तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग ११)

रहस्य मृत्यूचे


मागील भागात आपण पाहिले की दोन्ही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. जाता जाता आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. आता पाहुयात पुढे.

"जयहिंद सर..."

"हा बोल सचिन. काय झाले?"

"सर सायबरवाल्यांचा मेल आला आहे. त्यांनी डंप डेटाची यादी  पाठवली आहे."

"अरे वा.. गुड. बरं आता एक काम कर, तू सध्या त्यावरच फोकस कर. काही ना काही कल्यू नक्कीच भेटेल. थोडे किचकट काम आहे हे वेळ लागू शकतो पण उद्यापर्यंत मला सर्व माहिती हवी आहे."

"ओके सर." म्हणत पी.एस.आय सचिन निघोट तात्काळ पुढील कामाला लागले.

पोलिस स्टेशनमधे असलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून सचिन सरांनी हाती आलेल्या डंप डेटामधून काही संशयास्पद नंबर शोधून काढले. ज्यावरून मर्डर झालेल्या रात्री बऱ्याचदा कॉलिंग केले गेले होते. असे एकूण सात की आठ नंबर होते.

आता हा तपास नक्कीच काहीतरी वेगळे वळण घेणार याची सर्वांना खात्री होती.

पुढे शोध सुरू झाला तो म्हणजे त्या फोन नंबरच्या मालकांचा. दुसऱ्याच दिवशी बरीच माहिती हाती आली. त्यातील पाच नंबर हे स्थानिक लोकांचे होते. पण उरलेले तीन नंबर मात्र भलत्याच लोकांचे होते. आता खरा संशय तर त्यांच्यावरच जास्त होता.
पण तरीही इतक्यात अंदाज बांधणे योग्य नव्हते.

"सर हाती आलेल्या माहितीनुसार हे आठ नंबर आहेत, जे जास्त संशयास्पद वाटतात. त्यातील पाच नंबर हे कुरवंडे गावातीलच आहेत आणि तीन नंबर मात्र बाहेरचे आहेत. पण सर आणखी एक शॉकिंग न्यूज म्हणजे त्यात एक नंबर रामू गुरख्याचा पण आहे. त्याच्या नंबरवरून त्या रात्री जवळपास सात ते आठ वेळा कॉलिंग झालेलं आहे."

"व्हॉट?? पण हे कसं शक्य आहे? अरे एवढ्या रात्री तो विनाकारण कोणाला इतक्या वेळा का फोन करेल?"

"सर माझेही तेच म्हणणे आहे. ग्रामीण भागातील लोक रात्री लवकर झोपतात आणि दुसऱ्या दिवशी कामाच्या काळजीने लवकर उठतात. एवढ्या रात्री फोनवर बोलणे तर सोडाच विनाकारण कोण कशाला जागेल ना?"

"सचिन आता या केसचा तिढा तर आणखीच वाढत चाललाय रे."

"नाही सर उलट आपण केसच्या आणखी जवळ जातोय असं मला तरी वाटतंय."

"अरे पण रामूसारखा व्यक्ती असे काही करेल यावर विश्वासच नाही बसत. चेहऱ्यावरून तर खूपच साधा भोळा आणि गरीब वाटला मला तो."

"सर हे असेच असते, दिसते तसे काहीच नसते आणि म्हणून तर जग फसते. हे वेड पांघरूण पेडगावला जाणारे लोकच जास्त घातक असतात."

"बरं ते बाकीचे तीन नंबर ते कोणाचे आहेत?"

"सर त्यातील एक नंबर देहू गावातील आहे आणि बाकीचे दोन नंबर कर्नाटक साईडचे दाखवत आहेत."

"आता देहूचे ठीक आहे पण कर्नाटकचे नंबर त्या रात्री त्या परिसरात काय करत होते?"

"सर जर त्यांचा आणि रामूचा काही परस्पर संबंध असेल तर?"

"असेही असू शकते की ह्या तीन नंबरचा आपापसात संबंध असेल."

"सर शक्यता नाकारता येत नाही."

"पण आता आपल्याला अलर्ट राहायला हवं. सर्वांत आधी रामूला गाठून त्याला बोलते करायला हवे आणि कुरवंडे गावातील ते इतर चार नंबर आहेत त्यांचीदेखील चौकशी करायला हवी? पाच सहा कर्मचारी घ्या सोबत त्यात पाटील मॅडम आणि एखादी लेडी कॉन्स्टेबल पण असू द्या. वेळेला त्यांचीही गरज पडेलच. बरं निघायला हवं लगेच. जास्त वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही."

"ओके सर." म्हणत पी.एस.आय सचिन सरांनी पुढील तपासासाठी एक टीम तयार केली. काही वेळातच पोलिसांची टीम कुरवंडे गावच्या दिशेने रवाना झाली."

"बरं सचिन जोपर्यंत इकडची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर नंबरशी तात्पुरता संपर्क नको करायला. कारण आरोपी जर त्यापैकी कोणी असेल तर उगीच जागा होणार आणि पोलिस पकडतील या भीतीने तो फरार होऊ शकतो."

" पण सर त्यातील दोन नंबर तर कर्नाटकचे आहेत ना?"

"हो. मग त्यात काय एवढे?

"नाही पण सर मग त्यांचे या दोन मुलांसोबत काय वैर असेल? की त्यांनी हे असे पाऊल उचलावे. आणि इतक्या लांबून ते इकडे कशासाठी आले होते?"

"अरे साधी गोष्ट आहे, ते दोघेही मूळचे कर्नाटकचे असले तरी कामानिमित्त सध्यातरी पुण्यात स्थायिक असणार, याची मला खात्री वाटते. कारण इथे जुनी दुश्मनी असण्याची तर शक्यता वाटत नाही. आणि चुकून त्यांच्या हातून एवढा मोठा गुन्हा होणे शक्य नाही. मला तरी वाटतंय की हा प्रिप्लॅन्ट मर्डर असावा. बघू आता त्यांच्या मूळ पत्त्यावर गेल्यावर त्यांचे सध्याचे पत्तेही  लवकरच सापडतील."

"हो सर, असेही असूच शकते."

"आजचा आपला संपूर्ण दिवस इकडचीच चौकशी करण्यात जाईल. पण आज या केससंदर्भात काही तरी समजायलाच हवे."

चर्चा करता करता गाडी कुरवंडे गावात कधी येऊन पोहोचली ते समजलेच नाही.

"सचिन तू शिंदे आणि जोशींना घेवून त्यातील एका पत्त्यावर जा. पाटील मॅडम तुम्ही राऊत आणि चव्हाण मॅडमला घेऊन त्यातील दुसरा नंबर ज्याचा आहे त्याच्या घरी जा. मी कोळी आणि पवारांना घेऊन रामूच्या घरी जातो."

"ओके सर."म्हणत सर्वच पुढच्या तपासासाठी सज्ज झाले."

"आणखी एक गोष्ट, त्या रात्री त्यांनी नेमके कोणाला फोन केले होते? हे वदवून घ्या त्यांच्याकडून. हळूहळू अंदाज घेऊन प्रेशर टाका. ग्रामीण भाग आहे, भीतीपोटी लोक सहजासहजी बोलते होणार नाहीत. पहिल्याच झटक्यात जास्त प्रेशर टाकू नका. गोड बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न करा."

"येस सर." म्हणत सर्वचजण आपापल्या कामाला लागले.

क्रमशः

खरंच यात रामूचा हात असेल का? की आणखी कोणाचा? जाणून घेण्यासाठी वाचत राहा "तिढा.. गूढ मृत्यूचे.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all