जलद कथामालिका लेखन स्पर्धा.
विषय - अरे संसार संसार.
तिला काही सांगायचंय.
भाग - तीन (अंतिम.)
"सीमा, मला एक प्रयत्न करून तर बघू दे." तिच्या हातावर हात ठेवत शलाका म्हणाली. "उद्या सकाळी पाठव त्यांना."
त्या आश्वासक स्पर्शाने मनात एक आशा घेऊन सीमा घरी गेली.
******
"गोळ्या घेतल्यास का?" रात्री नवरा सीमाला विचारत होता.
"नाही. मॅडम बोलल्या की अशाच गोळ्या नाही देऊ शकणार. त्यांनी तुम्हाला सकाळी दवाखान्यात बोलावलंय." ती जराशी चाचरत म्हणाली.
"काय विचित्र डॉक्टर आहे? तुम्हा बायकांच्या प्रॉब्लेममध्ये माझं काय काम?" काहीसा चिडून रोहन.
"ते माहित नाही. मॅडम बोलल्या की काही गोष्टी तुमच्याशी बोलून क्लिअर करायच्या आहेत." मनाला येईल तसे सीमा थातूरमातुर उत्तर देत होती.
वेळ नाहीये माझ्याकडे पण ठीक आहे. एक चक्कर मारून बघेन. तरी नाहीच दिल्या गोळ्या तर मागच्या वेळे प्रमाणे मेडिकल मधून घेऊन येईन." बिछान्यावर पडत तो म्हणाला.
"अहो.." काहीतरी बोलणार होती ती.
"सीमा, जाईन मी उद्या. आज जाम थकलोय गं. झोपू दे." क्षणात डोळे मिटून तो घोरायला देखील लागला.
******
"भाऊ, तुम्हाला ठाऊक असेलच की सीमा प्रेग्नन्ट आहे ते?" समोर बसलेल्या सीमाच्या नवऱ्याला शलाका विचारत होती.
"म्हणूनच तर अबार्शनच्या गोळया हव्यात ना." जराशा बेफिकीरीने तो.
"तिला ते मूल हवे आहे." शलाका.
"पण आम्हाला नकोय." तो ठामपणे.
"उदरातील बाळावर सर्वप्रथम त्याच्या आईचा अधिकार असतो. तिला ते बाळ हवेय. मग तुम्ही का जबरदस्ती करताय?"शलाकाचा आवाज वाढला होता.
"आणि नकोच होते मूल तर स्वतः ऑपरेशन करून घ्यायचे हवे होते ना. नाहीतर काही प्रिकॉशन्स घ्यायचे होते. स्वतःला आनंद मिळावा म्हणून काही वापरायचे नाही आणि प्रेग्नन्सी राहिली तर बायकोला दहावेळा गोळया देऊन मूल अबॉर्ट करायचे, ही कसली वृत्ती? अशा अनसेफ गर्भपातामुळे खूप रक्तस्त्राव होऊन पेशन्टचा जीवही जाऊ शकतो."
"मॅडमऽऽ" तो शलाकाकडे आश्चर्याने पाहत होता. डॉक्टर आपल्याला एवढं बोलेल असे त्याला वाटले नव्हते.
"आय एम सॉरी. मी जरा जास्तच रिॲक्ट झालेय. पण मला नाही पटत आहे हे. भाऊ, तुम्हाला पहिलं बाळ होण्यासाठी काय काय करावे लागले हे आठवते ना? त्या तुलनेत तरया खेपेला देव तुम्हाला काही न मागताच देण्याचा प्रयत्न करतोय तर का नाकारताय तुम्ही? तुमच्या बायकोचा विचार करा ना जरा. ती काहीतरी सांगू पाहतेय. पण तिचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहचतच नाहीये. तिच्या मनीच्या वेदनांना अनुभवून बघा, तेव्हा तुम्हालाही तिचे दुःख कळेल. घरात आई, भाऊ, वहिनी सगळ्यांच्या प्रतीचे कर्तव्य पार पाडताना पत्नीबद्दलचेही कर्तव्य का विसरताय?"
"ती तुमची अर्धांगिनी आहे. तुम्हा लोकांचे मन दुखवू नये म्हणून कसला विरोध न करता ती दोन्ही वेळा अबार्शन करायला तयार झाली. आता तिला तुमच्या साथीची गरज आहे. एकदा तिच्या बाजूने उभे राहून बघा. तिच्या मनात तुम्हाला जे सांगायचे आहे ते ऐकून बघा. तुम्हालाही तिचा निर्णय योग्यच वाटेल. बायको आहे म्हणून तिला प्रत्येकवेळी गृहीत धरू नका. असे वारंवार गर्भपात केल्याने तिच्या गर्भाशयाबरोबरच तिच्या मनावर देखील ओरखडे उमटतील. गर्भाशयाच्या जखमा एकवेळ बऱ्याही होतील पण मनाच्या जखमेचे काय? प्लीज थिंक अबाऊट इट. तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. पण तो निर्णय तुम्हा दोघांचा हवा. या आता."
शलाकाचे बोलणे संपल्यावर रोहन घरी गेला. त्याला बघून सीमाच्या मनात थोडे दडपण अन काहीशी भीती वाटत होती. काही न बोलता तिने त्याला पाणी आणून दिले. पण तो काय म्हणेल हे ऐकायला तिचे कान आतूर झाले होते.
सीमा, जरा आत ये." तिच्याकडे न बघताच आपल्या बेडरूममध्ये जात तो म्हणाला.
"आय एम सॉरी." ती आली तशी दरवाजा बंद करून तो तिच्यासमोर कान पकडून उभा होता. तुझ्या मनातील मी कधी ऐकूच शकलो नाही. खरंच मला माफ कर. आज डॉक्टर मॅडम मुळे माझे डोळे उघडले. तुला हवेय ना हे बाळ? तुला हवे तर मलाही हवे. नको तो गर्भपात वगैरे. आपले बाळ आपण या जगात आणूया.
"अहो, पण हा सगळा खर्च असताना.. हे झेपेल ना आपल्याला?" त्याचे बोलण्यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
"तो विचार तू करू नकोस. मी दादाशी घरातील खर्च वाटून घेण्याबद्दल बोलेन." तिच्या पोटावरून हात फिरवत तो म्हणाला. तिच्या डोळ्यातील वाहणारे आनंदाश्रू त्याच्या हातावर ओघळले होते.
त्याच्या सोबतीने पुन्हा आई होण्यास ती सज्ज झाली होती. शलाकाचे आभार मानत तिने मनातच तिचे आभार मानले.
-समाप्त.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
नवरा बायको म्हणजे संसाररुपी रथाची दोन चाके. हा गाडा हाकताना दोघांचीही सोबत आवश्यक असते. कधी कधी मात्र आपण आपल्या पार्टनरला गृहीत धरतो. तिला किंवा त्याला यातलं काय समजतं? या भ्रमात राहतो. या कथेतून हेच मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. डॉक्टर शलाकाचे म्हणणे पटून रोहनने त्याचा विचार बदलला खरा आणि त्याच्या संसाराचा गाडा सुरळीत चालू राहिला. पण त्याने ते ऐकले नसते तर? संसार कदाचित राहिला असता पण त्यात केवळ एक कोरडा व्यवहार उरला असता. म्हणूनच आपल्या पार्टनरला गृहीत धरू नये असे मला तरी वाटते. तुमचे काय मत आहे?