जलद कथामालिका लेखन स्पर्धा.
विषय - अरे संसार संसार.
तिला काही सांगायचंय.
भाग - एक.
"मॅम, मला गोळया हव्या आहेत." डॉ. शलाका समोर बसलेली पेशंट आत आल्या आल्या म्हणाली.
शलाकाने समोर बसलेल्या तिला क्षणभर न्याहाळले. जवळपास तिशीच्या आसपास असलेली ती. चेहऱ्यावरचे भाव फारसे न वाचता येण्यासारखे. जनरली समोर पेशंट बसल्यावर डॉक्टर त्याला काय झाले म्हणून विचारतात आणि मग समोरची व्यक्ती आपल्या त्रासाचा पाढा वाचतो. त्यानंतर डॉक्टर पेशंटला हवी असलेली रामबाण गोळी लिहून देतात. ही केस जरा वेगळी वाटली. पेशंटने आल्या आल्या गोळ्याबद्दल विचारले म्हणून मग शलाकाने तिच्या कलाने घ्यायचे ठरवले.
"पाणी?" स्वतःसमोरचा पाण्याचा ग्लास शलाकाने तिच्यासमोर धरला तशी अवघडून तिने गटागटा पाणी पिले.
शलाकाची नजर तिच्यावरच होती. तिने पाण्याचा ग्लास खाली ठेवला तसे शलाका तिच्याकडे बघून मंद हसली.
"नाव काय गं तुझं?" तिचा प्रश्न.
"सीमा." तिनेही ओठ रुंदावून उत्तर दिले खरे पण त्यात ओढूनताणून आणलेले स्मित शलाकाला स्पष्ट जाणवत होते.
"हं, तर सीमा, कसल्या गोळ्या हव्या आहेत तुला?" शलाकाने मुख्य मुद्यात हात घातला.
"मॅम, माझी पाळी नीट येत नाहीये. म्हणजे दोन महिन्यापूर्वी पाळी चांगली आठवडाभर गेली. मागच्या महिन्यात पाळी आलीच नाही. त्यानंतर काही दिवस रोज म्हटल्यासारखं डाग दिसत होते. आठवड्याभरापासून पुन्हा तसेच स्पॉटिंग सुरू झालेय. कधी बंद तर कधी चालू असते." सीमाने तिचा प्रॉब्लेम सांगितला.
"दोन महिन्यापूर्वी एवढं ब्लिडींग झालं, मग कुठे दाखवलं वगैरे होते का?" शलाकाने गोळ्यांचा विषय बाजूला ठेवून तिच्या विषयात आणखी खोल डोकावण्याचा प्रयत्न केला.
"हो.. म्हणजे नाही.. "
ती काहीतरी टाळतेय हे शलाकाला स्पष्ट कळत होते. तिच्यावर स्थिरावलेली नजर तिने तशीच ठेवली. तेव्हा मग सीमाच पुढे बोलायला लागली.
"ॲक्च्युअली मॅम, मी प्रेग्नन्ट होते. मग घरीच अबार्शन केलं." शलाकाची नजर टाळत ती उत्तरली.
"कसे?" शलाकाने नजर न हटवता प्रश्न केला.
"यांनी मेडिकल मधून गोळ्या आणल्या होत्या." तिचा चेहरा केविलवाणा झाला होता.
"तुला माहितीये, हे किती रिस्की आहे ते?" तिचा तसा चेहरा बघून आवाजातील धार कमी करून शलाका म्हणाली, त्यावर ती गप्प बसली.
"मॅम, आता पाळी रेग्युलर यावी म्हणून काही गोळ्या द्या ना." ती पुन्हा मूळ पदावर आली.
"मागचे अबार्शन केल्यावर सगळं क्लिअर झाले का म्हणून सोनोग्राफी करून पाहिले होतेस?" गोळ्यांचे सोडून शलाका पुन्हा तेच उरकून काढत होती.
"नाही." सीमाची नजर खाली.
"महिन्यात असे अधून मधून स्पॉटिंग होतेय, मग आता एक सोनोग्राफी करून बघायची का?"
"अहोऽऽ." शलाकाच्या प्रश्नावर तिने बाहेर असलेल्या नवऱ्याला बोलावले. "मॅडम सोनोग्राफीचे म्हणत आहेत." खालच्या स्वरात ती.
"मॅडम, सोनोग्राफी नंतर करूयात की. आता फक्त पाळी नीट यायच्या गोळ्या द्या." रोहन, सीमाचा नवरा.
"यांना परत दिवस गेलेत असा मला डाऊट आहे. किमान एक युरीन टेस्ट तरी करूयात. ती निगेटिव्ह असेल तर मग मी गोळ्या लिहून देते." एक विचार करून शलाका म्हणाली.
हे त्या दोघांनाही पटले. "मॅम किटचे नाव लिहून द्या. मी उद्या अगदी सकाळीच चेक करून बघते."
"अगं, प्रेग्नसी असेल तर आत्ताही दिसेलच ना."
"मॅम, तसे नाही. ते लिहून असते ना की सकाळची पहिली युरीन चेक केली तर अचूक कळतं. म्हणून म्हणतेय." सीमा.
"हम्म. ठीक आहे." एक हलके स्मित करून शलाकाने चिठ्ठीवर किटचे नाव लिहून देत चिठ्ठी तिच्या हातात दिली.
"मॅम, फिस?" सीमा.
"उद्या या आणि फी देखील तेव्हाच द्या." शलाका म्हणाली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
काय असेल सीमाचा युरीन रिपोर्ट? वाचा पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा