तो अहिंसावादी आहे का?

About the violence by speech.


स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी ! (१४)

विषय- अहिंसा

कथा शीर्षक - तो अहिंसावादी आहे का?

लेखिका - ©® स्वाती बालूरकर, सखी.

मोहिनी सगळं आवरून ऑफिस साठी तयार होत होती. नवर्‍याला फोनवर बोलताना ऐकलं , तो धन्यवाद म्हणत होता. मनात हसली. वाढदिवसाच्या शुभेच्छा कधी देणार नाही पण घ्यायला मात्र नेहमीच तयार असतो.

तिने छान साडी नेसली होती, आज अगदी वेळ काढून ,कारण वाढदिवस हा स्पेशल हवाच!

कामकाजी महिला नेहमी कम्फर्टेबल म्हणून ड्रेसच घालतात पण विशेष म्हणून काहीतरी असावच.

कुणाला कौतुक असो की नसो स्वतःचं कौतुक स्वतः तरी करावं असा तिचा स्वभाव तयार झाला होता.

मोहिनी निघाली. त्याचा डबा हातात देत होती इतक्यात आणखी एक फोन!

"धन्यवाद धन्यवाद , अरे ती आताच गेली ऑफिसला . हो सांगतो ना ! बायकोला जेवायला न्यावच लागतं बाबा त्या शिवाय का वाढदिवस झाल्यासारखा वाटतो त्यांना ? बरं मग भेटू पुढच्या रविवारी!"

त्याने फोन ठेवला आणि तिला एकदा वरपासून खाली पर्यंत नजर टाकली.

"आज काय विशेष साडी वगैरे?"

त्याचा कडवट सूर ऐकून तिला काहीच स्पष्टीकरण द्यावं वाटलं नाही.

" फोन कुणाचा होता? ऑफिसला गेले म्हणून सांगितलंत म्हणून विचारलं !"

" सकाळी तो सच्या ,आता निखिल , लेकाचे आवर्जून फोन करतात , बरोबर लक्षात राहतो वाढदिवस तुझा , पुन्हा विश करून धन्यवाद सुद्धा ऐकायचे असतात. माझ्या वाढदिवसाला साल्यांना ढोसायला बोलावलं तर विश करतात नाहीतर विसरतात."

"जाऊ द्या , असू दे ! निघते मी. डबा ठेवलाय !"

" मोहिनी , एक सांग तू पण फोन करतेस का त्यांच्या वाढदिवसाला ? नाही, न चुकता तुला शुभेच्छा देतात म्हणून विचारलं!"

तिने फक्त एक कटाक्ष टाकला . काहीही बोलून पुन्हा मूड खराब करून घ्यायचा नव्हता तिला.

दिवस खूप छान गेला. सरांनी लंच टाईम मधे केक मागवला होता. सर्वांनी शुभेच्छा दिल्या .

सुजाताने तर खणाची साडी गिफ्ट दिली. कलिग्ज नी बुके दिला गुलाब व निशिगंधाचा ! तिने मिठाई मागवली होती.

मोहिनी खूप छान मूडमधे घरी परतली . हाच तर साजरा झाला वाढदिवस पुन्हा घरचं काही खरं नाही.
येताना पाहिलं तर सोसायटीच्या ग्रुप वर अर्जंट मिटिंग चा मेसेज होता. भाडेकरू व घरमालकांना येणं किमान एक सदस्य येणं तरी अनिवार्य होतं.


आली की फ्रेश झाली . पुन्हा नवरा ऑफिसातून परत आला तशी नवर्‍याला म्हणाली मिटिंग ला जा म्हणून.

" काय मग ऑफिसमधे ग्रँड सेलिब्रेशन झालं की नाही. . . . मोहिनी मॅडम चा वाढदिवस म्हणून! तुलाही तसलेच लाळघोटे लोकं आवडतात ना आमच्यासारखे मनातून प्रेम करणारे कुठे आवडतात.!"

"काहीही काय बोलताय? मी कधी काही म्हटले का तुम्हाला ? कशाला उगीचच !"

"बरं जेवायला जावं लागेल ना बाहेर? मॅडम चा वाढदिवस आहे. "


" तसं काही कंपलसरी नाही! बघा पहिले मिटिंग ला तरी जाऊन या!"

"मी आताच आलोय थकून , त्या ढोलबडव्या लोकांचा फाल्तू मोठेपणा ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही. !"

इतक्यात शेजारच्या रूपाचा फोन आला . मिटिंग ला चल म्हणून.

ती गेली.

तिथे पार्किंग प्लेस वरून वाद पेटला होता. मुद्देसूद बोलून तिने सर्वांना पटवलं मग मिटिंग चे मिनटस लिहिले. सह्या घेतल्या व रजिस्टर सेक्रेटरी ला देवून निघाली. तिथे कुणीतरी एकाने शुभेच्छा दिल्या म्हणून सगळ्यांनी बर्थडे विश केलं. तिची स्तुती पण केली गेली.

परत येताना मुलगा अर्णव खालीच सायकल खेळत होता.

"चल बेटा वर , आपल्याला बाहेर जायचंय ना !"

"मम्मा आलोच , एक मिनिट थांब ना! नव्या येतीय तुला भेटायला !"

इतक्यात नव्या आली व मोहिनीला शुभेच्छा देवून पाया पडली व एक गुलाबाचं फूल आणि हाताने बनवलेलं ग्रिटींग कार्ड दिलं .

तिला खूप आनंद वाटला. मागच्यावर्षी करोना काळात अर्णव बरोबर नव्व्यालाही रोज गणित शिकवत होती. तेव्हापासून ती मुलगी मोहिनी ला टीचर पेक्षा जास्त सन्मान द्यायची.


मोहिनी त्या आनंदात घरात आली. नवरा तोपर्यंत फ्रेश होवून तयार होता.

आल्या आल्या तिच्या हातातल्या फुलाकडे संशयास्पद पहात कुत्सित हसला .

आता या सेक्रेटरी बंटिया ची इतकी मजाल गेली की तुला गुलाब अन ग्रिटींग देवून विश करतोय, बरं झालं मी गेलो नाही. बहुतेक ही मिटिंग तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानेच ठेवली होती."

आता मात्र मोहिनीचा पारा चढला होता. काय करावं म्हणजे हे गलिच्छ बोलणं थांबेल. गेली चौदा वर्षे ती झेलत होती. पूर्वी इतका कडवट नव्हता तो पण गेल्या २-३ वर्षात तर त्याची भाषा व त्याचं कटु बोलणं असह्य व्हायचं.

वाद घालावा किंवा भांडण करावं तर घरात वयस्कर सासूबाई व १० वर्षांचा अर्णव होता उगीचच त्यांच्या मनावर परिणाम नको म्हणून सहन करत होती.

" अहो विचारायचं तरी की कुणी दिलंय, काहीही काय बोलताय? तो का देईल? मिटिंग पार्किंग च्या जागेसाठी होती." ती फर्म पणे म्हणाली.

"बाबा नव्व्याने आज आईसाठी किती छान ग्रिटींग बनवलं व गुलाबाचं फूल पण दिलं. मी आलोच जीन्स घालून!"

आज मात्र डिनरला जाण्याचा पण मूड नव्हता.

ती चवताळून बोलणार इतक्यात सासूबाई सुंदर गुलाबी पातळ नेसून आल्या.

"शेखर निघायचं का रे?"

जोरात ओरडून सांगावं वाटत होतं की मला डिनर नको व तुमचं गिफ्ट पण नको , तुम्ही फक्त कडवट बोलू नका.
पण डिनरला येत नाही म्हटलं की सासूबाई व लेकराचा हिरमोड होईल म्हणून सगळं गिळ लं.

अक्षरशः विमनस्क पणे ती डिनरला गेली.
सासूबाई क्वचितच बाहेर निघायच्या, त्या खुश होत्या. कारमधे मुलाच्या बाजूला बसून किती ते कौतुक.

हॉटेल मधे वेटर आला व शेखरच्या हातात मेन्यु कार्ड देत सासूबाईंच्या चेहर्‍यां कडे पहात म्हणाला ," जेवणात व्हेज घेणार का नॉनव्हेज ?"

सासूवाई एकदमच भडकल्या.

" नॉनव्हेज काय विचारतोस? माझा मुलगा पूर्ण शाकाहारी आहे. एवढ्या वस्तु खायला असताना माणसानं निष्पाप जिवाची हत्या का करायची असं मानतो तो. शाळेपासून गांधीजी व विनोबा भावेंच्या त त्वांचा अनुयायी आहे तो. पक्का अहिंसावादी!"

वेटरला एवढं स्पष्टीकरण अपेक्षित नव्हतं.
तो पटकन दुसरं वेजिटेरियन मेन्यूकार्ड घेवून आला.

नवरा व मुलगा ऑर्डर देत होते तेव्हा मोहिनीला मनात हसू आलं.

अहिंसा म्हटलं की लोकांना फक्त गांधीजी , विनोबा , बुद्ध व महावीर आठवतात. खून , हत्या व रक्तपातच हिंसा वाटते.

पण शेखर जे रोज करतो ते काय आहे ?

मन , काया, वाचा या तिन्ही ही प्रकारे न दुखवणं म्हणजे अहिंसा आहे हे कसं कळत नाही जगाला.

ही जी मानसिक हिंसा होतीय , वाचिक हिंसा होतेय, जे मनाचं खच्चीकरण होतंय . . . त्याला काय म्हणायचं , कसे पुरावे देणार?

व अशा माणसाला अहिंसावादी म्हणायचं का ?

समाप्त

©® स्वाती बालूरकर, सखी.
दिनांक ०९. १०. २०२२

चित्र- साभार गुगलवरून.