पोलिस कुरवंडे गावात चौकशीसाठी पोहोचले. गावातील पाच लोक संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर होते. त्यातील एक होता रामू गुराखी.
थोड्याच वेळात पोलीस इन्स्पेक्टर सारंग देसाई, कोळी आणि पवार या कर्मचाऱ्यांसह रामूच्या घरी पोहोचले. सरपंच देखील तात्काळ हजर झाले त्याठिकाणी.
रामू गायी घेऊन रानात जायला निघणार तोच पोलीस तिथे हजर झाले. क्षणभर रामू गोंधळला. पण सारंग सरांना समोर पाहताच त्याने अदबीने त्यांना नमस्कार केला.
"सर काय झालं त्या दिवशीच्या पोरांचं? मिळाली का काही माहिती? कोणी केलं हे नेमकं काही समजलं का?"
"हो म्हणजे जवळपास समजलंच आहे."
"कोण आहेत ते? काय मिळालं त्यांना हा असा एखाद्याचा जीव घेऊन.?
"हे तू विचारतोस रामू.?"
सारंग सरांच्या बोलण्यातील रोष रामूने बरोबर हेरला आणि तो घाबरतच उत्तरला.
"म्हणजे सर, मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचंय ते."
"अच्छा! म्हणजे तुला यातील काहीच माहीत नाही तर?"
"मला कसं माहित असेल साहेब?" रामूने शांतपणे प्रतिप्रश्न केला.
"बरं आता स्पष्टच बोलतो ऐक. तू या केसमधील पहिला संशयित आहेस. त्यामुळे खरं खरं काय ते स्पष्टच सांग."
"सारंग सरांचे हे बोलणे कानी पडताच रामूने डोक्याला हात लावला आणि आहे त्याच जागी तो मटकन खाली बसला."
"साहेब पण रामू असे काही करेल असे अजिबात वाटत नाही ओ." सरपंच लागलीच बोलले.
"अहो सरपंच, पण आमच्याकडे तसा पुरावा आहे ना, त्याचं काय?"
"साहेब मी गरीब माणूस आहे ओ. हे खून बिन टिव्हीत सुद्धा पाहायला वेळ नसतो मला. आणि खरोखरचा खून मी काय करणार? साहेब तुम्हीच म्हणाला होतात ना त्या दिवशी, माणूस पाहताक्षणीच तुम्हाला कळतो म्हणून. मग आज असा आरोप का करता माझ्यावर?"
"हे बघ रामू.. हे मी नाही बोलत, हे पुरावेच असे सांगत आहेत. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे." काही कागद पुढे करत सारंग सर उत्तरले.
"साहेब, त्या एका कागदाच्या तुकड्यानं हे कसं सिद्ध केलंत ओ तुम्ही?"
"मग खरं काय ते तूच सांग स्वतःच्या तोंडाने. शनिवारी रात्री तू उशिरा कोणाला इतके फोन लावले होतेस? रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान तुझ्या नंबरवरून एव्हढे फोन कोणाला आणि कशासाठी डायल केले होतेस? आणि मुळात रोज दहालाच झोपणारा तू त्या रात्री नेमका एवढा वेळ जागा कसा काय?"
थोडा विचार करुन रामूने सगळे आठवून खरे काय ते साहेबांना सांगायला सुरवात केली.
"साहेब त्या रात्रीसुद्धा मी दहाच्या आसपासच झोपलो होतो. पण गोठ्यातल्या गायी जोरजोरात हंबरायला लागल्या. त्यांच्या आवाजाने मला जाग आली. गोठ्यात जावून पाहिले तर एक गाय गोठ्यात नव्हती ओ. माझे तर हातपायच गळाले बघा. आज लाखाच्या घरात तिची किंमत हाय ओ साहेब. अशावेळी गाय गोठ्यातून गायब झाल्यावर काय अवस्था झाली आसंल आमची? याची कल्पना पण नाही करू शकत तुम्ही."
बोलता बोलता रामूचे डोळे पाणावले.
"साहेब घाबरून याला त्याला फोन करत होतो ओ मी. माझ्यासोबत गाय शोधायला चला म्हणून हातापाया पडत होतो सगळयांच्या. आता गाय सुटून गेली की कोणी चोरून नेली? या विचारानेच मनातून घाबरून गेलो होतो मी. त्यात एक फोन या सरपचांचा पण होता. विचारा त्यांना, मी कशासाठी फोन केला ते?"
"साहेब रामू खरं बोलत आहे. त्याने त्या दिवशी केला होता फोन मला. खरंच त्याची गाय गायब होती गोठ्यातून. आम्हाला वाटलं चोर शिरला की काय गावात. त्यावेळी आम्ही जमलो देखील होतो सगळे. पाच सहा जण मिळून शेतात जाऊन शोध घेतला गाईचा. जवळपास एक तास शोधत होतो. त्याच दरम्यान गावात बरेच फोन केले रामूने."
"कशावरून खरं बोलताय तुम्ही?"
"साहेब हे घ्या माझा फोन, चेक करा यात शनिवारी खरंच रामूने मला किती वेळा फोन केले होते ते?"
सारंग सरांनी सरपंचांचा आणि रामूचा देखील फोन चेक केला तर खरच त्या रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान रामूने त्यांना बरेच कॉल केले होते. त्याबरोबरच गावातील इतर जवळच्या लोकांना देखील त्याने मदतीसाठी बोलावले होते.
"मग शेवटी गाय कुठे सापडली तुझी?"सारंग सरांनी प्रश्न केला.
"साहेब माझ्याच शेताच्या बांधावर चरत होती ती. पण शेती थोडी आडबाजूला असल्याने सापडायला थोडा उशीर झाला."
"कोळी सर्व बाबींची बारकाईने नोंद करा."
"हो सर,केली आहे." कोळी लगेचच उत्तरले.
आता रामू निर्दोष आहे हे तर जवळपास सिद्ध झालेच होते.
क्रमशः.
रामू नाहीतर मग दुसरा कोण असेल आरोपी? हा प्रश्न पुन्हा एकदा गुलदस्त्यातच राहीला? खरा गुन्हेगार कोण? जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "तिढा..गूढ मृत्यूचे."
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा