विषय :- स्त्रीला समजून घेणं खरचं कठीण असतं का हो?
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
अबोली दिसायला एकदम सुंदर, गोरीपान, नाकी डोळी पण चांगली, तिच्या बोलक्या स्वभावामुळे क्षणात कुणालाही आपलंसं करून टाकणारी. मात्र माहेरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि शिक्षणाला पैसे आणायचे कुठून म्हणून ग्रॅज्युएट होऊन घरीच तिने मुलांचे क्लास घ्यायला सुरुवात केली.
घरची परिस्थिती अशी असल्यामुळे लग्नाला थोडा उशीर झाला. पण म्हणतात ना लग्नगाठ ही स्वर्गात बांधली जाते आणि तिच्या बाबतीत अगदी तसंच झालं,घरी बसल्या बसल्या एक खूप श्रीमंत स्थळ तिला चालून आले.
अजय म्हणजे तिचा होणारा नवरा अजय याने पहिल्याच भेटीत तिला पसंद केलं. तसा तो ही खूप सुंदर होता दिसायला.एका मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याने तिला हुंडा न मागता पसंती दर्शवली.
लग्न झाले, दोघांचा संसार सुरू झाला. घरात फक्त सासूबाई, अजय आणि अबोली एवढी लोकं होती.लग्न झालेली नणंद होती पण ती तिच्या संसारात मग्न होती.
लग्नानंतर सगळं नीट चालू होतं.रोजची कामं करायची आणि निवांत लोळायचं.. नाही तर टीव्ही बघायचा पण तिचं कशात मन लागत नव्हतं. कारण माहेरी तिला ट्युशन घ्यायची सवय होती आणि सासरी बघितलं तर फारसं काम नसायचं.
असेच आनंदात काही महिने गेले तिला कामाशिवाय काही करमेना , तिला घरी बोअर वाटू लागलं तिने हे अजयला बोलून दाखवलं.
" अजय, अरे... मला फार बोअर होत आहे घरी, घरची काम करायची पण किती!"
" अगं जरा घराच्या बाहेर पड, मैत्रिणींना भेट, हवं तर माहेरी जाऊन ये."
" तसं नाही... पण.. अरे, मला कळत नाही तुला काय आणि कसं सांगू?"
" अगं आपल्या लग्नाला अजुन वर्ष पण नाही झालं आणि तुला बोअर व्हायला लागलं.अजुन पूर्ण आयुष्य काढायचं आहे आपल्याला सोबत."
" अजय! अरे बसून बसून कंटाळा यायला लागला मला.अरे तू सोबत असला की चांगलं वाटत पण...!!!"
" पण काय???"
तिच्या मनात काही वेगळचं चालू होतं. खरं तर तिला सांगायचं होत की तिला परत कामाला सुरुवात करायची आहे. पण तिने स्वतः आवरलं आणि मनातच ठेवलं.
" काहीचं नाही"..म्हणत ती किचनमध्ये गेली.
अजयला काही कळलं नाही. तो ही टीव्ही पाहण्यात मग्न झाला.
खरं तर अजय बऱ्याचं वेळा बाहेरगावी जायचा. सासूबाई जास्त बोलत नव्हत्या.अबोलीचा स्वभाव मात्र बोलका असल्यामुळे तिला घरात करमेना.
एक दिवस अबोलीने अजयला चहा दिला आणि म्हणाली,
"अजय अरे मला घराच्या बाहेर पडायचं आहे. मी नोकरी करू का?की परत ट्युशन सुरू करू?"
"अगं तुला नोकरीची काय गरज आहे? सगळं आहे घरी आपल्या."
" हो बरोबर.. सगळं आहे घरी आपल्या पण?"
" तुला आई काही बोलली का?"
तेवढ्यात आई बाहेर आली....तिने हे सगळं ऐकलं होतं. ती जरा ठेक्यात बोलली,...
" मी कशाला काही बोलू, तीचं घर आहे तिची मर्जी चालते. हो फक्त मला ज्या गोष्टी नाही पटत त्या मी बोलते. मी तिला त्या दिवशी सहज बोलले,चारी पाय सुखात आहे बाई तुझे, नाहीतर आम्ही लग्न करून आलो तेव्हा दहा दहा लोकांच्या भाकरी थापाव्या लागायच्या. आता तर तुझ्या हाताखाली नोकर आहेत घरात दोनचं माणसं असून सुद्धा!काय कमी आहे तुला? पैशाची ना सुखाची."
" अबोली, खरचं ... अगं आई बरोबर बोलतेय."
" अजय,आई त्यांच्या मनात जे आहे ते बोलतात त्यांना त्याच्यात सुख वाटतं ना!. पण मला नाही वाटत त्यात सुख. अरे, माझ्या मनाचा कधी विचार केला का?.कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलासं तू? नाही ना !! कसं कळणार तुला?"
" अबोली, तू ना कुठला विषय कुठे नेऊ नकोस."
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
"अगं तुला काय झालं भरल्या घरात रडायला?" सासूबाई जोरात ओरडल्या.
अबोलीने आईकडे बघितलं..आणि म्हणाली,
" आई फक्त पैसा म्हणजे सुख आहे का? तुमच्या मते आयुष्यात फक्त पैसा हवा, बाकी काहीच नको.
अहो मला इथे येऊन वर्ष होईल आता, मला असं वाटते माझं जगणं फक्त तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी तर जगणं सोडून दिलं. रोजची कामं करायची आणि बसायचं. त्यात रोज सकाळ संध्याकाळी भाजी अजयच्या नाहीतर तुमच्या आवडीची ,तुम्ही कधी विचारलं मला अगं तुला काय आवडते? नाही ना!..नाही आवडत काही भाज्या मला तेव्हा नाही खाल्लं तुम्ही बोलायला काही कमी करत नाही...\"तुझं तर नेहमीचे नाटक झालं आहे\" हे, असे बोलून मोकळ्या होता तुम्ही."
अहो मला इथे येऊन वर्ष होईल आता, मला असं वाटते माझं जगणं फक्त तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी तर जगणं सोडून दिलं. रोजची कामं करायची आणि बसायचं. त्यात रोज सकाळ संध्याकाळी भाजी अजयच्या नाहीतर तुमच्या आवडीची ,तुम्ही कधी विचारलं मला अगं तुला काय आवडते? नाही ना!..नाही आवडत काही भाज्या मला तेव्हा नाही खाल्लं तुम्ही बोलायला काही कमी करत नाही...\"तुझं तर नेहमीचे नाटक झालं आहे\" हे, असे बोलून मोकळ्या होता तुम्ही."
"अजय महिन्यातून बराच वेळा बाहेर असतो, जेव्हा घरी येतो तेव्हा सुद्धा त्याचं काम आणि काही वेळ असला तर तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जाता. तुम्हीच सांगा नवरा असून तो माझ्या वाटेला किती येतो?"
" म्हणजे त्याचं कर्तव्य फक्त नवरा म्हणून आहे, मुलगा म्हणून काहीचं नाही का? अस म्हणायचं आहे का तुला?"आई अजयकडे बघत म्हणाली.
" आई अहो, हेच तर चुकते ना. .तुम्ही लग्न तर लावून दिलं मुलाचं पण तुम्हाला सून नकोय असं स्पष्ट दिसते. फक्त कामवाली बाई हवी आहे, न बोलता घरचं सगळं करत रहायच. दिवसातून किती शब्द बोलतो आम्ही दोघे? तसं सांगायला गेलं तर मी एकटीच त्यांच्याशी बोलते, त्यांना खूप काम असतं त्यांना नाही वेळ माझ्याशी बोलायला. आणि मी बोलले तर माझे शब्द फक्त ...जेवण करून घ्या, वाढू का? चहा घेता का? बस. ना विचारांची देवाणघेवाण ,ना भविष्याचा काही विचार. माझ्या मनात काय चालू असतं ...त्याला काहीच किंमत नाही."
अजय तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला.
" खरचं मी श्रींमत घरात आले, माझ्या कपाटात खूप महागड्या साड्या आहेत, दागिने आहेत पण त्यातली एकही वस्तू माझ्या आवडीने घेतलेली नाही. खरचं माझ्याकडे कशाची कमी नाही.... पण त्या महागड्या साड्या ते दागिने नाही बोलत माझ्याशी...आणि नाही कळत मी बोललेल त्यांना, नाही संवाद होत आमच्यात."
