
पैंजणांपासून घुंगरापर्यंतचा प्रवास
तिला आज महाराष्ट्र राज्य सरकारचा लावणी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता,स्टेज वर गेल्यावर ,तिने सगळ्या प्रेक्षकवर्गाकडे पाहिले आणि तिचे डोळे भरून आले,कारण आज तिच्या बरोबर तिची ही यशस्वी मजल कौतुकाने साजरी करायला तिचं असं कुणीच नव्हतं.
पुरस्काराचा कार्यक्रम झाल्यावर ,तिने जेव्हा आश्रमात प्रवेश केला,तसं सगळा आश्रम दिवे लावून झगमगत होता ,जशी काही दिवाळी आहे . ती थोडीशी पुढे गेली तर ,फुलांच्या रांगोळीने ,अभिनंदन लिहिलं होतं,ती या सगळ्याने भारावून गेली ,तशी सगळ्या महिला आणि मुलं तिच्याभोवती जमा झाले,दोन मुलांनी तिला हाताला धरून बागेतील टेबलाजवळ नेले ,तिथे केक होता ,तो सगळ्यांनी तिला कापायला लावला ,काही वेळासाठी तिने आपली मनातली घालमेल बाजुला ठेवली आणि सगळ्यांसोबत हसली ,बागडली . सगळा कार्यक्रम पार पडल्यावर, ती तिच्या रूम मध्ये गेली,फ्रेश झाली आणि आरशात पाहत होती ,तिच्या मनात विचार आला ,की किती आयुष्य बदललं आहे माझं,काय विचार केला होता आणि काय झालं,तेच तर आयुष्य असतं,ठरवल्याप्रमाणे काहिच होत नाही , पण सगळे म्हणतात ,जे होतं, ते चांगल्यासाठी ,पण माझ्या बाबतीत जे झालं,त्यात काय चांगल होतं माहित नाही.
तितक्यात साक्षी दार वाजवते - ताई जेवायला बोलावलं आहे.
ती तंद्रीतून बाहेर येत ,सगळ्यांबरोबर जेवते आणि झोपायला येते ,समोरच पुरस्कार ठेवलेला असतो,त्याकडे बघत असते आणि मनात विचार करते ,माझ्याच बाबतीत असं का घडलं आणि ती भूतकाळात जाते .
किती लाडात तिचं बालपण गेलं ,सगळ्यांची लाडकी होती ,आई बाबांनी लहान असताना छुम छुम वाजणारे पैंजण घेऊन दिले ,पूर्ण वाड्यात तिच्या पैंजणांचा आवाज दुमदुमायचा. आवाज नाही आला ,तर सगळे बेचैन व्हायचे ,अशी लादाकोडात वाढली ,घराणं प्रतिष्ठित त्यामुळे बंधन मात्र खूप होती ,कारण ती घराची ईज्जत होती . एकदा ती देवळात गेली होती ,तेव्हा ही तिच्या बरोबर तिची वहिनी होती ,तिथे एक मोटारगाडी उभी होती ,त्या वेळी मोटारगाडी असणारे लोक श्रीमंत समजले जात ,त्या गाडीच्या शेजारी एक तरुण उभा होता ,ज्याने शहरातली कपडे घातली होती ,गॉगल घातला होता,एकदम रुबाबदार होता. एक क्षण तिच्या मनात विचार आला की,माझा जीवनसाथी असाच असावा ,पण ती शांत होती.घरी गेल्यावर तिच्या भावाने सांगितलं ,तिला पाहायला शहरातून पाहुणे येणार आहे .तसं वहिनीने तिला साडी घातली.
ती साडीत खूपच सुंदर दिसत होती,पाहुणे आले ,तिला चहा घेऊन पाठवण्यात आले ,पण मान वर करून पाहण्याची हिंमत कुठे होती. त्यावेळी दोघांना असं स्वतंत्र बसायला ही देत नसत.
वहिनी कडून कळालं की,मुलाने होकार दिला आहे ,ते जायला निघाले ,तशी ती माडीवरच्या खिडकीत जाऊन उभी राहिली.
थोड्या वेळाने पाहुणे बाहेर पडले ,देवळाजवळ जो उभा होता ,तोच तिला दिसला आणि तिचे ऐकले म्हणून देवाचे आभार मानले. मुलाकडून अट घातली होती,लग्न साध्या पध्दतीने करण्याची,त्यामुळे आई वडिलांनी तिच्या अंगावर भरपूर सोने घातले . लग्न लागल्यावर लगेच शहरात रवानगी होणार होती,आईवडीलांना सोडून जाण्याचे दु:ख होते पण त्यावर मनपसंत नवरा मिळाला या गोष्टीने त्यावर फुंकर मारली होती.
शहरात जायला निघाले ,तो तिच्या शेजारी बसला होता,त्याचा हात लागताच ती मोहरुन गेली ,पण तिला काय माहित होते की,घरी गेल्यावर तिच्या समोर काय वाढून ठेवले आहे.
घरी पोहोचल्यावर,तिला माप ओलांडायला लावले आणि तिला तिच्या रूम मध्ये सासू घेऊन गेली . तिला सगळे थोडे विचित्र वाटत होतं पण,तिला वाटलं,शहरात अशीच प्रथा असेल .
तिची रूम मात्र छान सजवली होती ,ते पाहून तिच्या हृदयात धडधड झाली , ती तिथेच बेडवर बसून राहिली . सासू तिच्यासाठी जेवण घेऊन आली आणि म्हणाली - जेव.
तसं ती-सगळे एकत्र जेवू ना
सासू-अगं तुला भूक लागली असेल ,जेव ,आम्हाला उशिरा जेवायची सवय आहे .
तिला एकटीला जेवायला कसं तरी वाटतं असतं,पण नवीनच असल्यामुळे गुपचूप थोडसं खाल्लं आणि ताट उचलुन बाहेर जाणार ,तोच तिची सासू आली आणि म्हणाली -दे ,मी ठेवते
तिला बाहेरून जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू येतो,तशी सासू बोलते ,अगं तुझ्या नव-याचे मित्र आहेत ,तो येईल थोड्या वेळात,तोवर तू जाऊन पड हवं तर .
ती बेडवर जाऊन बसते ,आता तिला थोडीशी भीतीही वाटत होती की, मी काय बोलू .
थोड्या वेळाने दरवाजा उघडला जातो आणि परत बंद होण्याचा आवाज येतो ,तिला असं वाटतं,तो असेल .
तिला दारूचा वास येतो,तसं ती वळत म्हणते-तुम्ही घेतलीत का?
आणि पाहून आश्चर्यचकीत होते ,कारण तो नसून दुसरंच कुणीतरी असतं,ती घाबरते आणि विचारते -कोण तुम्ही आणि इथे कस काय?
ती व्यक्ती -मी तुझ्या नव-याचा मित्र ,घाबरू नको,खाली बस इथे ,पलंगाकडे हाथ दाखवून बोलतो.
ती-तुम्ही इथे का आलात?
मित्र-तुझ्या नव-यानेच पाठवलं,किंमत मोजून आलोय तुझी त्याला
ती-काहीही काय बोलता,मी तशी मुलगी नाही
मित्र-तू तशी मुलगी नाही ,असं सगळ्याच को-या मुली सुरवातीला बोलतात ,मग होते हळू हळू सवय .
ती धावत दाराजवळ पळत जाते आणि दार उघडा असं बोलते.
बाहेरून सासूचा आवाज येतो-लई,पतिव्रतेच रूप घेऊ नको ,तो जे म्हणतोय ,ते मुकाट्याने कर ,नाहीतर मारून टाकू तुला
तिला काहीच समजत नाही,हे काय चाललय
मित्र-ती काही तुझी सासू नाही,ते सगळे जण मिळून चांगल्या मुली हेरतात,लग्न करून आणतात आणि मग आमच्या सारख्यांच्या स्वाधीन करतात.
ती -तुम्ही मला भावा सारखे आहात असं नका ना करु ,मला इथून बाहेर पडायला मदत करा ना .
मित्र-मी एवढे पैसे मोजले ,ते काय भाऊ म्हणून घ्यायला का ,गुपचूप माझ्या स्वाधीन हो ,तुला इथं कुणीही वाचवायला येणार नाही.
तरी ती त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होती,पण त्याच्या राकटपणापुढे तिचा निकष लागला नाही,पहिल्या रात्रीची सगळी मधुर स्वप्न लयाला गेली ,तिने कधीही असा विचार केला नव्हता की ,तिला असं काही भोगावं लागेल.
तो गेला की,दुसरा आला ,तोही तिला ओरबाडत ,त्याला जे हवं ते करून गेला ,त्यानंतर तिसरा आला ,आता तर तिच्या डोळ्यांत पाणीही येत नव्हतं,एखाद्या मुर्द्यासारखी ती निपचित पडून राहिली होती. त्या नंतर तिची खोटी सासू आली आणि म्हणाली ,घे हे पी ,म्हणजे तुला काही वाटणार नाही . तिने दोन तीन पेग पोटात रिचवले ,तरी तिला चढत नव्हती ,तिला झोप येत नव्हती ,कधीतरी पहाटे,तिच्या तोंडावर कुणी तरी पाणी मारले ,पाहते तर काय ,तिचा नवरा .
