तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग १४)

रहस्य मृत्यूचे.


मागील भागात आपण पाहिले की पोलिसांनी या केसशी संबंधित असलेल्या संशयित आरोपींच्या कर्नाटक येथील पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता बरीच माहिती पोलिसांच्या हाती आली. आता पाहुयात पुढे.

सिद्धराम आणि कृष्णप्पा दोघेही या गुन्ह्यातील मुख्य संशयित होते. कर्नाटक मधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांच्या एका टीमने त्यांचा सध्याचा पत्ता शोधून काढला. आणि क्षणाचाही विलंब न लावता सारंग सरांना सर्व माहिती दिली.

इकडे पोलिसांची दुसरी टीम तात्काळ त्या पत्त्यावर जाण्यासाठी सज्ज झाली. तोपर्यंत भुजबळ साहेब मात्र सिद्धरामच्या घरीच थांबून पुढील चौकशी करत राहिले. जेणेकरून ते गेल्यानंतर सिध्दरामच्या घरच्यांनी त्याला फोन करून पोलीस तपासाची बातमी द्यायला नको.

पुढील एक तासात पोलिसांची टीम दिलेल्या पत्त्यावर पोहोचली.

दारावर नॉक करताच समोर विशीतील एक तरुण उभा राहिला.

"सिद्धराम आणि कृष्णप्पा इथेच राहतात का?"सारंग सरांनी प्रश्न केला.

समोर पोलिसांना पाहून त्या तरुणाची बोबडीच वळली.

भीतीमुळे त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. कोण आहे, पाहण्यासाठी पाठोपाठ दुसराही तरुण उभा राहिला समोर येऊन.आता सर्वकाही उघड होते.

भुजबळ साहेबांनी आधीच सिद्धरामचा फोटो सारंग सरांना पाठवला असल्यामुळे त्याची त्वरित ओळख पटली. आता दुसरा तरुण म्हणजे नक्कीच कृष्णप्पा असणार यात शंकाच नव्हती.

"राऊत, जोशी घ्या यांना ताब्यात." दोघांचीहीही ओळख पटताच सारंग सरांनी आदेश दिला.

पोलिसांनी दोघांनाही मग ताब्यात घेतले. त्यांच्याकडील फोनदेखील जप्त केले.

पोलिसांना असे अचानक समोर पाहून दोघांचीही बोलतीच बंद झाली. तरी धाडस करून सिद्धराम बोलला, "साहेब, कुठं घेऊन चालले ओ आम्हाला. आम्ही काय नाय केलं ओ."

"हो का, तुम्ही काय केलं आणि काय नाही? ते कळेलच लवकर. अजिबात आवाज काढायचा नाही. गुपचुप गाडीत बसायचं." राऊतांनी पोलिसी खाक्या दाखवताच, दोघेही गाडीत बसले. दोघेही प्रचंड घाबरले होते.

थोडयाच वेळात गाडी पोलीस स्टेशनला पोहोचली. काही वेळातच दोघांचीही चौकशी सुरू झाली.

सर्वात आधी सिद्धरामला पोलीस स्टेशनच्या इंट्रोगेशन रुममध्ये चौकशीसाठी नेण्यात आले.

"या दोघांना ओळखतोस का?" सायली आणि पार्थचा फोटो सिद्धरामच्या समोर धरत सारंग सरांनी प्रश्न केला.

"नाही साहेब..मी नाही ओळखत यांना." सिद्धराम उत्तरला.

"नाही का? बरं..आता मला एक सांग शनिवारी रात्री तू कुठे होतास?"

"मी रुमवरच होतो साहेब. कुठंच गेलो नाही." सिद्धराम घाबरतच उत्तरला.

"अरे तू काहीच केले नाहीस ना? मग एवढा घाबरतोस कशाला?  आणि हे बघ.. एक खोटे लपवण्यासाठी माणूस दहा वेळा खोटे बोलतो. पण तो कितीही खोटे बोलला तरी सत्य हे एक ना एक दिवस सर्वांच्या समोर येतेच. म्हणून म्हणतो आहे की, जे काही घडलंय त्या रात्री ते सर्व खरं खरं सांग. कारण खोटं बोलून तात्पुरती वेळ जरी तू मारून नेलीस, तरी जोपर्यंत तुम्ही खरे बोलत नाहीत तोपर्यंत  तुमची इथून सुटका नाही. हे ध्यानात असू दे"

सारंग सरांचे असे कठोर शब्द कानी पडताच सिद्धराम खूपच घाबरला. काय बोलावे त्याला काहीच समजेना.

"काय विचार करतोयेस? खरं सांगू की नको याचा? तू कितीही खरे लपव पण तू त्या रात्री कुठे होतास हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. आणि तू फोटोतील त्या मुलाला आणि मुलीलाही चांगलाच ओळखतोस हेही आम्हाला माहीत आहे. मग आता तुझ्या तोंडाने तू सांगतोस की आम्हालाच घ्यावे लागणार कष्ट?"

सारंग सरांच्या प्रश्नांवर सिद्धराम फक्त मूक गिळून गप्प बसला होता.

"सचिन आणि राऊत याला घेवून जा आणि तुमच्या पद्धतीने विचारा. म्हणजे मग बोलेल पोपटासारखा. तोपर्यंत मी कृष्णप्पाची चौकशी करतो."

राऊत मग सिद्धरामला घेऊन गेले. सारंग सरांनी कृष्णप्पाला चौकशीसाठी आत घेतले. त्यालाही तसेच प्रश्न विचारून बोलते करण्याचा प्रयत्न केला.

"साहेब, खरं सांगितल्यावर आम्हाला सोडून द्याल ना.?" कृष्णप्पाने घाबरतच विचारले.

"हो मग... आम्हाला सगळे खरे समजल्यावर तुम्हाला इथे ठेवून आम्ही काय करू? तू खरे सांग, मग सोडतो लगेच तुला. सिद्धराम काहीच नाही बोलला, बघ त्याचे तिकडे काय हाल सुरू आहेत. त्याचे झाले की मग तुझाच नंबर."

सारंग सरांनी कृष्णप्पाला बरोबर शब्दांच्या जाळ्यात अडकवले होते.

"नाही साहेब, मी सांगतो सगळं खरं खरं."

"बोल मग, फोटोतील दोघांना तू ओळखतोस का?"

"म्हणजे साहेब, आम्ही तसं ओळखत नाही त्यांना, पण आम्हाला त्यांच्यावर पाळत ठेवायला सांगितली होती. म्हणून आम्ही शनिवारी त्यांच्या मागे मागे गेलो होतो."

"हो का? मग कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं केलं होतं?"

"साहेब, ते नाही सांगू शकत मी तुम्हाला. आम्ही जर कोणाला काही सांगितले तर आम्हाला पण मारून टाकण्याची धमकी दिली आहे." हात जोडून कृष्णप्पा विनंती करत होता.

"बरं.. ज्यांच्यावर तुम्ही पाळत ठेवून होतात, त्यांच्याकडे गाडी होती का?"

"हो साहेब, त्या पोराची मोटारसायकल होती. तो त्या पोरीला त्याच्या गाडीवरूनच घेऊन गेला होता."

"पण तुम्ही त्यांच्यावर पाळत का ठेवून होतात.?"

"साहेब, त्या पोराला फक्त धमकावयाला सांगितलं होतं आम्हाला की, त्या पोरीचा नाद सोड म्हणून. पुन्हा त्या पोरीच्या आसपास पण फिरकायचे नाही तू. एवढेच त्याला सांगायचे होते."

"पण मग त्यांना मारून टाकायची काय गरज होती?"

"साहेब आम्ही नाय मारले त्यांना.? आम्ही तिथे होतो, हे मान्य करतो पण आम्हाला जेवढे सांगितले तेवढेच आम्ही केले."

हळूहळू कृष्णप्पाला बोलते केले सारंग सरांनी.

पण आता ज्याचे नाव सांगायला कृष्णप्पा घाबरत होता तो तिसरा व्यक्ती म्हणजे त्यातील तिसरा संशयितच असणार याची आता सारंग सरांना खात्रीच पटली होती. गोड बोलून सारंग सरांनी कृष्णप्पाकडून बरीच माहिती काढून घेतली.

क्रमशः

खरंच ती तिसरी व्यक्ती कोण होती? त्यानेच घडवून आणले असणार का हे हत्याकांड? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all