Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग १३)

Read Later
तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग १३)


मागील भागात आपण पाहिले की, रामूबरोबरच गावातील आणखी चारजणांना घटनेचे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी जाहीर केले. परंतु, चौकशीनंतर सत्य अखेर सर्वांसमोर आले आणि रामू निर्दोष आहे हे सिद्ध झाले. आता पाहुयात पुढे.

थोड्याच वेळात पाटील मॅडम  त्यांनी केलेल्या संशयित आरोपीच्या चौकशीची माहिती घेऊन हजर झाल्या.

"सर, हे त्या संशयित आरोपीचे सर्व डिटेल्स. त्याने त्या रात्री कोणाकोणाला फोन केले होते त्यांची ही यादी." सारंग सरांसमोर चौकशीचे पेपर्स धरत पीएसआय पाटील मॅडम बोलल्या.

"पण सर त्यांचा या केसशी काही संबंध असेल असे वाटत नाही. संशयित आरोपीचा मुलगा रात्री उशिरा मुंबईला जायला निघाला होता. त्यामुळे त्याला तिकडे पोहोचायला उशीर झाला. म्हणून तो वारंवार काळजीपोटी मुलाला फोन करत होता. हेच चौकशी अंती सिद्ध झाले. आम्ही स्वतः पुन्हा एकदा त्या नंबरवर फोन करून खात्री करून घेतली. पण तो आरोपी खरे बोलत असल्याचे अखेर समोर आले."

त्यानंतर सारंग सरांनी पीएसआय सचिन निघोट यांना फोन करून त्यांच्याकडील चौकशीचे डिटेल्स मागवले. पण ते चौकशी करत असलेल्या व्यक्तींचाही ह्या केसशी काहीही संबंध नसल्याचे उघड झाले. बाकी उरलेले गावातील दोन संशयितांचीही चौकशी करण्यात आली आणि योगायोगाने तेही निर्दोष असल्याचेच सिद्ध झाले.

आता हळूहळू हा तिढा उलगडत चालला होता. गावातील कोणाचाही या केसशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट होताच, आता मोर्चा उरलेल्या शेवटच्या तीन संशयित आरोपींकडे वळविण्यात आला. त्यातील एकजण देहूचा तर बाकीचे दोन कर्नाटकचे रहिवासी होते.

कुरवंडे गावातील चौकशी आटोपून पोलिसांची टीम पुन्हा पोलिस स्टेशनकडे रवाना झाली.

"हे पहा आता आपण लवकरच खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचू अशी आशा वाटते. आता सर्वात आधी आपल्याला त्या दोन संशयित आरोपींच्या कर्नाटक येथील पत्त्यावर जाऊन चौकशी करावी लागेल."

"सर जर आधी देहूच्या संशयित आरोपीची चौकशी केली तर चालणार नाही का? कारण त्याच्याकडूनच बाकीच्या दोघांची माहिती मिळण्याची शक्यता आहे."सचिन सरांनी मनात आलेला विचार बोलून दाखवला.

"अरे इतके सरळ जावून नाही चालणार. कारण याला गाफील ठेऊन त्या दोघांची आधी माहिती काढायची. याला जर आधी पकडले तर बाकीचे दोघे सावध होणार आणि एकदा का ते फरार झाले की मग हा तिढा आणखीच गुंतागुंतीचा होणार. त्यामुळे उलट पद्धतीने तपास करायचा आता."

"म्हणजे नेमकं काय करायचं सर?"

"आता उरलेल्या दोघांच्या कर्नाटक येथील पत्त्यावर जाऊन आधी चौकशी करायची. तिथे गेल्यावर यांची सर्व माहिती आपोआपच मिळेल. कारण त्या दोघांचा या तिसऱ्या व्यक्तीशी नक्कीच काहीतरी संबंध असणार. कदाचित तिघांनी मिळून हे हत्याकांड घडवून आणले असावे, ही शक्यता देखील नाकारता येणार नाही."

सारंग सरांचा तपास हा योग्य दिशेने सुरू होता. आता लवकरच मुख्य आरोपी जेरबंद होणार, याची खात्री वाटत होती सर्वांना.

त्याच दिवशी रात्री मग पोलिसांची एक टीम कर्नाटकला रवाना झाली. त्यात एपीआय भुजबळ साहेब, पोलिस नाईक कोळी आणि हवालदार शिंदे यांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कर्नाटकला पोहचले.

काही वेळातच संशयित आरोपींच्या मिळालेल्या पत्त्यावर सर्वजण पोहोचले. परंतु त्याआधी स्थानिक पोलिसांना या केसबद्दल सर्व माहिती देण्यात आली होती. नियमानुसार ते गरजेचे होते.

