ती, तो आणि प्रेमळ संवाद

This is simple conversation between husband and wife

#ती_तो_आणि_प्रेमळ_संवाद

प्रसंग १

©️ अंजली मीनानाथ धस्के

    टिव्ही वर साबणाची जाहिरात पाहिली की भारी नवल वाटत.

जाहिरातीतील स्नानगृह हे झाडा झुडूपानी भरलेलं जंगलच  असतं.....

आंघोळीला जातांना साबणाची नवी कोरी वडी काय घेतात. त्या वडीवरच नाव दाखवत आंघोळ काय करतात. अंघोळ करून झाली रे झाली की स्नान गृहाच्या बाहेर पडल्यावर आई, मुलगी, बहीण, वहिनी तत्सम ....जी कोणी व्यक्ती बाहेर असेल तिला आधी मिठी काय मरतात.   कौतुक करायला नवरा हजरच  काय असतो. साबणाची वडी असते अगदी त्याच रंगाचे मॅचींग कपडे काय घालतात. भरीस भर छोटी पोरगी....  गर्दीतही "मम्मी " अशी हाक मारते.... त्याचंही कोण कौतुक .... म्हणे संतूर मम्मी .

किटाणू मारायची वेळ आली की मग चिखलात लोळायच काम मात्र  मुलांच्या वाट्याला येणार. त्यांची आई ती आणि तिचा गुणी बाळ किटाणू मारण्यात कसे तज्ञ आहेत हे मिरवणार.

चिमुकली पोरगी ... पुन्हा पोरगीच हं .... आपल्या सगळ्या मित्र परिवाराला घेवून आंघोळ करून शुचिर्भूत झालेल्या आपल्या आईच्या दर्शनासाठी काय  येणार  "मिम्मी तुझा चेहरा बघितला की दिवस चांगला जातो काय म्हणणार.

वरील अनेक गोष्टी जुळवून आणल्या तरी मुलगी नसणाऱ्या आयांना सुंदर  मम्मी .... सो कॉल्ड संतूर मम्मी बनता येणार नाहीच का ???? आम्ही काय कायम किटाणूच मारत बसायच का जन्मभर ????

असा खडा सवाल मी लॅपटॉप मधे डोकं घालून काम करणाऱ्या माझ्या नवऱ्याला विचारला ........

तो ढिम्म....

ते काही नाही ..... मुलगी नसली म्हणून काय झालं....

मलाही संतूर मम्मी बनायचं आहे. मी माझा निरागस हट्ट त्याच्या पुढे पुन्हा नेटाने मांडला.

"चिंताssतूर" मम्मी आहेस तेवढं पुरेस नाही का ??? अजून " संssतूर  " मम्मी कशाला हवंय. असं म्हणत तो स्वतःच्याच शब्द कोटीवर मोकळा हसला...

      बाळराजेंनी नजरेनेच वडीलांना सहनभूती दाखवली. तसा

नवरोबाचा श्वास अडकला तरी धैर्याने ' तो मी नव्हेच' असे भाव चेहऱ्यावर ठेवून पुन्हा लॅपटॉपमधे डोकं खुपसून काम करत असल्याचा अभिनय सुरू ठेवला.

शब्द तीर वर्मी घाव लागेल याचा ठाव घेत निघाला होता.    घरात एकदम भयाण शांतता पसरली.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.