वाचल्या आहेत. "

" आई ती गंमत असते. "

" गंमत ? एखाद्या स्त्रीला वेश्या म्हणणे म्हणजे गंमत ? एखाद्या स्त्रीने स्वतःच्या बळावर काही सिद्ध केले असेल तर ती नक्कीच प्रसिद्ध व्यक्तीच्या अंगाखाली झोपली असेल अशी कमेंट करणे म्हणजे गंमत ? ज्या स्त्रीचा शहीद झालेला पती जो आर्मीत होता तिचे मत जर तुला पटले नाही तर तिला नवऱ्याला गिळून टाकणारी म्हणणे गंमत ? आज लोकांनी माझ्या स्तनावर कमेंट केली तर तुला राग आला. पण तू दिवसभर कितीतरी लोकांना ट्रोल करतोस त्यांच्या कुटूंबियांना त्रास होत नसेल का ? सैनिकांनी पाकिस्तान जिंकून तिथल्या अभिनेत्रींना " पब्लिक प्रॉपर्टी " बनवावं ही तुझी कमेंट ? हे संस्कार दिले होते मी तुला ?"

" आई त्या पाकिस्तानी अभिनेत्री भारताबद्दल काहीही बोलत होत्या. आणि पाकिस्तानीही आपल्या अभिनेत्रींबद्दल अश्याच भाषेत बोलतात. "

" त्यांनी शेण खाल्लं म्हणून आपणही खावं का ? परस्त्रीत आई शोधणाऱ्या छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा. महाराज म्हणायचे , त्यांनी तैसे केले म्हणून आपल्याला ऐसें स्वराज्य निर्माण करावे लागले. रंग रूप आपल्या हातात नसते मग त्यावरून कुणाला दुखावण्याचा आपल्याला काय अधिकार ? मध्यंतरी तर दहावीत टॉप आलेल्या मुलीला ट्रोल केलं. तिच्या गुणवत्तेपेक्षा तुम्हाला तिच्या रुपामध्येच तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. एखाद्याने ट्रोलिंगला कंटाळून आत्महत्या केली मग कोण जबाबदार ? उगाच फ्री इंटरनेट मिळत आहे तर निगेटिव्हीटी का पसरवत आहात ? चर्चा करण्यासारखे असंख्य विषय असतात. कुणाला न दुखावता विनोदनिर्मिती करण्यासाठीही असंख्य विषय असतात. मस्करी करणे आणि एखाद्याची थट्टा उडवणे यात फरक असतो बाळा. ज्यांना इतकं ब्रूटली ट्रोल करतोय तेदेखील कोणत्या तरी कुटुंबाचे सदस्य आहेत हे लक्षात ठेव. "

" आई माझे चुकलं. प्लिज माफ कर. "

विवेकला पश्चाताप झाला. सवितालाही समाधान वाटले.