अति घाई

वेळेआधी काम करावी, पण खरच वेळे आधी करणं गरजेचं असतं?


कथेचे नाव : अति घाई
विषय : काळ आला होता पण...
फेरी : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

सकाळची वेळ.

नेहमी प्रमाणे केदारची आई त्याला नाश्ता करायला सांगत होती आणि हेच केदारला आवडायचे नाही. त्याला काम जास्त महत्त्वाचे वाटायचं. काम केले तरच आपण आयुष्यात सेटल होऊ आणि जास्त पैसे कमवू शकू, हाच विचार त्याच्या मनात नेहमी असायचा. या विचारापुढे त्याला काही सुचायचे देखील नाही.

"आई, मी निघतो गं. " केदार म्हणाला.

"अरे, अजून बराच वेळ आहे. कशाला इतकी घाई करत असतो तू? थांब जरा, नाश्ता करून घे! मग जा." केदारची आई त्याला नाश्त्याला वाढत म्हणाली.

"आई, खुप उशीर करून जाण्यापेक्षा जरा लवकर निघालेलं बरं नाही का? आणि नाश्ता नको मला. मी कॅन्टीन मधे खाईल काही तरी! चल, डबा दे मला." केदार मनगटावर घड्याळ चढवत बोलला.

"इतकी घाई बरी नव्हे! बरं थांब हं, डबा देते. " आई म्हणाली.

" आज माझे महत्वाचे प्रेझेन्टेशन आहे गं आई, जरा लवकर दे. नाहीतर बॉस माझा जीव घेईल. " नेहमीचेच वाक्य केदार म्हणाला.

"तुझ्या बॉसला काय रे एवढी घाई असते? नेहमी स्वतः नाष्टा करत नसेल म्हणून दुसऱ्यांनी पण उपाशी राहायचं का? त्यांची आई लांब असेल म्हणूनच तो असा वागतो. " केदारची आई म्हणाली.

केदार नेहमी प्रमाणे या बडबडीकडे दुर्लक्ष करून आईने दिलेला डबा घेऊन बाहेर पडला कंपनीकडे जायला.

केदार एका आयटी कंपनीत कामाला होता. त्याला सतत घाई असते. कोणतंही काम त्याला नेहमीच  वेळेआधी पुर्ण  करायच असतं.
सगळे प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन त्याने वेळेआधीच पूर्ण करून दिले, त्यामुळे त्याचे वरिष्ठ अधिकारी ही त्याच्यावर खुश असायचे. आणि त्याच्या कामाचं कौतुक करायचे.

त्याची आईचे नेहमी त्याला "घाई नको करू, अति घाई, संकटात नेई.. " असे उपदेशाचे डोझ चालू असायचे पण त्याला ते सगळं ऐकणं म्हणजे \"व्यर्थ\" असचं वाटायचं.

वेळेआधी काम पुर्ण केलं तर पुढच्या नवीन कामाला सुरवात करता येईल, त्याशिवाय मोठं कस होणार?
असं स्वतः ला सांगून तो त्याच काम करायचा.

आजही त्याची घाई चालू होती. एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं पण  ते ऑफिसमधे नव्हतं. बाहेर दुसऱ्या कंपनीमधे जाऊन द्यायचं होतं त्यामुळे तो घाई करत होता. प्रेझेंटेशनची वेळ दुपारी बारा वाजताची होती आणि हा दहा वाजताच निघायला तयार! असं नव्हतं की ऑफिस लांब होतं. ऑफिस तर अगदी घराच्या अर्ध्यातासाच्या अंतरावर होतं.

"केदार, हे बघ नीट जा सांभाळून! गाडी हळू चालवशील नाहीतर उशीर होतोय असा विचार करून तू फास्ट चालवायला घेशील तर आधीच सांगते असं करायचं नाहीस. कळलं? " आई त्याच्या हातात डबा देत त्याला काही काळजीचे चार शब्द सांगत होती.

"हो गं! मी नाही चालवणार फास्ट. बरं चल जातो आता." केदार आईच्या पाया पडत म्हणाला.

" जातो नाही, येतो मी म्हणावं." आई त्याला सांगते पण तो कुठे थांबला होता ते ऐकायला, तो तर निघूनही गेला लगेच.

" कधी ऐकणार माझं काय माहित? देवा! काळजी घे रे देवा माझ्या लेकराची. " आई घरात येऊन देवापुढे हात जोडत म्हणाली.

"हॅलो प्रणव, हे बघ प्रेझेंटेशनमध्ये कुठलीही गडबड नकोय मला आणि हे बघ माझ्या कडे प्रेझेंटेशनची ओरिजनल फाईल आहे. तू पण तुझ्याजवळ एक कॉपी घेऊन ठेव बॅकअपसाठी म्हणजे प्रेझेंटेशनच्या वेळी काही गोंधळ नको व्हायला." केदार कानात हेडफोन घालून प्रणवला कॉल करून त्याच्या कलीगशी बोलत होता.

