तिला समजून घेताना

Sasu suneche khare nate ekmekini samajun ghenyatch ahe.

"आई "तुमच्या हाताला काय मस्त चव आहे हो! मीरा आपल्या सासूच्या हातच्या पदार्थांचे रोज कौतुक करत होती. ऑफिस मधील तिच्या मैत्रिणी तिच्यावर जळत असत.. हिचे एक बरे आहे...सासू रोज आयता डबा करून हातात देते..! आम्ही
नसते लाड नाही करून घेत कुणाकडून... घरचं सगळ आवरून, स्वयंपाक करून ठेऊन येतो ऑफिसमध्ये. शेवटी सासू ती सासूच.. कळेलच थोड्या दिवसात. पण मीरा मैत्रिणींच्या या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायची नाही..

जय आणि मीराचे नुकतेच लग्न झाले होते. मीरा चे काम पाहता सासूबाईंनी अजून तिच्यावर फारशी जबाबदारी टाकली नव्हती. जसा त्या सकाळचा डबा जय ला देत तसाच मीरा ला ही देत असत. सुनेनेच घरचं सगळ पाहीलं पाहिजे असा काही हट्ट नव्हता त्यांचा. घरचं काम जसं जमेल तसं कर असे मीराला सांगितले होते त्यांनी...
सासू आपल्याला समजुन घेते म्हणून मीरा ही  खूप आनंदात होती.

एक दिवस जय च्या आत्या आठ दिवसांसाठी इकडे राहायला आल्या. स्वभावाने त्या थोड्या कडक होत्या. सासू आपल्या सूनेला रोज सकाळी आयता डबा करून देते हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्या सुधाताईंचे कान भरू लागल्या. सुनेला नुसते लाडावून ठेवू नका. घरची जबाबदारी ही द्या. घरची चार कामे केली की कळते हो आपोआप सगळे..ती तुझी सून आहे. मुलगी नाही..  माझी सून घरातील सगळी कामे करून मगच ऑफीस ला जाते. आल्यावरही सगळी कामे मी तिलाच करायला लावते..
नकळत हे सारे बोलणे मीरा च्या कानावर पडले. आता आपली 'सासू 'काय उत्तर देते, याकडे तिचे लक्ष लागून राहिले...

तशा सुधाताई म्हंटल्या, मी ही या घरची सून होतेच की कधीतरी.. तुम्हाला तर माहित आहेच..मला आमच्या सासूबाईंनी घरच्या रीती-भाती हळू हळू शिकवल्या. माझे वय ही तेव्हा लहानच होते.
मीरा ही शिकेल हळू हळू..
मी जर सुनेवर एकदम सारी जबाबदारी टाकली तर ती गोंधळून जाईल, कामात तिची चूक झाल्यास अपराधीपणाची भावना राहील तिच्या मनात. तिने केलेल्या कामात मी सारख्या चुका काढत राहिले तर, मला तशीच सवय ही लागेल आणि माझ्याविषयी तिच्या मनात अढी बसेल ती कायमची..च. आम्ही दोघींनी एकमेकींना समजून घेतले तरच सासू -सुनेचे नाते आणखी घट्ट होईल. शिवाय घरची जबाबदारी आम्ही सगळे मिळून पार पाडू. ती एकटीच जबाबदार व्यक्ती नाही या घरात, आम्ही ही आहोतच की.

हे सारे बोलणे ऐकून मीराच्या डोळयात पाणी आले. आपल्या सासूबाईंना आपण कधीच दुखवायचे नाही, आता आपणच हळू हळू घरातील जबाबदारी घ्यायची असे ठरवून ती आत आली.

रात्री साऱ्यांसोबत जेवताना मीरा ने लगेच ठरवून ही टाकले की मी सुट्टीच्या दिवशी आईंकडून छान छान रेसिपीज शिकून घेईन... आणि प्रत्येक संडे ला सर्वांनी माझ्या हातचे जेवण जेवणे हे 'कम्पल्सरी' आहे... तशा सासूबाई आत्याकडे पाहत समाधानाने हसल्या. सासऱ्यांनी ही हसून मान डोलावली आणि म्हंटले.. आता प्रत्येक रविवारी आमच्या पोटावर अत्याचार होणार असं वाटतंय... तसे सगळे हसू लागले..

आत्या पाहत होत्या ..मीरा किती समाधानाने, मोकळेपणाने घरात वावरते. मनातल्या गोष्टी सर्वांशी शेअर करते. जय आणि तिचे नाते अगदी 'स्पेशल 'आहे.. तसेच आपल्या सासू -सासऱ्यांना  ती आई वडीलांचा 'मान' देते. मनातल्या मनात त्या आपल्या सुनेची तुलना मीराशी करू लागल्या.

आत्या आपल्या घरी जाण्याचा दिवस उजाडला. तसे सारे त्यांना राहण्याचा आग्रह करू लागले. तशा त्या म्हंटल्या.. सुधा.. मी आठ -दहा दिवस इथे राहून खूप काही शिकले. मला सून आली तशी मी  सारी जबाबदारी तिच्यावर टाकून मोकळी झाले.
ती ही मला कधी उलट बोलली नाही, की भांडली नाही माझ्याशी. अजूनही सगळे ऐकते ती माझे.
ऑफिस चे काम, घरचे काम करताना तिची ओढा-ताण होत होती, दिसत होते मला. पण मी दुर्लक्ष केले. कारण सर्वांच्या घरी हे असेच असते म्हणून...पण आता मी तिला कामात मदत करेन. अगदी तुझ्यासारखीच कामांची कसली सक्ती ही करणार नाही तिच्यावर.. ती ही मन मोकळेपणाने राहील घरात. आणि माझ्यावर नाराज ही नाही होणार कधी. सर्वांनी समजूतदारपणा दाखवला की कुटूंब ही हसतं खेळत राहील... नाही काय?

पुन्हा छान हसून त्या मीराला म्हणाल्या, तुझ्या सासूने तुझ्यावर फार जबाबदारी टाकली नसेल, तरी हे कुटूंब 'माझे माहेर' हसते-खेळते ठेवण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते हे विसरु नकोस.. आणि जाता जाता डोळ्यातले पाणी पुसत त्यांनी पाया पडणाऱ्या मीराला भरभरून आशीर्वाद दिला.. अष्टपुत्र सौभाग्यवती भव: