तिळगुळ घ्या आणि गोड बोला ... digitally(?)!

तिळगुळ घ्या आणि गोड बोला!

आता सण साजरे करणं जरा सोपं झालंय का? असेल तर सोशल मिडिया च्या कृपेनेच!

आता संक्रांतीचचं बघा ना!

मला आठवतंय लहानपणी आई मोठ्ठी बरणी भरून तिळगुळ करायची. काही तास तरी तो प्रोग्राम चालायचा. तीळ, खोबरं, दाणे भाजल्याचा खमंग वास, आणि ते त्या गरम चिक्कीच्या गुळात टाकल्यावर मग तर त्या खमंग वासात वेलाचीचा सुगंध, गुळाचा गोडसर वास मिक्स होऊन त्याच जे काय बने ते आम्हाला नकळत स्वयंपाक घरात खेचून नेई.

थोडं मोठं झाल्यावर आम्हाला पण ती लाडू वळायला बसवायची कारण ते गरम असताना पटापट वळायला लागतात. हाताला तूप फासून हळूचकन वरच्या वर थोडंसं ते mixture उचलायच, पटापट गोल गोल वळायचं. तूप वगैरे लावून सुद्धा हात लाले लाल होत.

मग लगेच देवाला नैवेद्य दाखवून पहिला तिळगुळ तोंडात टाकायचा.

तो टणक लाडू काटकन दाढांखाली मोडायचा. खोबरं, दाणे, तीळ ह्यांचा खमंगपणा, चिक्कीच्या गुळाचा गोड चिकटपणा आणि तो कुरकुरीत लाडू.. heavenly!!

तर तीन चार तास खपून (आईने) लाडू केले की त्यांच्या पुड्या करायच्या, शाळेतल्या बाईंसाठी.

उरलेले लाडू बरणीत जायचे.

संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी, शेजारी पाजारी सगळ्यांकडे जाऊन हातावर तीळगुळ ठेवून, मोठ्यांना नमस्कार करायचा. त्यांनी दिलेल्या तिळगुळाचे, हलव्याचे बकाणे भरायचे हाच कार्यक्रम!

जास्तकरून चौथी पर्यंत, दुसऱ्या दिवशी शाळेत बाईना तिळगूळ द्यायचा. सगळीच मुलं तिळगुळ आणायची. बाईंकडे एक मोठी पिशविभरून तिळगुळ व्हायचा. मग बई तोच तिळगुळ परत सगळ्या मुलांना वाटून टाकायच्या.

आमच्याकडे दोन दिवसात ती भरलेली बरणी रसातळाला जायची. मग आईची ओरडा आरडी " अरे किती तिळगुळ खाता, पोटात दुखेल. रथसप्तमी पर्यंत घरी कोणी आल तर हातावर ठेवायला पण तुम्ही तिळगुळ शिल्लक ठेवत नाही वगैरे वगैरे.."

पण आम्हाला माहीत असायचं तिने नक्की कुठेतरी अजून एक बरणी दडवून ठेवलीय. आम्ही तर बहिर्जिंचे वंशज असल्यासारखे ती बरणी शोधून काढायचो आणि गुपचूप हळू हळू तो तिळगुळ पण फस्त करायचो.

मग एखाद दोन दिवसातच परत एक आरडा ओरडी " अरे काल ती मामी आली, तिळगुळ द्यायला म्हणून आतली बरणी काढलीं तर तुम्ही ती ही संपवलेली. .."

हा सगळा त्रागा बहुदा वरवरचा असावा कारण तिने अजून एकदा होतील अशी तिळगुळाची सगळी तयारी ठेवलेली असायची आणि मग परत एकदा ते तिळगुळ बनायचे. असं करत कसे बसे ते रथसप्तमी पर्यंत ते पुरायचे.

पण आता कस what's app आणि FB ने तिळगुळाची कशी छान सोय करून ठेवली आहे. बसल्या बसल्या शेजारी पाजारीच नाही जगभरात असलेल्या आपल्या आप्तेष्टांना पटकन तिळगुळ पाठवता येतात.. तेही हवे तितके. रथसप्तमी पर्यंत पुरवायची चिंता तर नकोच नको.

तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हा डिजिटल तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि सोशल मीडियावर (आणि सोशल मिडियामूळे ) का असेना, गोड बोला!

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा!