तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग ६)

हत्या की आत्महत्या? रहस्य मृत्यूचे.


मागील भागात आपण पाहिले की पी.एम.च्या प्राथमिक अहवालानुसार हे सिद्ध झाले की त्या तरुण आणि तरुणीची आत्महत्या नसून ती एक हत्या आहे. आता पाहुयात पुढे.

सोमवारची सकाळ म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी अत्यंत खळबळजनक सकाळ होती. गाव, दुकाने, हॉटेल्स, बस, स्टेशन सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळत होती आणि ती म्हणजे कालच्या त्या फाशीची.

"लोणावळा गावापासून सहा किमी अंतरावर असलेल्या कुरवंडे गावच्या हद्दीतील डोंगर भागात निर्जन स्थळी अंदाजे बावीस वर्षीय तरुण तरुणीचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत. दोन्हीही मृतदेहांची अजूनतरी ओळख पटलेली नाही. मृत तरुणीच्या अंगावर गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि डार्क काळया रंगाची जीन्स पँट असून मृत तरुणाच्या अंगावर पांढरा टी शर्ट आणि डार्क निळ्या रंगाची जीन्स पँट आढळून आली आहे.
दोन्ही मृतदेह लोणावळा सरकारी ग्रामीण रुग्णालयात पोस्ट मॉर्टेमसाठी पाठविण्यात आले आहेत.

दोन्ही तरुण तरुणी पुण्यातील कॉलेजमध्ये बाहेरगावावरून शिकायला आलेले असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडलेला असावा. रविवारी सकाळी साधारणत: अकराच्या सुमारास एक गुराखी गुरे चारण्यासाठी त्या भागात गेला असता हे दृश्य त्याच्या दृष्टीस पडले.
तरी ही आत्महत्या की हत्या? हे अजूनतरी उघडकीस आलेले नाही.

मृत तरुण तरुणीविषयी कोणास काही माहिती असल्यास खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा."

पोलिसांना जरी समजले असले की ती आत्महत्या नसून हत्या आहे तरी न्यूजमध्ये मात्र याचा स्पष्ट उलगडा नव्हता. कारण रात्री उशीरा पी.एम.अहवाल पोलिसांच्या हाती आला आणि बातमी मात्र त्याआधीच पत्रकारांच्या हाती दिली गेली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सातच्या दरम्यान लोणावळा पोलिस स्टेशनचा फोन खणाणला.
नाईट ड्युटीवर असलेल्या लेडी कॉन्स्टेबल धोत्रे यांनी फोन उचलला.

"हॅलो, कोण बोलतंय?"

"लोणावळा पोलिस स्टेशन का?"

"हो, बोला."

"मॅडम काल ते दोन मृतदेह तुम्हाला सापडले आहेत त्याविषयी थोडी माहिती हवी होती."

"पण तुम्ही कोण बोलत आहात?"

"मॅडम मी देखील एका मुलीचा बाप आहे ओ. माझीही मुलगी पुण्यात शिकायला आहे. पण शनिवापासून तिच्याशी काहीच बोलणे झाले नाही. आणि कालपासून तर तिचा फोन सारखा बंद लागतोय. मनातून खूप भीती वाटली म्हणून न राहवून फोन लावला. त्यात पेपरमधील फोटो स्पष्ट दिसत नसल्याने काहीही कळायला मार्ग नाही."

"सर्वात आधी तुम्ही तुमचे आणि तुमच्या मुलीचे नाव, ती कोणत्या कॉलेजमध्ये शिकायला होती? त्या कॉलेजचे नाव आणि तुमचा पत्ता या सर्व गोष्टी मला सांगा."

"मॅडम माझे नाव राजेंद्र सखाराम सुर्वे. माझ्या मुलीचे नाव सायली राजेंद्र सुर्वे. आमचे मूळ गाव भोर तालुक्यातील बारे खुर्द. माझी मुलगी कृषी महाविद्यालय, गणेशखिंड, शिवाजीनगर पुणे येथे चौथ्या वर्षात शिकत आहे."

"शेवटचे कधी बोलणे झाले होते तुमचे तुमच्या मुलीसोबत?" लेडी कॉन्स्टेबल धोत्रे यांनी पुढचा प्रश्न केला. एकीकडे फोनवरील सर्व संभाषण नोट करून घेतले जात होते.

"मॅडम, शुक्रवारी दुपारी तिने तिच्या आईला फोन केला होता. दोन दिवस जोडून सुट्ट्या आल्यामुळे तिची आई तिला घरी येऊन जा, म्हणून आग्रह करत होती. पण, \"कालच माझी परीक्षा संपली त्यामुळे मला मित्र मैत्रिणींसोबत एन्जॉय करायचे आहे, मी पुढच्या आठवड्यात नक्की येईल घरी.\" असेही तिने तिच्या आईला सांगितले होते.
त्यातच \"आई आता दोन दिवस माझ्या फोनची काही तू वाट पाहू नकोस. वेळ मिळाल्यावर मीच करेल तुला फोन.\" असे सांगून आणि आमची खुशाली विचारुन तिने फोन ठेवला.
तरी आईचेच मन, न राहवून  काल तिच्या आईने तिला फोन केला होता पण तो लागलाच नाही. गेली असेल ही मैत्रिणींसोबत सिनेमाला वगैरे म्हणून मग आईनेही समजून घेतले. आणि आता बातमी वाचून आम्ही खूप वेळा तिला फोन लावला पण अजूनही फोन बंदच लागतोय."

"बरं काका तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही लगेच चौकशी करून तुम्हाला याच नंबरवर पुन्हा फोन करतो. घरातील अजून कोणाचा नंबर असेल तर तोही देऊन ठेवा. ऐनवेळी नाहीच हा नंबर लागला तर मग कामी येईल."

त्या काकांनी मग त्यांच्या पत्नीचा नंबर दिला.

"मॅडम लवकरात लवकर शोधा ओ. खूप काळजी लागली आहे जीवाला. देव न करो आणि ती आमची सायली असो. जोपर्यंत आमचे तिच्याशी बोलणे होत नाही तोपर्यंत आमचे कशातच मन लागणार नाही."

"हो काका नक्की, आम्ही लवकरात लवकर शोधून काढतो आणि काही समजलेच तर तुम्हाला फोन करतो. तोपर्यंत तुम्ही तिच्या जवळच्या कोणी मैत्रिणी असतील आणि तुमच्याकडे जर कोणचा नंबर असेल तर त्यांना फोन करून विचारुन घ्या."

"अहो मॅडम आम्ही केला होता तिच्या मैत्रिणीला फोन पण तिचाही नंबर बंद लागतोय. त्यांनतरच मग तुम्हाला फोन केला मी."

"बरं, चालेल..पण तुम्ही काळजी करू नका आम्ही कळवतो लवकरच तुम्हाला."

क्रमशः

असेल का ती त्या काकांचीच मुलगी? की निर्माण झालेला हा तिढा आणखीच गुंता वाढवत जाणार? जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भाग.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all