" गरिबाच्या घरी दिलं असतं तेव्हा कळलं असतं तुला. जेव्हा अंगावर एक फाटकी साडी आणि एक फुटका मनी असता आणि खायला चटणी भाकर." आई किचनमध्ये जाता जाता बोलल्या.
" आई जर तिथे माझ्या मनाचा विचार केला गेला असता तर ते प्रिय असतं मला. तुमच्या सोबत कुठे जायचं ठरलं, कुठल्या नातेवाईकांकडे जाणं झालं तर तुम्हाला विचारल्याशिवाय कपडे घालायची परवानगी नाही मला. अशीच घालायची,आणि तो रंग सुद्धा तुम्हीच ठरवा. मला तुम्ही इथे शोभेची बाहुली बनवुन ठेवली आहे. तुमच्या घरात बाहेरच कुणी आलं की माझ्या बद्दल काय बोलता हे माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहीत."
" अगं कुठली सासू सुनेचे गुणगान करते सांग गं?"
" नका करू कौतुक, पण मी भांडखोर आहे, मला काहीच येत नाही, पैशाची उधळण करते अस खोटं बोलू तर नका."
"आणि दुसरं म्हणजे एक वर्षानंतर घरात पाळणा हलला पाहिजे. निदान हा तरी निर्णय माझा मला घेऊ द्या. आयुष्यभर काय मी फक्त तुमच्या आणि अजयच्या मनाने वागायचं...मला मन आहे हे विसरलात तुम्ही."
आता वाद वाढणार त्याआधी अजय बोलला,
" अबोली, आत जा."
अबोली काहीही न बोलता उठून आत गेली, तिच्या पाठोपाठ अजय गेला.
"अबोली तू चिडू नकोस, अगं आई आता म्हातारी झाली, तिच्या मनासारखं वागलं तर काय बिघडलं?"
" म्हणजे मी सतत इतरांच्या मर्जीने वागायचं. माझं मन आहे का नाही?"
" अजय तुला सुद्धा वाईट वाटेल... पण अरे,दिवाळीच्या वेळी माझा वाढदिवस होता, त्यावेळी तुम्हा बहीण भावांनी केकचा कुठला फ्लेवर आवडतो तो तुम्ही आणला, तुला एक वेळ सुद्धा वाटलं नाही का की, मला विचारावं कुठला आणु? तुला कुठला केक आवडतो? गिफ्ट आणायचं सोडून सरळ पैसे देऊन मोकळं झाला. अरे त्या पैशापेक्षा तू दोनशे रुपयाची तुझ्या आवडीची साडी जरी आणली असती ना खूप
आनंद झाला असता रे मला."
आनंद झाला असता रे मला."
"अजय माहीत आहे मला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मन दुखतं रे या गोष्टींनी आणि मग मनाला खूप एकटं वाटतं. आपल कुणीचं नाही असं वाटायला लागतं."
" अगं पण तुला आणलेलं गिफ्ट नसतं आवडलं तर?"
" वर्षभरात मला कसं माहीत रे...तुला काय आवडतं? तुला जेवणात काय आवडतं? तुला कुठला रंग आवडतो? तुला कुठली भाजी आवडते? खरच एवढं कठीण आहे का रे एका बायकोच्या, एका स्त्रीच्या मनातलं ओळखणं, नाही ना?"
" अबोली, अगं मला माफ कर, खरचं मी तुला नाही समजू शकलो. कधी कधी आम्हा पुरुषांना वाटत बाईला मस्त महागड्या साड्या ,दागदागिने असले तर त्या खुश असतात . पण तसं नसतं... खरं सुख त्यांना स्वातंत्र्य देण्यात, त्यांचं घरात अस्तित्व आहे हे सगळं मानण्यात आहे."
" अबोली, तुला क्लास घायचे असतील तर तू घेऊ शकते, तुला तुझ्या मर्जीने वाग, तू आज मनमोकळे पणाने बोललीस तशीच कायम रहा. आणि आता आपल्या लग्नाचा वाढदिवस येणार आहे, तेव्हा तुला घेऊन तुझ्या आवडीची साडी... सॉरी तुला हवं ते घे."
अबोली गालात हसली आणि हळूच त्याच्या मिठीत शिरली.
समाप्त...
माझी ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद!
©®कल्पना सावळे
जिल्हा :- पुणे