Jan 27, 2021
सामाजिक

तिला तिचं स्थान देऊयात...

Read Later
तिला तिचं स्थान देऊयात...

... तिला तिचं स्थान देऊयात... 

पर्वा कॅलेंडर बघताना लक्षात आलं, ह्या वेळेस अधिक मास आहे. त्या अनुषंगाने जावयाला दिलं जाणारं वाण आठवलं, आणि आजीची लगबग आठवली. 33 अनारसे, वाण, शाही पंगत, असा सगळा थाट. जसं जसं वय वाढत गेलं, ह्या गोष्टीतला फोल पणा खटकायला लागला. जावईच का? सुनेला का नाही? म्हणजे जावयाला वाण, साग्रसंगीत जेवण, ह्या बद्दल काहीच म्हणणं नाही, खुशाल करा. पण त्यातलं 1% तरी कोडकौतुक आपल्या घरातल्या सुनेचं करायला काय हरकत आहे? 

म्हणजे असं बघा, तुमची सून तुमच्या घरासाठी, तिथल्या लोकांसाठी, आपलं घर, आपलं नाव, आई वडील, तिथल्या चालीरीती, ती ज्या वातावरणात वाढलीये ते सगळं सोडून आलीये न? मग ती नवऱ्याच्या घराला 'घर' बनवते, सासू-सासर्यांच्या चालीरीती, तिथलं वातावरण, तिथल्या पद्धती, नातलग, त्यांची ये-जा, पुतण्या-पुतणी ह्यांची हौस-मौज, सासू-सासर्यांची आजारपणं, सगळं मनापासून करते. इतकंच नाही, आमच्या कडे भाजी ह्याच पद्धतीची लागते, इतके वाजताच जेवण लागतं, इतकाच किराणा लागतो, हेच तांदूळ लागतात, ह्या सगळ्या अटी मान्य करते. 
कधी सुनेची आणि मुलाची वादावादी झाली तर कायम मुलाचीच बाजू घेतली जाते, तिनेच भांडण उकरून काढलं असेल, माझा मुलगा नाही हो त्यातला, असं म्हणून घरात कोर्ट भरवून तिच्या वर 4 आरोप करून तिची बाजू मांडायची संधी न देता दोषी ठरवण्यात येते. ती हार न मानता, नव्या जोमाने घरातल्यांना आपलंसं करायचा प्रयत्न करते. 
मुलाला लक्षात राहत नाही इतक्या तिला सासू सासर्यांच्या डॉक्टर कडे अँपॉइंटमेंट लक्षात राहतात. त्यांना डॉक्टरांकडे ने-आण करणे, औषधे लक्षात ठेवणे, पथ्य सांभाळणे, इतकं सगळं ती करत असते. तरीही वेळे प्रसंगी काही घरात तिला "तुझ्या पायरीने वाग" असं सांगितलं जातं. आता मूलभूत प्रश्न हा आहे की ही "पायरी" कोण ठरवतं? आणि तो ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? पण झाल्या गोष्टी विसरून तुमच्या साठी ती येतेच न धावून!! 
आता तुम्हीच विचार करा, ह्यातलं तुमचा मुलगा जावई म्हणून काय काय करतो? तरीही सुनेचे आई वडील त्याला इतका मान सन्मान देतात, मग जी सुन तुमच्या घरची लक्ष्मी आहे, तिच्या मान सन्मानाचा वेळी, तिचं कोडकौतुक करते वेळी, आपण इतके कोते का होतो? 
अश्विन पौर्णिमेला जेष्ठ मुलासोबत  जेष्ठ सुनेचं ही करा की औक्षण, गुढि पाडव्याला तिच्या हातून उभारा की गुढी, नाहीतरी तुमच्या घराची गुढी तिनेच तर सांभाळली आहे, एखाद्या सणाला तिच्या ताटाभोवती पण रांगोळी काढून तिला पण बसवा की तुमच्याच पंगतीला, कधी तरी सुनेला आवडतं म्हणून करा तिच्या आवडीचा पदार्थ, अधिक महिन्यात जावयाला करतात तसा तिचा मानपान करून तर बघा, ती बाहेरची कामं करून आली की आस्थेने विचारा कधीतरी 'दमलीस का ग? बस जरा आता थोडं शांत'. तिच्या तुमच्यासाठी  असलेल्या आठवणी सुंदर बनवणे हे तर तुमच्याच हातात आहे. शेवटी तीच येणार आहे आपले हात पाय चालेनासे झाल्यावर, तेव्हा केवळ कर्तव्य म्हणून कोरड्या मनाने करतेय ह्या पेक्षा प्रेमाने करतेय हे आपल्याला किती समाधान देईल. नुसतं आमची सून, आम्हाला मुली सारखी असं म्हणून चालत नाही, कारण शेवटी असण्यात आणि मानण्यात फरक असतो. पण एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री चा केलेला गौरव, कोडकौतुक आणि आदर कदाचित नात्यामध्ये अजून आपुलकी आणि ओढ निर्माण करेल. 

म्हणजे मुद्दा फक्त मान सन्मानाचा नाही, तुमच्या घरासाठी , कुटुंबासाठी तिने घेतलेल्या मेहनतीचा आदर करण्याचा आहे.