तिला समजून घेतांना

लेकाला उमगलेलं शहाणपण ऐकून एक आई तृप्त झाली तर शिक्षणातून मुलांमध्ये रुजलेली मूल्ये पाहून ति??

कथेचे नाव- तिला समजून घेतांना

विषय- स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो? 

फेरी- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

आज वेदांत जरा निवांतच उठला. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या त्याला आवरायला थोडी घाईच झाली. त्यात शाळा सकाळी साडेसातची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

"आईऽ, डब्बा भरला का? माझी पाण्याची बॉटल?" तो बोलतच होता की मेघना तिची बॅग घेऊन बाहेर आली.

"तुझे कपडे, डब्बा आणि पाण्याची बॉटल सगळं आवरून ठेवलं आहे. पटकन उरकून घे आणि वेळेत शाळेमध्ये पोहोच. निघताना बाबाला उठव नाहीतर झोपून राहिल तसाच. बाय बेटा." म्हणत मेघना घाईघाईतच घराबाहेर पडली.

आईकडे पाहत तिचा एकुलता एक मुलगा गोड हसला.

"थँक यू आई. थँक यू सो मच." घाईत असणाऱ्या आईचे आभार मानत तो म्हणाला.

"यु आर मोस्ट वेलकम माय चॅम्प." गेटबाहेर पडता पडता मेघनाने त्याला प्रतिउत्तर दिले आणि आपल्या कामावर निघून गेली.

'हे फक्त आई तूच करू शकतेस. माय सुपरमॉम.' म्हणत वेदांतने आवरायला घेतले.स्कूल बॅग उचलून बाहेर पडणार तोच त्याला आईचे शब्द आठवले. तो तसाच त्याच्या बाबाला उठवायला बेडरुमकडे वळला.

"बाबाऽ, प्लिज उठ लवकर नाहीतर तुलाही उशीर होईल माझ्यासारखा. मी पळतो." म्हणत त्याने कसेबसे प्रमोदला उठवले.तोही त्याचा आवाज ऐकतच लागलीच उठून बसला.

"आई गेली का? थांब मी येतो स्कूलपर्यंत सोडायला." म्हणत तो अंथरुणातून उठला. तोंडावर पाणी शिंपडत बाईकची चावी घेऊन बाहेर पडला. वेदांत वाट पाहत बाहेरच उभा होता. थोड्याच वेळात ते शाळेत पोहचले.

"थँक यू बाबा. तू होतास म्हणून वेळेत पोहचलो नाहीतर आज शिक्षा नक्की होती." गाडीवरून उतरत तो म्हणाला आणि तसाच गेटच्या दिशेने धावला. प्रमोदनेही गाडी फिरवली आणि घरी निघून गेला.

शाळा भरली आणि प्रार्थनेच्या मंगल सुरांनी दिवसाची सुरवात झाली. प्रार्थना म्हणजे जणू मशागत मनाची. नवीन ज्ञान देण्यासाठी शिक्षकांत आणि नविन काही आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांत पोषक वातावरण निर्मिती करण्याचं काम ती करते. प्रार्थनेच्या रुपात वेदांतने मनापासून देवी सरस्वतीची उपासना केली.

वेदांत अभ्यासात हुशार होता. नववीपर्यंत पहिला क्रमांक त्याने कधीच सोडला नाही आणि आता तर बोर्डाची परीक्षा म्हणजे त्याची जबाबदारी आणखी वाढली होती. घरातील वातावरण मोकळं असल्याने त्याने कधीच दडपणाखाली अभ्यास केला नाही पण त्याचबरोबर आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर शिक्षण हेच माध्यम आहे याची जाणिव ठेवायलाही तो विसरला नाही. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या त्याने नेहमीच परिस्थितीची जाणिव ठेवली.

प्रार्थना आटोपल्यानंतर रोजच्या दिनक्रमाला सुरवात झाली. एकापाठोपाठ एक लेक्चर्स होत होते. यापुढचा लेक्चर सायन्सचा होता. पाटील मॅडम वर्गात आल्या. मागील दोन दिवसांपासून रिप्रोडक्शन ही लाईफ प्रोसेस त्या शिकवत होत्या. अगदी मेल आणि फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीमपासून प्रोसेसपर्यंत सगळीच माहिती विस्तृत होती. आज मेंस्ट्रुअल सायकलविषयीचा भाग त्या शिकवणार होत्या. त्यांनी सुरुवात करताच काही मुलींनी लाजेने माना खाली घातल्या तर काही जणी उत्सुकतेने सारं काही ऐकत होत्या. मुलांच्या डोक्यात काही जात होतं तर काही डोक्यावरून पण वेदांत मात्र सगळंच व्यवस्थित अभ्यासत होता.

"ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्रियांच्या रिप्रोडक्टीव सिस्टीममध्ये हार्मोन्समुळे काही रिपेटेटीव्ह बदल होतात त्यालाच मेंस्ट्रुअल सायकल म्हणतात.." म्हणत पाटील मॅडमने संपूर्ण माहिती विस्तृतपणे मुलांना सांगितली.

"या सायकल दरम्यान महिलांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासातून जावं लागतं. रक्तस्त्रावामुळे शरीर कमजोर बनतं. याकाळात त्यांना आरामाची गरज असते. योग्य आहाराची गरज असते." म्हणत त्यांनी दरम्यानच्या काळात महिला कोणत्या परिस्थितीतून जातात याचीही मुलांना जाणिव करून दिली.

वेदांतनेही सारीच माहिती मनापासून अभ्यासली यापेक्षा ती मनात उतरवली. रोजच सकाळी घाईत असलेली आई त्याला आठवली. आजच त्याने सॅनिटरी पॅडचे पॉकेट बाथरूममध्ये पाहिले होते.

'म्हणजे आईला..' तो मनातच म्हणाला.

'मग तीही यासाऱ्यांतून जात असणार. तिलाही त्रास होत असणार, तिलाही आरामाची गरज आहे.' मनाला जाणिव होताच त्याला आईची कसरत आठवली.

रोज सकाळी पाच वाजता उठून सकाळी सगळ्यांसाठी डब्बे करणारी आई समोर साकार झाली. त्यानंतरही तिचे काम संपत नाही. आपले कपडे इस्त्री करण्यापासून ते डब्बा आणि पाण्याची बाटली भरून टेबलावर ठेवणाऱ्या आईला आठवून त्याला स्वतःचाच राग आला. दुपारच्या जेवणाचीही तयारी करून सात वाजता नोकरीनिमित्त कामाबाहेर पडणाऱ्या आईची जाणिव होताच आता मात्र तो हळहळला.

'ती कधीच काही सांगत नाही. कधी त्रास झाल्याचं दाखवतही नाही. कधीतरी चिडचिड करते पण तोही तिच्या मानसिक त्रासाचाच भाग असेल ना? आम्ही दोघंही तिला कधीच कुठलीच मदत करत नाहीत मग थोडीशी चिडचिड होणारच ना? त्या चिडणाऱ्या आईमागेही काळजी घेणारं हृदय असतं. ओरडून झाल्यावर पुन्हा मायेनं आमचं पोट भरणारी तिच तर असते. मग तिला या दिवसातही आम्ही समजून घेऊ शकत नाही? हे चुकीचं आहे.' म्हणत वेदांतने मनाशी काहीतरी निश्चय केला.

दुपारी शाळा सुटल्यानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या वागण्यात सकारात्मक बदल झाला होता. एरवी कपडे बदलून तसेच टाकून देणाऱ्या त्याने ते व्यवस्थित घडी करून जागेवर ठेवून दिले. आज पहिल्यांदा त्याने घरातील केर काढायचा अयशस्वी प्रयत्न केला. किचनमध्ये पडलेला भांड्यांचा पसारा तेवढा त्याला आवरता आला नाही. तोच घड्याळ्यात नजर गेली दुपारचे दोन वाजत आले होते.

त्याला पाटील मॅडमचे शब्द आठवले.

'आईलाही पोषक आहाराची गरज आहे.' म्हणत त्याने तिने सकाळी बनवलेलं जेवण गरम केलं.

याचदरम्यान त्याची आई मेघना घरी येऊन पोहचली. थकून आलेली ती तशीच सोफ्यावर येऊन बसली. रोज अस्तावस्त असणारं घर आज तिच्याकडे पाहून गोड हसत होतं. वेदांतचे कपडेही व्यवस्थित जागेवर पोहचले होते. स्वयंपाकघरातून तिने सकाळी केलेल्या जेवणाचा सुगंध पुन्हा दरवळत होता. आपण स्वप्नात तर नाही ना? या विचारात असतानाच हातात पाण्याचा ग्लास घेऊन वेदांत तिच्या पुढ्यात हजर झाला.

"काय रे आज चक्क पाणी घेऊन आलास? घराला आज वेगळच घरपण चढलय. सगळं ठिक आहे ना?" पाणी पित ती म्हणाली.

"एकदम ठिक. तू आवरून घे. मी जेवायला घेतो." पाण्याचा रिकामा ग्लास घेत तो म्हणाला.

"म्हणजे तू अजून जेवला नाहीस? काय हे वेदु क्लासला जायला उशीर होईल ना?" म्हणत पदर खोचत ती उठली आणि स्वयंपाकघराकडे निघाली.

"अजिबात नाही होणार. क्लासला भरपूर वेळ आहे सो तू आधी फ्रेश हो आणि जेवून घे." म्हणत तो स्वयंपाकघरात निघून गेला.

मेघनाला मात्र त्याच्या वागण्याचे आश्चर्य वाटले. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असं काही घडत होतं. ते घडावं अशी इच्छा मात्र व्यक्त केली प्रमोदकडे पण ती आजतागायत त्याने कधी पूर्ण केली नव्हती. लेकाला असं बदलतांना पाहून एक आई मनोमन सुखावली. शेवटी एका स्त्रीला आणखी काय हवं असतं?

लेकानं हाताने वाढलेलं ताट पाहून न खाताच तिचं मन भरलं.

"आई, आता अजिबात दगदग करू नकोस. आराम कर. संध्याकाळी स्वयंपाकाचं आम्ही दोघं बघू." म्हणत त्याने क्लासला निघायची तयारी केली.

"अरे पण का? मी तर चांगली ठणठणीत आहे." ती आश्चर्याने म्हणाली.

"पाटील मॅडम, आज तुम्हीच शाळेत शिकवलत ना की मेंस्ट्रुअल सायकलच्या दरम्यान तुम्हांला खूप त्रास होतो? म्हणूनच आराम करायचा." आईची समजूत काढत तो उत्तरला.

चटकन तिच्या डोळ्यांत पाणी आले. लेकाला उमगलेलं शहाणपण ऐकून एक आई तृप्त झाली तर शिक्षणातून मुलांमध्ये रुजलेली मूल्ये पाहून तिच्यातील शिक्षिकेला आनंद झाला.

ठरल्याप्रमाणे रात्री वेदांतने त्याच्या बाबासोबत स्वयंपाकाचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी मेघनाच्या मदतीने त्यांनी पहिल्यांदा जेवण बनवलच. त्यानंतरही ताटं वाढण्यापासून ते किचनच्या सफाईपर्यंत दोघांनी मिळून काम केले. एवढ्या वर्षांत जे मेघनाला जमले नाही ते तिच्या लेकाने करून दाखवले.

"बाबा, आईला समजून घेणं इतकं कठीण नाही. आता अजून दोन दिवस तरी तिला अशीच मदत करायची आणि सकाळी लवकर उठून बाईकवर तिला शाळेत सोडून यायचं. कराल ना तिच्यासाठी एवढं?" वेदांतने स्पष्टपणे फर्मानच सोडलं.

प्रमोद आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला. किचनमधलं आवरून वेदांत अभ्यासासाठी खोलीत निघून गेला.

"पाटील मॅडम, असं काय शिकवलस माझ्या मुलाला की तो एवढा बदलला?" दमून भागून सोफ्यावर बसत प्रमोद म्हणाला.

"काही नाही रे जे तुझ्या आईने तुला शिकवलं नाही तेच शिकवलं माझ्या मुलाला. खरंतर प्रत्येक आईने आपल्या मुलाला ही जाणिव करून द्यायला हवी. मी शिक्षिका म्हणून तेच केलं. स्त्रीला समजून घेण्याचं विज्ञान चांगलच भिनलं त्याच्यात." तीही अभिमानाने म्हणाली.

"हो हो कळलं. या विज्ञानाचे धडे बहुतेक आमच्याकडूनही गिरवून घेतले जाणार. थकलो बुवा. जाऊन झोपतो उद्या तुला शाळेत सोडायचं फर्मान काढलय लेकानं." म्हणत हसत हसत तो झोपायला निघून गेला.

ती मात्र आज सुखावली होती. शारीरिक आरामापेक्षा मनाला झालेलं समाधान जास्त महत्वाचं होतं. तिचं स्त्री मन आज लेकाला उमगलं होतं आणि त्याचाच जगावेगळा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

©® आर्या पाटील

जिल्हा पालघर