पी. एम्.(पोस्ट मॉर्टम) चा अंतिम अहवाल यायला जरी उशीर होणार असला तरी त्या दोघांचा मृत्यू कसा झाला हे डॉक्टरांनी पी.आय. सारंग देसाई यांना बारकाईने समजावून सांगितले.
"हे पहा सर, पी.एम. च्या प्राथमिक अहवालातून तर असं समजतंय की, मृत्यूच्या काही वेळापूर्वी त्या मुलीवर अतिप्रसंग झालेला होता. त्यानंतर तिचा गळा आवळण्यात आला आणि त्यातच तिचा जीव गेला."
"डॉक्टर म्हणजे ही आत्महत्या नसून हत्या आहे तर?" आश्चर्यकारकरित्या सारंग सरांनी प्रश्न केला.
"हो...कारण फासावर लटकविण्यापूर्वीच तिचा जीव गेला होता हे स्पष्ट होतंय."
"आणि त्या मुलाचे काय?"
"त्याच्या सोबत सुद्धा हेच झाले आहे. त्याचीही अगोदर गळा दाबून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यालाही फासावर लटकविण्यात आले. दोघांचीही हत्या अंदाजे पाच दहा मिनिटाच्या फरकाने झालेली आहे. आधी त्या मुलीचा जीव गेला त्यानंतर त्या मुलाचा. साधारणपणे रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे.
"थँक्यू डॉक्टर, अहो सकाळपासून एकही धागादोरा हाती लागेना.त्यात शहरात मागच्या एक दोन दिवसांत एकही मिसींग कंप्लेंट दाखल झाली नाही. त्यामुळे हा तिढा आणखीच वाढत गेला. मुलीवर रेप झाला, हा अंदाज होताच आम्हाला. परंतु,आधी त्या मुलाने हा रेप करून तिला फासावर लटकवून नंतर स्वतः फाशी घेतली असावी. असेच वाटत होते पाहताक्षणी तरी. पी.एम. रिपोर्टमुळे आता या केसला एक नवी दिशा तरी मिळाली."
"चला डॉक्टर येतो आम्ही आता. तुमच्या सहकार्याबद्दल खरंच खूप आभार. काही मदत लागलीच तर करतो कॉल." वे
"ओके सर, नो प्रॉब्लेम.. केव्हाही फोन करू शकता तुम्ही."
डॉक्टरांकडून प्राथमिक अहवालाची एक प्रत घेवून पोलिसांची टीम पोलिस स्टेशनकडे रवाना झाली.
तपास आता एक एक टप्प्याने पुढे सरकत होता. दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार होता. एकदा का वर्तमान पत्रात ही न्यूज आली की मग त्या मुलीच्या आणि मुलाच्या घरच्यांचा शोध लागेल आणि अजून बरीच काही माहिती समोर येईल.
दिवसभराचे सर्व काम मार्गी लावता लावता रात्रीचे अकरा साडे अकरा झाले होते. ऑन ड्युटी असणारे सर्वजण आता खूपच थकले होते.
"चला आता सगळे घरी गेले तरी चालतील. सर्वांनाच आरामाची गरज आहे. उद्या पुन्हा कसून तपासाला लागावे लागेल. त्यामुळे आराम करा आता सगळे. शिंदे तुम्ही थांबा फक्त पाच मिनिट, बाकीचे गेले तरी चालतील."
"शिंदे आज नाईट ड्युटीचा आणि नाईट राऊंडचा टर्न कोणाचा आहे? पाहा बरं एकदा."
"सर आज लेडी कॉन्स्टेबल कांबळे आणि लेडी कॉन्स्टेबल धोत्रे या आहेत नाईट ड्युटीवर. तसेच ड्रायव्हर काळे आणि पी.एस. आय. सचिन निघोट सर आहेत नाईट राऊंडसाठी.
"बोलवा बरं आधी त्या दोघींनाही."लागलीच शिंदेंनी मग दोघींनाही सरांचा निरोप पोहोचविला.
"येस सर."
"हे पहा कांबळे आणि धोत्रे, रात्री या केसशी संबंधित कोणाचा काही फोन आला तर मला लगेच इन्फॉर्म करा. कोणताही हलगर्जीपणा नको आहे मला."
" ओके सर."
"नाईट राऊंडची गाडी रवाना झाली नाही ना अजून?"
"अजून नाही सर, होईलच पण थोड्या वेळात."
"बरं निघोट सर ड्युटीवर हजर झाले असतील तर त्यांना मी बोलावलंय म्हणून सांगा बरं."
"सर गाडी डायरेक्ट त्यांच्या घराकडून त्यांना पिक करून पुढे जाते नेहमी त्यामुळे सर पोलिस स्टेशनला नाही येत नाईट राऊंडच्या वेळी."
"बरं, बरं...जा तुम्ही मी फोनवर बोलून घेतो त्यांच्याशी."
सारंग सरांनी लागलीच पी.एस.आय सचिन निघोट यांना फोन लावला.
"हॅलो..जयहिंद सर."
"हे बघ सचिन आज ज्या ठिकाणी हे मृतदेह आढळले त्या परिसरात एक राऊंड घ्या. बारकाईने तो परिसर पुन्हा एकदा नजरेत घाला. रात्रीच्या सर्व हालचालींवर थोडे बारीक लक्ष ठेवा. चुकूनही काही हालचाली जाणवल्या तर लगेच आम्हाला इन्फॉर्म करा. गरज वाटत असेल तर सोबत एखादा कर्मचारी असू द्या, आज तरी. आज कोणाची सुट्टी होती पाहा आणि त्यांना न्या सोबत."
"ओके सर."
सर्व काम मार्गी लावून सारंगसर आणि तपास कार्यातील ऑफिसर आणि कर्मचारी देखील घरी गेले. सकाळपासून सगळेच शिणले होते. कधी एकदा अंग टाकतो असे झाले होते सर्वांना. त्यात एवढा उशीर झाला तरी पोटभर जेवणही मिळाले नव्हते कोणालाच. वडा पाव, चहा बिस्कीट, भजी यावरच दिवस काढला होता सर्वांनी.
ही मध्येच अशी एखादी केस आली की मग पूर्ण वेळ त्यात कसा जायचा ते समजायचेदेखील नाही. तहानभूक विसरून फक्त केसवर फोकस करावा लागत होता.
थोड्याच वेळात रात्रीची नाईट राऊंडची गाडीही रवाना झाली.
आता प्रतिक्षा होती ती म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्राची. एकदा का बातमी सर्वत्र पसरली की मग पुढच्या तपासाला नवी दिशा मिळणार होती.
क्रमशः
आता अजून कोणते वळण घेणार ही मर्डर केस? जाणून घ्या पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा