Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माझ्या पत्नीस

Read Later
माझ्या पत्नीस

पतीने आपल्या प्रिय पत्नीच्या 'आठवणीत'  लिहिलेले पत्र.

सोमवार,
दिनांक -१०/१०/२०२२

प्रिय आशा,
अचानक तू निघून गेलीस आणि माझं जगणं एकदम असहाय्य झालं. अगदी एकाकी पडलो मी. आपली मुलं आहेत माझ्या सोबतीला, पण तुझं 'नसणं' कुठेतरी जाणवतं मनाला.

गेली कैक वर्षे आपण एकमेकांच्या सहवासात घालवली, सुखात, दुःखात एकमेकांची साथ दिली. या अनेक वर्षात क्वचितच एकमेकांना सोडून राहिलो आपण. अगदी तुझ्या माहेरी जातानाही तुला माझी सोबत लागायची, मुलं तुझ्यासोबत असली तरीही! तेव्हा माझी चिडचिड व्हायची. मग रागावून तू मुलांना घेऊन एकटीच निघून जायचीस. पण तुम्ही गेल्यावर मात्र सारं घर मला खायला उठायचं.

मला आठवतं, आपला मोठा मुलगा जेव्हा मोठ्या पदावर काम करू लागला, तेव्हा हट्टाने तुला तो त्याच्या बरोबर परगावी घेऊन गेला होता. तब्बल पाच महिने राहिली होतीस तू तिथे! आणि दर पंधरा दिवसांनी तू मला पत्र लिहून पाठवत होतीस!

इकडे पोस्टमन दारात यायचा, मी आतून बाहेर येईपर्यंत ओरडत राहायचा, काका.. 'टपाल.'
हा काळानुसार लुप्त होणारा शब्द ऐकून मला खूप छान वाटायचं. ते पत्र फोडून वाचायचा आनंद अगदी अवर्णनीय असायचा. माझा उत्साह पाहून आपली धाकटी सून मला चिडवायची, 'बाबा आलं बघा, तुमच्या बायकोचं पत्र.' तेव्हा मी चक्क लाजायचो गं. तुझं मोत्यासारखं अक्षर मी पुन्हा पुन्हा वाचून काढायचो.

"अहो आई, आजच्या काळात कोणी पत्र लिहीत का?" असे म्हणत आपल्या मोठया सुनेने तुला मोबाईल आणून दिला.
त्यावरून आपण एकमेकांसोबत बोलायचो, एकमेकांना पाहायचो. पण सांगायचे राहूनच गेले, पत्रातून तू जे बोलत होतीस ना, तो गोडवा मोबाईलमधून बोलण्यात अजिबात नव्हता गं. प्रत्यक्ष भेटल्याचा आनंदही नव्हता त्यात. ती तुझी 'हरवलेली पत्र' मी आजही जपून ठेवली आहेत, माझ्या उशाशी.

पाच महिन्यानंतर तू इकडे आलीस आणि माझी  अवस्था पाहून मला किती ओरडलीस! 'पुन्हा तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही,' अशी प्रेमळ धमकीही दिलीस. माझं मन किती हलकं झालं होतं तेव्हा!

नंतर तुझं आजारी पडणं, सारं काही विसरून जाणं, ध्यानीमनी नसताना अचानक मला सोडून जाणं.. कसं सांगू? किती व्याकूळ झालो मी. असं वाटतं तू परतून येशील..'तुम्हाला सोडून मी कुठे कुठे जाणार नाही.' असे म्हणत तुझा हात माझ्या हातात देशील.

आजही मी वाट पाहतो गं, तुझं पत्र घेऊन दारात पोस्टमन येईल. 'काका टपाल' म्हणून हाक मारेल. मी अधिरतेने ते पत्र फोडून वाचेन आणि तू जिथे असशील तिथे सुखी असशील, हे वाचून मला खूप खूप आनंद होईल.

या वेळी मात्र आठवणीने मी तुला त्या पत्राचे 'उत्तर' लिहीन बरं का! त्यात केवळ इतकेच विचारेन  "खरचं पुन्हा येशील का परतून?" बस् इतकेच.

ता. क. -तुझ्या दोन्ही सुना आणि मुलं माझी खूप मनापासून काळजी घेतात.

तुझाच आणि फक्त तुझाच,
माधव.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//