टीपीकल बाई वाटत असेल ती

Tipical Baai
टिपिकल बाई वाटत असेल ती..

श्रावणी, "कशी आहेस,चल भेटूया आपण.."

तृप्ती, "अग वेळ नाही मला, आपण नंतर बोलुयात का, खूप काम आहेत मला..तू निवांत आहेस पण मला तर बोलण्या इतका ही वेळ नाही.."

दोन वर्षापूर्वी श्रावणी ने फोन केला होता, आणि ती मध्ये मध्ये अशीच मैत्रिणीची आठवण आली की फोन करत..पण तृप्ती कधीच तिला फोन तर करतच नसे ,पण तिच्या आलेल्या फोनला ही शक्यतो टाळत असे....

तृप्तीची आई म्हणाली, "अग घेत जा ग फोन तिचा, नाहीतर निवांत फोन करत जा . "

तृप्ती, "आई रिकामीच असते ती, तिला काय काम आहे.."

दोन वर्षा नंतर..........


तृप्ती खूप वर्षांनी भारतात आली होती आणि सहज फोन चाळत बसलेली असतांना श्रावणीचा फोन नंबर दिसला..

ती हसली... मनात आठवणीने घेर घालायला सुरुवात केली..

आता श्रावणी एक टिपिकल बाई वाटत असेल..

दोघी बालपणीच्या घट्ट मैत्रिणी...वेडी अल्लड..बोलकी..श्रावणी..आली की तृप्ती आणि ती फुगडी खेळायच्या...दम लागला तरी थांबायच्या नाही..हसून हसून सगळ्या वाड्यात गोंधळ घालायच्या....कधी घर घर खेळायच्या तर कधी भावाला भावलीचे लग्न लावायच्या.. छोट्या छोट्या गोष्टींवर ही हसायच्या..दोघी एकमेकींशिवाय रहात नसत..कधी तृप्ती कुठे गावाला गेली की वाड्यात शांतता पसरलेली असायची...

तृप्तीचे आई वडील नौकरी निमित्त ह्या शहरात आले होते..श्रावणीच्या आजोबांच्या जुन्या वाड्यात खोली करून रहात होते.. ते जवळपास ती बारावीपूर्ण करूनच हे शहर सोडून गेले..आणि तेव्हाच तृप्ती आणि श्रावणीची मैत्री तुटली....मैत्री होती पण दोघी वेगळ्या झाल्या..हळूहळू मग संपर्क ही कमी होत गेले..कधी तरी फोन होत असे पण मग तृप्तीचे ध्येय मेडिकल..आणि श्रावणीचे ध्येय..आर्टस्..त्यात लग्नची बोलणी सुरू झाली..आणि एका मोठ्या घराण्यात लग्न ही झाले..मग तर काहीच संपर्क राहिला नाही..

श्रावणीकडे फोन असल्यामुळे ती आपली मैत्रीण म्हणून बोलायची तृप्ती सोबत पण. तृप्ती तिचा फोन आल्यासच बोलायची..तिच्या कडून मैत्री तेव्हाच तुटली जेव्हा तिला तिचे ध्येय महत्वाचे होऊन राहिले.... तिनेच ठरवले जास्त गुंतून रहायचे नाही..

तृप्तीने अजून ही लग्न केले नव्हते..आणि मोठ्या संधीच्या शोधत ती अमेरिकेत रमली ती रमली.. मग कधी तरी मुंबईच्या अत्याने तिच्या नावे केलेल्या घरी येत....आज आली होती पण हे घर विकायला म्हणून आली होती..मग इथला तिचा संपर्क ही कायमचा तुटणार होता..मग पुन्हा इथे येण्याचे असे कारणच उरणार नव्हते... सगळे बंध मागे टाकून जातांना तिला सहज वाटले की एकदा जुन्या मैत्रिणीला भेटून घेऊ..मी ही येणार नाही आणि तिला तर अमेरिकेला यायला झेपणार नाही..

आज का कोण जाणे, श्रावणीचा ध्यास धरला....


ती मनाशी बोलत होती..नेहमीच येते मी भारतात आणि कधीच कोणाला भेटून जात नाही..आपली आपलीच व्यस्त होऊन जाण्याचे नाटक करते..कोणाची ही गरज नाही मला म्हणून कधीच जवळच्या मैत्रीणीला ही आवर्जून फोन ही करणे टाळते... हा स्वार्थ म्हणावा की एकटेपणा माझा...जर हा एकटेपणा असेल तर हा वेळीच आवरता आला पाहिजे..सगळेच सोडून दिले पण अजून ही तिने मला सोडले नाही..ती दरवेळी फोन करत असते...म्हणत असते तू कधी आलीस मुंबईला तर भेटशील ग..खूप दिवस झाले आपण भेटलो नाहीत.. मी सगळी कामे बाजूला ठेवून सुट्टी काढेन..

पण मीच जेव्हा येते तेव्हा तिच्याशी बोलणे टाळलते.. आता तसे ही काय राहिले आहे आमच्यात कॉमन की त्यावर गप्पा होतील..जोक होतील...बोलणे होईल..टाळ्या दिल्या जातील.. मग काय तेच ते औपचारिक बोलणे..काय तू कशी आहेस...तू सध्या काय करतेस..इथेच असतेस का ? घरी कोण कोण असते..मुलं किती आहेत.. नवरा काय करतो...तू नौकरी करतेस का ? आणि तेच प्रश्न ती ही मला विचारणार..मग काही चहा कॉफी, मग फार तर फार जेवण..मग अवघडल्यासारखे एकमेकींना बोलू की नको बोलू..तिला आवडेल का ? मग पुन्हा शांतता...आणि चल निघू आपण..मग तेच औपचारिक बोलणे..तुला भेटून खूप बरे वाटले..भेटत जा अशीच...


झालेल्या भेटीच ओढ ही नसते आणि मग पुन्हा भेटायची इच्छा ही नसते..एकदा जाणून घेतले की कशी आहे श्रावणी..आता कशी दिसते..ती मला ओळखेल का ? ही उत्सुकता फक्त ती भेटेपर्यंत असते..मग सगळे कसे तुटक तुटक वाटू लागते..श्रावणी माझी ती मैत्रीण नाही असे वाटेनासे होते..त्यापेक्षा न भेटलेले बरे..

ती तरी कशी असेल...एक साधारण टिपिकल भारतीय स्त्री..साडी नेसणारी.. तोच तो आंबोडा.. एक पर्स..आणि रिक्षात बसून भेटायला येणारी..आणि डोक्यात सतत मुलांचा, घरचा, आणि सासरच्यांचा विचार करत असणारी....सतत घरातील गोष्टी सांगणारी अशी असेल आज ही..मग वाटते नकोच तिची भेट घ्यायला..

तरीही कोण जाणे श्रावणी कशी आहे हे जाणून घ्यायचे होतेच..

तिने श्रावणीला फोन लावला..

"हॅलो, श्रावणी कापसे आहे का ? "

"हो मीच श्रावणी कापसे, बोला कोण हवंय तुम्हाला.?"

तृप्ती जरा चपापलीच, दोन वर्षावपूर्वी फोन करून आवर्जून घरी ये सांगणारी श्रावणी अशी परक्या सारखे का बोलत आहे..हिच्याकडे माझा फोन नो असून ही हिने मला ओळखले नाही, हे कसे होत आहे..

" अग तू मला ओळखले नाहीस का,मी तृप्ती."

