वेळ...अमूल्य संपत्ती

Time Is Wealth
"ईश्वर एक बार में एक ही क्षण देता है

और दुसरा क्षण देने सें पहले,

पहले वाले क्षण को ले लेता है।"

काळ,क्षण,टाइम,समय,

वेळ.....कुठलही नाव घ्या.एकदा जर वेळ निघून  गेली तर पुन्हा परत येत नाही.वेळ ही जीवनातील सर्वांत महत्त्वाची व गरजेची गोष्ट आहे. जी कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही किंवा पैशाने विकत घेता येत नाही. वेळेमुळे अनेक गोष्टी घडतात तर अनेक गोष्टी बिघडतात.माणसाजवळ असलेली सर्वांत मौल्यवान वस्तू म्हणजे त्याच्या जवळ असलेली वेळ.या जगात जमीन, पाणी,सूर्यप्रकाश, हवा ह्या गोष्टी मानवाला निसर्गाकडून मिळाल्या आहेत आणि त्या आपल्याला निर्माण करता येत नाही म्हणून आपण त्याचा वापर योग्य  प्रकारे करतो.तसेच वेळ ही आपल्याला  जन्मतः निसर्गाने दिलेली देणगी आहे .या देणगीचा कोण कसा वापर करतो त्यानुसार त्याचे भविष्य घडत असते.

One who takes time seriously

Time takes them seriously


आयुष्यात कोणी पैसा,यश,आत्मसन्मान, नाती यांना मौल्यवान समजत असतील पण जगात  खुप कमी लोक आहेत जे वेळेचे महत्त्व जाणतात आणि त्याचा सदुपयोग करतात.

वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेचं आहे.

वेळ ही पैशापेक्षा अधिक मूल्य आहे.आपण अधिक पैसे मिळवू शकतो परंतु आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही.

वेळ फुकटात मिळते मात्र ती अमूल्य आहे.आपण वेळेला आपलं म्हणू शकत नाही मात्र तिचा उपयोग स्वतः साठी करु शकतो आपण वेळेला साठवून ठेऊ शकत नाही मात्र योग्य प्रकारे खर्च करु शकतो.

आतापर्यंत पृथ्वीवर एवढे महान व्यक्ती होऊन गेले .राजे,महाराजे,

शास्त्रज्ञ, महान संत ,तत्वज्ञानी ज्यांनी अनेक गोष्टींवर विजय मिळवला परंतु कोणीचं वेळेवर विजय मिळवू शकले नाही. किती महान सत्ता आल्या आणि गेल्या पण काळाची सत्ता कोणीही जिंकू शकले नाही .अनंत काळापासून वेळ आपल्या मर्जीने चालत आहे.वेळ सर्वांशीच निःपक्षपातीपणे वागत असते.कधीही ,कोणताही भेदभाव करत नाही, सर्वांना समान संधी देत असते .ज्या व्यक्ती हुशारीने आणि शिताफीने संधीचा फायदा घेतात त्या व्यक्ती यशाचे शिखर गाठतात.

वेळ आपल्याकडे असलेली सर्वांत महत्त्वाची संपत्ती आहे,तिला योग्य ठिकाणी गुंतवली की तिची आपल्याला सर्वांत जास्त आणि चांगली परतफेड मिळते.

\"Time is money\"

 जीवनाचे सार्थक करावयाचे असेल,जीवनाला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, तर वेळेचे नियोजन करणे,वेळेचे महत्त्व जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

वेळ कोणासाठी थांबत नाही .वेळ ही सतत पुढे जातचं असते ,जसा एकदा धनुष्यातून सुटलेला बाण मागे घेता येत नाही त्याप्रमाणे चं एकदा सरकलेले मिनिट पुन्हा हाती लागत नाही आणि हे मिनिट तुमचं,माझं,आपलं सर्वांचं सारखचं असतं तरीही आपण असे वागत असतो की जणू काही आपण वेळेवर नियंत्रण करीत आहोत.

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला ,आपण पुन्हा स्पर्श करु शकत नाही,कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी ,कधीही परत येत नाही ,असेच वेळेचेही आहे, एकदा गेलेली वेळ परत येत नाही.

वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी 5 रूपयाला असतो,तोचं  काही तासातचं रद्दी होतो .म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या.


प्रत्येक गोष्टीची वेळ असते

तेव्हाच ती घडायला हवी

वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी ...


परिक्षेत पेपर लिहीत असलेले विद्यार्थी, त्यांच्या साठी वेळ किती महत्त्वाची असते ? दिलेल्या वेळेत पेपर लिहायचा असतो .एकदाची वेळ संपली तर पुन्हा पेपर नाही लिहु शकत .स्टेशनवर वेळेत पोहोचलो तर गाडी सापडते ,थोडाही उशीर झाला तर पुढच्या गाडीपर्यंत प्रतीक्षा करावी लागते .आजारी व्यक्तीला वेळेत डॉक्टरांकडे नेले तर त्याचे प्राण वाचू शकतात नाही तर डॉक्टर ही काही करु शकत नाही.


"कर्तव्या जे तत्पर नर

दृढ नियमित व्हावयास मन

घड्याळ बोले,आपुल्या वाचे

आला क्षण ,गेला क्षण।"


जगात सगळ्यात नाशवंत पण अत्यंत मौल्यवान आणि तरीही मोफत असे काय आहे? तर ती आहे वेळ !

काळाची गती ज्यांनी ओळखली त्यांनीच आयुष्यात प्रगती केली .

एखादी वास्तू साकारण्यासाठी जसे दगड,विटा,वाळू ,माती यांना एकसंघ करण्याच काम सिमेंट करते ,तसे आपल्यातील अनेक गुणगोष्टींना एकत्र बांधून ठेवून जीवन सफल बनविण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन  हे सिमेंट प्रमाणेचं कार्य करीत असते.

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

भूतकाळातील चुकांवर पस्तावण्याऐवजी त्यापासून शिकले पाहिजे आणि त्या चुका पुन्हा करू नये.वर्तमानातील प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे.भविष्यात हव्या असलेल्या भौतिक सुखाच्या मागे धावण्याऐवजी आज आपल्याकडे जे आहे त्याचा उपयोग घेता आला पाहिजे .वेळ ही फक्त काम करण्यासाठीचं असते असे नाही तर प्रत्येक क्षण आनंदाने असा जगायला हवा की आपल्याला गेलेल्या वेळेचा कधीही पश्चाताप होणार नाही !