अस्तित्वाचा शोध भाग 3

एक बारीकसा धागा, आणि तो ओढल्यावर लोकरीच्या गोंडया प्रमाणे मिळालेले असंख्य क्लू.


पूर्वसूत्र: मीरा घर आणि बाग पुन्हा फुलवत होती.  एकदा रात्री तिच्या हाताला एक खिट्टी लागली. तिने ती बाहेर काढली, तर ती एका लोखंडी पेटीची कडी होती. त्या पेटित तिचा लहानपणीचा फोटो आणि एक पत्र होतं.

भाग 3

मिराने ते पत्र उघडलं. सगळ्यात आधी शेवटी जाऊन तिने ते पत्र कोणी लिहिलं आहे ते बघितलं. पण तिची जरा निराशाच झाली. हे पत्रसुद्धा मावशीचंच होतं. जरासं नाराज होतच तिने पत्र वाचायला सुरुवात केली.
प्रिय मीरा,
मला माहित होतं तू याच खोलीत रहायला लागशील. तू छोटी असताना जेव्हा पहिल्यांदा मी तुला घरी आणलं, तेव्हासुद्धा तू याच खोलीत राहायचा हट्ट केला होतास. माहीत नाही का तुला हीच खोली आवडली होती.

मीरा मला तुला भेटायचं आहे, पण धीर नाही होत. मला माहित आहे तू माझ्यावर चिडली असशील. मी तुला एक रात्रीत अनाथाश्रमात सोडून निघून गेले. पण माझ्याकडे तसं करण्याशिवाय पर्याय नव्हता. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू नक्की माझ्या घरी ये. खूप वाट बघितली आहे मी तुझी. प्लिज मला माफ कर जमलं तर.  तू भेटशील तेव्हा मी नक्की सांगेन का सोडलं मी तुला आश्रमात. प्लिज येशील ना मला भेटायला?खाली मी माझा पत्ता जोडला आहे.

आणि एक गोष्ट सांगायची होती तुला. तू, ताई आणि तुझे बाबा ज्या घरात रहायचात त्या घराचा पत्ता आणि किल्ली ह्या पेटित आहे. तेही घर तुझंच आहे आता. पण मी तुला तिथे जायचा आग्रह नाही करणार. मला माहित आहे कदाचित तिथे गेल्यामुळे तुला जुने प्रसंग आठवून त्रास होईल. पण जर तुला वाटलं की तू ह्या सगळ्यासाठी तयार आहेस, तर नक्की जा तुमच्या घरी. तुझ्यासाठी ते घर जसं होतं तसंच ठेवलंय. तुझ्या आठवणीतल्या सारखंच!
तुझी मावशी.

पत्र वाचल्यावर मिराला रागच आला होता मावशीचा. "का सोडून गेली ती मला? अजिबात जाणार नाही मी तिला भेटायला!" मीरा स्वतःशीच म्हणाली. पण स्वतःच्या घरी जायचं, घर बघायचं कुतूहल मात्र  आवरत नव्हतं. तिने पेटीतून अलगद ती चावी बाहेर काढली. त्यालाच किचेन सारखा कागद लावून त्यावर पत्ता लिहला होता.  घरी जाऊन परत यायला कदाचित एक दोन दिवस लागणार होते. तिने मावशी आणि माळी काकांना दोन दिवसांची सुट्टी दिली.

दुसऱ्या दिवशी काही मोजके कपडे बरोबर घेऊन ती निघाली. साधारण दोन तीन तासाचा प्रवास होता. दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत ती गावात पोचली. तिथल्याच एक हॉटेल मध्ये तिने जेवण करून घेतलं; आणि ती तिच्या घरी आली. उत्सुकता तुटेल इतकी ताणली गेली होती. एक अदृश्य ताण तिला आजूबाजूला जाणवत होता. ती अधीर झालेली असल्यामुळे असेल, पण तिला वेळ खूप हळूहळू सरकतीये असं वाटत होतं.

तिने घराचं दार उघडलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. असं वाटत होतं जणू काही तिचे आईबाबा आत्ताच सगळं आवरून घराबाहेर पडले असावेत. सगळं सामान अगदी नीटनेटकं लावलेलं होतं. आईबाबांच्या खोलीत त्यांच्या लग्नातील एक फोटो लावला होता. तिने त्या फोटोलाच घट्ट मिठी मारली. आत्ता ह्या क्षणी आपल्या जवळचं कोणीतरी असायला पाहिजे असं तिला फार प्रकर्षाने जाणवलं.

आईबाबांची खोली बघून झाल्यावर ती तिच्या बेडरूममध्ये आली. ती खोली बघून ती गोंधळून गेली. खोलीत अगदी बेड पासून कपाटापर्यंत सगळं एकसारखं होतं. जणू काही जुळ्या भावंडांची खोली असावी. हा विचार मनात आला आणि ती चरकली. म्हणजे आपल्याला स्वप्नात दिसते ती……


                              क्रमशः

🎭 Series Post

View all