तिढा..गूढ मृत्यूचे(भाग १६ अंतिम)

अखेर उलगडला मृत्युचा हा तिढा.


मागील भागात आपण पाहिले की या घटनेचा मुख्य संशयित नीरज पटेल याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सत्य काय ते वदवून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण अजूनही तो खोटे बोलून पोलिसांची दिशाभूलच करत असल्याचा पोलिसांना संशय होता. आता पाहुयात पुढे.

पोलिसांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा कृष्णप्पा आणि सिद्धरामकडे वळवला.

"हे पहा, तुम्ही कितीही लपवले तरी आम्ही नीरजला शोधून काढलेच. तुम्ही त्याला वाचवण्याच्या नादात आता स्वतः अडकला आहात. त्याने तुमच्या दोघांची नावे घेतली आहेत. तुम्ही दोघांनी मिळून त्या मुलीवर रेप करून तिला आणि तिच्या प्रियकराला मारून टाकले. आता हे जर सिद्ध झाले तर आयुष्यभर जेल मध्ये सडत बसावे लागणार तुम्हाला दोघांनाही. त्यामुळे आता तरी खरे बोला. नेमके काय घडले त्या दिवशी?  सांगून टाका एकदाचे."

"साहेब हे सर्व नीरज शेठनेच केले आहे. त्यानेच त्या मुलीवर रेप केला. त्या मुलाला मारहाण देखील केली. आम्ही म्हणत होतो त्याला, सोडून देऊ आपण त्यांना. पण तोच म्हणाला आता जर यांना सोडले तर हे आपल्याला कामाला लावतील. म्हणून मग त्यांना आता जिवंत सोडायचे नाही, असे त्याने ठरवले. आम्हालाही वाटले की, खरंच आता आम्हीही यात अडकू. म्हणून मग आम्हीही त्याला साथ दिली. पण साहेब आम्ही फक्त साथ दिली, सर्व काही नीरज शेठनेच केलं.

झाडीत जाऊन त्या मुलीवर अत्याचार केले. आम्ही त्या मुलाला नीरज शेठच्या सांगण्यावरून पकडून ठेवले. त्यानंतर नीरज शेठने दोरीने त्या दोघांचा गळा आवळून हत्या केली. त्यांच्याकडील मोबाईल आणि गाडी, जवळच्याच एका विहिरीत फेकून दिले. त्यानंतर जवळच्याच डोंगर भागात त्यांचे मृतदेह झाडाला नेऊन लटकवले.

सिद्धराम आणि कृष्णप्पाने अखेर सर्व गोष्टींची कबुली दिली.

सारंग सरांना आता राग अनावर होत होता. त्यांनी कृष्णप्पा आणि सिद्धरामच्या सनसनीत कानशिलात लगावली.

"अरे तुम्ही माणूस आहात की हैवान? इतक्या क्रूरपणे कोणी वागते का कोणासोबत? अरे जितका तुमचा नीरजशेठ गुन्हेगार आहे ना त्याच्या कैकपटीने तुम्ही दोघे गुन्हेगार आहात. काही चांगले करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नका. ज्यांना तुम्ही असे निर्घृणपणे मारून टाकले ना, त्यांच्या आई वडिलांची अवस्था पाहा जरा जाऊन. पण तुम्हाला काय कळणार म्हणा त्या गोष्टी. दोन पैशासाठी इमान गहाण ठेवणारे तुम्ही, तुम्हाला काय कळणार एखाद्याच्या भावना. पण याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याचे आयुष्य तुम्ही हिरावून घेतले, आता तुम्हाला तरी जगण्याचा अधिकार आहे का? हे विचारा एकदा मनाला."

सारंग सरांचा संताप संताप होत होता. त्यांचा राग पाहून सिद्धराम आणि कृष्णप्पाचे तर धाबेच दणाणले.

गुन्हेगार तर आता पोलिसांच्या ताब्यात होते. पण अजूनही गुन्हा मात्र सिद्ध झाला नव्हता.

आता पोलिसांचा तपास पुन्हा एकदा मागे जाणार होता. सिद्धराम आणि कृष्णप्पाला घेऊन पोलीस जिथे ही घटना घडली तिथे गेले. ज्या दोरीने त्यांचा गळा आवळण्यात आला होता, ती दोरी पोलिसांच्या हाती लागली. लगेचच ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली. त्यानंतर त्या विहिरीतील बाईक आणि मोबाईल देखील काढण्यात आले.

