तिळगुळाचे प्रकार

तिळगुळाचे प्रकार

हिवाळ्यात तिळाचा वापर फायदेशीर समजला जातो. त्यामध्ये अनेक पोषक द्रव्य असतात. तिळामुळे शरीराला विटामिन बी मिळतं. ज्यामुळे भूक वाढते व अन्नपचन व्हायला मदत होते.

तिळगुळाचे पौष्टिक सँडविच

साहित्य

ताजी ब्रेड, तीळ, गुळ, बदाम, काजू, वेलची पूड, खोबरे किसून बारीक केलेले, बटर, तूप.

कृती

प्रथम तीळ भाजून घ्या व गूळ घालून मिक्सर मधून बारीक करून गोळा करून  घ्या. बदाम, काजू जाडसर वाटून घ्या. तिळगुळात बदाम, काजू, खोबऱ्याचा कीस, वेलची पूड मिसळून घ्या. ब्रेडच्या स्लाईसच्या कडा च्या  कापून घ्या. तिळगुळाची स्लाईस ब्रेडच्या स्लाईस मध्ये मावेल इतकी लहान करा. ब्रेड स्लाईसला सर्व बाजूने बटर लावा व तीळ गुळाची स्लाईस बाहेर येऊ न देता ब्रेडच्या स्लाईस वर अलगद ठेवून दाबा. ब्रेड स्लाईसला पाण्याचे बोट कडेला फिरवून घ्या. नंतर दुसरी बटर लावलेली स्लाईस त्यावर ठेवा व कडा नीट दाबून घ्या. व सँडविच मेकर मध्ये किंवा तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने बदामी रंगावर फ्राय करून घ्या. लहान मुले हा प्रकार खूप आवडीने खातात.


तिळगुळाच्या करंज्या

साहित्य

एक वाटी मैदा, एक वाटी तीळ, अर्धी वाटी गूळ, मोहनासाठी तेल किंवा तूप, वेलची पावडर. तळण्यासाठी तेल किंवा तूप.

कृती

प्रथम तीळ भाजून, गूळ घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात थोडी वेलची पूड घाला. मैद्यात थोडे मोहन व चिमूटभर मीठ घालून भिजवून एक तास मुरू द्या. नंतर मैद्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून तुम्हाला पाहिजे त्या आकारात लाटून त्यात तीळ गुळाचे सारण भरा. सर्व बाजूने व्यवस्थित बंद करून तेलात किंवा तुपात करंज्या तळून घ्या.


तिळाच्या कुटाच्या झटपट वड्या

साहित्य

तीळ व गूळ

कृती

प्रथम तीळ भाजून मिक्सर मधून थोडे जाडसर फिरवून घ्या. नंतर कढईत गुळाचा पक्का पाक करून त्यात तिळाचा कुट  थोडे तूप टाकून चांगले मिसळून घ्या व तूप लावलेल्या ताटात लगेच काढून एकसारखे थापून घ्या. गरम असतानाच चाकूने किंवा सराट्याने रेषा आखून वड्या पाडून घ्या.

चला तर मग वाट कसली बघतायं.

करा की रेसिपी ला सुरुवात.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

सौ. रेखा देशमुख