तो सगळे ठीक करेल

Ajay lost his job and came into some stressful situation

"तो सगळे ठीक करेल......"

©®अमित मेढेकर

"तुला काय झालंय तोंड वर करून बोलायला, जॉब माझा गेलाय"
"जॉब जाऊन 6 महिने झाले, काही कमी पडले का आपल्याला, तो आहे ना! त्याला काळजी..."
"त्याला काळजी असती तर माझा जॉब नसता गेला..."
"तुमच्या एकट्याचा गेला का जॉब? ही परिस्थिती अशी आहे की आपण काहीच करू शकत नाही...थोडा काळ धीर धरला पाहिजे"

"तुला व्यवहार कळले असते तर काय ग! घरात खर्च लागतो... किराणा, दूध, फळे-भाजी, गॅस, TV चा रिचार्ज, मोबाइल रिचार्ज, लाईट बिल, गाडीचा हफ्ता, घराचा हफ्ता, पेट्रोल, औषधे, इन्श्युरन्स, मेडिक्लेम एवढा पैसा आणायचा कुठून गं?" त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. 

ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, " गेल्या सहा महिन्यांपासून तुम्ही इन्कम नसताना पण हे सगळे बघत आहात ना, मग काळजी कशाला?"

"ते मी पैसे साठवले होते त्यातूनच करतो गं! पैसे आपण ऋचा आणि ऋषि च्या शिक्षणासाठी साठवतोय, विसरलीस का?"

"मी काहीच विसरले नाही, पण तुम्ही बरंच काही विसरत आहात"

"मी? मी नाही विसरलो काही..."
"अच्छा! मला सांगा, एवढ्या 6 महिन्यात तुम्हाला कोणापुढे हात पसरायची वेळ आली का?"

"डोके फिरलं आहे का तुझे? मी किती स्वाभिमानी आहे हे माहिती नाही का तुला...स्वतःला विकेन पण कोणापुढे हात पसरणार नाही..."

"तशी वेळच येणार नाही..तो विधाता आहे ना काळजी घ्यायला, तो सगळे ठीक करेल"

"तुझ्या त्या विधात्यानेच असे दिवस आणले आहेत आपल्यावर...."

"नाही हो...तो विधाता आहे म्हणूनच आपल्याला काही कमी पडत नाही... त्यानेच अजून आपल्याला काही कमी पडून दिले नाही, बघा तुमच्या हातात लवकर पैसा येईल"

"तुला समजावणे हा निव्वळ मूर्खपणा आहे स्मिता" 
असे म्हणून अजय तावातावाने तिथून निघून गेला...

अजय हा एका मोठ्या कंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर जॉब ला होता..पण कोविड आला आणि त्याच्या कंपनीने 500 लोकांना जॉब वरून काढले...यात त्याचाही नंबर होता. 
6 महिने झाले होते ही घटना घडून..!

पहिला महिना तर अजय ला केवळ हे ऍक्सेप्ट करण्यात गेला की आपल्या बाबतीत असे होऊ शकते? 2ऱ्या महिन्यापासून त्याने टाईम्स जॉब्स, इंडिड, नोकरी, शाईन, मॉंस्टर अश्या वेगवेगळ्या जॉब्स साईट वर रेझ्युमे अपडेट करून जॉब शोधायला सुरुवात केली होती..पण कुठूनच कॉल येईना...त्याचा धरलेला धीर आता जायला लागला होता...चिडचिड जास्त व्हायची त्याची. सगळी चिडचिड स्मिता वर निघायची..

स्मिता खूपच शांत स्वभावाची...अजय चे सगळे वागणे मान्य करून ती खूप समजून घ्यायची..त्याचे सगळे रुसवे फुगवे काढायची...त्याच्यावर उलट उत्तरे द्यायची नाही..फक्त सगळे ठीक होईल एवढेच म्हणायची..तिचा तिच्या देवावर पूर्ण विश्वास होता...जर त्याने ही परिस्थिती आणली आहे तर तो यातून नक्की बाहेर काढेल ही पक्की खात्री तिला होती..

जॉब गेल्यापासून अजयने खर्च एकदम कमी करून टाकले होते..दूध, किराणा, भाजी यात पण जेवढी काट छाट करता येईल तेवढी तो करायचा..
पार्सल आणणे टाळायचा..हिंडणे, फिरणे बाहेर खाणे एक्स्ट्रा असा खर्च जो होता तो पूर्णपणे शून्यावर आणून ठेवला होता..एरवी सुपर मार्केट मध्ये जाऊन हवी तो शॉपिंग करणारा तो आता स्वस्तातले एखादे तेल घे असा आग्रह स्मिताला करायचा..

स्मिता त्याच्यातील बदल फक्त अनुभवायची आणि काही न बोलता त्याला जे हवे ते करायची.
सहा महिन्यात ऋचा आणि ऋषी दोघांनाही कळले होते की बाबा थोडा विचित्र वागत आहे पण ते दोघेही मुळातच समजूतदार असल्याने काही बोलायचे नाही..

