तो,ती आणि कॉफी

To,ti,ani,coffee

ती, तो आणि कॉफी..

कोण बरं असं शुक शुक करतय! बँकेतून पैसे घेऊन परतणाऱ्या सुमनने मागेपुढे पाहिलं. रांगेतलं तर कुणीच नाही..मग..छे! आपल्याला नसेल. सुमन पुढे निघाली. तरी परत शुक..शुक..आता मात्र तिने त्रासिक नजरेने मागे वळून पाहिलं. बँकेचे मेनेजर केबिनमधून बाहेर येऊन तिला हाकारत होते. रांगेतली माणसंही सुमनकडे पाहू लागली. आपलं काही चुकलय का या विचाराने सुमन गांगरली. 

तेवढ्यात शिपाईदादा पुढे आला..मेडम आपणास साहेब बोलवताहेत.

सुमन जराशी भितीनेच केबिनच्या दिशेने वळली. साधी चापूनचोपून नेसलेली कॉटनची साडी..पिस्ताकलर त्याला मेंदीकलरचा बारीकसा काठ..मेंदीकलरचं ब्लाऊज..मनगटावर स्टीलच्या पट्टयाचं घड्याळ,खांद्याला लटकवलेली ग्रे कलरची पर्स..एका हातात दोन सोन्याच्या पाटल्या..त्यामधे दोन हिरव्या काचेच्या बांगड्या..सरळ वाटेसारखा स्पष्ट दिसणारा उजळ भांग..करवंदी डोळे,तरतरीत नाक, बारीक टिकली,गळ्यात बारीकसं मंगळसूत्र..कानात कुडी..आदित्य सामंत न्याहाळत होता तिला..

"सुमी.."

आदित्यच्या तोंडून हे तिच्या माहेराचं नाव निघालं नि सुमन अगदीच थबकली..'कोण बरं हा..याला आपण कसं ठाऊक..' तिच्या मनाच्या डोहात, बारक्या पोरांनी तळ्यात खडे मारुन पाण्यावर तरंग उमटावे तसे प्रश्न उमटले..तिची ती अवस्था पाहून आदित्य हसू लागला. 

"बैस गं. सुमे, तू मला ओळखलं नाहीस! अगं मी आदि..सामंतांचा आदि..आपला वाडा आठवतोय..तुमचा तो गाडगीळांचा ..आम्ही भाडेकरु होतो पण तुम्ही ते कधी जाणवूच दिलं नाहीत."

आता कुठे सुमीच्या डोक्यात प्रकाश पडला.. पांढरा शर्ट आणि खाकी हाफ चड्डी घालणारा आदि आठवला तिला. अगदी बारीकसा..दिसायला गोरागोमटा..त्याच्या आईसारखाच. वडील लहानपणीच गेल्याने फार लवकर समज आलेली आदिला. 

सकाळी उठून वाड्यातील बिर्हाडांच्या दुधाच्या बाटल्या केंद्रावर न्हेऊन, भरलेल्या बाटल्या आणून द्यायचा आदि. सुमीला ती बुचाच्या आतील बाजूस चिकटलेली साय आठवली..कधीच वाटलं नसावं आदिला.. स्वतःसाठी दूध न्यावं! 

सुमी कधीकधी त्यांच्या खोलीत डोकवायची. आदिची आजारी आई खाटीवर झोपलेली असायची. आदि तिला कोरा चहा पाजायचा. सुमीचे वडील, नाना कधीच घरभाडं घेत नव्हते सामंतकाकूकडून. आदिची आई बरी व्हावी असंच प्रत्येकाला वाटायचं पण ते दुखणं मानसिक असावं बहुतेक..तिने स्वतःला तिच्या कोशात इतकं मिटून घेतलेलं की आदिप्रति तिचं काही कर्तव्य आहे याचाही तिला विसर पडलेला. 

आदिचे काकाकाकू चुकूनही येत नव्हते. मामा मात्र दर महिन्याला येऊन किराणा भरुन जायचा..तोही आदि आठवीनववीत गेल्यावर, मला तुझी मामी करवादते. मी कुठवर तुम्हांला पुरे पडणार! म्हणत यायचा बंद झाला होता. 

आदि पेपर टाकायचा. कुणी दळण न्हे सांगितलं तर न्यायचा. खालच्या वाण्याकडे संध्याकाळचा पुड्या बांधायचा तेंव्हा तर बनियन आणि जुन्या चड्डीवर असायचा. एवढं करुनही आदिची आई त्याचा राग करायची..आदिने लहानपणी खेळण्यातल्या झूकझूकगाडीसाठी हट्ट केला होता. ती आणण्यासाठी गेलेला तिचा नवरा..काही परत आला नव्हता..आली होती ती त्याच्या अपघाताची बातमी.. एका ट्रकची ठोकर लागून जागीच गतप्राण झालेला त्याचा म्रुतदेह वाड्यातल्या शेजाऱ्यांनी मिळून आणला होता. त्यांनीच आदिच्या नातेवाईकांना बोलावणं पाठवलं होतं. आदिच्या वडिलांचे दिवसकार्य झाल्यावर लोकलज्जेस्तव का होईना आदिचे मामा बहीणभाच्याला घरी घेऊन गेले होते.

