Feb 27, 2024
जलद लेखन

तिला काही सांगायचंय. भाग -२

Read Later
तिला काही सांगायचंय. भाग -२

जलद कथामालिका लेखन स्पर्धा.

विषय - अरे संसार संसार.


तिला काही सांगायचंय.

भाग -दोन.


"मॅम, तसे नाही. ते लिहून असते ना की सकाळची पहिली युरीन चेक केली तर अचूक कळतं. म्हणून म्हणतेय." सीमा.


"हम्म. ठीक आहे." एक हलके स्मित करून शलाकाने चिठ्ठीवर किटचे नाव लिहून देत चिठ्ठी तिच्या हातात दिली.

"मॅम, फिस?"


"उद्या या आणि फी देखील तेव्हाच द्या." शलाका म्हणाली.


"थँक यू." म्हणून दोघे बाहेर गेली आणि शलाकाने एक लांब श्वास घेतला. सकाळची पहिली लघवी तपासली की प्रेग्नन्सीचे अचूक निदान होते, हे यांना ठाऊक आहे पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अबार्शन करायचे नसते हे कसे कळत नाही?' मनातील प्रश्न बाजूला ठेवून तिने पुढच्या पेशंटला आत बोलावले.


*****

दुसऱ्या दिवशी सीमा परत केबिनमध्ये होती, ते सुद्धा कालच्या प्रमाणे सायंकाळीच. पण आज ती एकटीच होती.


"मॅम, टेस्ट पॉझिटिव्ह आहे." किट टेबलवर ठेवत निर्विकार चेहऱ्याने ती म्हणाली.


"हम्म. मग आता काय करायचे?" तिच्या मनाचा वेध घेत शलाकाने विचारले.


"आता काही नाही. अबार्शनसाठी गोळ्या लिहून द्या." तिचे कोरडे उत्तर.


"तुझे पहिले मूल तीन वर्षाचे झालेय. मग तरी दुसरे का नको? ठेव ना ही प्रेग्नसी." तिच्या काळजात हात घालत शलाका.


"मॅम, दुसरे मूल हवे असते तर दोन महिन्यांपूर्वी कशाला पाडले असते?" सीमाच्या डोळ्यातील थेंब गालावर आला.


"तेच विचारतेय ना मी, का नको दुसरे बाळ?" डॉक्टरकी चा प्रॅक्टिकल अप्रोच बाजूला ठेवून शलाका तिच्याशी इमोशनली कनेक्टटेड होऊ पाहत होती. 


"त्यांना नकोय." नवऱ्याचे नाव ना घेता ती म्हणाली.


"म्हणजे तुला हवेय?" तिच्या डोळ्यात बघत शलाकाचा थेट प्रश्न.


"कोणत्या आईला मूल नको असते?" ती आता स्वतःच बोलायला लागली. जणू काही इतक्या दिवसांचे मनात साचलेले सगळे तिला बाहेर काढायचे होते.


"माझे पहिले बाळ लग्नाच्या सहा वर्षानंतर झाले. ही सहा वर्ष मी काय काय सहन केले मला माहित. महागडी ट्रीटमेंट, इंजेक्शन्स, मनस्ताप, बाहेर आणि घरच्यांचे टक्केटोणपे.. आणखी बरंच काही. पाण्यासारख्या पैसा खर्च झाला तेव्हा कुठे मूल पदरी पडले."


"मग आता तर देवाने परत चान्स देऊ केलाय. एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा. कसलाही खर्च न करवून घेता. तरीही मग का माघार घेते आहेस?" शलाकाला अजूनही तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते.


"आमची जॉईंट फॅमिली आहे. आत्ताच घराचे काम झाले, त्याचे हप्ते सुरू आहेत. त्यात मोठया जाऊबाई गरोदर आहेत. दुसऱ्यांदा. म्हणून मग दीराने इतर खर्च उचलायला हात वर केलेत. त्यामुळे घर-बाहेर सगळीकडे यांनाचा पैसा लावावा लागतो. त्यात दुसरे मूल झाले तर त्याचा कसा निभाव लागेल? म्हणून हे म्हणाले की आपण एकच बाळ राहू देऊया." एक खोल श्वास घेऊन ती म्हणाली. "सासूबाईंचेही हेच म्हणणे आहे. त्यांच्यापुढे हे तरी काय बोलणार?" सीमा सांगत होती.


"आणि तुला काय वाटतं?" शलाका.


"माझं म्हणणं ऐकायला वेळ कोणाकडे आहे? सगळ्यांना जाऊबाईच्या येणाऱ्या बाळाचे लागले वेध आहेत."डोळ्यातील पाणी पुसत ती म्हणाली.


"मला तुझ्या नवऱ्याला एकदा भेटायचे आहे." शलाका म्हणाली.


"नाही ऐकणार ते." सीमा ठामपणे म्हणाली.


"एक डॉक्टर म्हणून काही ठोस कारण नसताना मी तुम्हाला अबार्शन करण्याची परवानगी नाही देऊ शकत. आणि जेव्हा बाळाच्या आईची इच्छा नसेल तेव्हा तर मुळीच नाही."


"मॅम.."


"सीमा, मला एक प्रयत्न करून तर बघू दे." तिच्या हातावर हात ठेवत शलाका म्हणाली. "उद्या सकाळी पाठव त्यांना."


त्या आश्वासक स्पर्शाने मनात एक आशा घेऊन सीमा घरी गेली.

:

क्रमशः

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

सीमाच्या नवऱ्याचे मन वळवू शकेल का शलाका? वाचा

पुढील अंतिम भागात.



ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//