Jan 23, 2022
वैचारिक

आठवणींच्या हिंदोळ्यावर ............ट्रिप्सी

Read Later
आठवणींच्या हिंदोळ्यावर ............ट्रिप्सी

        ट्रिप्सी .... अजूनही आठवते ती आमची ट्रिप्सी टीम. मी इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते. तेव्हा शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टसाठी आम्हांला टीम अप करायचे होते. मला पर्सनली मुलांसोबत टीम अप अजिबात करायचे नव्हते. त्यामुळे मी माझ्या टीम मध्ये आणखी पाच मुलींना घेऊन माझी प्रोजेक्ट टीम आधीच तयार केली होती. श्रद्धा शेटे, नाजनीन, नंदिनी , आरती, स्नेहल आणि मी श्रद्धा गायकवाड अशी आमची टीम होती.

        आमच्या टीम मध्ये स्नेहल आणि मी लोकलच्या असल्याने आमच्याकडे स्वतःची स्कुटी होती. मग आम्ही प्रोजेक्ट च्या कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणासाठी बाहेर जायचो तेव्हा ट्रिपल सिटच जात होतो. स्नेहलच्या गाडीवर तिघी आणि माझ्या गाडीवर तिघी अशी ही आमची दोन गाडयांची ट्रिप्सी संपूर्ण कॉलेज मध्ये फेमस झाली होती.

        कॉलेज चे आयुष्य हे प्रत्येकासाठी एक पर्वणीच असते. आपल्या पुढील आयुष्यात जेव्हा आपण मागे फिरून कॉलेजच्या आठवणींना उजाळा देतो तेव्हा तिथल्या अश्या काही आठवणी असतात, ज्या आपल्या साठी खूपच खास आणि अविस्मरणीय अशाच असतात. त्या आठवणींचा केवळ उल्लेख जरी केला तरी आपले मन आपल्याला भूतकाळात त्या ठिकाणी घेऊन जात आणि डोळ्यांच्या पटलावर त्या सर्व घटना जश्या घडल्या होत्या अगदी तश्याच तरळू लागतात.

         असच काही आमच्या ट्रिप्सी च्या बाबतीत आहे. कॉलेजमध्ये केलेली ती धमाल, मज्जा, मस्ती आता आठवू शकते, ते केवळ आणि केवळ आमच्या ट्रिप्सीमुळेच. ट्रिप्सी.. आम्हीच आमच्या ग्रुपला दिलेले खास नाव.  आम्ही सोबत केलेली पन्हाळा ट्रीप ही माझ्यासाठी खूपच खास होती. कॉलेजचे प्रोजेक्ट सबंधित असलेले थोड फार काम आटपून आम्ही एक १२ च्या दरम्यान आमच्या ट्रिप्सी नेच पन्हाळाच्या दिशेने कूच केली.

          वारणेपासून पन्हाळा २० ते २५ किमी वरच असलेने आम्ही ट्रिप्सी नेच जायचा निर्णय घेतला होता. दोन्ही बाजूंची हिरवाई बघून मन खूपच प्रसन्न होत होत्र. पन्हाळयाचे सौंदर्य खरच खूप अफलातून आहे. पन्हाळयाला जाताच क्षणी पहिल्यांदा मध्येच काही पायऱ्या उतरल्यावर शिवा काशीद यांची समाधी लागते. त्या ठिकाणी गेल्यावर मन खूपच भारावून गेले. शिवा काशीद यांचे बद्दल ऐकलेला, वाचलेला इतिहास पुन्हा मन पटलावर जागा झाला.

                   पुढे गेले असता, पन्हाळयाच्या द्वाराजवळ बाजीप्रभूंचा भलामोठा पुतळा ऐटदार  पणे उभा असलेला दिसतो. पावनखिंड ज्या पद्धतीने बाजीप्रभूंनी लढवली अगदी त्याच पद्धतीने त्यांचा पुतळा तिथे ऐटीने उभा होता दिसतो. पुढे आमच्या  ट्रिप्सीने पन्हाळगडावरील बऱ्याच स्थळांना भेटी दिल्या. दिवसभर खूप धमाल, मस्ती करून आम्ही एक ६ च्या दरम्यान तिथून बाहेर पडलो.

         येताना सुद्धा संपूर्ण प्रवासात आमच्या ट्रिप्सीची धमाल सुरूच होती. या सर्व आठवणी आम्ही फोटोमध्ये कॅप्चर करून घेतल्या. आणि संपूर्ण समाधानाने आनंदाने घरी परतलो.

          आज या घटनेला जवळजवळ ५ वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. ट्रिप्सी तील प्रत्येक व्यक्तीचे लग्न होऊन ती आपापले एक वेगळे आयुष्य जगत आहे. पण मी खात्रीपूर्ण सांगू शकते कि आजही ट्रिप्सी हा शब्द जरी ऐकला तरी त्या  प्रत्येक व्यक्तीला आमच्या या कॉलेजच्या ट्रिप्सी ची नक्की आठवण होत असेल. आणि थोडा वेळ का होईना मन भूतकाळात रमत असेल.....

              Miss  You All..... Tripcy Girls.....

     

        

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shradha Prabhakar Patil

Government Job

Love to express my thoughts by writing. Love to reading books, blogs and stories.