त्यात पुढील तपासासाठी कन्नड भाषा अवगत असणेही गरजेचे होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुढील तपास सुरू झाला. मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषा आत्मसात असलेल्या एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन पोलीस त्यातील एका पत्त्यावर पोहोचले.

घरात संशयित आरोपी सिद्धराम नाटीकर याचे आई वडिल आणि म्हातारी आजी होती.

पोलिसांना पाहताच क्षणी सर्वांना धक्काच बसला. सोबत असलेल्या स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याने सिद्धराम बद्दल चौकशी केली.

पण "तो तर मागच्या दोन महिन्यापासून आलाच नाही इकडे." अशी माहिती मिळाली.

पुण्यात तो कुठे राहायला आहे? त्याच्यासोबत आणखी कोण आहे? तो तिकडे काय काम करतो? किती वर्षे झाली तो तिकडे जाऊन? अशी सर्व बेसिक आणि महत्त्वाची माहिती भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे  त्या कर्मचाऱ्याने त्यांना विचारली.

त्यांनीही घाबरतच उत्तरे दिली. पण तो पुण्यात नेमका कुठे राहायला आहे? हे त्यांनाही माहित नव्हते. फक्त तो शिवाजी नगरच्या परिसरात राहत आहे. एवढेच त्यांना माहित होते.

"इकडे उनाडक्या करत फिरण्यापेक्षा तो तिकडे आहे तेच चांगले आहे." सिद्धरामची आई कन्नड भाषेत बोलत होती.

पण पोलीस का त्याची चौकशी करत आहे? हे कोणालाच समजेना.

त्याच्या वडीलांनी कारण विचारले, आता त्यांनाही सर्व समजणे गरजेचेच होते. त्यामुळे भुजबळ साहेबांनी, "सांगून टाका त्यांना सगळं" म्हणत त्या कर्मचाऱ्यास इशारा केला.

सर्व हकीकत समोर येताच त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली.
"इकडे काही काम करत नाही म्हणून त्याला तिकडे पाठवले, पण आमचा सिद्धू असे काही करणार नाही साहेब." बोलता बोलता त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. आई आहे शेवटी, लेकराची काळजी वाटणारच ना.

भुजबळ साहेबांनी मग त्याच्या वडिलांना त्याला ताबडतोब फोन लावायला सांगितले. ते जे जे सांगतील त्याप्रमाणे ते कर्मचारी कन्नडमध्ये रूपांतर करून त्याच्या वडिलांना सांगत होते. तोही तिकडून बोलत होता.

"अरे आपल्या शेजारचे शंकर आण्णा येणार आहेत पुण्याला, तुझा पत्ता ते मागत आहेत." असे स्थानिक कर्मचाऱ्याने भुजबळ साहेबांच्या सांगण्यावरून सिध्दरामच्या वडिलांना बोलायला सांगितले.

"शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या मरीआई माता मंदिराजवळच आमची रूम आहे. कोणालाही विचारले तर ते आणून सोडतील."
सिद्धरामने कोणताही विचार न करता लगेचच पत्ता सांगितला.

बोलता बोलता शक्य तितकी माहिती मिळवण्याचा भुजबळ साहेबांचा प्रयत्न अखेर सफल झाला.

त्यातच"माझी तब्बेत ठीक नसल्याने मी कामावर जाणार नाही आज, रूमवरच आराम करणार आहे." असेही त्याने वडिलांना सांगितले.

"आणि कृष्णप्पा बरा आहे  का रे? पोलिसांच्या सांगण्यावरून सिद्धरामच्या वडीलांनी पुढचा प्रश्न केला.

बोलता बोलता दुसऱ्या संशयित आरोपीची देखील माहिती मिळाली. सिद्धराम आणि कृष्णाप्पा दोघे मित्र पुण्याला  एक दीड वर्षापूर्वी सोबतच गेले आणि तिकडचेच झाले. शिवाजीनगरच्या आईसाहेब साडी डेपोमध्ये हे दोघेही गेल्या तीन चार वर्षांपासून काम करत होते.

अखेर पोलिसांचा अंदाज खरा ठरला. दोन्हीही संशयितांचा परस्पर संबंध असल्याचे आता स्पष्ट झाले.

भुजबळ साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता सारंग सरांना फोन करून सर्व वृत्तांत कथन केला.

हाती आलेल्या माहितीनुसार पोलिसांची दुसरी टीम तात्काळ कामाला लागली.

क्रमशः

सिद्धराम आणि कृष्णाप्पा असतील का गुन्ह्यातील मुख्य आरोपी? लागतील का ते पोलिसांच्या हाती? जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "तिढा.. गूढ मृत्यूचे."

©® कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//