...तिच्या मनासारखं !

प्रत्येकीला भावेल अशी सुंदर पैठणी सारखी रेशीम कथा!

आज कपाट आवरताना जुन्या फोटोंचा अल्बम सापडला. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना अत्यंत लाडका फोटो समोर आलाच, सोळा वर्षांपूर्वीचा. मांडीत घेतलेला सव्वा महिन्याचा सुदृढ हसरा कान्हा, हिरवीगार पैठणी, डायमंडचे कानातले आणि फुललेल्या चेहर्यावरचे कृतार्थ भाव. पहिल्या मुलाच्या बारशाला तिने हौसेने ठरवलेला हॉल, उत्तम कॅटरिंग, कान्ह्याला आईकडे सोपवून एका तासात घाईघाईने एकटीने केलेली पैठणी खरेदी.. किती तरी दिवसांनी होत होतं अगदी तिच्या मनासारखं!

***

चौविसावं लागलं तेव्हाच तीचं लग्न ठरलं. घरातलं पहिलच कार्य. आज्या, मावश्या, आत्या , काका , काकू सगळ्यांच्या उपस्थितीत साखरपुड्याची, लग्नाची तारीख ठरली. महिन्याभरात साखरपुडा पुढच्या दोन महिन्यांनी लग्न.

“अगं ह्या रविवारी सकाळी साखरपुड्याची साडी घ्यायला जा तुम्ही दोघं. तुझ्या आवडीची घे छान!”

”उत्सव मध्ये जावू?”

“हो जा ना!” तिची कळी खुलली. दागदागिन्यांची, कपड्यालत्तायाची तिला फार हौस होती असं नाही. पण ती चिकित्सक मात्र होती.

आई-आजी सुद्धा, “वा वा! मंडळी हौशी आहेत, साखरपुड्याची साडी ती काय? पण तरीही मुलीच्या आवडीचा विचार.

”रविवारी सकाळी दोघांनी जावून छान मरून रंगाची वल्कलम् घेतली. दुपारी सासूबाईंच्या फोन

“अगं, ताई आलिये तर जरा संध्याकाळी दुकानातच भेट.”

दुकानात, “मरून रंगाचा ना जनरली शालू घेतात लग्नात !”

” बघू हो जरा अजुन साड्या” हो नाही करत मरुन वल्कलम् कॅन्सल होऊन शेवटी मोरपिशी रंगाची साडी फायनल झाली. म्हणा तशी ही पण चांगली होती.

“पुढच्या रविवारी अंगठी आणि दागिने करायला टाकूयात, छगनलाल & सन्स मधे भेटूया. तुझ्याच पसंतीने करु सगळं”

”संस्कृतीमध्ये का नाही? तिकडे किती छान डिझाईन्स असतात. छगनलाल काय पकाऊ,” घरी आल्यावर तिची कुरकुर सुरू झाली.

“अगं सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी सगळे आपल्या विश्वासू सोनाराकडेच करतात. समजून घे ना जरा” आईची दटावणी.

छगनलाल आणि सन्स मधे सगळी जुनी ढबोळी डिझाईन्स, काय आणि कसं सिलेक्ट करावं?

” मंगळसूत्र चांगल घसघशीत घे नाही तर नाजूक डिझाईनचं अडकून वाढवतं.” ताई उवाच

लंगेच त्यातल्या त्यात आवडलेलं झिरो साइझ मण्यांचं साधसं मंगळसूत्र तिला नाईलाजाने ठेवून द्याव लागलं.

”बांगड्या सहा तोळ्यांच्या करुन टाका” हिशोबाल्या पक्क्या सासूबाईंची सोनाराला सुचना.

”डायमंड, स्टोन्स लाभतं नाही लाभत नकोच ते. तू आपली सोन्याचीच अंगठी घे.” मला अजून एक सूचना.

”‘किती ते नाजुक डिझाईन, चांगली घसघशीत करा हं अंगठी” ही सूचना सोनाराला.

शेवटी तीन तासांनी सगळ्यांच्या सोयीनुरुप (ठसठशीत, घसघशीत आणि बोजड) दागिने खरेदी आटोपल्यावर,” काय खुश ना?” ” वा! वा! छान मनासारखी झाली ना खरेदी? ” ह्या सासू-नणंदेच्या अवघड प्रश्नांना “कोणाच्या?” हा (खोचक) प्रतिप्रश्न गिळून टाकताना तिची झालेली तारांबळ . आठवणींने सुद्धा हसू आल चेहर्यावर.

***

आता मुख्य खरेदी साड्यांची!

मस्त हिरवीगार पैठणी, आंबा कलरचे काठ, पदरावर नाचरा मोर मनात चित्र पक्कं होतं.

”उत्सव मधेच जायचं ना?” तिचा उत्साही प्रश्न.

“छे छे. मस्त दादरला जाऊयात. ताईचं स्पेशल दुकान आहे मोठं नेहमीचं. तुला पण आवडतील बघ तिकडे साड्या.”

ती, सासूबाई, ताई, चुलतताई आणि एक-दोघी पोहोचल्या दादरच्या त्या तीन मजली दुकानात. धीर करून तिने सुतोवाच्य केले, “मला शालू नकोय, पैठणी घ्यायचीय.”

” अगं पैठणी काय कधीही घेशील, खूप निमित्तं मिळतील नंतर. आत्ता मस्त शालूच घे.”” नंतर कधीतरी कारण काढून घेण्यापेक्षा आता माझ्या लग्नात माझ्या आवडीचं घेऊ देत ना मला…”वगैरे वगैरे मनातील वाक्य ओठावर काही पटकन आली नाहीत.

तोपर्यंत ताईच्या सांगण्यावर हुकूम दुकानदाराने शालू दाखवायला सुरुवात केली. ते भरजरी मोठे काठ, मोठे बुट्टे काहीच पसंतीस येईनात. कंटाळून जरा बाजूला नजर टाकली तर बाजूच्या गिऱ्हाईकाला दाखवत असलेला एक हिरवागार शालू त्याचे अगदी नाजूक छोटे काठ आणि अंगभर विखुरलेल्या छोट्या चांदण्या अगदीच मनात भरल्या. हळूच किंमत बघितली, अरे बापरे आता बघत असलेल्या साड्यांच्या दुप्पट किंमत आहे. “कोणाकडे काही मागायचे नाही, उगाच हावरटपणा करायचा नाही” हेच बाळकडू मिळाल्याने ती पटकन वळून परत ह्या घोळक्यात सामिल झाली. मग उगाच आपला त्यातल्या त्यात बरा निळा जर्द शालू घेतला. इतर खरेदी ही अशीच आटोपली.

***

दोन वर्षांनी झालेल्या कान्हाच्या बारशाला मात्र तिने आधीच छान तयारी (अगदी आर्थिकही) केली होती.

एक एक तास काढून आई-सासूबाईंना सुंदर साड्या घेतल्या, कधीची मनात भरलेली हिरवीगार पैठणी घेतली. तिला पसंत असलेला, उत्कृष्ट कॅटरींग असणारा हॉल बुक केला. नवर्याने, तिने दोघांनी कधीतरी विंडो शॉपिंग करताना आधीच बघून ठेवलेले डायमंडचे इअरींग गिफ्ट करून अजुनच रंगत आणली.

कितीतरी दिवसांनी खरचं सगळं तिच्या मनासारखं जुळून आलं होतं.

सर्वार्थाने लाडक्या त्या फोटो मध्ये ती हरवून गेली.