उठ रे सोट्या ! तुझंच राज्य!!

Don't Be So Simple In This Selfish World

       (छोट्या बाल दोस्तांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे एक गोष्ट , दामू नावाच्या स्वभावाने अगदी सरळ असणाऱ्या एका माणसाची, पण कधीकधी साध्या स्वभावामुळे ही माणसावर अनेक संकट येतात. चला तर मग वाचू या ही गोष्ट आणि बघूया की येणाऱ्या संकटातून दामू कसा बाहेर पडतो ते)


              ही गोष्ट आहे खूप खूप जुनी. एका छोट्याशा गावात दामू नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. दामू अभ्यासात काही फार हुशार नव्हता, तो स्वभावाने सरळ होता आणि व्यवहारी जगात चतुराईने कसे जगतात हे त्याला अजिबातच कळत नव्हते. त्यामुळे घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे हेच दामूचे उपजीविकेचे साधन होते. त्यामुळे दामू ची परिस्थिती ही सर्वसाधारण गरीब होती.

          यथावकाश इतरांप्रमाणे दामूचं ही लग्न झालं आणि त्याला तीन मुलं झाली. पण दामू च उत्पन्नाचं साधन केवळ भिक्षा असल्याने त्याची परिस्थिती आणखीन आणखीन गरीब होत गेली.

           आजूबाजूच्या मुलांची खेळणी, कपडे , खाऊ बघून दामू ची मुलं ही दामू कडे आता खेळणी , कपडे आणि नवनवीन खाऊसाठी रोज - रोज हट्ट करू लागली. दामू ची बायकोही गरिबीत संसार करून  कंटाळली होती त्यामुळे , तीही रोज दामूच्या मागे लागे की , "काहीतरी नवीन उद्योग धंदा शोधा किंवा एखादी बर्‍यापैकी नोकरी तरी करा". परंतु दामू चे शिक्षण यथातथाच असल्याने त्या गावात कोणीच त्याला नोकरी द्यायला तयार नव्हते. नवीन व्यवसायाकरिता त्याच्याकडे पुरेसे भांडवल नव्हते, म्हणून एका दिवशी रात्रीच दामूने बायकोला सांगितले की , "उद्या सकाळी माझ्या करिता आठ- दहा दशम्या करून दे ,मी बाजूच्या शहरात नवीन काम शोधायला जातो आहे". दामू चे हे शब्द ऐकून दामूच्या बायकोलाही आनंद झाला , आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच तिने दामू करिता आठ - दहा दशम्या बनवल्या आणि सोबत थोडा ठेचा आणि एक कांदा ही दिला. दामू ही त्या दिवशी लवकर उठून , आंघोळ करून , व्यवस्थित तयार होऊन शेजारच्या शहरात जाणाऱ्या रस्त्याने चालू लागला.    

           दुपारचे जवळपास बारा - एक वाजले असतील,  डोक्यावरच्या रणरणत्या उन्हाने दामू पार थकून गेला होता आणि सकाळपासून काहीही न खाल्ल्याने त्याला भूकही खूप लागली होती. त्यामुळे रस्त्याने कुठे एखादं झाड दिसते का ? म्हणजे झाडाच्या सावलीत बसून त्याला जेवता आलं असतं म्हणून दामू हळूहळू पुढे जाऊ लागला. थोड्याच अंतरावर त्याला एक डेरेदार झाडांचा समूह दिसला आणि त्यांच्या बाजूलाच एक छोटसं तळही होतं. झाडांची थंडगार सावली आणि सोबतच पाण्याचा तळ पाहून दामूने तिथेच बसून जेवणाचा निर्णय घेतला.

                 झाडाखाली बसून दामूने आपली शिदोरी सोडली आणि मनाशीच पुटपुटू लागला, "एकीला खातो , दुसरीला खातो , तिसरीला खातो, चौथीला खातो". दामू मनाशीच असा विचार करत असताना त्या तळ्यातून सात जलपऱ्या  बाहेर आल्या आणि त्या दामूला विनवू लागल्या की, " हे भल्या माणसा आम्ही तुला कुठलाही त्रास दिलेला नाही . त्यामुळे तू कृपा करून आम्हाला खाऊ नकोस. त्याबदल्यात तू मागशील ते आम्ही तुला देऊ". दामू त्यांना साधेपणाने म्हणाला की ,"मी , माझ्या दशम्या खाण्याचा विचार करीत होतो आणि त्या मोजत होतो, पण आता तुम्ही म्हणताय तर मला उत्पन्नाचं काहीतरी साधन द्या, ज्यामुळे माझी बायको आणि माझी मुलं अगदी आनंदात जगू शकतील". दामू च म्हणनं पऱ्यांनी शांतपणे ऐकलं आणि त्याला एक पिशवी दिली आणि सांगितलं की, " दामू ही एक जादूची पिशवी आहे ,तू  ही पिशवी एका पाटावर ठेव, तिथे उदबत्ती लाव आणि हात जोडून मनोमन प्रार्थना कर की , "हे देवी मला दहा सोन्याच्या मोहरा हव्यात आणि डोळे उघडल्यानंतर त्या पिशवीतून तुला दहा सोन्याच्या मोहरा मिळतील".  दामू ती पिशवी बघून खूप खुश झाला आणि परतीच्या वाटेला लागला. परंतु रस्त्यातच सूर्यास्त झाला आणि त्याकाळी रस्त्यावर दिवे नसल्याने त्याने त्याच्या मावशीकडे रात्रभर राहण्याचा निर्णय घेतला.

            दामू ची ही मावशी फार लबाड होती , पण दामूला ती फार प्रेमळ वाटे. मावशीच्या घरी गेल्यावर मावशीने दामू चे स्वागत केले ,गूळ पाणी दिल्यावर, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, दामू म्हणाला,   "मावशी कसं काय सुरु आहे ?" तर उगीच खोटं खोटं दीनवाणे पणे मावशीने सांगितलं "काय सांगू बाबा तुला , माझी  परिस्थिती तर फारच बिकट आहे दोन वेळेला मला खायला सुद्धा मिळत नाही , किती तरी वर्ष झाले मी माझ्या मुलांना नवे कपडेसुद्धा घेतले नाही . ह्या दिवाळीत तर मी साधं फराळाचं सुद्धा बनवलं नाही ,फार कठीण दिवस आहेत माझे ! माझ्या कडे एक रुपया सुद्धा नाही". मावशी चे हे दीनवाणी शब्द ऐकून भोळ्या दामूला लगेच तिची दया आली,  आणि त्याने मावशीला एक पाट आणि उदबत्ती मागितली. लगेच त्या खोली चे दरवाजे बंद करून,  त्याने पूर्व दिशेला तो पाट मांडून त्यावर ती पिशवी ठेवली आणि बाजूला उदबत्ती लावून मनोमन प्रार्थना केली की,  "हे देवी ! मला दहा मोहरा हव्या आहेत" आणि थोड्या वेळाने ,डोळे उघडून खरंच ! त्या पिशवीतून दहा मोहरा दामूने काढून मावशीला दिल्या. लबाड मावशी बंद दाराच्या फटीतून दामू काय - काय करतो हे गुपचूपपणे बघत होती. पिशवीतून दहा मोहरा निघाल्या बरोबर मावशी चे डोळे विस्फारले आणि रात्री दामू झोपल्यावर त्याची पिशवी चोरण्याचा मावशीने निर्णय घेतला.

              दामू ने दिलेल्या पैशातूनच मावशीने रात्री सुग्रास जेवण बनवले .दामू ,मावशीची मुलं आणि मावशी सगळेजण पोटभर जेवले आणि रात्री निवांत झोपले. दिवसभराच्या दगदगीने , दामू ही थकलेला होता आणि थोड्या वेळात तोही गाढ झोपला , बरोबर मध्यरात्री मावशीने दामू ची पिशवी चोरली आणि तशीच दुसरी पिशवी तिने दामूच्या उश्या खाली ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून , चहा- पाणी घेऊन दामू घरी परतला.

                सकाळी सकाळी बाबांना घरी परततांना पाहून मुलांना खूप आनंद झाला. ते विचारत होते, "बाबा खाऊ काय आणला? खेळणी कुठे आहे?", तर दामूच्या बायकोला जरा संशय आला आणि तिच्या डोक्यावर आठ्या पसरल्या. मुलांना बाहेर खेळायला पिटाळून तिने दामूला विचारलं की, "तुम्ही नोकरी शोधायला गेले होतात आणि एका रात्रीतच परत आलात!" तर दामूने घडलेली सगळी हकीकत तिला सांगितली आणि पाट आणायला लावला. पाट पूर्व दिशेला ठेवून पिशवीला उदबत्ती ओवाळून दामूने प्रार्थना केली , "हे देवी मला दहा सोन्याच्या मोहरा दे", आणि थोड्या वेळाने पिशवीत हात घातला परंतु पिशवीतून काहीही निघालं नाही. दामूने असे दोन तीनदा केले परंतु दामू च्या बायकोचा धीर सुटला आणि तिने रागाने बडबड करायला सुरुवात केली की, ,"पिशवीतून काय आपोआप मोहरा निघतात का ?त्या पऱ्यांनी तुम्हाला मूर्ख बनवलं आहे. मी तुम्हाला उद्या परत दशम्या करून देते तुम्ही परत शेजारच्या शहरामध्ये नोकरी शोधायला जा"

             बिचारा दामू परत दुसऱ्या दिवशी शहरात जायला निघाला. मध्यान्न झाली, त्याला भूक लागली म्हणून तो त्याच झाडांच्या खाली आणि त्याच तळ्याजवळ शिदोरी उघडून म्हणायला लागला, "एकीला खातो , दुसरीला खातो, तिसरीला खातो", परत सगळ्या जल पऱ्या वर आल्या आणि त्यांनी विचारलं, "काय झालं दामू? तू आम्हाला परत का त्रास देतोय" तर दामूने घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि म्हटलं की, "तुम्ही दिलेली पिशवी ती काही जादूची वगैरे नव्हती ,त्यातुन एकही सोन्याची मोहर निघाली नाही, त्यामुळे मी आता परत शहरात जातो आहे, नवीन काम शोधायला" त्यावर जल पऱ्यांच्या राणीने दामूला एक ताट दिलं आणि सांगितलं की, " दामू या ताटाला तु उदबत्ती ओवाळून मनातल्या मनात जे जे काही खाण्याचे पदार्थ मागशील, ते ते पदार्थ तुला भरभरून खायला मिळतील". आणि ते ताट दामू च्या हातात देऊन त्या जलपऱ्या अदृश्य झाल्या.

         या वेळीही सूर्यास्त झाला होता आणि दिवसभराच्या चालण्याने दामू ही थकला होता म्हणून,  तो परत मावशीकडे गेला मावशी दारातच बसलेली होती. दुरूनच दामूला येतांना पाहून तिने घराची परत पटापट आवराआवरी केली, आणि जुनीच साडी नेसून खोलीत येऊन बसली. दामू आल्यावर, तिने दामूला गूळ पाणी दिले . इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, दामू म्हणाला "मावशी काय म्हणतेस कशी आहेस?" मावशी म्हणाली , "मागल्यावेळी तू दहा मोहरा दिल्यास फार बरं झालं बाबा! गरिबाला तेवढाच आधार, पण दामू खूप दिवस झाले रे माझ्या मुलांना श्रीखंड पुरी खायची आहे ,आणि मी बासुंदी कित्येक दिवसात खाल्ली नाही , आणि तुला तर माहिती आहे तुझ्या काकांना गुलाबजाम किती आवडतात ते ?" तिला असं वाटलं यावेळीही दामू पिशवीतून आपल्याला दहा सोन्याच्या मोहरा देईल पण झालं उलटच ,दामूने मावशीला खोलीतुन बाहेर जायला सांगितलं आणि एका पाटावर पऱ्यांनी दिलेलं ताट ठेवून त्याने मनोमन प्रार्थना केली की,  "सगळ्यांना पुरतील एवढे गुलाबजाम , बासुंदी आणि श्रीखंड पोळी त्याशिवाय,  वांग्याची भाजी आणि कोशिंबिरी मला तू दे" आणि काय चमत्कार! बघता बघता तिथे ताटं भरून भरून सगळे पक्वान्न आणि अन्नपदार्थ  आले. दामूने मावशीला दरवाजा उघडून आत बोलावले आणि सगळ्यांना पोटभर जेवू घाल असे सांगितले.

        सगळेजण पोटभर जेवले आणि निवांत झोपले दिवसभराच्या दगदगीने दामू ही लवकरच गाढ झोपी गेला, मध्यरात्रीला मावशीने परत दामूच्या डोक्यात खालचे जादूचे ताट काढून घेतले आणि तिच्या घरचे तसेच जुने ताट त्याच्या डोक्याखाली ठेवले.

            दुसऱ्या दिवशी दामू सकाळीच लवकर घरी परत आला. वडिलांना घरी परत आलेले पाहून मुलं फार खुश होती , पण दामूच्या बायकोच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . तिने मुलांना बाहेर पिटाळून दामूला विचारले, " तुम्ही एवढ्या लवकर  परत कसे आले ?" तर दामूने तिला जादूचे ताट दाखवले आणि खोलीचा दरवाजा बंद करून पाटावर ताट ठेवून त्याला प्रार्थना केली पण नेहमीप्रमाणेच ताटातून काहीही बाहेर आले नाही. यावेळी मात्र दामू च्या बायकोचा धीर सुटला आणि तिने दाम वर भरपूर तोंडसुख घेऊन त्याला सांगितले की,  "उद्या तुम्ही सकाळीच ,परत शेजारच्या शहरात काम शोधायला जा आणि यावेळी मी तुम्हाला एकही दशमी बनवून देणार नाही"

         बायकोचा रुद्रावतार बघून , दामू फारच घाबरलेला होता आणि दोन्ही वेळेला तोंडघशी पडला होता .त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मुकाट्याने तो शहराच्या रस्त्याने चालू लागला आणि परत त्याच झाडांच्या सावलीत त्याच तळ्यापाशी गेला आणि  म्हणाला "एकीला खातो ,दुसरीला खातो, तिसरीला खातो".

              सलग तिसऱ्या वेळी दामुला तिथे पाहून जलपऱ्याना ही नवलच वाटले त्यातल्या सगळ्यात मोठ्या जलपरी ने विचारले ,"काय झाले दामू, तू इतका चिडलेला का आहेस?"त्यावर दामूने घडलेली संपूर्ण हकीकत तिला सांगितली .जलपरी ने थोडा विचार केला आणि त्याला विचारलं "दामू तू दोन्ही वेळेला रस्त्यात कुठे थांबला होतास का रे ?" मग दामूने थोडा विचार करून सांगितलं, "हो मी माझ्या मावशीकडे थांबलो होतो आणि पहिल्या वेळी मी पिशवीतून मावशीला दहा मोहरा काढून दिल्या होत्या , तर दुसऱ्या वेळी मावशीला जादूच्या ताटातून पंचपक्वान्नाचे जेवणही करवलं होतं ". जलपरी ने म्हटलं "ती पिशवी आणि ते ताट दाखव बघु" दामूने ते ताट आणि ती पिशवी जलपरी ला दाखवली , त्यावेळी जलपरी ने डोक्याला हात लावला आणि म्हटलं "दामू  तु इतका कसा रे भोळा ?आम्ही दिलेले ताट आणि पिशवी मावशीने स्वतः ठेवून घेतली आहे ,आणि अगदी तसेच ताट आणि पिशवी  तुला  देऊन  तुला मूर्ख बनवलं आहे"

                 मावशीची लबाडी पाहून तर दामूला ही आता राग आला होता ,पण तो काय करू शकत होता? तो म्हणाला "जलपरी ,मी आता काय करू ?" तर जलपरी ने दामूला एक सोटा दिला .(सोटा म्हणजे बेसबॉल खेळण्यातली जी बॅट असते ना !त्यातला थोडा मोठा प्रकार), आणि दामुला सांगितलं की , "तू असाच सरळ मावशीकडे जा ,आणि तिला तुझ्या दोन्ही वस्तू परत माग ,जर मावशीने पिशवी आणि ताट द्यायला नाही म्हटलं , तर तू एकच काम करायचं  हा सोटा हातात धरायचा आणि म्हणायचं, "उठे  रे सोट्या तुझच राज्य"आणि मग बघ  हा सोटा काय करतो ते.

              दामू रागारागाने  मावशी च्या घराकडे निघाला. मावशी दारातच बसलेली होती ,दामूला पाहून परत तिने पूर्वीसारखंच नाटक केलं , पण यावेळी दामू फार चिडलेला होता . त्याने मावशीला सरळ त्याच्या दोन्ही वस्तू परत मागितल्या , पण मावशी मानभावी पणे  म्हणाली ,"दामू नको रे असं करू ,मी काही चोर आहे का ?मी तर तुझी मावशी आहे ना !मी एक गरीब बाई आहे .माझ्याकडे नाहीये तुझ्या वस्तू " .मावशीला दोन-तीन वेळा वस्तू मागूनही ती देत नाही ,असं पाहून दामू चा राग अनावर झाला आणि त्याने सोटा हातात धरून एकच वाक्य म्हटलं, "उठ रे सोट्या तुझाचं राज्य!". आणि सोट्याने मावशीला बदडायला सुरुवात केली, 2-3 रटे खाल्ल्या बरोबरच मावशीने म्हटलं ,"दामू हा तुझा सोटा आवर, मी तुझ्या दोन्ही वस्तू तुला परत करते"

               मावशीकडून जादूची पिशवी आणि जादूचं ताट घेऊन लगोलग दामू घराकडे परतला आणि पहाटे पहाटे घरी पोहोचला. सकाळी सकाळीच नवऱ्याला दारात पाहून परत दामू च्या बायकोचा पारा चढला, परंतु दामूने तिला डोळे मोठे करून म्हटलं "शांत बस" आणि आत मधल्या खोलीचे दार लावून घेतलं, एका पाटावर पिशवीत ठेवून तिथे उदबत्ती लावून त्यांनी विनंती केली की , "हे देवी , मला तू दहा सोन्याच्या मोहरा दे" आणि दुसऱ्या ताटाला उदबत्ती दाखवून मनोमन प्रार्थना केली की , "माझ्या घरी आज माझ्या मुलाबाळांना पंचपक्वान्नाचे भोजन मिळू दे" आणि काय चमत्कार !थोड्याच वेळात पिशवीतून दहा सोन्याच्या मोहरा मिळाल्या आणि पंचपक्वान्न भरलेली ताटं पाटावर दिसू लागली. मग दामूने बायकोला घरात बोलावले आणि पिशवीचा आणि ताटाचा चमत्कार दाखवला .त्यासरशी दामूच्या बायकोच्या आणि त्याच्या मुलांच्याही चेहर्‍यावर आनंदाचं हास्य पसरलं.

          



(छोट्या बाल दोस्तांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा तुमचे अभिप्राय आणि मत नक्की कळवा)


(सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व!)







(मंडळी तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि आपले अभिप्राय व्यक्त करायला विसरू नका)


🎭 Series Post

View all