तिच्या मनाचे खेळ

तिच्या मनाचे खेळ


" प्लीज  ......  नको नं मला ......  मळमळतयं ... उलटी आल्यासारखं होतयं ", समोरचं जेवणाचं ताट बाजूला सारत ती म्हणाली .

" बरं मग, दुसरं काहीतरी खाते का?  तुला मस्तं, तुझ्या आवडीची भेळ मागवू का?", तिने काहीचं खाल्ले नाही म्हणून काळजीने त्याने तिला विचारले.

" नको रे  ... या दिवसांत बाहेरचं खाल्लेलं बरं नसतं.",  तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.

" अगं, तू काही न खाऊन कसं चालेल?  तुझ्या पोटात बाळ आहे ..... त्याचा तरी विचार कर ..... त्याला तू उपाशी ठेवणार आहेस का?", तो थोडा चिडूनचं बोलला.

" नाही होत रे खायला ... त्याला मी काय करू?", तीही आता वैतागली.

" अगं, असं म्हणून कसं चालेल?  डॉक्टरांनी सांगितले होते नं, बाळाच्या वाढीसाठी सकस आहार घेतला पाहिजे.  आपलं बाळ तुला हेल्दी व्हायला हवं आहे नं!  मग तुला मळमळत असेल तरी, खायला हवं.", त्याने तिला समजावतं, पुनः जेवणाचे ताट तिच्यासमोर सरकवले.

तिने पुन्हा काही न बोलता ताट मागे सारले. ..

" चला, बाळाला जेवण भरवयाची वेळ झाली." असं म्हणून, त्याने चपाती भाजीचा घास तिच्या तोंडाजवळ नेला.

" तू पण नं!  माझी काळजी करणार नाही पण बाळाची आतापासून काळजी घेतो.", असं म्हणून तिने घास तोंडात घेतला.

" हा घास चिऊचा, हा घास काऊचा ", असं म्हणतं तो तिला जेवण भरवत होता.

तिची आई, दारामागे उभी राहून, आपल्या मुलीचं सगळं कौतुक पाहत होती.  जावई, आपल्या मुलीची मनापासून किती काळजी घेतोय, याचं तिला समाधान वाटत होतं.

जेवणानंतर, तो तिला गॅलरीत फेऱ्या मारायला घेऊन गेला.  थोडावेळ मोबाईल वर टाईमपास करून ती झोपल्यानंतर, तो रुमच्या बाहेर, हॉल मध्ये आला.

हॉलमध्ये, तिच्या बाळंतपणासाठी मुद्दाम बोलावून घेतलेले सासूसासरे, जन्माला येणाऱ्या बाळाविषयी, स्वप्न रंगवत होते.  पहिल्यांदाच आजी आजोबा होणार म्हणून खूप आनंदात होते.

" काय मग बाळ जेवलं का? आमचं येणारं नातवंडं फार नशिबवान आहे बरं!  त्याला तुमच्या सारखा काळजी घेणारा, प्रेम करणारा बाप मिळणार म्हणून!", जावयाला पाहून, तिच्या आईने त्याचे कौतुक केले.

" खरचं जावईबापू, आमची मुलगी खूप नशिबवान आहे आणि आम्ही सुद्धा.", तिच्या वडिलांनी, तिच्या आईच्या बोलण्याला दुजोरा दिला.

तो मात्र संभ्रमात पडला.  त्या दोघांच्या बोलण्यावर, नक्की काय उत्तर द्यावे, त्याला समजत नव्ह्ते.  नकळत त्याचे डोळे पाणावले. 

त्याला असं शांत राहिलेलं पाहून, न राहवून, तिच्या वडिलांनी विचारले, " जावई बापू सगळं ठिक आहे नं?  काळजी करण्याचे काही कारण नाही नं?"

त्यांना सांगावे की नाही, याचा विचार करतं,  शेवटी त्याने नाईलाजाने सत्य परिस्थिती कथन केली.

" तिला दिवस गेले नाहीत.  ती गरोदर नाही. " 

" म्हणजे?", दोघांनी आश्चर्य वाटून एकदम आ वासला.

" मेडिकली दोघांचे रिपोर्ट नॉर्मल असूनही, लग्नाला पाच वर्षे झाले तरी, ती गर्भवती होऊ शकली नाही.  याचे तिने टेन्शन घेतले आहे." तो कसाबसा बोलून गेला.

" कसं शक्य आहे?  गेले तीन महिने तिला मासिक पाळी आली नाही.  प्रेग्नशी रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला.  असे तिनेच मला फोनवर सांगितले होते.", तिच्या आईने शंका बोलून दाखवली.

" हो!  ते खरे आहे. म्हणजे अर्धसत्य आहे.  तिला गेले तिन महिने मासिक पाळी आली नाही.  पण प्रेग्नशी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे." तो होकार देत पुढे बोलू लागला, " सगळं काही नॉर्मल असूनही, बाळाचं सुख पदरात नाही, ही गोष्ट तिने मनाला फार लावून घेतली आहे.  याचाच परिणाम तिच्या मासिक पाळीवर सुद्धा झाला आहे.  कधी दोन दोन महिने किंवा कधी तीन महिन्यांच्या गॅपने तिला पाळी येते."

" मग तिला येणारी चक्कर, होणारी मळमळ आणि मघाशी तुम्ही आतमध्ये बाळाला चिऊ काऊ च्या गोष्टी सांगत, तिला भरवत होता ते ... ते काय होतं?", तिच्या आईने कापऱ्या आवाजात विचारलं.

" तिच्या मनाचे खेळ!  त्याच्यात ती रमते.  तिचं दुःख तेवढ्यापुरते तरी ती विसरते.  म्हणून मीही तिच्या त्या खेळात सामील होऊन तिला साथ देतो.

अलीकडे, तिची मासिक पाळी मिस् झाली की तिला असे झटके यायला सुरवात होते.  तिला चक्कर आल्यासारखं वाटते, काही खाल्लं की मळमळतंय, असं वाटायला लागते.  एका गरोदर बाईला सुरवातीच्या काळात, जी लक्षणे दिसतात, ती सगळी लक्षणे अनुभवयला तिची सुरुवात होते.", तो निर्विकारपणे बोलत होता.

"अरे देवा!", म्हणतं तिच्या आईने कपाळाला हात लावला.

" यावर काही डॉक्टरी उपाय नाही का?", न राहवून वडिलांनी चिंता बोलून दाखवली.

" तिला मासिक पाळी आली की, गर्भपात झाला असं समजून ती रडत बसेल.  गेले आठ नऊ महिने हे असेच चक्र चालूच आहे."  एक मोठा सुस्कारा सोडत त्याने उत्तर दिले

" परंतु, तिचे हे मनातलं खुळ कधी थांबेल ?", वडीलांनी त्यांची काळजी बोलून दाखवली.

" डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ती निसर्गतः आई झाल्यावर, तिचे हे वेड आपोआप जाईल.  पण ती वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही." हवेत हात उडवत तो म्हणाला.

" तोपर्यंत आपण काय करायचं?", न राहवून आईने रडवेल्या सुरात विचारले.

" तिच्या मनाच्या खेळात, आपण सर्वांनी सामील व्हायचं.  ती आई होण्यासाठी वाट बघण्या पलिकडे, आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही.", डोळे मिटून आवंढा गिळत, त्याने उत्तर दिले.

समाप्त

कथा आवडली असल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा.
=================================