टोपीवाला सेल्समन आणि माकडे (मॉडर्न इसापनिती)

आजची नीती वापरून  जर बोध कथा बनवल्या तर त्या कश्या असतील ह्याची एक झलक आहे ही कथा.

एका उपक्रमात लिहताना अचानक हा विचार आला की 

आजीकडुन पंचतंत्र आणि  इसापनितीच्या  ऐकलेल्या कथा अजुनही बोध देतात. आजची नीती वापरून  जर बोध कथा बनवल्या तर त्या कश्या असतील ह्याची एक झलक आहे ही कथा.

"गणेश हे घे पार्सल  आणि हा घे नवीन टेरीटरी एड्रेस ....माथेरान कॉलनी  जिल्हा बंदरपुर ,इकडे आज जाउन टोप्या विकायच्या  ..."

"हो आणि आजच टारेगट  किमान दोनशे टोप्या तरी विकल्याच पाहीजेत..." नायका कंपनीचा सेल्स मॅनेजरने त्याला त्याचे टारगेट दिले.

"गरमी आहे ,त्यात टुरीस्ट सीझन आहे तर हाताेहात विकल्या जातील  बॉस .!" आत्मविश्वासाने विक्रेता गणेश बॉसला सांगत होता..

"बॉस ,थोड्या जास्तच टोप्या घेतो, कारण टारगेट ओवर अचिव झाल तरच  इन्सेंटीव मिळेल. "

"I don"t have problems ,पण लक्षात ठेव त्या  जागी सेल्समन जास्त टिकत नाही ..so be careful ,and don"t be over confident" ,गणेशच्या बॉसने त्याला सावधान केल.

तसा टुरीस्ट स्पॉट असल्यामुळें गणेशचा माथेरान कॉलनीत सकाळच्या वेळी चांगला बिझनेस झाला .

मग तो लंचसाठी गार्डन रेस्टारंटमध्ये गेला ..तिकडे गणेशच जेवुन झालं आणि मग बिल द्यायला तो कांउटरकडे गेला तेव्हाच नेमकी त्याची बॅग एका माकडाने उचलली आणि तो तिकडुन पळुन गेला .

बॅग गायब झाल्याचे पाहुन गणेशने आराडाओरडा करायला सुरवात केली,

"अरे !माझी बँग दहा हजाराचा माल होता त्यात ,कुणीतरी पकडा रे त्या माकडाला !"

  हे ऐकल्यावर त्याला सर्व्हीस  देणारा वेटर बोलला.

"सर इकडची माकडे वांड आहेत. त्यांची एक मंकी गँग आहे...ते नेहमीच  लोकांच्या बँगा पळवतात "

"अरे !मग कुठे शोधायच त्यांना,माझ्या हजारच्या टोप्या होत्या त्या बॅगेत " गणेश रडवेला होत म्हणाला.

"साहेब ती मंकी गँग इकडे बाजुच्या गार्डनकडे असते.तुम्ही  तिकडे जाउन पाहा, तुमची बॅग मिळेल तिकडे  कदाचित".?.. वेटरने हे म्हटल्यावर गणेश गार्डनकडे पळत सुटला.

तिकडे दहा ते पंधरा माकडे आंब्याच्या झाडावर  टोप्या घालुन बसली होती आणि बॅग जमीनीवर  पडलेली होती.

हे पाहुन सुरवातीला गणेश रडवेला झाला पण त्याला आजीने सांगितलेली इसाप नितीची स्टोरी आठवली .त्याने आधी झाडावर दगड मारले ,तर त्यांनी कैऱ्या फेकल्या .

हे पाहुन तर गणेशला हुरूपच आला इसापनीतीची कथा काम करतेय अस वाटल ..."येस  !आता टोपी फेकतो मग माकडही टोप्या फेकतील." तो उत्साहात स्वत:शीच बोलला.

त्याने डोक्यावरची टोपी फेकली तर माकडाने त्याला थोबाडीत मारली आणि म्हणाला.

"मुर्खा इसापनीती काय तुलाच माहीत आहे का? आम्हालाही माहीती आहे..आमचेही पुर्वज होते कथेत . आम्हालाही गरमी होते तर चल फुट टोपी बिपी  काय मिळणार नाय."?


हे ऐकुन आणि लाल गाल घेउन गणेश परत रेस्टाॅरंटमध्ये आला."कोणी सांगितल होतं ओवर करयला ,आता भोगा."

हे पाहुन वेटरही हसला आणि गणेश जवळ जाऊन म्हणाला ,

"साहेब काय झाल ? माकडांनी माल नाही दिला..मी एक युक्ती सांगतो.तुम्ही एक काम करा तुम्हाला टोप्या मिळतील पण थोडा खर्च करावा लागेल "

"करेन !करेन!अरे तु सांग तरी काय करायला हवं. " गणेशने अधीर होत म्हटलं.

"सर एक काम  करा . बनाना पाय केक आहेत ह्या रेस्टारंटचे. ते तुम्ही माकडांना दाखवा..म्हणजे एक  काम करा .माकडांना हे केक खुपच आवडतात तर  हे केक घ्या त्यात थोडीशी झोपेच्या गोळ्यांची पावडर टाका  आणि गार्डनमध्ये त्याच्यांजवळ ठेवा."

" माकड  येतील आणि तिकडेच झोपतील मग तुम्ही टोप्या काढुन घ्या सिंपल "

"हमम...गुड आयडीया ! पण झोपेच्या  गोळ्या कुठुन आणु .." गणेश थोडासा चिंतेत होता कारण उपाय होता पण साधन नव्हतं उपाय करण्याचं.

"सर तुम्ही अजुन पाचशे द्या ..मी झोपेच ओषध असलेले केक बनवुन देतो...पर केक शंभर रूपये"

"काय ? पन्नास रूपयाच्या  बनाना पाय केकचे डायरेक्ट  शंभर रूपये लावतोस  म्हणजे पंधरा केकचे  दोन हजार आणि तुला पाचशे ...मेलो माझा इन्सेंटीव इकडेच गेला" 

"सर तुम्हीच बोललात ना माझा हजारांचा माल आहे मग दोन हजारांसाठी कशाला रडता, तसचं सर माझी मेहनतही आहे आणि गोळ्यांना पण पैसे पडतातच  ना सर !"वेटर गणेशला समजावत म्हणाला .

"ठीक आहे दे!" गणेश हताश सुरात म्हणाला.

"सर हे घ्या." , वेटर जणु केक  रेडी असल्यासारखे त्याच्या हातात देत बोलला.

गणेशनी लगेच आंब्याच्या झाडाखाली ते केक ठेवले आणि लांब जाउन बसला .माकडांनी थोड्यावेळ्यातच येउन केक खाल्ला आणि ते पेंगु लागले.मग गणेशने आपल्या टोप्या गोळ्या केल्या आणि तो परत आपल्या कंपनीत निघुन गेला. 

"अरे बापरे...आता इकडे बिझनेस करताना नेहमी बनाना केक हातात ठेवुन फिराव लागेल अस दिसतयं "

बोध : युक्तीने कठीण काम  नेहमी सोपे होते..

पण ही तर मॉडर्न स्टोरी आहे अशी कशी संपेल. पाहुया पुढे काय होतं.



गणेशला लांब गेलेल बघुन कुठुनतरी एक शिटी  वाजली आणि माकडे लगेच जागी झाली आणि धावत एका माणसापाशी आली.


तो माणुस रेस्टॅारेंटचा तोच वेटर होता, जो शेंगदाण्याची पाकीटे घेउन हसत उभा होता. तो लगेच त्यांना कुरवाळत म्हणाला .

"आज मोठ घबाड मिळालं .खुप केक डबल किमतीला गेले त्यामुळे मालकाने माझा पगार वाढवला आणि त्या सेल्समनकडुन पैसे मिळाले ते वेगळेच..."


ज्या माकडाने गणेशला थोबाडीत मारले होते तोच माकड  वेटरला हसत हसत म्हणाला,

"हो आणि आम्हालाही आज केक आणि शेंगदाणा दोन्ही मिळालं. ते पण एकाच वेळी ,आजच्या दिवसासाठी एवढी कमाई पुरे आहे ..आता आराम करतो. चला रे झाडावर! आराम करायला.  बाय !उद्या भेटु रे !" 


आता मोठा बोध:- तुम्हाला मदत करणारा नेहमी तुमचा हितचिंतक असेल अस नाही आहे..तेव्हा नेहमी सावध रहा

मुळ कथा......


एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात.


थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या.


तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात.


शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो.


उपदेश :  शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

©®वृषाली गुडे