आता त्या दोरीवरून हे सिद्ध होणार होते की नीरजच या सर्व हत्याकांडाचा खरा सूत्रधार आहे. त्याचबरोबर ती बाईक आणि मोबाईल या गुन्ह्याचे भक्कम पुरावे होते.

सर्व पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा आता वेदांतकडे वळवला. त्याला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणण्यात आले. त्याच्याकडून देखील सर्व गोष्टींची कबुली करून घेतली.

"त्या दिवशी पार्थ मावशीकडे जाणार असल्याचे सांगितले होते त्याने, मग तुला काय माहीत की तो सायलीला घेऊन लोणावळ्याला फिरायला जाणार आहे?"

"सर पार्थचा मोबाईल चार्जिंगला असताना सायलीचा मॅसेज आला होता, त्यावरून मला समजले."

"अच्छा! म्हणून मग तू नीरजला त्यांच्या मागावर पाठवलेस का?" सारंग सरांनी प्रश्न केला.

"सर, मी नेहमीप्रमाणे फक्त माझे मन मोकळे केले त्याच्याजवळ. तेव्हा तोच म्हणाला होता, तू काळजी करू नकोस. इथून पुढे पार्थ त्या सायलीपासून चार हात लांब राहील, याची व्यवस्था करतो मी. पण तो नेमके काय करणार आहे, याची मला जराही कल्पना नव्हती. तसे मी विचारले देखील त्याला पण तो म्हणाला की तू नको टेन्शन घेऊस, मी बरोबर समजवतो दोघांनाही."

"अरे पण जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी पसरली तेव्हा तू नीरजला विचारलेच असशील ना की, हे कसे काय घडले म्हणून? तुला त्याच्यावर संशय नाही आला का?"

"सर मलाही खूपच धक्का बसला समजले तेव्हा. कारण हे असे काही घडेल याची मी कल्पनाच केली नव्हती. मी लगेचच फोन लावला नीरजला, पण त्याने खूप वेळानंतर माझा कॉल रिसिव्ह केला. तेव्हा तो म्हणाला, त्यांच्या दुकानातील दोघांना पाठवले होते त्याने सायली आणि पार्थच्या मागावर. त्यांनी दोघांनाही धमकावले आणि घाबरून सायली आणि पार्थने आत्महत्या केली असावी. पण नंतर जेव्हा समजले की सायलीवर रेप झाला, तेव्हाही नीरजचे आणि माझे बोलणे झाले होते. तेव्हा तो म्हणाला की पार्थनेच हे केले असावे."

"याचा अर्थ तुला खरे काय ते माहीतच नाही.?"

"म्हणजे सर? नीरजने जे मला सांगितले ते खोटे आहे का?"

"अरे तुझ्या मित्राने तुला गाफील ठेऊन स्वतःच हा सगळा गेमप्लॅन घडवून आणला. प्रत्यक्षात सायली आणि पार्थ सोबत जे काही झाले ते सर्व नीरजनेच केले आहे?"

"म्हणजे सर, सायलीवर जो रेप झाला तो....?" आश्चर्यकारक रित्या वेदांतने प्रश्न केला.

"बरोबर ओळखलेस. सायलीवर नीरजनेच रेप केला आणि एवढे सगळे करून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने त्यांची गळा आवळून हत्या केली. बरं एवढेच करून तो थांबला नाही तर त्यांच्या हत्येला आत्महत्येचे रूप देण्यासाठी त्याने दुकानातील दोघांच्या मदतीने एका निर्जनस्थळी दोघांचेही मृतदेह एका झाडाला नेऊन लटकवले."

"इतका मोठा विश्वासघात!" वेदांतने तर डोक्यालाच हात लावला.