"हो सर, मी माझ्याकडे एक कॉपी घेऊन ठेवली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल नक्की! पण सर, तुम्ही एवढ्या लवकर का जात आहात? म्हणजे अजून दोन तास शिल्लक आहेत आपल्याकडे आणि तुमच्या घरापासून अगदी अर्ध्या तासातच ती कंपनी आहे तर तुम्ही? " प्रणव

"मी ऑफिस मधे येणार आहे आधी, आणि ट्रॉफिक नाही का लागणार? महत्त्वाचे म्हणजे मला सांग लवकर गेलो तर काही बिघडणार आहे का? नाही ना, मग? बरं चल, येतो मी ऑफिसमध्ये! " केदार त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि लगेच फोन कट करून घेतो.

नाही म्हटलं तरी केदार फास्ट बाईक चालवत होता आणि प्रेझेंटेशनचे विचार डोक्यात चालू होते. ह्या सगळ्यात त्याला हे समजलं नाही की, जी बस त्याला क्रॉस करून गेली तिच्यामागून ट्रक येत होता आणि काही कळायच्या आत त्याचा ऍक्सीडेन्ट झाला.


तब्बल तीन साडेतीन तासांनी त्याला जाग आली. त्याने हळूच डोळे उघडून पाहिलं तर त्याला सभोवती हिरवे पडदे दिसले. त्याची आई त्याच्या शेजारी खुर्चीवर बसून होती अन् तोंडाला पदर लावून रडत होती.

त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण एक जोरदार कळ त्याच्या हाताला आणि पाठीला लागली. तो तसाच बेडवर आपटला. त्याची हालचाल पाहून आई लगेच त्याच्या जवळ आली.

"अरे! उठू नकोस, थांब मी डॉक्टरांना बोलावते." आई म्हणाली. आईचं बोलणं ऐकून त्याला आठवलं की, त्याचा ऍक्सीडेन्ट झाला आहे.

" हे! यंग बॉय, आलात का शुद्धीवर? पाहू बरं! "डॉक्टर त्याला तपासात बोलले.

"थोडक्यात बचावलात नाहीतर काही खर नव्हतं... डोक्याचा मार हातावर निभावला. आता पुर्ण काळजी घ्या, आराम करा, तुमच्या दोन्ही हाताला जास्त मार बसला आहे. त्यामुळे प्लास्टर करावं लागलं आणि पायाला थोडं लागलं आहे. त्यामुळे भरपूर काळजी घ्या आणि आराम करा. " डॉक्टर त्याला काही इन्स्ट्रक्शन  देऊन निघून गेले.


" किती वेळा सांगितलं आहे तुला की, जास्त घाई करू नको म्हणुन... पण नाही ऐकायचंच नाही. आता पाहिलंस ना, काय परिणाम झाला तुझ्या घाई करण्याने? हे म्हणजे असं झालं, काळ आला होता *\"पण\"* वेळ नाही! " डॉक्टर जाताच आई केदारच्या काळजीने बोलू लागली.

" आई... " केदार

" काय आई? तुला विषयाचं गांभीर्य कळतंय का? आज जर तुला काही झालं असतं तर मी एकट्या बाईने काय केलं असतं जगून? तुझ्याशिवाय कोणी आहे का मला? " एवढ्यात आईला हुंदका आला. पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, " बरं, सध्या आराम कर. तुझ्या ऑफिसचे साहेब लोकं येऊन गेलेत. येतील परत संध्याकाळी असे म्हणाले होते. आता तू आराम कर बाकी काही नंतर... "आई म्हणाली.

आई केदारला आराम करायला सांगून ती दवाखान्यात असलेल्या मंदिराजवळ देवाचे आभार मानत होती. इकडे केदार मात्र आईच्या बोलण्याचा विचार करत होता.

" कदाचित आई बरोबर बोलली \"काळ आला होता पण वेळ नाही.\" ह्म्म पण आई बोलते ते सिरियसली घ्यायला हवं. माझ्या अति घाईने मी तिला खूप दुखावले आता परत अशी चुकी करणार नाही. " केदारने मनोमन निर्धार केला.

काही दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला पण त्या अपघातानंतर त्याने कधीच आईच्या बोलण्याकडे ना दुर्लक्ष केलं, ना अति घाई केली, ना कधी घाई करून गाडी वेगात चालवली. त्या एका अपघाताने त्याला आयुष्यभराची शिकवण मिळाली.


समाप्त.

©®
तेजश्री
जिल्हा - पूणे.