हसत असणारा अजय आता अति काळजी करून चिंताग्रस्त झाला होता..त्याला हायपर टेन्शन चा त्रास सुरू झाला होता...डॉक्टर ने सांगितले की गोळी कम्पलसरी घ्यावी लागेल नाहीतर स्ट्रोक येऊ शकतो...
कॉलेज झाल्यापासून ते आत्तापर्यंत कधी जॉब नाही अशी वेळच आली नव्हती..सगळे उत्तम चालले होते आणि अचानक असे घडले आणि सगळे तंत्र बिघडले आता जॉब मिळेस्तोवर त्याला चैन पडणार नव्हते...

आज सकाळी सकाळी दारावर आलेल्या  खव्यावाल्याकडून ताजा खवा स्मिता ने विकत घेतला..1 किलो खवा कशासाठी असा हजार किलो वजनाचा प्रश्न त्याला पडला आणि त्याने स्मिताला जाब विचारायला सुरवात केली...त्यावरून हे संभाषण झाले होते...

दुपारी जेवणामध्ये खव्याच्या पोळ्या खात असताना, अजय चा फोन वाजला. 
एका जुन्या फ्रेंड चा फोन होता,
"अजय, एका ऑफिशियल पर्पज साठी तुझ्या अनुभवाचे कन्सलटेशन हवे आहे. 2 दिवस झूम वर मिटिंग घेऊन तुझी एक्सपर्ट मते सांगायची आहेत..2 दिवसांचे 20000 रुपये मिळतील...इंटरेस्टेड आहेस का?"
क्षणाचाही विचार न करता त्याने हो सांगितले..6 महिन्यानंतर त्याला काही पैसे मिळणार होते..
त्याचे बोलणं ऐकून, स्मिता ने हसत हसत त्याच्याकडे पाहिले तर हा काही न बोलता खवा पोळी खायला लागला..

तो आठवडा त्याचा खूप बिझी गेला..रिसर्च, प्रेझेंटेशन तयारी, PPT बनवणे यात तो त्याच्या काळज्या तात्पुरत्या विसरला...2 दिवस झूम वर मिटिंग घेऊन तो फुल्ल रिफ्रेश झाला...फीडबॅक मस्त आले..सगळ्यात महत्वाचे म्हणजे 20000 लगेच अकाऊंट ला क्रेडिट झाले...आपण पैसे कमवू शकतो हे विश्वास त्याला निर्माण झाला...
आनंदाच्या भरात त्याने पिझ्झा हट मधून 2लार्ज पिझ्झा, गार्लिक ब्रेड आणि पेप्सी मागवले... आज बाबा खुश म्हणून मुले पण खुश होती..
वीस हजार रुपयांत सगळे काही भागणार होते असे नाही ,पण बुडत्याला काडीचा आधार प्रमाणे आज पैस्यांची किंमत जास्त होती...

आठ दिवस तो शांत होता परत त्याला पुढे काय हि चिंता भेडसायला लागली..परत त्याचे वागणे चेंज व्हायला लागले..शाळेतून मुलांच्या फी साठी रिमायंडर कॉल यायचे..तो फक्त 'हो भरतो' एवढे म्हणायचा आणि स्वतःला त्रास करून घायचा..
स्मिता फक्त त्याला ऑब्झर्व करायची..त्याची अस्वस्थता तिला कळायची... एकवेळ देवाच्या तसबिरी कडे पाहायची, हात जोडायची आणि म्हणायची, "देवा, सगळे ठीक कर रे" आणि आपले बोलणे देव ऐकत आहे या विश्वासाने कामाला लागायची.

ज्या दिवशी शाळेतून फी साठी कॉल आला, त्या दिवशी दुपारी 4 वाजता घराची बेल वाजली.
कोण आलंय आता कडमडायला हा विचार करून अजय ने दरवाजा उघडला..
दारात एक माणूस रजिस्टर ए. डी. घेऊन उभे होता...त्याने सही करून इन्वेलप घेतले..फोडून बघितले तर आत एक चेक होता..त्याची एक इन्शुरन्स पॉलिसी काही महिन्यांपूर्वी मॅच्युअर्ड झाली होती त्याचा चेक होता. चेक ची अमाउंट एवढी होती की त्या दोघांच्या शाळेची वर्षाची फी, वह्या पुस्तके, क्लासेस हे सगळे सहज पूर्ण झाले असते...
या वेळेस हा चेक अनपेक्षितपणे येणे म्हणजे त्याच्यासाठी पर्वणी होती..
स्मिता त्याच्या कडे हसून बघत उभी होती...

असेच काही दिवस गेले...शाळेची वर्षभराची फी भरून तो रिलॅक्स झाला होता पण बाकीचे खर्च आणि महिन्याचे फिक्स एक्सपेन्सेस त्याच्याकडे डोळे वटारून बघत होते...
त्यादिवशी तो स्मिता ला म्हणाला, "स्मिता, मला वाटते की मी आता काही तरी असे काम करावे जेणे करून आपल्याला रोजच्या रोज पैसे मिळतील.."

"म्हणजे कुठले काम?" तिने चकित नजरेने विचारले..
"कुठलेही काम चालेल, अगदी कुठलेही...जॉब मिळेस्तोवर मी काही करायला तयार आहे..आता 8 महिने झालेत मी घरी बसलोय तर काय हरकत आहे?"

