तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग ९)

रहस्य मृत्यूचे


मागील भागात आपण पाहिले की, त्या दोन्ही मृतदेहांची फायनली ओळख पटली. त्यांच्या घरीदेखील त्यांच्या मृत्यूची बातमी पोहोचली. आता पाहुयात पुढे.

सारंग सरांनी मग पार्थच्या अगदी जवळचे जे मित्र होते त्यांना बोलावून घेतले चौकशीसाठी.

त्याचे कॉलेजमध्ये कोणाशी काही भांडण होते का? याची सर्वात आधी माहिती काढणे गरजेचे होते. कारण सुडाच्या भावनेतून देखील हा प्रकार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

"पार्थचे कोणाशी वैर असणे शक्यच नाही सर. तो अत्यंत शांत, सुस्वभावी आणि मनमिळाऊ मुलगा होता. एकदा का एखाद्याशी नाते जोडले की मग त्याच्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असायची. अगदी हसून खेळून राहायचा तो सर्वांसोबत."

पार्थचा अगदी जवळचा मित्र निशांत लोखंडेने माहिती दिली.

निशांत आणि पार्थ दोघेही रुममेट होते. वेदांत शिंदे हाही त्यांचाच रूममेट होता. त्यानेही पार्थबद्दल अगदी हेच मत वर्तवले.

"बरं, त्या दिवशी तो कुठे जाणार होता याबद्दल तुम्हाला काही माहिती होती का?"

"हो सर तो हडपसरच्या त्याच्या मावशीकडे जाऊन येतो, असे सांगून शनिवारी सकाळी साडे अकराला हॉस्टेलमधून बाहेर पडला होता."

" त्याच्या मावशीचा पत्ता, काँटॅक्ट नंबर वगैरे काही माहिती आहे का तुम्हाला?"

"नाही सर."

"बरं सायलीचे आणि त्याचे अफेअर वगैरे सुरू होते, याची कल्पना होती का तुम्हाला?"

"हो सर, तो खूप मोकळेपणाने बोलायचा सायलीबद्दल आमच्याशी. आम्हीही त्याला तिच्यावरून चिडवायचो. आणि त्यालाही हे सर्व आवडायचे. लग्न करेल तर सायलीशीच हे तो वारंवार बोलायचा."

"आता इतके काही तो तुमच्याशी शेअर करायचा म्हटल्यावर त्या दिवशी तो कुठे जात आहे हे का सांगितले नाही त्याने तुम्हाला? आणि तो रूमवर परतला नाही म्हटल्यावर तुम्ही काँटॅक्ट का नाही केला त्याला?"

"माहित नाही सर त्याने आम्हाला का सांगितले नाही. पण तो जायचा अधूनमधून त्याच्या मावशीकडे. शनिवारी जायचा आणि सोमवारी कॉलेजच्या वेळात हजर व्हायचा. आम्हाला वाटलं येईल तो वेळेत पण नाही आला."

आता बरीचशी माहिती हाती लागली होती पोलिसांच्या. बरेचसे अनुत्तरीत प्रश्न आता सुटणार होते. पुढील तपासाला आता खऱ्या अर्थाने दिशा मिळाली होती.

"बरं सर, तुम्ही खूप सहकार्य केले आम्हाला त्याबद्दल तुमचा आभारी आहे. यापुढेही तुमची मदत लागणार आहे. तेव्हाही असेच सहकार्य करावे ही विनंती."

सारंग सरांनी बनसोडे सरांना रिक्वेस्ट केली आणि त्यांचे आभार मानले. त्यांचा निरोप घेवून पोलिसांची टीम पुन्हा लोणावळ्याच्या दिशेने रवाना झाली.

तितक्यात घटनास्थळी चौकशीसाठी गेलेल्या पी.एस.आय सचिन निघोट यांचा सारंग सरांना फोन आला.

"जयहिंद सर, सर आम्ही जाऊन आलो घटनास्थळी. पुन्हा एकदा सर्व परिसर नजरेखाली घातला आणि आताच डंप डेटासाठी सायबरला मेल केला आहे. उद्यापर्यंत मिळून जाईल सर्व माहिती."

