Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिढा..गूढ मृत्यूचे (भाग १)

Read Later
तिढा..गूढ मृत्यूचे (भाग १)


"गुड मॉर्निंग सर.."

"अरे शिंदे, आलात तुम्ही. गुड मॉर्निंग.. गुड मॉर्निंग. बरं आता कशी आहे तुमच्या आईची तब्बेत?"

"हो सर आता पहिल्यापेक्षा बरीच सुधारणा आहे."

"अरे वा! छानच की मग. चला, सकाळ सकाळ एकदम छान बातमी दिलीत. आता लागूयात कामाला."

"हो सर, पण त्याआधी तुमचे आभार मानायचे होते. रहावले नाही म्हणून आलो सर तुमच्याशी बोलायला."

"हे अगदी छान केलंत  तुम्ही." सरांनीदेखील हातातील फाईल बाजूला ठेवत हसतच प्रतिसाद दिला.

"सर तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्या आणि माझी सुट्टी मंजूर केलीत, त्यासाठी मनापासून आभार सर. तुम्ही जेव्हापासून इथे आलात ना सर तेव्हापासून या पोलिस स्टेशनचे चित्रच अगदी पालटून गेले आहे बघा."

"अरे! बस झालं आता हे आभार प्रदर्शन. माणूसच आहोत आपण. पोलिसांना देखील भावना असतात. आज एक केस सॉव्ह झाली तर उद्या दुसरी आहेच पुन्हा उभी. त्यात प्रत्येकाचे फॅमिली प्रॉब्लेम्स ते वेगळेच. मग आपणच एकमेकांना समजून नको का घ्यायला? एकजुटीने काम केले तर वेळेचीही बचत होते आणि कामाचा उत्साहदेखील वाढतो."

अगदी नम्रपणे सर उत्तरले आणि सरांचाही हा फंडाच होता. सगळी कामे जर सुरळीतपणे पार पाडायची असतील तर कनिष्ठ लोकांना कोणालाही त्रास न देता अगदी सराईतपणे त्यांच्याकडून काम करुन घेणे. हे करत असताना एकमेकांचे प्रॉब्लेम्स समजून घेऊन त्यांची मानसिकता जपणे कोणी सरांकडून शिकावे. लोकही त्यामुळे त्यांना खूप मानत होते. एकीने काम करण्यास मग सगळेच नेहमी सज्ज असायचे.

पोलिस इन्स्पेक्टर "सारंग देसाई." पोलिसी क्षेत्रातील एक नावाजलेली हस्ती. हातात एखादी केस आली की तिचा तिढा सोडवल्याशिवाय काही चैनच पडायची नाही साहेबांना. जेमतेम सहाच महिने झाले असतील त्यांना लोणावळा पोलिस स्टेशनला बदली होवून.

गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात सरांनी तब्बल तीन वर्षे काढली होती. पण आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्यांनी स्वतःची एक वेगळीच छाप निर्माण केली होती.

त्यातच सर्वांशी अगदी खेळीमेळीचे संबंध. परंतु, कामात थोडीही कसूर झालेली सहन व्हायची नाही सारंग सरांना. त्यामुळे सर्वचजण त्यांच्या अगदी आज्ञेत होते.

तेवढ्यात पोलिस स्टेशनचा फोन खणाणला.

ठाणे अंमलदार पवार यांनी फोन उचलला. तसे सगळ्यांचेच कान टवकारले गेले.

"शिंदे, पाहा बरं कोणाचा फोन आहे?"

तेवढ्यात पवार धावतपळत सारंग सरांच्या केबिनमध्ये आले.

"सर इथून सहा किमी अंतरावर असलेल्या कुरवंडे गावच्या हद्दीतील एका निर्जन स्थळी डोंगर भागात एक युवक आणि युवतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे." एका श्वासात पवारांनी मिळालेली बातमी सारंग सरांसमोर कथन केली.

"नक्की फोन कुणाचा होता पवार?"

"सर कुरवंडे गावच्या पोलिस पाटलांचा फोन होता. स्थानिक एक गुराखी घटनेचा प्रथमदर्शनी साक्षीदार आहे. गुरे चरायला नेण्याचा रोजचाच त्याचा हा दिनक्रम. अंदाजे साडे अकराच्या सुमारास त्याला ही घटना दृष्टीस पडली."

"बरं बरं..मला गावच्या पोलिस पाटलांचा आणि सरपंचांचा फोन नंबर द्या, ताबडतोब.

"ओके सर" म्हणत पवारांनी दोन मिनिटातच दोन्ही नंबर सरांना दिले.

"मोमीन गाडी काढा पटकन्. लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचणे गरजेचे आहे. शिंदे, राऊत, कोळी आणि जोशी तुम्ही चला माझ्यासोबत. पाटील मॅडम तुमचीही गरज पडणार आहे, तुम्हीही तयार राहा. हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांना पण घ्या सोबत. त्यांची मदतच होईल तुम्हाला.

"ओके सर" म्हणत पी.एस.आय. पाटील मॅडम सज्ज झाल्या.

सकाळपासून अगदी शांततेत सुरू झालेला पोलिस स्टेशनचा  दिनक्रम असा अचानक गडबड गोंधळात बदलला.

"नेमकी सुसाईड केस असेल की मर्डर केस?" मनात विचारांचे काहूर उठले होते प्रत्येकाच्या. सारंग सरही विचारांत गुंतले होते.

गाडीत बसताच त्यांनी गावच्या पोलिस पाटलांना फोन डायल केला.
"गावातील कोणी तरुण तरुणी मिसिंग आहेत का?"

"नाही सर, गावात तर कोणतीही मिसिंग केस नाही."

"मग तुम्हाला इतर काही शंका वाटते का?"

"सर मला असं वाटतंय ही मुले पुण्यातील कॉलेजमध्ये असावीत शिकायला. शनिवार रविवार जोडून सुट्टी आल्यामुळे आले असतील नागफणी येथे ट्रेकिंगसाठी किंवा मग लोणावळा परिसर फिरण्यासाठी."

"ओके ओके. आम्ही पोहोचतोच दहा मिनिटात. तोपर्यंत घटनास्थळी जास्त गर्दी होऊ देऊ नका. शक्यतो सामान्य कोणालाही तिकडे फिरकू देऊ नका."

"हो सर." म्हणत गावच्या पोलिस पाटलांनी फोन ठेवला.

"राऊत काय वाटतं तुम्हाला? सुसाईड असेल की मर्डर?"

"सर आता प्रत्यक्ष बॉडी पाहिल्याशिवाय कसे कळणार ना? पण तरीही मला वाटतं सर ही सुसाइड केस असावी. आजकालच्या तरुण तरुणींना मरण म्हणजे अगदी सोप्पं झालंय ओ." राऊतांनी त्यांच्या मनातील शंका बोलून दाखवली.

"नाहीतर काय. शहरात यायचं शिकायला आणि शिक्षणाच्या नावाखाली ही अशी प्रेम प्रकरणं करायची. घरच्यांनी नाही मान्यता दिली की मरण हा बेस्ट ऑप्शन आहे आजकालच्या तरुणाईसमोर. नाहक जिवानिशी जातात ते आणि ताप मात्र आपल्या डोक्याला वाढवून ठेवतात."
न राहवून हवालदार जोशींनी देखील त्यांच्या मनातील शक्यता वर्तवली.

"अरे मागच्या दोन महिन्यांतील ही तिसरी केस आहे. काय मग शिंदे, मी इथे आल्यापासून जरा जास्तच सुसाइड आणि मर्डर केस वाढल्या राव या भागात. माझा पायगुण काही चांगला नाही वाटतं?"

सारंग सरांच्या गमतीशीर विधानावर सर्वचजण हसले. इतक्या तणावयुक्त वातावरणात थोडा हलकेपणा आला त्यामुळे.

"नाही ओ सर, काहीही काय? उलट तुम्ही आल्यापासून पहिल्यांदा प्रत्येक केसचा तिढा सुटतोय, अगदी सहज." हवालदार शिंदे उत्तरले.

क्रमशः

कोण असतील ते तरुण तरुणी? त्यांनी नेमकी आत्महत्या केली की हत्या झाली त्यांची. नेहमीप्रमाणे सारंग सर हॅण्डल करू शकतील का हीदेखील केस? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

(वरील कथा पुर्णपणे काल्पनिक असून त्यातील घटना, पात्र, स्थळ, काळ याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. फक्त मनोरंनात्मक दृष्टीकोनातून ही कथा लिहिली गेली आहे. चुकून वास्तवाशी काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//