Jan 19, 2022
नारीवादी

तिला तिची साथ

Read Later
तिला तिची साथ

#तिला तिची साथ

सान्वी: अहो ऐकलं का . फारच गरम होतय मला. जरा पोळ्या शेकून काढा. मी तोवर धुणं धुते.

शंतनू: मी नाही.

सान्वी: का ओ. जरापण मदत करत नाही. मीच का किचनमधे राबू? शेका ना पोळ्या.

शंतनु: मग तू कशाला आहेस?

सान्वी व अनयचं लग्न होऊन वीसेक वर्ष झाली. प्रत्येक वेळी सान्वी अनयला जरा घरकामात मदत करा म्हणून सांगे तेंव्हा अनयचा ठरलेला प्रश्न असायचा..'मग तू कशाला आहेस?'

सान्वी पदवीधर होती. लग्न झालं तेंव्हा तीने प्रयत्न केला असता तर तिला कुठेही जॉब मिळाला असता  पण बाळंतपण झालं नंतर बाळाकडे लक्ष द्यायला घरी कोणी नव्हतं. सासूसासरे गावी. तिथे शेतीवाडी होती. ती सोडून बाळाला सांभाळायला येणं त्यांना शक्य नव्हतं व पाळणाघरात बाळाला ठेवून कामाला जाण्याची मनाची तयारी सान्वीची नव्हती. 

सान्वीने तिचे पंख छाटून टाकले व सगळं लक्ष घरावर केंद्रीत केलं. नाही म्हणायला ट्युशन घ्यायचा प्रयत्न केला पण आजुबाजूच्या बायका फुकट शिकवत असेल तरच पाठवायच्या. फी वगैरे द्यायची असेल तर मोठ्या क्लासेसना पाठवायच्या. बाजारहाट,घरकाम,मुलाचा अभ्यास घेणं यात सान्वीचा वेळ कधी जायचा,तीचं तिलाच कळत नव्हतं. पण मुलगा मोठा झाला नी तिच्या आयुष्यात हार्मोनल इंबेलन्समुळे का असेना पण एक पोकळी निर्माण होऊ लागली. 

त्यात अनय बऱ्याचदा कामावरुन आला की तिला खिजवायचा,"तुझं बरंय. घरातच बसून रहायचं नुसतं. असतं काय काम तुला! बाहेर बघ ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा नसते. चेंगरुन जायला होतं. श्वास घ्यायला वेळ मिळत नाही ऑफिसमधे. तो बॉस नुसता मलाच कामं सांगतो..बाहेर काम करायची वेळ आली असती तुझ्यावर तर तुला माझे कष्ट कळले असते." कधीकधी सान्वीही प्रत्युत्तर करायची. मग वाद व्हायचे. 

आताशा तिला प्रत्युत्तर करणंही आवडेनासं झालं होतं. एकदा तिला ताप आला होता. मोजून पाहिलं तर शंभर होता. तशातच उठून तिने पोळीभाजीचे डबे केले. घरातली कामं आवरली. परत ताप मोजून पाहिला तर एकशे दोन होता. क्रोसिन घेऊन गप्प झोपून राहिली तरी डोळ्यातून गरम आसवं गळत होती. कशीतरी दुपारी पेज करुन खाल्ली तिने. ताप उतरला तसं संध्याकाळचा स्वैंपाक केला. अनय आला तसं तिने त्याला तब्येतीविषयी सांगितलं. त्यावर तो उत्तरला,"डॉक्टरकडे जा." बास. दुसऱ्या दिवशी परत ताप भरला तशी सान्वी डॉक्टरकडे गेली व औषधगोळ्या घेऊन आली. डॉक्टरांना तीने सांगितलंही,"डॉक्टर, मला लवकर बरं व्हायचय. मला झोपून राह्यला आवडत नाही. मी झोपून राहिले की घरातल्यांचे हाल होतात. ते मला आवडत नाही." थोड्या दिवसांत सान्वी बरी झाली. नेहमीसारखी बाजारहाट,घरकाम करु लागली.

एकदा अनयला सर्दीताप आला. तो तापाने अगदी लाल झाला. एकशे दोन ताप होता. सान्वीने त्याचं पुरं अंग साध्या पाण्याने पुसून काढलं. त्याच्या कपाळावर मीठाच्या पाण्याची घडी ठेवून ती बदलीत राहिली. त्याला पेरेसिटॉमॉल दिली. तो उठला तसा त्याला पेजभात दिला. दोन दिवस त्याची खूप काळजी घेतली.

हल्ली मेनोपॉजमुळे सान्वीची चिडचिड होत होती. पहिल्यासारखी कामं झेपेनात. किंबहुना तीच तीच काम करायचा वीट आलेला तिला. ती मग चिडून काहीबाही बोलू लागली की मी एकटीनेच कामं करायची का घरात किंवा मी उचलल्याशिवाय इथली काडी तिथे होत नाही वगैरे तर अनयने त्यावर वेगळंच शस्त्र काढलं. मोठ्याने ओरडू नकोस म्हणू लागला. आता बायकांच्या आवाजाचा पीच हा तुलनात्मकदृष्ट्या थोडा जास्त असतो त्याला सान्वी तरी बिचारी काय करणार. 

दुसरं अस्त्र म्हणजे तुला मी घरात नको आहे,मी घरात असलेलं तुला बघवत नाही याहीवर जाऊन तू माझ्या मरणाची वाट बघतेस ..सान्वीला फार वाईट वाटायचं. कोणती बायको आपल्या पतीच्या मरणाची इच्छा धरेल? पण अनयच्या तोंडाला लागणार कोण? बरं घरातली भांडणं ही चार भिंतीतच ठेवावी या मताची ती होती. कधीतरी चांगले दिवस येतील या आशेवर बिचारी जगत होती.

सान्वीला बरेचदा वाटे की आपण या घरात कायमस्वरुपी मोलकरीण आहोत. आपल्या लेकीबाबत मात्र अनय पझेसिव्ह होता. तिचे शक्य ते लाड पुरवायचा. उद्या रेशमही परक्याच्या घरी जाणा. उद्या तिच्या नवऱ्यानेही तिला अशीच वागणूक दिली तर याची पुसटशी जाणीवही त्याला होत नव्हती.
-------------------------------
असंच मधे अनयच्या धाकट्या भावाचा फोन आला. त्याचं व त्याच्या बायकोचं भांडण झालेलं व तिला तापही येत होता. अनयने भावाला सांगितले ," तिला आधी डॉक्टरकडे घेऊन जा. थर्मामीटर नसलं तर घेऊन ये. तिला गोळ्या वेळेवर दे. ताप जास्त असेल तर तीचं अंग साध्या पाण्याने पुसून काढ. तिच्याशी अजिबात भांडू नको. तुम्ही भांडलात तर त्याचा तुमच्या छोटीवर वाईट परिणाम होईल. ती बिचारी घाबरेल." सान्वी तांंदूळ निवडताना हे सारं ऐकत होती. तिला..तिला जेेव्हा ताप आलेला तेंव्हा तिच्याकडे ढुंकूनही न पहाणारा,तिला फक्त डॉक्टरकडे जा म्हणून सांगणारा अनय आठवला. तिच्या मनात आले," यातला कोणता अनय खरा की फक्त रक्ताच्या नात्यापुरतं याचं प्रेम सिमित आहे? बायकोचं रक्त वेगळं त्यामुळे तर हा असा दुजाभाव करत नसेल? आयुष्याची इतकी वर्ष याच्यासोबत घालवली. ओंजळभर प्रेम नको पण थोडीतरी दया हवी की नको बायकोबद्दल?"

अनयच्या बहिणीचा फोन आलाकी अनय तिच्याशी अगदी म्रुदुतेने बोले. तिला तिच्या संसारात कोणाचा त्रास तर नाही ना हे आस्थेने विचारे. अनयच्या बहिणीशी सान्वीचंही छान जमे. दोघी फोनवर गप्पा मारीत. अनयच्या बहिणीला काय अडलं तर सान्वी तिला योग्य ते मार्गदर्शन करे. 

अनयच्या आईला बरं नसलं की अनय हवालदिल व्हायचा. त्याने बऱ्याचदा त्यांना इकडे शहरात रहायला यायला सांगितलं होतं पण गावचा प्रपंच,शेतीवाडी सोडून असं शहरात निघून येणं त्यांना शक्य नव्हतं व गावातच त्यांच मन रमे. तिथे त्यांची जीवाभावाची माणसं होती, जोडीला. सान्वीही सासूसासऱ्यांची ख्यालीखुशाली घ्यायची. वेळेवर त्यांना मनीऑर्डर करी. सणासुदीला कपडे पाठवी. पण सान्वीच्या माहेरी काही द्यायचं झालं की अनयच्या कपाळाला आठ्या पडत. पैसे काय झाडाला लागतात का असं तो सान्वीला विचारी.  लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सान्वी अनयच्या आईला आई म्हणून साद घालू लागली पण अनय कधीही तिच्या आईला आई म्हणाला नाही तसंच त्याने कधीही फोन करुन त्यांची,त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली नाही. अनयच्या कर्तव्याच्या यादीत सासूसासऱ्यांप्रतीचं त्याचं कर्तव्य बसत नव्हतं.

अनयच्या वडिलांनीच जणू त्याच्या कपाळावर हात ठेवला होता. बायको म्हणजे पायपुसणे. बायकांचे जास्त लाड केले की त्या डोक्यावर बसतात या खुळचट समजुतींचा पगडा त्याच्या डोक्यात घट्ट बसला होता. अनयची स्वतःची आई, बहीण व लेक सोडून बाकीच्या सगळ्या महिला या घराघरांत निव्वळ भांडणं लावतात,जगात जेवढी भांडणं होतात ती बायकांमुळे होतात अशी त्याची ठाम समजूत होती. त्यालाही मुलगा हवा होता पण रेशमनंतर प्रयत्न करुनही त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. 

सान्वीची लेक रेशमही बाबाचा कित्ता गिरवत होती. सान्वीला ग्रुहित धरू लागली. आपल्या आईला काही कळत नाही अशी तिची धारणा झाली. सान्वी तिला अभ्यासाबाबत काही विचारु लागल्यास रेशम म्हणे,"अगं आई तुला नाही कळणार माझ्या अभ्यासातलं. मी बघेन माझं माझं नाहीतर बाबांना विचारेन."

सान्वीला कळत होतं की लेक तिच्या हातून निसटत चाललेय.  वास्तविक सान्वीने तिला विरोध केला पाहिजे होता पण अनयने तिची वाचा,तिचा आत्मविश्वास हिरावून  घेतला होता. सहावारी पातळातल्या आईपेक्षा रेशमला तिच्या मैत्रिणींच्या पंजाबी ड्रेस,जीन्स घालणाऱ्या,वेणीऐवजी छान हेअरकट असणाऱ्या मम्मी जास्त आवडायच्या. 

सान्वी आठवीत गेल्यावर  बाईंनी जाई गोखलेला तिच्या शेजारी  बसवलं. जाई अगदी निरागस,मोकळ्या स्वभावाची होती. साऱ्यांशी मिळूनमिसळून वागायची. थोड्याच दिवसांत रेशमची जाईशी मैत्री जुळली. जाईचे तिच्या मम्मीशिवाय पान हलत नव्हते. जाई चौथीत असताना तिच्या मम्मीला स्तनाचा कर्करोग झाला होता. किमोच्यावेळी मम्मीला होणाऱ्या वेदना,मम्मीची त्याकाळात झालेली जर्जरावस्था, तिच्या केसांच गळणं सारं जाईने पाहिलं होतं. फार लहान वयात जाईला आईची किंमत कळली होती. बाप्पाकडे ती एकचं मागणं करायची."बाप्पा,माझ्या मम्मीला लवकर बरं कर." आणि बाप्पाने छोट्याशा जाईची प्रार्थना ऐकली. जाईची मम्मी तिच्यावरील उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागली. थोड्याच दिवसांत तिची मम्मी घरी आली.
-----------------------

 हळूहळू जाईच्या मम्मीची तब्येत सुधारत होती पण तिला डिप्रेशनने ग्रासले. मी देवाघरी गेले असते तर माझ्या कुटुंबाच काय झालं असतं या चिंतेने तिच्या मनात नकारात्मक विचारांच जाळं विणायला सुरुवात केली. त्याचदरम्यान त्यांच्या कामवाली ताई शकू हिने जाईच्या मम्मीला तिच्या सहावीत असणाऱ्या मुलाची सदूची शिकवणी घेण्याची विनंती केली. सदू जाम करामती होता. झाडावर चढून आंबे काढणे,कुठे डोंगरावर फिरायला जाणे असं काहीतरी त्याचं चालू असायचं. सदूच्या साठ्याला त्याच्या भटकंतीच्या गंमतीजमती असायच्या. त्या तो जाईच्या मम्मीला म्हणजे त्याच्या ट्युशन टिचरला सांगायचा. त्यामुळे जाईच्या मम्मीच्या डोक्यावरील नकारात्मक विचारांचा पगडा हळूहळू विरु लागला.

 सदूला चांगले गुण मिळालेले पाहून सदूच्या चाळीतल्या कमिटीच्या अध्यक्षांनी जाईच्या मम्मीला चाळीतील इतर मुलांचीही शिकवणी घेण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांना शाखेचा हॉल देण्यात आला. जाईच्या मम्मीने मग तिथल्या बायकांसाठीही काहीतरी करायचं ठरवलं. सगळ्या महिलांचा विचार घेऊन गोधडी प्रशिक्षण शिबीर घेतलं गेलं. तिथे योग्य ते मार्गदर्शन स्त्रियांना मिळालं. त्यासाठी लागणारं सुती कापड,दोरा आणण्यात आलं. प्याचवर्कच्या छान छान गोधड्या तयार होऊ लागल्या. प्रदर्शनांत या गोधड्यांची विक्री होऊ लागली. त्यातून महिलांना पुरेसे अर्थार्जन होऊ लागले. 

जाई तिच्या मम्मीने घेतलेली फिनिक्स पक्षासारखी झेप पाहत होती. तिची मम्मी केवळ स्वतःचीच प्रगती करत नव्हती तर समाजाचं हित साधत होती. याचा जाईला सार्थ अभिमान होता.

जाई या साऱ्या गोष्टी रेशमला गप्पांच्या ओघात सांगायची. तसंच ती तिच्या मम्मीला घरकामात कशी मदत करते,कोणकोणते नवीन पदार्थ करायला शिकली हेही आवर्जुन सांगायची. जाईच्या गप्पा ऐकून रेशमचं मनपरिवर्तन होऊ लागलं. ती तिच्या आईची करत असलेली हेटाळणी तिला बोचू लागली व तीही तिच्या आईला जमेल तशी मदत करु लागली. तिच्याशी गप्पा मारु लागली. तिला जाईविषयी,तिच्या मम्मीविषयी सांगू लागली. 

रेशमला पाळी आली तेंव्हापासून तर ती आईच्या अधिक जवळ गेली. सान्वीने तिला सांगितल की पाळी येणं ही मात्रुत्वाची पहिली पायरी आहे. तू आई होण्यासाठी लागणारी आवश्यक ती तयारी तुझ्या शरीरात होतेय.  फक्त नऊ महिने पोटात गर्भ वाढला की मुल जन्माला येतं असं नाही तर त्याची तयारी मुलीच्या गर्भाशयात बारा तेराव्या वर्षापासून सुरु असते. पाळीच्या वेळी रेशमच्या ओटीपोटात वेदना होऊ लागल्या तेंव्हा रेशमला तिच्या आईने तिला जन्माला घालण्यासाठी किती लहान वयापासून अशा वेदना सहन केल्या आहेत याची जाणीव झाली.

आताशा तिला तिच्या बाबांच, अनयचं सान्वीवर डाफरणं आवडेनासं झालं. ती विरोध करु लागली पण काही वाक्यं अनयच्या तोंडात बसली होती. 'मी कमवून आणतोय म्हणून तू घरी बसून खातेस. तुला फुकटचं आयतं गिळायला मिळतंय..'असं टोचून बोलायचा. रेशमला तिच्या आईची कणव वाटू लागली. याबाबत ती जाईशी बोललीही. जाईने हा विषय तिच्या मम्मीच्या जान्हवीताईंच्या कानावर घातला.

-------------------

जान्हवीताई जाईला घेऊन एकदा रेशमच्या घरी गेल्या व त्यांनी सान्वीला त्या करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व यात सान्वीने त्यांना हातभार लावावा अशी विनंती केली. सान्वीलाही जान्हवीताईंच सामाजिक कार्य आवडलं तरी तिने घरी विचारुन सांगते असं त्यांना सांगितल. जान्हवीताईने मी तुमच्या होकाराची वाट बघतेय असं म्हणत तिच्या हातावर आपला हात दाबला.

सान्वीने अनय घरी आल्यावर त्यांना जान्हवीताईंबद्दल व त्यांनी तिला केलेल्या विनंतीबद्दल सांगितलं. अनयने तिला विरोध करताच रेशमने खिंड लढवली.  तिने अनयला सांगितलं की ती आईला घरकामात मदत करेल व घरातली कोणतीही कामं ती बाहेर गेल्याने अडणार नाहीत . शेवटी अनय काहीशा नाराजीनेच तयार झाला.

सान्वी ताईंच्या ऑफिसमधे जाऊ लागली. पदवीधर असल्याने व कॉम्प्युटरचे जुजबी ज्ञान असल्याने ऑनलाईन मार्केटिंगचे तंत्र तिने लवकर ग्रहण केले. इतर महिलांशी गप्पा मारुन तिच्या मनावरची मरगळही नाहीशी होऊ लागली. मग ताईंच्या विनंतीनुसार सान्वीने मुलांना इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. अतिशय साध्या सोप्प्या पद्धतीने ती मुलांना डायरेक्ट इनडायरेक्ट,एक्टीव्ह वॉइस,पेसिव्ह वॉइस..शिकवू लागली. त्यांना इंग्रजी बोलावयास प्रत्साहन देऊ लागली. 

अनयकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करायची नाही असं त्या मायलेकींनी ठरवलं होतं. रेशम सान्वीच्या अधिकाधिक जवळ जात होती. त्या दोघींच्या गप्पा रंगत होत्या. अनयलाही त्यांच्या गप्पांत सहभागी व्हावसं वाटू लागलं. लेकीने पोळ्या लाटल्या तर अनय त्या शेकू लागला,कुणीही न सांगता. रेशमने कपडे धुतले तर अनय ते वाळत घालू लागला. लेकीने भांडी घासली की ती पुसून ठेवू लागला.

सान्वी जास्तीत जास्त बाहेरच्या कामांत व्यग्र रहात होती पण घरावर तिचं लक्ष मात्र पहिल्यासारखंच होतं. एखादी वस्तू आपल्याजवळ असली की आपण तिला ग्रुहित धरतो,आपल्याला तीचं महत्त्व कळत नाही. असंच काहीसं अनयचं झालं. सान्वी व रेशम वुमेन अपलिफ्टमेंटच्या प्रोग्रामसाठी दहा दिवस जान्हवीताईंसोबत दिल्लीला गेल्या. रेशमची सुट्टी चालू असल्याने तिलाही जायला मिळालं होतं. 

त्या दहा दिवसांत अनयला सान्वीची किंमत कळली. अनयने दहा दिवस पोळीभाजीचा डबा लावला होता. वातड पोळ्या,तिखटजाळ भाजी,पाण्याशी साधर्म्य पावणारी आमटी खाऊन त्याचा जीव कंटाळला. त्याच्या तोंडाची चवच पळाली. घरात कणिक,डाळ,तांदूळ सगळं साहित्य होतं पण अनयला काहीच बनवता येत नव्हतं.

सान्वीचं व तिच्या टीमच्या कामाचं महिलादिनी कौतुक झालं.  तिला महिला गौरव पुरस्कारही देण्यात आला. अनय हे टिव्हीवर पहात होता. कित्येक महिला या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आल्या होत्या. त्यांचा संघर्षप्रवास ऐकताना अनयचे ह्रदय हेलावलत होते.  
वर्षोनुवर्षे त्याच्या मनात तयार झालेली महिलांविषयीची कडवी मतं विरून जात होती.

सान्वी व रेशम महिला गौरव पुरस्कार घेऊन घरी आल्या. देवाला बत्ती लावून त्यांनी सन्मानचिन्ह व बक्षिसाचा एक लाख रुपयांचा चेक देवाजवळ ठेवला व देवाच्या पाया पडल्या. देवाच्या पाया पडल्यावर सान्वी अनयच्या पाया पडायला वाकली मात्र अनयने तिला कुशीत घेतले व म्हणाला,"सानू,फार अन्याय केलाय मी तुझ्यावर जमल्यास मला माफ कर. तू व रेशमने मिळून माझ्या मनात स्त्रियांविषयी असलेला गैरसमज तुमच्या वर्तनातून दूर केलात. रेशमनेही मग आईबाबांना मिठी मारली.

सान्वी म्हणाली,"चला,जेवणाला लागते." 
तिला खुर्चीवर बसवत अनय म्हणाला,"राणीसरकार आज मी तुमच्या आवडीचं जेवण मागवलय." थोड्याच वेळात जेवणाचं पार्सल आलं. सान्वीच्या आवडीचं कोल्हापुरी सुकं मटण,तांबडा,पांढरा रस्सा,ज्वारीच्या भाकऱ्या व रेशमच्या आवडीची चिकन तंदुरी. तिघंही गप्पा मारत जेवली. जेवणानंतर सान्वी भांडी घासेपर्यंत अनयने स्वैंपाकाचा ओटा आवरला.

दर रविवारी एक पदार्थ शिकणार व रोज रात्रीची भांडी तो घासणार असं अनयने कबुल केलं शिवाय ऑफिसातून येताना भाजी,फळं आणत जाईन असंही कबूल केलं.

रात्री अनयने सान्वीला मिठीत घेतलं. कितीतरी वर्षांनी सान्वीला तिचा अनय मिळाला होता. सान्वी लहान मुलीसारखी त्याच्या कुशीत शिरली. अनय बराच वेळ तिला थोपटत राहिला.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now