तिला वाटत होते,त्याला जाब विचारावा ,का माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केला ,पण तेवढेही त्राण उरले नव्हते.त्यानेही नवरा असल्याचा हक्क बजावत,बाजुच्या सोफ्यावर जाऊन पडला .अशा परिस्थितीत ती बाहेरही जाऊ शकत नव्हती ,कारण ती असणारच पाळतीवर ,तिला उठवत ही नव्हतं,तशीच कशी बशी उठली ,वेदना तर खूप होत होत्या ,बाथरुम मध्ये गेली आणि थंड पाण्याच्या नळाखाली बसली .
तिला आता स्वत:चीच लाज वाटत होती,रात्रीच्या त्या स्पर्शांची घृणा वाटत होती ,हाताने चोळून चोळून मिटवण्याचा प्रयत्न करत होती,ते तर काळानुसार जातील ,पण मनाच काय ,ते तर या सगळयाने उन्मळून पडलं होतं,कळी फूल होताना कुस्करली गेली होती. तिने थोडेसे हे विचार बाजुला करत ,आपण इथून बाहेर कसे पडू शकतो ,याचा विचार करायला सुरुवात केली .दिवसभर तिला तिच्या रूम मध्ये जेवण देण्यात आले,रात्री आठ वाजता महामाया(सासू) आत आली ,तिच्या अंगावर साडी फेकून म्हटली,तयार हो. ती नाही म्हणाली ,तसं तिने तिच्या थोबाडीत दिल्या आणि म्हणाली ,आज एकच येईल,त्याला खूष करायचं .
ती-मी नाही म्हणाले तर
सासू-इथेच मारून टाकेल,कुणाला तपास लागणार नाही.
तिने मनात विचार केला,सुटका करून घ्यायची असेल ,तर हिचा विश्वास जिंकावा लागेल ,तिला लावणी चांगली यायची ,तिने शाळेच्या स्नेह संमेलनात भागही घेतला होता.
ती-मला नाचता येतं ,मी हवं तर नाचते ,पण मला कुणाच्या हवाली करु नका .
सासू म्हणाली ,करून दाखव .
तिने एक दोन लावण्या करून दाखवल्या.
सासू खुश झाली आणि म्हणाली ,ठिक आहे,रोज करावी लागेल लावणी तुला .
ती लगेच ,हो म्हणते .
दुस-या दिवसापासून लावणी करायला सुरूवात करते ,तिची गी-हाईकं वाढतात .
एकदा तिचा भाऊ तिला भेटायला आला होता ,पण ती आत असताना ,तिच्या सासूने ती तिच्या नव-याच्या मित्राबरोबर पळून गेली ,अशी कहाणी रचून सांगितली . ज्यामुळे तिच्या भावाने तिच्या बरोबरचे आमचे संबंध संपले, असं रागाच्या भरात बोलून निघून गेला,आता तर परत कुणीही तिला पाहायला येणार नव्हते . तिला तिच्या घरच्यांचा तिच्यावर विश्वास नाही,हे पाहून खूप वाईट वाटले.
पहिली फोनची सुविधा नव्हती ,की जेणे करुन ती घरच्यांची मदत घेईल आणि स्वत:ची सुटका करुन घेईल,ती तिच्या घरच्यांना चांगली जाणत असते ,स्वत:च्या प्रतिष्ठेपायी त्यांनी तिला एवढं सगळं झाल्यावर स्विकारलं नसतं,म्हणून ती ठरवते ,आता हा लढा तिचा एकटीचा.
त्यात एक मोठा शेठ तिच्यावर खूपच फिदा असतो ,त्याला ती हवी असते .
सासू तिला त्याच्या घरी लावणी करायला जायचं आहे ,असं सांगते आणि त्याने पाठवलेल्या गाडीत पाठवते .ती त्याच्या समोर लावणी करत असते ,अचानक तो तिचा हात पकडतो,तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो ,ती स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत असते ,त्या झटापटीत ती बाजुला फळांच्या टोकरीमध्ये असलेला चाकू उचलते आणि त्याच्यावर वार करते ,तो जोरात ओरडतो ,तसा त्याचा वॉचमन आत येतो ,तेव्हा चाकू तिच्या हातात असतो आणि त्याला रक्त लागलेले असते ,ती तिथेच बसलेली असते. तो पोलिसांना फोन करून बोलावतो ,ते त्याला हॉस्पिटल मध्ये आणि तिला पोलीस ठाण्यात घेऊन जातात ,ती तिचा गुन्हा कबूल करते . तिची सासू आणि नवरा आमचा हिच्याशी काही संबंध नाही आणि ती कशी चारित्र्यहिन आहे,हे सांगतात . तिचं नशीब चांगलं की ,तो शेठ वाचतो ,तिला पोलीस तिची माहिती विचारतात ,ती कुणी नाही असं सांगते ,मग पोलीस तिची रवानगी नारी निकेतन मध्ये करतात ,ती तिथल्या सगळ्यांना आपलं मानते ,सगळ्यातून स्वत:ला सावरते आणि लावणीचे कार्यक्रम आश्रमासाठी पैसे गोळा करण्यासाठी करते ,हे काम ती सातत्याने गेली दहा वर्षे करत होती ,ह्याची दखल सरकारने घेतली आणि तिला पुरस्कार मिळाला होता.तिला आज घरी फोन करण्याची खूप इच्छा होत होती ,ती असंही गुपचुप फोन करून तिच्या वाहिनीच्या संपर्कात होती . एक वहिनीच होती ,की जीला तिच्या सा-या दु:खाची कल्पना होती .आई तर तिच्या बरोबर जे झाले ,त्या धक्क्याने देवाघरी गेली होती . वडील आणि भावाने तिच्याकडे पाठ फिरवली होती ,तिने वहिनीला तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सांगितले होते .
वहिनी पाहत होती की भाऊ आणि वडील दोघेही,तिच्या आठवणीने व्याकूळ व्हायचे ,म्हणून ती पुढे होणा-या परिणामांचा विचार न करता ,तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना सांगते आणि मला माहित असून तुमच्या पासून लपून ठेवले ,त्याची माफी मागते .
तसं तिचे वडील-सुनबाई ,आवरा ,चला आमच्या बरोबर,आम्हांला माफी मागायची आहे ,आम्ही आमच्या रक्तावरच विश्वास नाही ठेवला ,हे आमचं चुकलं.
तिचा भाऊ-आबा ,मी पण येतो .
ती दुस-या दिवशी सकाळी, नेहमी प्रमाणे एक चक्कर मारत होती ,तिने बाहेर गाडी उभी राहिल्याचं पाहिलं,पण कुणी तरी दान द्यायला आले असेल ,म्हणून ऑफिस मध्ये जाऊन बसली.
तितक्यात एक मुलगी -ताई ,तुम्हाला भेटायला कुणी तरी आलं आहे .
ती दरवाजाकडे पाहते ,तर ते तिला तिचे वडील दिसतात ,पण तिचा विश्वास बसत नसतो ,तिला असं वाटतं,रात्री आपण त्यांच्या बद्दल विचार करत होतो ,म्हणून तिला भास वाटतो .
तिचे वडील -पोरी,माफ कर गं,तुझ्या बापाला ,नाहीतर मरताना शांती नाही मिळायची आणि आपले दोन्ही हात पसरत तिला बोलावतात ,त्यांच्या पाठिमागे वहिनी आणि दादा असतो ,वहिनी खुणेनेच बोलावते ,तशी ती धावत जाऊन तिच्या वडीलांना मिठी मारते . थोड्या वेळाने ती बाजूला होते ,तसं भाऊही तिची माफी मागतो ,मी त्या लोकांवर विश्वास ठेवला ,तेव्हा एकदा तरी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा होता.
ती- जे झालं,ते झालं,आज तुम्ही सगळे इथं आलात ,मला खूप बरं वाटतय्ं
तिचे वडील-पोरी आता तरी घरी चल
ती -नाही बाबा ,आता हेच माझं विश्व ,अधून मधून येत जाईल भेटायला ,चला मी तुम्हाला प्रिया ताईची ओळख करून देते ,त्यांनी मला या सगळ्यातून बाहेर पडायला खूप मदत केली आणि माझ्यातील कलेला प्रोत्साहन दिले,म्हणून आज मला हा पुरस्कार मिळाला.
सगळे प्रियाताईला भेटून,तिचे आभार मानतात आणि तिला आपल्या बरोबर थोड्या दिवसांसाठी घेऊन जातात . तिला घराच्या काना कोप-यांत आपल्या आठवणी दिसतात ,तिचं मन भरून येतं ,वाहिनीच्या कुशीत मनमोकळेपणाने रडून मन हलकं करते ,एक आठवडा कसा जातो ते कळत नाही.
ती परत परतीच्या प्रवासाला निघते ,पण आज तिच्या डोळ्यांत सगळे भेटल्याचा आनंद असतो आणि परत भेटायला येण्याचे आश्वासन असते .
प्रवासात तिला तिचा पूर्ण प्रवास आठवतो ,जो पैंजणांपासून घुंगरा पर्यंतचा होता ,ती प्रत्येक लावणीच्यावेळी घुंगरु मोठ्या अभिमानाने पायात घालत होती ,कारण ती किती तरी गरजूंना,तिच्या उपक्रमातून मदत उभी करत होती .
आता ती आयुष्याकडेही ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होती की,कदाचित हे चांगले कार्य तिच्या हातून घडावे ,म्हणून तिच्या आयुष्यात या सा-या घटना घडल्या .
पालकांनी मुलांवर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे ,नाहीतर पश्चात्तापाची वेळ येते.
कथा जर आवडली असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.
रुपाली थोरात