ती हसली आणि म्हणाली, "तो विधाता आहे ना, तो सगळे ठीक करेल"
तिच्या या नेहमीच्या उत्तराला त्याने काहीच उत्तर दिले नाही...
ही देवापाशी गेली आणि त्या तसबिरी कडे पाहून म्हणाली, "देवा, सगळे ठीक कर रे" आणि तो करेल या विश्वासाने कामाला लागली..

त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या काकांचा फोन आला,
"अरे अजय, ती गावाकडची जमीन आज फायनली विकली गेली बरं का...2 दिवसात सगळे पैसे येतील आले की आपल्या दोघांमध्ये समान वाटून घेऊ"

काकांच्या फोन मुळे अजय एकदमच रिलॅक्स झाला..जमीन विकायचा प्रयत्न त्याचे वडील गेल्यानंतर, गेले 3 वर्षे चालला होता आणि आज तो मुहूर्त सापडला...
"स्मिता, ऐकतेस का? आपली जमीन विकली गेली...2 दिवसात पैसे येतील.."  
स्मिता हसली आणि म्हणाली, "तो विधाता आहे ना, तो सगळे ठीक करेल"
तिच्या या बोलण्यावर तो काहीच बोलला नाही पण आज तो खूपच खुश होता..त्याने आज मुलांसाठी मॅकडोनाल्ड मधून बर्गर्स, फ्रेंच फ्राईज आणि कोक मागवले...बाबा खुश असला की बाहेरून पार्सल येते हे ऋषी आणि ऋचा ला आत्तापर्यंत कळले होते...

आता त्याचा जॉब जाऊन जवळपास 9 महिने झाले होते..9महिन्यात काहीच कमी पडले नव्हते..तो फायनान्शियल स्ट्रेस मधून बराच रिकव्हर झाला होता, पण नवीन जॉब अजूनही मिळत नव्हता..

सकाळी ब्रेकफास्ट टेबल वर तो म्हणाला,"स्मिता, मला जॉब का नाही मिळत आहे ग अजून?" इतका अनुभव, इतके नॉलेज असूनही....का असे होत आहे?" 

"तो विधाता आहे ना काळजी घ्यायला, तो सगळे ठीक करेल"

स्मिता, प्लिज...मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला कि तु एकच वाक्य बोलतेस...तुला तुझ्या नवऱ्याच्या भावना दिसत नाही का?" तो काकुळतीला येऊन म्हणाला

"मला सगळे दिसते आणि कळते...तुम्हाला पण एक गोष्ट कळणे गरजेचे आहे...आपण फक्त निमित्तमात्र आहोत...करणारा, घडवणारा तोच आहे...त्याला आपली काळजी आहे म्हणूनच प्रत्येक वेळेला तो आपल्या बाबतीत धावून आलेला आहे..तुम्ही आठवून पहा..जेव्हा जेव्हा तुम्ही खूप जास्त काळजी करायला लागला तेव्हा त्याने काहीतरी मार्ग आपल्याला दाखवला....तुम्ही फक्त कर्म करा...तो विधाताच फळ देईल आणि आपले सगळे ठीक करेल" 

"तुझ्या विधात्याला तू सांगितले नाही का, की मला जॉब ची किती गरज आहे?"

"मी सांगितले आहे आणि त्याला ही माहिती आहे...योग्य वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील ..काळजी नसावी..."

तो काही न बोलता कॉफी प्यायला लागला तेवढ्यात त्याचा कॉल वाजला....
तो कॉल वर बोलत होता आणि बोलताना उत्तेजित होत होता...
फोन ठेवल्यावर तो अति आनंदाने म्हणाला, "स्मिते, मला MNC मधून फोन आला आहे...माझी प्रोफाइल त्यांना आवडली आहे...एक skype इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर मला ह्या कंपनी मध्ये जॉब मिळेल..."

स्मिता त्याचा आनंद सोहळा डोळे भरून अनुभवत होती. ती देवघरात गेली आणि तिच्या देवाला तिने मनोमन हात जोडले. ती प्रार्थना करत असताना तिच्या दोन्ही हातांवर अजून दोन हात जोडले गेले....
तिने डोळे उघडून बघितले तर अजय तिच्या बरोबर प्रार्थना करत होता...
"स्मिता, खरं आहे तुझे...त्याला काळजी आहे...आणि त्याने आपल्याला काहीच कमी पडून नाही दिले...9 महिने जॉब नाही हे खरं... पण हा जॉब मिळाला की 9 महिन्याचा बॅकलॉग पुढच्या 3 महिन्यात भरून निघेल...
काळजी करणे, नको त्या चिंता करणे यात काहीच अर्थ नाही कारण मला आज पटले आहे,  जे होते ते चांगल्या साठीच!" 

तिने हसून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, "हा विधाता आहे ना काळजी घ्यायला ....." त्याने तिच्या तोंडावर हात ठेवून पुढचे वाक्य त्याने पूर्ण केले...."तो सगळे ठीक करेल"

©®अमित मेढेकर