"गुड सचिन, आम्हीदेखील येतच आहोत तिकडे. दोन्ही मृतदेहांची ओळख देखील अखेर पटलेली आहे. त्यांचे घरचेही पोहोचतीलच पुढच्या दोन तासात."

"ओके सर." एवढे बोलून फोन ठेवला गेला.

पोलिसांची टीम लोणावळ्याला पोहोचली. त्यानंतर साधारणपणे एक ते सव्वा तासात सायलीचे नातेवाईक हजर झाले. पार्थच्या घरच्यांना यायला थोडा उशीर होणार होता. कारण नगर ते लोणावळा अंतर साधारणपणे तीन ते साडे तीन तासांचे.

सायलीचे बाबा, काका, आत्या, मामा आणि त्यांच्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती सोबत आले होते.

लेकीचा मृतदेह उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे धाडस त्या बापामध्ये नव्हते. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकीला आज अशा अवस्थेत पाहताना बापाचे काळीज तीळतीळ तुटत होते.

सरकारी दवाखान्याच्या आवारात सुरू असलेला आक्रोश आसमंती भिडला होता. "सावरा स्वतःला" म्हणण्याचे धाडस देखील कोणात नव्हते. ध्यानी मनी नसताना हे असे काही घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते कोणाला.

महिन्याभरापूर्वी लेक गावी आली होती. तेवढीच काय ते घरच्यांची आणि तिची भेट.

"सायली, अगं उठ ना बाळा. बघ तरी डोळे उघडून, कोण कोण आलंय तुला घ्यायला?" लेकीला पाहताच बापाच्या भावनांचा बांध तुटला. अश्रूंनी तर परिसीमाच गाठली.

उपस्थितांच्या काळजाचा तर ठोकाच चुकला. सायलीच्या बाबांची ही अवस्था पाहून प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघत होते. ज्या हातांनी लेकीचे बालपण जपले, तिचा प्रत्येक हट्ट पुरवल, त्याच हातांनी आज लेकीचे पार्थिव उचलावे लागणार होते त्या कमनशिबी बापाला. 

गावी तर सायलीच्या आईची अवस्था याहूनही वाईट झाली होती. दोन मुलांच्या पाठीवर झालेली ही लाडाची लेक. लेकीला पाहण्यासाठी ती माऊली आतुर झाली होती.

सकाळपासून लेकीच्या काळजीत अन्नाचा एक घासही कोणाच्या घशाखाली उतरला नव्हता. "मीही येणार तुमच्यासोबत माझ्या सायलीला भेटायला," म्हणत आईने टाहो फोडला आणि जागेवरच भोवळ येवून आई खाली कोसळली. दोन्ही मुलांनी मग आईला दवाखान्यात भरती केले. वडिल इतर नातेवाइकांना सोबत घेऊन पुण्याला रवाना झाले.

"सुट्टी आहे तर येऊन जा ना ग बाळा घरी." आईने लेकीला आग्रह केला होता पण "पुढच्या आठवड्यात मी नक्की येईल आई" म्हणत सायलीने गावी जाण्याचे टाळले होते. कदाचित तिच्या नशीबाची साथ इथपर्यंतच असावी. काही गोष्टी ठेवूनही टाळता येत नाहीत. हे अखेर सिद्ध झाले.

हा हा म्हणता बातमी गावभर पसरली. भोर तालुक्यातील बारे खुर्द गाव शोककळेत बुडाले. ग्रामीण भागातून मुलगी पुण्यात शिकायला गेली. सर्वांना खूपच अभिमान होता सायलीचा. शाळा कॉलेजात हुशार असणाऱ्या सायलीचा स्वतःच्या हिमतीवर आणि मेरीटमधून पुण्यातील ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये नंबर लागला होता. आता थोडेच दिवसांत डिग्री पूर्ण करून ती घरी परतणार होती. पण त्याआधीच हे असे होऊन बसले होते.

क्रमशः

सायलीच्या घरच्यांची ही अशी अवस्था होती, आता पार्थच्या घरच्यांची काय रिॲक्शन असेल? कारण त्यांना तर ह्या गोष्टीची जराही कल्पना नव्हती. आता नेमके काय होणार पुढे? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all