तीन कावळे..

मानवी स्वभाव दर्शन देणारी ललित कथा..
*तीन कावळे*
मधुबन नावाचे एक सुंदर जंगल होते. त्या जंगलात तीन कावळे राहत होते.त्यांतील एक कावळा अतिशय मेहनती होता दुसरा कावळा खूपच हुशार होता. तर तिसरा कावळा महाआळशी,भांडखोर आणि कामचुकार होता.आळशी कावळा नेहमीच त्या दोन कावळ्यांशी भांडात असे. पण ते दोन कावळे त्याकडे दुर्लक्ष करत.कारण त्यांना त्याचा भांडखोर स्वभाव माहीत होता. मेहनती व हुशार कावळा मात्र एकमेकांचे चांगले मित्र होते त्यांचा एकमेकांवर विश्वास होता. त्या शांत आणि सुंदर जंगलात त्या भांडखोर आळशी कावळ्याचा त्रास सोडला तर दोघांचेही छान चालले होते.
एक दिवस त्या सुंदर जंगलाला निर्दयी माणसांची नजर लागली. माणसांनी जंगलात येऊन जंगल तोडायला सुरवात केली. जंगल तोडीमुळे इतर प्राण्यांचे हाल पाहुन मेहनती व हुशार कावळ्याला फार दुःख होई. आळशी कावळा मात्र फार आनंदी होता कारण माणसांनी खाऊन टाकलेले मांसाचे आयते तुकडे त्याला खायला मिळत होते. त्याच काम होत होते त्यामुळे त्याला इतर प्राण्यांच्या दुखाशी काही देणंघेणं नव्हते. कारण त्याचा स्वभावच अपना काम बनता। भाड में जाए जनता। अश्या प्रकारचा होता.काही दिवसातच माणसांनी ते जंगल साफ करुन टाकले. व उरलेला जाळ पेटवून दिला. त्यामुळे जंगलातील प्राणी इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. जे अडकले ते बिचारे होरपळून मेले.
जे वाचले होते त्यांतील काहींनी दूरवरच्या दुसऱ्या जंगलात जाण्याचा निर्णय घेतला तर काही मन घट्ट करुन तिथेच राहिले.त्यामध्ये त्या तीन कावळ्यांचा देखिल समावेश होता.
उन्हाळ्याचे शेवटचे दिवस होते. जंगलातील नदी सुकली होती. आसपास पाण्याचा थेंबही शिल्लक नव्हता.पाण्या वाचुन अनेक प्राणी तडफडून मरत होते. जंगलात पाण्याअभावी भयंकर परिस्थीती निर्माण झाली होती. अश्यातच जंगल तोड करणाऱ्या माणसांनी आणलेले एक मटके त्या मेहनती कावळ्याला सापडले. मटके छोटे होते एका मोठ्या दगडावर ते ठेवले होते त्याला तोटी देखिल होती.पण त्यांत पाणी मात्र फार खोलवर गेले होते.
मेहनती कावळ्याला आपल्या पूर्वजांची युक्ती आठवली त्याने खुप मेहनतीने आजूबाजूचे दगड आणुन त्यांत टाकले. त्यामुळे पाणी वर आले. वर आलेले पाणी मेहनती कावळा पिऊ लागला.हे सर्व तो आळशी कावळा लांबून लपून पाहत होता. पाणी पिऊन मेहनती कावळा गेल्यानंतर तो लगेचच तेथे गेला. व त्याने आपल्या स्वभावा प्रमाणे आयत्यावर कोयता मारून पाणी पिले. मेहनती कावळ्याने मटक्याची ही बातमी आपला मित्र हुशार कावळ्याला सांगीतली तसा हुशार कावळा त्या मटक्या जवळ गेला. त्याने मटक्यात चोच बुडवून पाहिली मात्र त्याच्या चोचीत पाणी आले नाही. कारण आळशी कावळ्याने आधीच पाणी पिऊन ते पुन्हा खाली घालवले होते. हुशार कावळा विचार करू लागला काय करावे बरं? इतक्यात त्याला आठवले की माणस तोटी फिरवून पाणी पितात. त्यानेही आपल्या चोचीने तोटी फिरवली व पाणी पिले. भविष्याची सोय म्हणून त्याने तोटी पुन्हा बंद केली व उडून गेला. बरेचसे दिवस तिघांचाही हाच दिनक्रम चालु होता. आळशी कावळा रोज मेहनती कावळ्याच्या जीवावर फुकटचे पाणी प्यायचा. काही दिवसांनी मटक्यातील पाणी संपत आले.
एक दिवस मेहनती कावळ्याने दगड टाकून जेमतेम स्वतः पुरती पाणी मिळवले. त्या दिवशी आळशी कावळ्याला पाणीच मिळाले नाही. हुशार कावळ्याला देखील तोटीतुन चारपाच थेंब मिळाले कारण पाणी एकदम तळाशी गेले होते.
दुसऱ्या दिवशी तहानलेला आळशी कावळा सकाळीच मटक्या जवळ गेला आणि त्याने जोर लाऊन दगडावरून मटके खाली पाडले त्यामुळे मटके फुटले. त्यां मटक्याच्या तुकड्यात काही थेंब शिल्लक होते त्यांवर त्याने आपली तहान भागवली. दुपार होऊ लागली कडक उन्हामुळे ते सगळं पाणी सुकून गेले. मेहनती कावळा येऊन पाहतो तर काय? मटके फुटलेले. ते फुटलेले मटके पाहत तो तेथेच रडत बसला. काही वेळाने हुशार कावळा तेथे आला. फुटलेले मटक पाहुन त्यालाही वाईट वाटले.हे काम नक्कीच त्या आळशी कावळ्याचे असले पाहिजे.त्याने मेहनती कावळ्याला धीर दिला मित्रा रडू नकोस आपण यातुन काहीतरी मार्ग काढू. पाऊस पाडायला आता काही दिवसच बाकी आहेत तोपर्यंत आपण पाण्याचा काहीतरी बंदोबस्त करू. विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. तो मेहनती कावळ्याला म्हणाला मित्रा काळजी करू नकोस तुझी मेहनत आणि माझ्या हुशारीने आपण पाऊस येईपर्यंत पाणी मिळवू तु चल माझ्या सोबत मेहनती कावळ्याला हुशार कावळ्यावर विश्वास होता.तो त्याच्या सोबत निघाला. हुशार कावळ्याने मेहनती कावळ्याला जंगलाबाहेर असणाऱ्या एका उंबराच्या झाडाजवळ नेले व त्याने उंबराच्या मुळावर चोच मारायला सांगीतले.मेहनती कावळ्याने चोच मारायला सुरवात केली. बऱ्याच मेहनती नंतर त्या मुळातून पाणी निघाले.. दोघांनीही पाणी पिऊन आपली तहान भागवली.. मटक फुटल्याने दुसऱ्या दिवशीआळशी कावळ्याला पाणी मिळाले नाही.त्याच्या आळसामुळे त्यालाआयत्याची सवय झाली होती. मेहनती आणि हुशार कावळा मात्र आपल्या मेहनत आणि हुशारीने उंबराच्या मुळाच्या पाण्यावर आपली तहान भागवत राहिले.म्हणून पाऊस येईपर्यंत ते जिवंत राहीले.आळशी कावळा मात्र त्याच्या आळस आणि आयतेपणाच्या वृत्तीमुळे पाण्याअभावी तडफडून तडफडून मेला....
लेखन :चंद्रकांत घाटाळ
संपर्क: ७३५०१३१४८०