तिला मुरायला जरासा वेळ द्या ना..भाग 1

Tila Murayala Jarasa wel dya na
तिला मुरायला जरासा वेळ द्या ना..भाग 1

आशिष आणि शिल्पीचं अरेंज मॅरेज होतं. शिल्पीच्या लग्नाच्या वेळी तिचे शिक्षण सुरू होतं आणि आशिष इंजिनियर झालेला आयटी कंपनीत नोकरीला होता. लग्न झाल्यानंतरही शिल्पीला शिकता येईल असं आशिषने आधीच तिला सांगून ठेवलेलं होतं. त्यामुळे शिल्पीही आनंदात होती.

लग्नाच्या वेळी शिल्पी अवघी बावीस वर्षाची होती. शाळा कॉलेज असल्यामुळे तिने किचनमध्ये कधी जास्त वेळ दिलाच नव्हता, साधा स्वयंपाक करता येत होता पण सणावाराचे पदार्थ तिने कधी केलेले नव्हते. ते सगळं आई करायची आणि त्यामुळे तिने कधी त्यात लक्ष घातलं नव्हतं.

लग्नानंतर पहिल्या सणाला म्हणजे दीप अमावस्येला सासूबाईंनी तिला तांदळाची खीर बनवायला सांगितली. शिल्पीने कधी तांदळाची खीर बनवलेली नव्हती. सासुबाईला विचारावं की नाही या द्विधा मनःस्थितीत होती. तिने तिच्या आईला फोन केला आणि तिच्या आईच्या सांगण्यावरून तिने तशी खीर बनवली.
संध्याकाळी सगळे जेवायला बसले, शिल्पीने सगळ्यांना जेवायला वाढलं. सासूबाईंनी तोंडात खिरीचा घास घेतला.

"छि छि छि काय खीर बनवली आहेस ग? किती ती साखर? अग खीर गोड असते म्हणून का इतकी गोड बनवायची का?"
सासरे काहीच बोलले नव्हते. आशिष मात्र शिल्पीच्या बाजूने बोलला.


"आई ठीक आहे ग थोडं कमी जास्त होईलच. तिची सुरुवात आहे ना तिला तेवढा स्वयंपाक नाही येत."


"हो ना मग शिकायला हवं ना? सासूबाईला विचारायला काय झालं? विचारायला हवं होतं तिने मला."


"इट्स ओके तू शिकव तिला हळूहळू."

"हो तेच राहिलंय आता, सुनांनी आधी काही शिकायचं नाही सासरी आल्यावर मग सासूंनी सगळे शिकवायचं."

सासूची बडबड सुरू होती. आशिषने शिल्पिला डोळ्याने इशारा करून आधार दिला तिने काही मनावर घेतलं नाही.
हळूहळू दिवस सरकत गेले.

शिल्पीचं कॉलेज सुरूच होतं, घरचं सगळं करून ती कॉलेजला जायची. पुन्हा घरी येऊन अभ्यास आणि स्वयंपाक असायचा. तिचा शेडूल बिझी झालेला होता.


शिल्पी सासूबाईला काही विचारायला गेली की त्या तिरकस उत्तर देत होत्या. त्यामुळे मग शिल्पेने त्यांना काही विचारायचं बंद केलं. ती मोबाईल वरून रेसिपी बघायची आणि त्यातून बघून बघून करायची. हळूहळू तिचे पदार्थ सासऱ्यांना आणि आशिषला आवडायला लागले.

क्रमशः

🎭 Series Post

View all