नजरेचा स्पर्श...

Touch


नजरेचा स्पर्श ( लघुकथा)

 सकाळच्या बसच्या गर्दीत तिच्या पाठीवरून फिरणारा काही क्षणांचा तो अनभिज्ञ स्पर्श .कदाचित मंजूला वगळले तर कोणालासुद्धा तो स्पर्श वेगळा वाटणार नाही कारण अनुभव घेणाऱ्या व्यक्तीची व्यथा प्रत्यक्ष त्या व्यक्तीला वगळले तर उत्तम रित्या कोणीही समझू शकत नाही , पण काही क्षण संपले आणि पुढचा स्टॉप शालेय विद्यार्थिनीचा असल्यामुळे गर्दी कमी झाली आणि मंजुला बसण्यास योग्य अशी जागा मिळाली. 


पण तो स्पर्श आज खूप वर्षांनंतर मंजूला तिच्या लहानपणीच्या भातुकलीच्या खेळाची आठवण झाली . कशी ती तासंतास तिच्या त्या भातुकली आणि बाहुल्यांमध्ये व्यस्त राहत असे. जणू संपूर्ण जीवनाचा अर्थ तिला त्या भातुकली मध्ये मिळत असे. 


पण अचानक एक दिवस मंजूने सर्व भातुकली बाहुलीसहित एका बॅग मध्ये भरून ठेवली आणि परत कधीच ती भातुकली खेळली नाही.


भातुकलीच्या खेळात सर्वत्र सुख शोधणारी मंजू आता आईच्या कितीतरी सांगण्यावरून सुद्धा भातुकलीचा आनंद शोधत नव्हती.


कदाचित त्या भातुकलीच्या खेळात घडणाऱ्या घटनांना प्रत्यक्ष सामोरे जाण्यास ती अजून तरी तयार नव्हती. 


आईने सुद्धा हळूहळू तिच्या भातुकलीविषयी विचारणं सोडून दिले .. 

पण मंजुला मात्र राहून राहून आठवण येत असे पण परत तिला राग सुद्धा येत असे आणि ती तो विचार सुद्धा सोडून देत असे. 


अशीच एक दिवस आई घरात चकली करत होती परंतु सोऱ्या काही केल्या नीट चालत नव्हता म्हणून आईने मंजुला सांगितले

 “ मंजू , अग मंजू जा बघू शेजारच्या काकूंकडून सोऱ्या घेऊन ये .”


 “आई,तू जा मी नाही जाणार मला अभ्यास आहे खूप “. मंजू उत्तरली 


आईला काही समजेना कि जी मुलगी काही काम नसले तरी शेजारच्या मावशींकडे जाण्यास तत्पर असायची ती आज न जाण्यासाठी कारणे देत होती .


त्या दिवशी तर आईने काही जास्त विचार केला नाही पण अगदी हुबेहूब वागणूक तिला रोजच बघायला मिळत होती . जणू शेजारी जाणे ती टाळू लागली होती.  


न राहून आईने ठरवले काय आहे काय नाही याचा सोक्षमोक्ष तर आज लागलाच पाहिजे.


सर्व काम आवरून आई मंजूच्या खोलीत आली 


"काय ओ मंजूबाई अभ्यास झाला असेल तर सांगा बरं का ! थोडं बोलायचं आहे मला" … आई 


"हा बोल ना आई काही विशेष आहे का आज ? कि तु मला खरेदीला घेऊन चालली आहे ! " … मंजू 


"नाही नाही खरेदी वगैरे काही नाही . चल बर माझ्यासोबत सान्वीकडे." 

"तिच्या आईने आज बोलवले आहे . आवर पटकन " … आई 

"नाही ..नको जा तू मला काम आहे मी नंतर जाईल " … मंजू 

"नंतर ? अग, मंजू महिना झाला रोज बघते तुला तिकडे जायला सांगितले का .." 

"काही ना काही तरी कारण सांगत असते .एक तर कारण सांग नाहीतर चल पटकन ! " … आई 


"अग, आई जा बघू तू मला नाही यायचं" ...मंजू थोडी चिडून बोलली . 


"अग पण का ? सांगशील का मला?" … आईने पुन्हा एकदा विचारले . 


"आई सांगितलं ना काय नुसती तेच तेच विचारात आहेस" ... मंजू 


"मंजू हि काय पद्धत असते का बोलायची ? तुला मी एवढी शांततेत विचारात आहे "

आणि तू काय हळूहळू चिडत आहेस ? अग त्या सान्वी सोबत तू रोज खेळायची !"

माझ्यापेक्षा जास्त त्या काकूंच तू ऐकत होतीस आणि काका त्यांचं तर विचारूच नको .. 

"काका ! स्त्रीलंपट माणूस म्हण त्याला "

मंजू मध्येच आईचे वाक्य रोखून बोलली . 

"काय मंजू ? काय बोलली तू ? आणि हा शब्द कुठे ऐकलास ? आणि का ग लाज नाही वाटली तुला "

"त्यांच्याबद्दल असा बोलताना बोल कि आता "! आई अगदी चिडून मंजू कडे एकटक बघत होती . 

"हो एवढा सन्मान द्याची काही एक गरज नाही.. एक नंबरचा वाईट माणूस आहे तो "… मंजू . 


"अग , बाई सांगशील का काही ? काय चालवले तू? मंजू ए बाळा काही झालं का? "आईने मंजूच्या खांद्यावर हाथ ठेवत विचारले .. 


आईचा हाथ खांद्यावर पडताच मंजूने अगदी क्षणाचा विलंब न करता तिचा हाथ झटकला .. आणि ती दूर सरकली . 


आईला मात्र काही कळेना तरी आईने पुन्हा मंजुला विचारले .. 


"मंजू , अग बाई काय झालं? अग तू सांगणार नाही तर मला कसं कळेल ? "


अखेरीस मंजू आईजवळ बसली आणि बोलू लागली . 


"आई , तो सान्वीचा बाप शैतान आहे ग ! मला त्यांचा स्पर्श नाही आवडत . मागच्या रविवारी तू बाहेर गेली असताना मी सान्वीकडे खेळायला गेली. तिची आई घरात नव्हती आणि तो माणूस म्हणजे सान्वीचे वडील मधल्या खोलीत काम करत होते .मी आणि सान्वी खूप वेळ खेळलो पण नंतर तिला कंटाळा आला मग ती आत झोपायला निघून गेली, आणि मी सुद्धा माझे भांडे आवरत होती अचानक तिचे वडील आतून आले आणि माझी मदत करू लागले … पण 


पण काय सान्वी ? बोल मी ऐकते आहे . आणि विश्वास ठेव आपण काहीतरी करू आई उत्तरली . 


पण ते आज नेहमीसारखे नव्हते वागत ते आज उगीच मला मदत करत होते . माझे भांडे देत होते पण न कळत ते प्रत्येकवेळी मला स्पर्श करत होते म्हणजे तुझा स्पर्श कसा मायेचा असतो बाबांचा प्रेमाचा असतो पण तो स्पर्श मला त्या दिवशी आवडत नव्हता म्हणजे आई तो स्पर्श ना एकदम किळसवाणा होता .. कारण तो स्पर्श ना पहिले फक्त हाथांपर्यंत मर्यादित होता पण नंतर तो स्पर्श हाथावरून खांदा..खांद्यावरून गाल आणि जणू सापासारखा तो स्पर्श मला ठिकठिकाणी जाणवत होता आई ! आणि जसा जसा तो स्पर्श वाढत होता मला कसेतरीच होत होते .


म्हणून मी त्यांना जोरात धक्का दिला आणि घरी धावत आली . 


सांगत असताना मंजू ने एकदम आईला कवटाळले .


मुलीची व्यथा ऐकून आई तर धक्क्यातच गेली कि एवढ्या कोवळ्या वयात तिला एवढे सहन करावे लागले .


त्यानंतर आईने कधीच मंजुला शेजारी पाठवले तर नाहीच पण एक मैत्रिणीचे नाते त्यांचे अधिकच खुलले काही दिवसातच मंजूच्या आईने सर्व घटना मंजूच्या बाबाना सांगितली आणि शेजारच्या काकूंच्या कानावर सुद्धा टाकली .


काही दिवसांमध्ये मंजू आणि तिचे घरचे दुसरीकडे राहण्यास गेले त्यावेळी त्यांनी जास्त काही कारवाई केली नाही कारण मंजूला विश्वास होता कि याचे फळ त्याना नक्कीच मिळणार आणि मिळाले देखील त्या घटनेनंतर सान्वीच्या आईबाबांचे नाते पाहिल्यासारखे राहिले नाही . 


आज या घटनेला खूप वर्ष लोटली होती पण काही जखमांचे घाव मनात कोरले जातात .


इतक्यात बसची घंटी वाजली आणि मंजू तिच्या स्टॉप वर उतरली.    

समाप्त.