माझ्या प्रिय सख्या

I know I am not the most beautiful woman in the world, nor do I possess all the qualities of a good wife, but you never made me feel any less of myself. You loved me for who I am and never tried to change me. This motivated me to work on myself to bring out the best in me.

                                            II श्री II




माझ्या प्रिय सख्या,


हसू नकोस हं! तुला सख्या यासाठी म्हणाले कारण, माझ्यासाठी तू नवरा कमी आणि मित्र जास्त आहेस. एक प्रियकर ते नवरा आणि आता वडील. या पूर्ण प्रवासात तू मित्र म्हणून नेहमी मला साथ देत आलास. मी स्वतःला खूप नशीबवान समजते, की तुझ्यासारखा नवरा मला मिळाला. वटपौर्णिमेला मी फक्त सात नाही, तर जितके जन्म घेईन, त्या प्रत्येक जन्मी तुलाच माझा नवरा म्हणून मागते.

लग्नाचे ६ वर्ष कसे भुर्र्कन उडून गेले नाही? या ६ वर्षांत प्रत्येक वेळी आपलं नातं उलगडत गेलं. सुरुवातीचे दिवस आठवले कि, मी मोहरून जाते. सगळेच पहिले. तुझा ओझरता स्पर्श. तुझी मिठी. आणि आपल्या कधीही न विसरता येणाऱ्या डेट्स! मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागले. नेहमी तुझाच विचार करायचे. दोन प्रेमींसारखं आपण कधी वागलोच नाही. आपल्या प्रेमातला एक असा टप्पा, जिथे प्रेम व्यक्त केलं, तर केलं आणि नाही केलं, तर कधीच नाही! बस्स्, ठरवलं आणि मी पुढाकार घेतला. आपल्या प्रेमाला अकरा वर्षं झाली. इतक्या वर्षांत आपण अनेक संकटांना तोंड दिलं. तू माझी सोबत कधीच सोडली नाहीस. तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. माझं सारं विश्वच बदललं तुझ्यामुळे.

लग्नानंतर मैत्रिणींसोबत पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप करायची इच्छा मी तुला बोलून दाखवली फक्त, आणि त्वरित तुझा होकार आला. खरंतर पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप आपण दोघे करणार होतो, पण तू मला पाठवलंस. कुठेतरी वाटत होतं, तू नाराज आहेस. मी जाण्याच्या आदल्या दिवशी मला गिफ्ट दिलेला महागडा परफ्यूम पाहून समजला तुझा आनंद. ट्रिप तर खूप केल्या होत्या आपण लग्नानंतर, पण ती "आऊट ऑफ इंडिया" वाली बाकी राहिली होती. आणि मी एकटी जायला निघाले. बायकोला एकटीला फिरायला पाठवायची हिम्मत आणि विश्वास तू दाखवलास, तिथेच आपलं प्रेम जिंकलं.

"मी नोकरी करणार", या माझ्या निर्णयाला तू घरातल्यांसमोर खंबीरपणे साथ दिलीस; तेव्हाच मला जाणीव झाली होती, की माझी निवड योग्य आहे. ३ वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या आयुष्यात एक भयानक वादळ आलं होतं, मी तर मोडूनच पडले होते. तू सावरलंस मला. पुन्हा सक्षमपणे उभी राहिले मी, केवळ तुझ्यामुळे. त्यावेळी तू खंबीर राहिला नसतास तर मीही कोलमडून गेले असते रे!

असं वाटायचं मला की तुझं प्रेम तू व्यक्त करत नाहीस. पण गरोदरपणाच्या ९ महिन्यांत तू केलेली माझी काळजी, माझी सेवा सगळं काही व्यक्त करून गेली. त्या ९ महिन्यांत तू नव्याने समजलास मला. सुरुवातीचे ४ महिने डॉक्टरांनी दिलेली सक्तीची विश्रांती होती. माझ्यासाठी तू जेवण बनवायला शिकलास. सगळं काही हातात देत होतास माझ्या. ऑफिसला जायच्या आधी माझा नाश्ता जेवण सगळं काही करून जायचास. शेवटचे २ महिने आणि कोरोनाचा लॉकडाऊन लागला. बस! आणि तू सगळ्या किचनचा ताबाच घेतलास. त्या २ महिन्यांत तर तू माझे सगळे डोहाळे पुरवलेस. जे मागितलं, ते सगळं काही बनवून खायला दिलासा मला. जेव्हा माझ्या सुजलेल्या पायांना मालिश करायचास, तेव्हा असं वाटायचं, किती जन्मांची पुण्याई माझी, कि तू माझ्या आयुष्यात आलास ! तुझ्याबद्दल तुलाच काय सांगू ? पण तुझं अव्यक्त प्रेम आज मला व्यक्त करण्याची संधी मिळाली ती दवडून कसं चालेल ना! आपली परी आयुष्यात आली आणि तू बाबा म्हणून अचानक खूप जबाबदार झालास. वाटलं होतं, कसं जमेल मला तिला घेऊन नोकरी करायला? पण, तू साथ दिलीस. तिचा सांभाळ तू पण करू शकतोस, हे सिद्ध करण्याची गरजच नाही पडू दिलीस. माहित नाही का मला? तुझा किती जीव आहे तिच्यावर. तुझं सर्वस्व आहे आपली परी. तिच्यामुळे या एक वर्षात तुझ्यातल्या बापावर प्रेम करू लागले मी! या प्रेमाइतकी सुंदर आणि आश्वासक भावना दुसरी कुठलीही नसेल.

किती गोष्टी आठवू आणि किती लिहू तुझ्याबद्दल असं झालं आहे रे. ते म्हणतात ना, "परफेक्ट हसबँड डझ नॉट एक्सिस्टस!" धादांत खोटे आहे. माझ्याकडे आहे तो "माझा परफेक्ट हसबँड"! माझ्या मैत्रिणी जेव्हा त्यांच्या नवऱ्यांचे नखरे आणि त्यांच्या कुरबुरी सांगतात, तेव्हा जाणवतो मला तुझ्यातला "द परफेक्ट हसबँड". माझे आयुष्य तुझ्यापासून सुरु होते आणि तुझ्यापर्यंत संपते. नवरा बायकोच्या नात्यामध्ये फक्त प्रेम जरुरी नसते, तर विश्वास, समजूतदारपणाही तितकाच महत्वाचा असतो. माझ्यातल्या तापट आगीवर तुझा शांत स्वभाव फुंकर घालतो, तेव्हा दिसतो तुझ्यातला समजूतदारपणा. तू घरात नसतानाही तुझे आणि माझे मित्र येऊन माझ्याशी गप्पा मारतात, तेव्हा आणखी दृढ होतो आपल्या नात्यातला विश्वास. एकमेकांच्या फोनचा पासवर्ड, फेसबुकचा पासवर्ड दोघांनाही माहित आहे, कारण आपल्यात लपवण्यासारखे कधीच काही नसते. कुठलीही गोष्ट आपण एकमेकांशी शेयर करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीत आपण मत विचारात घेतो, हे आपल्या नात्याचं वेगळेपण आहे. अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. इतक्या वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. जेव्हा आपल्याला "परफेक्ट कपल" म्हणतात, तेव्हा किती छान वाटतं हे शब्दांत सांगूच शकत नाही.

आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे, त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आपला विश्वास, आपलं प्रेम हीच आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. आपल्यातील निःस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना, की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना कधीच बांधलेलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं, की तू एवढं करतोस, तर मीच कमी नाही पडणार ना ? कधी कुठे मी कमी पडले किंवा काही चुकलं, तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तू म्हणतोस ना, "काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही, त्या लिहून व्यक्त करता येतात." म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस, मला समजून घेतलंस, खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे, "हृदयाचा ठोका चुकला तरी, तू मात्र चुकू नकोस, माझी साथ कधीच सोडू नकोस..."


"अबोलीतून फुलली बोली

खुलली गालीची नाजूक कळी

"न" कारातुनी झंकारली प्रीती

दोन नाजूक कोवळ्या ओठी

हृदये ही जुळती मनोमनी

प्रीतसागर ओथंबता नयनी

प्रेमानुभव हा माझा

कसा वर्णू शब्दांतुनी..?"



आज तुझ्यासाठी लिहून खूप छान वाटत आहे. खरंच प्रत्येकाने एकदातरी एखादेतरी प्रेमपत्र लिहावं. बायकोने नवऱ्याला आणि नवऱ्याने बायकोला ! कदाचित वेडेपणा वाटेल हे सगळं करण्याचा. पण हा वेडेपणा आनंद देणारा असेल एवढं नक्की.

                                                                       - तुझीच प्रेमवेडी सखी