तिला लिंबलोण करा

कथा एका रुसलेल्या माहेरवाशीणीची


तिला लिंबलोण करा..


सकाळपासून सुमेध बैचेन होता. सतत आतबाहेर करत होता. त्याची ही घालमेल वेदिका बघत होती. पण इतक्या वर्षांनंतर स्वतःहून काही बोलायचे नाही ही गोष्ट तिला चांगली माहित असल्यामुळे ती गप्प बसली होती. शेवटी सुमेधच तिच्याशी बोलायला आला..
" आज कोणता दिवस आहे?"
" शुक्रवार आहे. का?"
" तिथी हवी आहे." सुमेध तिरसटून बोलला.
" आता परवा गणपती बसले, काल ऋषीपंचमी.. आज तृतिया.."
" तिच्याकडचा गणपती काल गेला असेल ना?" सुमेध पुटपुटला..
" काही बोललास का?"
"नाही.. तू कर तुझी कामे." खांदे उडवून वेदिका आत गेली. सुमेधची बेचैनी अजूनच वाढली.
झाले असे होते, की मागच्या वर्षीच त्याचे आईबाबा दोघे एकापाठोपाठ एक गेले होते. त्याला ते आठवत होते. नुकतेच बाबांचे दिवस झाले होते. सगळे नातेवाईक गेले होते फक्त त्याची बहीण अवनी आणि तिचे कुटुंब थांबले होते.
" दादा, मी आईची आठवण म्हणून तिचा एखादा दागिना घेऊन जाऊ?"
" दागिना? अग सगळे तर दिले ना तिने तुला? तरिही?" खरेतर अवनी तशी नव्हती. त्यामुळे दिवसकार्य झाल्या झाल्याच तिची ही मागणी सुमेधला खटकली.
" दिले म्हणजे ते नवीन घडवलेले.. मला आईने घातलेला दागिना हवा आहे."
" अग आईच्या अंगावर होते किती दागिने? एक मंगळसूत्र आणि चार बांगड्या. त्यातले मंगळसूत्र आणि दोन बांगड्या तिने वेदिकाला दिल्या आणि उरलेल्या दोन तिने सियाला दिल्या."
" हे बघायला होते कोण?" अवनीने रागाने विचारले.
" तुझा आमच्यावर विश्वास नाही?"
" पैसा ना भल्याभल्यांची मती फिरवतो. तू ही त्यातलाच.." अवनी थांबतच नव्हती..
" अवनी.. खूप झाले. लहान म्हणून खूप ऐकून घेतले आता बस कर."
" का बस करू? सगळं तूच घेणार आणि मी साधा एक दागिना मागितला तर तू सुनावणार? वा रे वा?" अवनी असं बोलेल यावर सुमेधचा विश्वासच बसत नव्हता. तो काहीच न बोलता तिथून निघून गेला. तो आत जाताच अवनीसुद्धा नवर्‍याला आणि मुलांना घेऊन तिथून निघाली. त्या दिवसानंतर ना तिने कधी फोन केला ना सुमेधने.. दोघेही हट्टाला पेटले होते. कोणी माघार घेत नव्हते.
दरवर्षी माहेरवाशीण म्हणून स्वतःच्या घरचा गणपती गेला की गौरीच्या निमित्ताने अवनी तीन दिवस न चुकता रहायला यायचीच. सुमेध दर्शनाला तिच्या घरी गेला की तसे आमंत्रण देऊनच यायचा. पण यावर्षी ना तो गणपतीला तिच्याकडे गेला ना तिचा फोन आला. ठरवल्याप्रमाणे वेदिका मात्र गप्पच होती. गौरी आवाहनाचा दिवस उगवला. तरिही अवनीचा काहीच निरोप आला नाही. दहावेळा सुमेधने फोन हातात घेतला पण फोन न लावता ठेवून दिला.
"चला सियाताई, आणायचे का गौराईला?" वेदिकाने विचारले.
" हो.. करा मग तयारी.."
" माझ्याशिवाय आणणार का?" अवनीचा आवाज ऐकू येताच सुमेध हातातले काम टाकून बाहेर आला..
" तुमच्याशिवाय ती गौराई घरात तरी कशी येणार.." वेदिका सुमेधकडे बघत म्हणाली.
अवनीने सुमेधला जाऊन मिठी मारली.
" माझी चूक झाली दादा.." ती रडत म्हणाली. "आपल्याच काही नातेवाईकांनी माझ्या मनात भरवून दिले होते की आईबाबांचे सगळे तुलाच मिळणार. लेक म्हणून माझाही हिस्सा असायलाच पाहिजे. पण ते मागताना तू आईबाबांच्या आजारपणात जो खर्च केलास तो मात्र मी सोयीस्करपणे विसरून गेले. मला खरेच तोंड नव्हते तुला दाखवायला. म्हणून मी फोन केला नाही.."
" मग आज अचानक तू इथे?" सुमेधने आश्चर्याने विचारले.
" वहिनीने बोलावून घेतले.. थँक यू वहिनी."
" आभारप्रदर्शन नंतर करू. आधी गौराईला घरात तर घेऊ."
तिघींनी मिळून वाजतगाजत गौरींना सोन्याच्या पावलांनी घरात आणले. सगळे घर दाखवले. दुसर्‍या दिवशी महाभोजन झाले. गौरीची ओटी भरताना वेदिकाने नेहमीप्रमाणे अवनीलाही बसवले. तिच्या ओटीत तिने सोन्याची एक बांगडी ठेवली.
" वहिनी हे काय?"
" तुमच्या आईची आठवण. त्यांनी सियाला जे दिले ते मी तुम्हाला देऊ शकत नाही. मंगळसूत्र तुमच्या घरच्या प्रथेनुसार माझे नंतर माझ्या सुनेचे. जास्तीत जास्त मी आईंनी मला जे दिले ते मी तुमच्यासोबत वाटून घेऊ शकते. "
" नको ग वहिनी मला अजून लाजवूस."
" मी तुम्हाला लाज वाटावी म्हणून हे नाही करत. तुमच्या भावाबहिणींच्या प्रेमाचा मला अभिमान होता. थोड्याशा सोन्यापायी ते नाते दुरावावे असे मला नाही वाटत. म्हणूनच माहेरवाशिणीच्या या सणाला मला तुमचा मानपान करू दे. राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू?"
अवनीने मान हलवली.
"कोणाचीही आठवण ही कधीच फक्त दागिन्यांशी निगडित नसते. त्याची एखादी वस्तूही पुरेशी असते.. बरोबर ना?" अवनीने न राहवून वेदिकाला मिठी मारली. ते बघून मांडलेली गौरीच्या चेहर्‍यावर समाधान झळकत होते..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई