तोडी सोन्याचा पिंजरा..

एका लढणाऱ्या स्त्रीची कथा
तोडी सोन्याचा पिंजरा..



" मॅम, मला माफ करा. मला माहिती आहे मी तुम्हाला तुम्ही बाहेरगावी असताना त्रास देते आहे. पण इथे थोडा प्रॉब्लेम झाला आहे." सोनल रडवेली होत बोलत होती.

" ठिक आहे ग. काय झाले ते सांग." मुलाकडे फेकण्यासाठी घेतलेला बॉल नवर्‍याकडे देत नेहा बोलू लागली. तिला फोनवर बोलताना बघून अर्णव चिडला. तो चिडलेला बघून नेहाने तिच्या नवर्‍याला समीरला हात जोडले. तो ही नाराज होऊन अर्णवची समजूत काढू लागला.

"आता सांग.. काय झाले ते?"

" मॅम, उद्या निशिकांतसरांची ओपिडी आहे. त्यांच्या दहा अपॉइंटमेंट ठरल्या होत्या. त्यातल्या पाच अचानक कॅन्सल झाल्या. त्यांचा फोन आल्यावर त्यांनी विचारले म्हणून मी सांगितले. तर आता त्यांनी उरलेल्या पण कॅन्सल करायला सांगितल्या. हे जर गायत्रीमॅमना समजले तर खूप चिडतील माझ्यावर. त्यांनी मागेच बजावले होते मला एक दिवसही रिकामा नाही जायला पाहिजे म्हणून. आता मी काय करू? मला नोकरीची गरज आहे मॅम." सोनल रडायलाच लागली.

" झाले बोलून? आता एक काम कर. माझ्या डेस्कवर जा. गेलीस? तिथे एक फाईल ठेवली आहे. दिसली? ती उघड. एका पानावर निशिकांतसरांच्या पेशंट्स ची लिस्ट आहे. कोणाचा फॉलोअप आहे का, ते बघ. ज्यांचे आहे त्यांना आठवण करून दे. तरिही नाही झाले तर मला परत फोन कर. मी बघते."
सोनलला समजावून नेहाने फोन ठेवला. तिने आजूबाजूला बघितले तर अर्णव आणि समीर दोघेही पाण्यात गेले होते. दोघेच मजा करत होते. एक क्षण तिलाही त्यांच्यासोफत जावेसे वाटले. पण सोनलचा परत फोन आला असता तर? तिने सुस्कारा सोडला. रोजच्या कामातून अर्णवला वेळ देता येत नव्हता म्हणून दोन दिवस बाहेर आलो तर इथेही तेच. आता दोघेही चिडणार हे नक्की. नेहा स्वतःशीच विचार करत होती. तेवढ्यात तिचा फोन परत वाजला. सोनलच होती.

" थॅंक यू सो मच मॅम. तुम्हाला माहिती आहे मी दहाजणांना फोन केले आणि दहाही जणांना फॉलोअप हवा होता. आता निशिकांतसरांचे पंधरा पेशंट झाले. ते सुद्धा खुश झाले. थॅंक यू आणि परत एकदा सॉरी." नेहाला काही बोलायची संधीही न देता सोनलने फोन ठेवला. नेहा स्वतःशीच हसली. " गरज सरो वैद्य मरो."

ती उठली आणि पाण्याच्या दिशेने गेली. चिडलेल्या अर्णवची समजूत काढणे सोपे होते पण समीरची नाही. खेळून दमल्यामुळे अर्णव जेवून झोपलासुद्धा. समीर मात्र काहीच न बोलता मोबाईलवर गेम खेळत होता.

" बोलणार नाहीस का?" नेहाने त्याच्याजवळ जात विचारले.

" काय बोलायचे?" त्याने मोबाईलवरची नजर न काढता विचारले.

" असं रे काय करतोस? दोन दिवस बाहेर आलो तरी तेच."

" तेच मला म्हणायचे आहे." मोबाईल रागाने बाजूला ठेवत समीर बोलला. "दोन दिवस सुट्टी काढून इथे आलो तरी तुझे हॉस्पिटल काही सुटत नाही. घरी असले तरी तेच, बाहेर आलो तरी तेच. जॉब कसला तर रिसेप्शनीस्टचा.." समीर हेटाळणीच्या स्वरात बोलला.

" समीर, तू सुद्धा? तुला माहित आहे हे काम मी मला आवड म्हणून करते. आणि मी रिसेप्शनीस्ट नाही तर फ्लोअर मॅनेजर आहे." नेहा निराश होत बोलली.

" काम तेच आणि पगारही तेवढाच. राबवून मात्र घेणार. आणि जास्त काम केलेस म्हणून पगार तर कोणीच वाढवत नाही तुझा."

" तुला तो विषय काढून रात्र खराब करायची आहे का?"

" काहीच खराब करायची माझी इच्छा नाही पण उद्या तुझा मोबाईल बंद ठेव. म्हणजे कोणाचाच दिवस खराब होणार नाही. " दुसरीकडे तोंड करून झोपत समीर बोलला.


नेहाच्या आयुष्यात पुढे काय होईल बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all