"मी किती मूर्ख आहे, डोळे झाकून नीरजवर विश्वास ठेवला. मनातील सगळ्या गोष्टी त्याला सांगत राहिलो. कदाचित मीच जर स्वतःवर कंट्रोल ठेवला असता, नीरजला काही सांगितलेच नसते तर हे सर्व घडलेच नसते. मी ज्याला खूप जवळचा मित्र समजत होतो त्यानेच असा विश्वासघात केला आणि ज्याला नेहमी दुश्मन समजत राहिलो त्या पार्थला, एका चांगल्या मित्राला माझ्या एका चुकीमुळे मी कायमचे गमावले. माफ कर मित्रा मला. तुझ्याबरोबरच मी सायलीचादेखील गुन्हेगार आहे. सायली आणि पार्थ दोघांचेही चेहरे आठवून वेदांतला मात्र अश्रू अनावर झाले."

वेदांतला त्याच्या एका चुकीचा आता खूपच पश्चात्ताप होत होता. पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता. कारण ऑलरेडी खूपच उशीर झाला होता त्याला हे समजायला.

या केसमधील मुख्य आरोपी नीरज पटेल, सिद्धराम नाटीकर आणि कृष्णप्पा या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली. आणि अखेर हा सर्व तिढा एकदाचा सुटला.

तसे पाहिले तर या सर्वात पार्थचा मित्र वेदांत याचा काहीही संबंध नव्हता. पण तरीही या सर्वाला कुठेतरी तोच जबाबदार होता. नकळतपणे तो त्याच्या भावना जवळचा मित्र या नात्याने नीरजकडे व्यक्त करत राहिला. आणि इथेच त्याने सर्वांत मोठी चूक केली. काहीही कारण नसताना नीरजने वेदांतच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केली आणि सायलीला पार्थपासून दूर करण्याच्या नादात नको त्या गोष्टी त्याच्या हातून घडल्या.

या सर्वात साध्य मात्र काहीच झाले नाही. पण मैत्रीवरचा विश्वास उडाला तो वेगळाच.

खरंच, या सर्वात विनाकारण किती जणांचे आयुष्य पणाला लागले? या सर्वाला जबाबदार कोण? तर प्रत्येकजण स्वतःच या गोष्टीला जबाबदार आहे. मैत्रीतील विश्वासघात हे या सर्वाचे मूळ कारण आहे.

मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी पालक त्यांना शहरात शिक्षणासाठी पाठवतात. परंतु, अभ्यासाच्या नावाखाली बाहेर फिरणे, होटेलिंग, लव्ह अफेअर्स ही तर आजच्या तरुणाईची फॅशनच म्हणावी लागेल. अर्थातच सगळेचजण असे करतात असेही नाही. पण बऱ्याच अंशी हे पाहायला मिळते. पण त्यामुळे अशा काही घटना घडतात की, मुले स्वतःच स्वतःच्या अधोगतीचे कारण ठरतात.
अशा गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याला कुठेतरी आळा बसणेही तितकेच गरजेचे आहे. परंतु अशा काही घटनांमुळे सर्वच पालकांच्या मनात कायमस्वरुपी भीती निर्माण होत आहे.

त्यामुळे आजच्या तरुणाईनेदेखील सर्व गोष्टींचा विचार करूनच प्रत्येक पाऊल उचलणे आवश्यक आहे.सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच आयुष्यात कोणत्या वेळी, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. क्षणिक सुखाच्या आहारी न जाता सदसद्विवेबुद्धीने विचार करून वागणे केव्हाही चांगले. जेणेकरून पालकांनादेखील मुलांचा अभिमान वाटेल.

परंतु त्यासाठी पालकांनी देखील मुलांकडून भरमसाठ अपेक्षा न ठेवता तसेच त्यांना दडपण येईल असे वर्तन न करता मुलांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले तर मुलेही पालकांशी मनातील सर्व गोष्टी शेअर करतील. जेणेकरून चूक काय बरोबर काय? हे पालकदेखील त्यांना वेळोवेळी समजावून सांगू शकतील.

त्यामुळे सततच्या वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला नक्कीच आळा बसेल. आणि आयुष्यातील प्रत्येक तिढा मग आपसूकच सुटला जाईल.

समाप्त.

सदरची कथा पुर्णपणे काल्पनिक असून त्यातील घटना, पात्र, स्थळ, काळ याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. फक्त मनोरंनात्मक दृष्टीकोनातून ही कथा लिहिली गेली आहे. चुकून वास्तवाशी काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.

तसेच ही रहस्यकथा कशी वाटली? ते कमेंट करून नक्की सांगा.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all