आदि पाचवीत असेस्तोवर मामाकडे होती ती दोघं पण मामीच्या सततच्या वाग्बाणांनी घायाळ झालेली आदिची आई आदिला घेऊन पुन्हा गाडगीळांच्या वाड्यात रहायला आली होती. वर्षभरच ती बरी होती. नंतर तिने अंथरुण धरलं ते कायमचंच. आदि मात्र आईशी कधीही वाईट वागत नव्हता. तिची बोलणी खायचा. तिची सेवाशुश्रुषा करायचा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तो अगरबत्ती,कापसाच्या वाती असं काहीबाही घेऊन देवळासमोर विकायला बसायचा. कधीच आईच्या औषधांची हलगर्जी करत नव्हता तो. वाड्यातल्या मुलंमुली कुल्फीवाला आला की पारावर बसून गारेगार मलईवाली कुल्फी चाखायच्या..त्याचवेळी तो मात्र वाण्याकडे गव्हावर चाळण मारत नाहीतर मिरच्यांची देठंबिठं काढत असायचा. कार्बाइड घालून पिकवलेल्या आंब्यासारखं आदिचं बालपण होतं.. निरस,केविलवाणं. तरी पठ्ठ्या नेहमीच पहिल्या पाचात असायचा. पुस्तकाशी त्याची विशेष मैत्री होती. ही पुस्तकंच आपल्याला दारिद्रयातून वर काढतील असा त्याचा आशावाद होता. 

सुमीला आठवलं, एकदा सोबतच्या कामगारांच्या नादी लागून आदि सिगारेट फुंकत होता..ते नेमकं सुमीच्या नानांच्या द्रुष्टीपथात आलं..ते भरभर लाकडी जिना उतरत खाली गेले आणि त्यांनी आदिच्या श्रीमुखात सणसणीत थप्पड लगावली होती.. ते आठवून सुमीला त्या वातानुकूलित केबिनमधेही घाम फुटला. 

सुमीची आई मात्र अधनंमधनं आदिला बोलवायची. गोडाधोडाचं आवर्जुन खाऊ घालायची. सुमीच्या घरीच आदिची कॉफीशी ओळख झाली.  सुमीची आई दाट दुधाची कॉफी बनवायची जी आदिला प्रचंड आवडायची. तो एक एक घोट मन भरुन प्यायचा..पिताना त्याला झालेला आनंद त्याच्या निरागस,हसऱ्या डोळ्यांत दिसायचा.

 परीक्षा जवळ आली होती. सुमी आणि आदि गणितं सोडवत होते..साधारण नववीत..भुमितीचं प्रमेय आदि तिला समजावून सांगत होता आणि कॉटवरच्या आदित्यच्या आईचा जोरात आई..गं आवाज आला..सुमी व आदि तिच्याजवळ गेले. आदिची आई निपचित पडली होती. आदि..आई..आई अशा हाका मारत सुटला होता..पण सारं संपलं होतं..सुमीनेच आईनानांना बोलावून आणलं होतं..आदि आईला सोडायला तयार नव्हता. . हमसून हमसून रडत होता. ते काळीज पिळवटणारं द्रुश्य पाहून वाड्यातल्या सगळ्या बिर्हाडकरुंचे डोळे पाणावले होते. अवघ्या पंधरा दिवसांत आदि परत वाण्याकडे कामाला जाऊ लागला होता. काका,मामा.. कुणीकुणी त्याला घरी न्हेलं नव्हतं. 

दहावीतही आदिला पंच्याऐंशी टक्के मिळाले होते पण पुढचा खर्च झेपणार नाही म्हणून त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. खरंतर त्याला डॉक्टर बनायचं होतं पण त्याने आपली इच्छा फक्त सुमीला बोलून दाखवलेली. सुमीच्या घरी त्या तिघी बहिणी..ती तरी तिच्या नानांना आदिच्या शिक्षणाचा खर्च उचला असं कसं सांगणार! 

सुमीला आठवलं..आदिने तिला जाळीदार पान दिलेलं,पिंपळाचं..तिने ते पुस्तकात जपून ठेवलं होतं. आदि कविताही करायचा. अकरावीला गेला तसं त्याच्या ओठांवर मिसुरडं फुटलं होतं..आवाजही वेगळा वाटत होता त्याचा..अचानकपणे तो खूप उंच दिसायला लागला होता आणि.. आणि सुमीच्या आईने तिचं आदिकडे जाणंयेणं बंद केलं होतं पण आदि तिला जातायेताना निरखायचा. तिच्या केसांचा लांबलचक शेपटा त्याला भुरळ घालायचा. सुमीलाही हे कुठेतरी जाणवत होतं. खाली गेली की तिची नजर आदिला शोधायची.

 नानांच्या चाणाक्ष नजरेने हे अर्धवट उमलणारं प्रेम हेरलं होतं व आदिची शहरातील होस्टेलमधे व्यवस्था लावून दिली होती. आर.ए. पोद्दार कॉलेजला त्याला प्रवेश मिळवून दिला होता..थोडक्यात नानांनी आदिला बाहेरच्या बाहेर कटवलं होतं पण तेही कोणाला जाणवू न देता..त्याला न ओरडता. काही दिवस सुमी गुपचूप रात्ररात्र रडायची. मग हळूहळू तीही तिच्या मैत्रिणींच्या विश्वात स्थिरावली. पुढे जगरहाटीप्रमाणे पदवीधर होताच तिचं लग्न लावण्यात आलं.

"ए हेलो..सुमी..अगं चहा गार होतोय." आदि तिच्या डोळ्यांसमोर हात हलवत म्हणाला.

सुमी भानावर आली. "आदि..आ दि त्य..आय मीन आदित्य ना तुम्ही. शरीरयष्टीत फरक पडलाय..शिवाय ही फ्रेंच बियर्ड..डोक्यावरचे विरळ केस.."सुमीने दातांनी जीभ चावली."

"अगं बोल..खरं तेच बोलतैस तू..या कामाच्या व्यापात व्यायामाची बोंबच आहे..त्यामुळे हे असं वाण्याच्या पोटापेक्षा सरस पोट सुटलंय बघ. केस तर कधीचे सोडून गेलैत. चार आहेत ते जपून विंचरतो."

"तुझं सांग..लग्न झालं!"

"न व्हायला काय झालं..शिक्षक आहे नवरा माझा.  मुलगा आदिनाथ नुकताच सीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन एका फर्ममधे कामाला लागलाय. आणखी दोन वर्षांत सासूबाई होईन मी. तुझं कसं चाललय?"

"माझं..झक्कास..मामाच्या धाकट्या मुलीशी लग्न झालंय माझं. मामाचे नाही म्हंटलं तरी ऋण आहेत माझ्यावर. मुलगी आहे एक..सुमेधा नाव तिचं.." दोघांनी एकाच वेळी एकमेकांच्या डोळ्यांत बघितलं..नजरेची भाषा सुरु झाली. 

सुमी म्हणाली,"सुमेधा..माझ्या नावावरून ठेवलंस ना!"

आदित्य म्हणाला.."तू नाही का माझ्या नावारनं मुलाचं नाव आदिनाथ ठेवलंस..आदि म्हणता आलं पाहिजे म्हणून ना. कुठेतरी ह्रदयाच्या कोपऱ्यात आहे मी,बरोबर ना!"

 सुमी म्हणाली.."तू दिलेलं जाळीदार पिंपळपान अजुनही जपलंय मी.."आणि आदित्य म्हणाला.. नव्हे त्याला ही मनात म्हणायचं होतं पण त्याच्याही नकळत कंठातून शब्द बाहेर पडले.."तू दिलेलं मोरपीस आहे  माझ्याकडे." आणि क्षणभर दोघंही कावरीबावरी झाली. दोघांनीही आजुबाजूला पाहिलं. मग मात्र सुमी उठली,म्हणाली,"चल निघते..लेक यायची वेळ झाली."

"बोलवणार नाहीस! तुझ्या हातची कॉफी अजुनही जीभेवर.."

सुमी पदराची घडी कमरेपाशी घेत सटकन निघाली, ती पुन्हा त्या बँकेत जाणार नाही आणि मागच्या भूतकाळाची रेती उकरणार नाही..असं मनाशी ठरवत.

*******

सुमन घरी पोहोचली. लेक अजुनही आला नव्हता. तिने पोहे करायला घेतले. थोडयाच वेळात कांदेपोह्यांचा सुवास घरभर दरवळला. इतक्यात दाराची बेल वाजली..एक, दोन..तीनवेळा..अरे हो हो..करत सुमी दाराजवळ आली तर दारात तिचा नवरा..महिंद्र.

महिंद्र शीळ वाजवतच आत आला. सुमनच्या कंबरेभोवती हात गुंफून त्याने गोल गिरकी घेतली.

"कसला एवढा आनंद झालाय तुला! आणि शुज..आधी शुज काढ बघू." सुमी ओरडली.

"ओ हो सॉरी मिलॉर्ड..अगं आनंदच एवढा झालाय नं काय सांगू तुला!"

"कसला?"

"आपल्या बंगल्याचं लोन सँक्शन झालंय. कोणतरी नवीन मेनेजर आहेत आदित्य सामंत म्हणून. त्यांनीच बोलावून घेतलेलं मला फोन करुन. हे पेढे ठेव देवाजवळ. मी फ्रेश होऊन आलोच..आणि हो उद्या संध्याकाळी आदित्य सामंताना बोलावलय मी घरी चहाला."

"छे! चहा कुठे! कॉफी आवडते आदिला तिही दाट दुधाची." नकळत सुमीच्या तोंडून निघून गेलं.

-------सौ.गीता गजानन गरुड.

(वाचकहो,काहींना ही कथा अपुर्ण वाटेल..पण हा एक कथाप्रकार आहे. यात कथेचा शेवट करत नाहीत..याला ओपन एंड स्टोरी  म्हणतात..शेवट हा वाचकांनी आपल्या कल्पनेने रंगवायचा असतो.)