" हो का, बोल ना तृप्ती आज कसा काय फोन केला आहेस.." श्रावणी

"अग तूझ्याकडे नो आहे ना हा माझा, मग तू ओळखले नाहीस का ?" तृप्ती

"नाही मी माझ्या लिस्ट मधून बरेच अनोळखी नो ज्यांना मी कॉल करत होते पण त्यांचे येत नव्हते त्यांचे नो मी delete केले आहेत..फक्त लिस्ट वाढत ठेवण्यात काय अर्थ आहे म्हणून delete केले काही contacts.. तुझा ही झाला असेल..तू तशी ही खूप busy असतेस..मग डिस्टर्ब नको उगाच म्हणून एक शेवटचा कॉल करून..छान बोलून मी नो delete केला.." श्रावणी

"अग पण तुला माझ्यासोबत बोलणे आवडायचे ना, तू अशी कशी करू शकतेस..ते ही माझाशी.. तुझी मैत्रीण ना मी तरी ?" तृप्ती खूप आश्चर्यकारक रित्या बोलत होती..

"अग हो पण तुझी मी मैत्रीण होतेच ना,फरक इतकाच होता मी काही ध्येय वेडी नव्हते तुझ्यासारखी म्हणून तुला कधी एक फोन करावासा नाही वाटला का ? मी वेळ वाया घालवणारी अशी लोकांची माझ्या बाबतीत समजूत झाली होती ,मग ठरवलेच भावनिक न होता आता प्रॅक्टिकल व्हायचे..अगदी तू म्हणतेस तसे.." श्रावणी

"तू वेडी आहेस का, मला जे तेव्हा नाही कळले ,पण तू तरी निदान त्या एकटेपणाचा वाटेवर जाऊ नकोस..तू आमच्या सारख्यांना निदान हवी आहेस , की कोणी तरी आहे ज्याला आपल्यासोबत बोलण्याने आंनद होतो..पण तू ही असे वागणार आहेस म्हंटल्यावर मी एक खरी खुरी मैत्री गमावून बसेल ग.."तृप्ती

"आता मी बदलले आहे..थोडा वेळ लागेल मला ही आधी सारखे वागायला पण बघते जमले तर पुन्हा कॉन्टॅक्ट सेव करेन..जर तिकडून ही साद आली तर.." श्रावणी

श्रावणीने फोन ठेवून दिला..

इकडे तृप्ती तिच्या बदललेल्या वागण्याने हेलावली होती..काय झाले असेल..का ती अशी वागत होती..मी काय चूक केली..असे प्रश्न स्वतःच स्वतःला विचारत होती..

न रहाता तिने परत श्रावणीला फोन केला..

"हॅलो श्रावणी ,तुला वेळ आहे का ? आपण बोलू शकतो का ? "

"हॅलो मॅम, श्रावणी मॅडम महत्वाच्या इंटरनॅशनल मीटिंग मध्ये आहेत, त्या सध्या तुमच्याशी बोलू शकणार नाहीत..बोलायचे असेल काही तर तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घ्या.. " श्रावणीची PA बोलत होती..

"हॅलो, मला काही कळले नाही, कोण तुम्ही.." तृप्ती

" मी श्रावणी मॅडमची P.A आहे "

" मला समजले नाही..श्रावणी मॅडम ची पर्सनल अससिस्टँट... हे काय समजले नाही मला "

"मॅडम ही रुबी फॅशन स्टेटमेंट हा ब्रँड तुम्हाला माहीत असेलच.. हा इंटरनॅशनल ब्रँड आहे..आणि ह्या ब्रँडच्या सर्वेसर्वा श्रावणी मॅडम आहेत..ज्याचे जगभरात आउटलेट ही नुकतेच सुरू झाले आहेत. "

तृप्तीला शॉक बसतो..ज्या श्रावणीला आपण टिपिकल भारतीय स्त्री समजत होतो..तीने जग काबीज केले आहे हे ऐकून धक्का बसला..

श्रावणी इतकी मोठी व्यक्ती आहे हे समजल्यावर ती अशी का वागली ह्याचे कारण कळले होते..आता स्वतःची चूक ही समजली होती..

कशी वाटली कथा सांगा..

श्रावणीने योग्य तेच केले असे वाटते का कळवा..

©®अनुराधा आंधळे पालवे..